नोव्हेंबर
शनिवार, १ नोव्हेंबर
तू लहान मुलांना आणि तान्ह्या बाळांना आपल्या तोंडाने स्तुती करायला लावलं आहेस.—मत्त. २१:१६.
तुम्हाला जर मुलं असतील, तर त्यांच्या वयाप्रमाणे उत्तरं द्यायची तुम्ही त्यांच्याकडून तयारी करून घेऊ शकता. कधीकधी सभेत काही गंभीर विषयांवर, जसं की वैवाहिक समस्यांवर किंवा नैतिक विषयांवर चर्चा केली जाते. पण लेखात असे एकदोन परिच्छेद तर नक्कीच असतील ज्यांवर तुमची मुलं उत्तरं देऊ शकतील. यासोबतच मुलांना हे समजावून सांगा, की प्रत्येक वेळा त्यांनी हात वर केला म्हणजे त्यांना उत्तर विचारलंच जाईल असं नाही. काही वेळा कदाचित त्यांना विचारलं जाणार नाही. त्यामुळे जेव्हा त्यांच्याऐवजी इतरांना उत्तर विचारलं जातं तेव्हा मुलांना वाईट वाटणार नाही. (१ तीम. ६:१८) यहोवाची स्तुती होईल आणि आपल्या भाऊबहिणींना प्रोत्साहन मिळेल अशी उत्तरं आपण सगळेच तयार करू शकतो. (नीति. २५:११) उत्तर देताना एखाद्या वेळी आपण स्वतःचा अनुभव थोडक्यात सांगू शकतो. पण स्वतःबद्दल खूप जास्त बोलायचं आपण टाळलं पाहिजे. (नीति. २७:२; २ करिंथ. १०:१८) त्याऐवजी आपण यहोवा, त्याचं वचन आणि त्याचे लोक या गोष्टींवर भर दिला पाहिजे.—प्रकटी. ४:११. टेहळणी बुरूज२३.०४ २४-२५ ¶१७-१८
रविवार, २ नोव्हेंबर
आपण इतरांप्रमाणे झोपेत राहू नये, तर जागं आणि सावध राहावं.—१ थेस्सलनी. ५:६.
जागं आणि सावध राहण्यासाठी प्रेम खूप महत्त्वाचं आहे. (मत्त. २२:३७-३९) प्रचार कार्यात कितीही अडचणी आल्या तरी देवावरचं प्रेम आपल्याला प्रचार कार्य करत राहायला मदत करेल. (२ तीम. १:७, ८) कारण देवाची सेवा न करणाऱ्या लोकांवरसुद्धा आपलं प्रेम असल्यामुळे आपण प्रचार कार्य करत राहतो, तसंच फोन आणि पत्राद्वारेसुद्धा लोकांना साक्ष देतो. लोक एक ना एक दिवस बदलतील आणि जे योग्य आहे ते करतील अशी आशा आपण सोडत नाही. (यहे. १८:२७, २८) आपले भाऊबहीणसुद्धा आपले शेजारी आहेत आणि त्यामुळे आपण त्यांच्यावरसुद्धा प्रेम केलं पाहिजे. ‘एकमेकांना प्रोत्साहन देऊन आणि एकमेकांना बळकट करून’ आपण हे प्रेम दाखवू शकतो. (१ थेस्सलनी. ५:११) खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या सैनिकांप्रमाणेच आपणसुद्धा एकमेकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपण कधीच जाणूनबुजून आपल्या भाऊबहिणींना दुखावणार नाही किंवा वाइटाची फेड वाइटाने करणार नाही. (१ थेस्सलनी. ५:१३, १५) तसंच मंडळीत नेतृत्व करणाऱ्या बांधवांचा आदर करूनसुद्धा आपण आपलं प्रेम दाखवू शकतो.—१ थेस्सलनी. ५:१२. टेहळणी बुरूज२३.०६ १० ¶६; ११ ¶१०-११
सोमवार, ३ नोव्हेंबर
यहोवा जे बोलेल, ते तो पूर्ण करणार नाही का?—गण. २३:१९.
आपला विश्वास मजबूत करण्याचा एक मार्ग म्हणजे खंडणी बलिदानावर मनन करणं. कारण खंडणी बलिदानामुळेच आपल्याला याची खातरी मिळते, की यहोवा त्याची सगळी अभिवचनं नक्की पूर्ण करेल. खंडणी बलिदानाची गरज का पडली, आणि त्यासाठी देवाला किती मोठी किंमत चुकवावी लागली या गोष्टींवर आपण सखोल विचार करतो, तेव्हा नवीन जगात कायमचं जीवन देण्याचं जे अभिवचन देवाने आपल्याला दिलं आहे त्यावरचा आपला विश्वास आणखी वाढतो. आपण असं का म्हणू शकतो? विचार करा, यहोवाने खंडणी बलिदान देण्यासाठी आपल्या एकुलत्या एका मुलाला, आपल्या सगळ्यात जवळच्या व्यक्तीला स्वर्गातून पृथ्वीवर परिपूर्ण मानव म्हणून पाठवलं. आणि मग पृथ्वीवर असताना येशूला वेगवेगळ्या कठीण परीक्षांचा सामना करावा लागला. आणि शेवटी त्याचा छळ करण्यात आला आणि त्याला वेदनादायक मृत्यू सहन करावा लागला. खरंच, खंडणी बलिदान देण्यासाठी यहोवाला खूप मोठी किंमत चुकवावी लागली! आपल्याला फक्त काही वर्षांसाठी एक चांगलं जीवन जगता यावं म्हणून आपल्या प्रेमळ देवाने त्याच्या एकुलत्या एका मुलाचा इतका छळ आणि वेदनादायक मृत्यू होऊ दिला असता का? नक्कीच नाही. (योहा. ३:१६; १ पेत्र १:१८, १९) पण ज्या अर्थी त्याने आपल्यासाठी इतकी मोठी किंमत दिली त्या अर्थी नवीन जगात कायमचं जीवन देण्याचं जे अभिवचन त्याने दिलं आहे ते तो नक्की पूर्ण करेल. टेहळणी बुरूज२३.०४ २७ ¶८-९
मंगळवार, ४ नोव्हेंबर
अरे मरणा, तुझा डंख कुठे आहे?—होशे. १३:१४.
मृत लोकांचं पुनरुत्थान करायची यहोवाची खरंच इच्छा आहे का? हो नक्कीच आहे. म्हणूनच तर बायबलच्या कितीतरी लेखकांना त्याने पुनरुत्थानाच्या आशेबद्दल लिहिण्याची प्रेरणा दिली. (यश. २६:१९; प्रकटी. २०:११-१३) आणि जेव्हा यहोवा एखादं अभिवचन देतो तेव्हा तो ते नक्की पूर्ण करतो. (यहो. २३:१४) खरंतर मृत लोकांचं पुनरुत्थान करण्यासाठी यहोवा स्वतः खूप आतुर आहे. ईयोबने काय म्हटलं होतं त्याचा विचार करा. त्याला खातरी होती, की त्याचा मृत्यू जरी झाला तरी यहोवा त्याला पुन्हा जिवंत करण्यासाठी आतुर असेल. (ईयो. १४:१४, १५, तळटीप) यहोवाच्या ज्या उपासकांचा मृत्यू झाला आहे त्यांना पुन्हा उठवण्यासाठी यहोवा तितकाच आतुर आहे. तो लवकरच त्यांना पुन्हा जिवंत करेल. आणि तेव्हा ते आनंदी आणि निरोगी जीवन जगतील. पण त्या लाखो लोकांबद्दल काय ज्यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांना यहोवाबद्दल शिकण्याची संधी मिळाली नाही? आपल्या प्रेमळ देवाला त्यांनाही जिवंत करायची इच्छा आहे. (प्रे. कार्यं २४:१५) त्यांनाही त्याचे मित्र बनता यावं आणि या पृथ्वीवर कायमचं जीवन जगण्याची संधी मिळावी अशी त्याची इच्छा आहे.—योहा. ३:१६. टेहळणी बुरूज२३.०४ ९ ¶५-६
बुधवार, ५ नोव्हेंबर
देव आम्हाला ताकद देईल.—स्तो. १०८:१३.
तुम्ही तुमची आशा कशी मजबूत करू शकता? तुम्हाला जर पृथ्वीवर कायम जगण्याची आशा असेल तर बायबलमध्ये नंदनवन पृथ्वीचं जे वर्णन केलं आहे, ते वाचा आणि त्यावर मनन करा. (यश. २५:८; ३२:१६-१८) नवीन जगात जीवन कसं असेल याचा विचार करा. तुम्ही प्रत्यक्ष तिथे आहात अशी कल्पना करा. जर अशा प्रकारे आपण नवीन जगाची आशा नेहमी आपल्या डोळ्यांसमोर ठेवली, तर आपल्याला आपल्या समस्या ‘तात्पुरत्या आणि हलक्या’ वाटतील. (२ करिंथ. ४:१७) यहोवाने आपल्याला जी आशा दिली आहे, त्यामुळे आपल्याला समस्यांचा सामना करण्यासाठी बळ मिळतं. यहोवाकडून बळ मिळवण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे, त्या त्याने आपल्याला आधीच पुरवल्या आहेत. त्यामुळे जेव्हा तुम्हाला तुमची नेमणूक पूर्ण करण्यासाठी, समस्येचा सामना करण्यासाठी आणि आपला आनंद टिकवून ठेवण्यासाठी मदतीची गरज असते, तेव्हा यहोवाला कळकळून प्रार्थना करा. आणि व्यक्तिगत अभ्यास करून त्याच्याकडून मार्गदर्शन मिळवा. तसंच भाऊबहिणींकडून मिळणारं प्रोत्साहन स्वीकारा. आणि आपल्या आशेवर मनन करण्यासाठी वेळ काढा. असं केल्यामुळे “सहनशक्ती दाखवून आनंदाने धीर धरता यावा, म्हणून तुम्हाला त्याच्या गौरवी सामर्थ्याच्या शक्तीने ताकद” मिळेल.—कलस्सै. १:११. टेहळणी बुरूज२३.१० १७ ¶१९-२०
गुरुवार, ६ नोव्हेंबर
सर्व गोष्टींसाठी आभार माना.—१ थेस्सलनी. ५:१८.
प्रार्थनेत यहोवाचे आभार मानण्याची कितीतरी कारणं आपल्याकडे आहेत. आपल्याकडे असलेल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीसाठी आपण त्याचे आभार मानू शकतो. कारण शेवटी प्रत्येक चांगली देणगी देणारा तोच आहे. (याको. १:१७) उदाहरणार्थ, या सुंदर पृथ्वीसाठी आणि सृष्टीतल्या अद्भुत गोष्टींसाठी आपण त्याचे आभार मानू शकतो. याशिवाय आपल्याला जीवन दिल्याबद्दल तसंच कुटुंब, मित्र आणि एक सुंदर आशा दिल्याबद्दल आपण त्याचे आभार मानू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, यहोवाने आपल्याला त्याच्यासोबत मैत्री करण्याची संधी दिली याबद्दल आपण त्याचे आभार मानू शकतो. यहोवाने खास माझ्यासाठी काय केलं आहे आणि त्याबद्दल मला त्याचे आभार कसे मानता येतील याचा विचार करण्यासाठी कदाचित आपल्याला विशेष प्रयत्न करावे लागतील. आपण अशा जगात जगत आहोत जिथे कोणीही उपकाराची जाणीव ठेवत नाही. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कदर बाळगण्याऐवजी लोक सहसा आपल्याला आणखी काय-काय पाहिजे याचाच जास्त विचार करतात. आपलीही वृत्ती अशीच झाली तर आपल्या प्रार्थना, विनंत्यांची एक मोठी यादीच बनून जाईल. आपण जर काळजी घेतली नाही तर आपणही त्यांच्यासारखेच होऊ शकतो. आणि मग प्रार्थनेत यहोवाचे आभार मानण्याऐवजी प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या गोष्टीची आपण त्याच्याकडे विनंतीच करत असू. आपल्या बाबतीत असं होऊ नये म्हणून यहोवा आपल्यासाठी जे काही करतो त्याबद्दल आपण कदर बाळगली पाहिजे आणि ती व्यक्तही केली पाहिजे.—लूक ६:४५. टेहळणी बुरूज२३.०५ ४ ¶८-९
शुक्रवार, ७ नोव्हेंबर
मनात कोणतीही शंका न बाळगता विश्वासाने मागत राहा.—याको. १:६.
यहोवा एक प्रेमळ पिता असल्यामुळे त्याला आपण त्रासात असलेलं कधीच बघवत नाही. (यश. ६३:९) पण तरीसुद्धा नद्या आणि आगीच्या ज्वालांसारख्या आपल्यावर येणाऱ्या सगळ्याच परीक्षांमधून तो आपल्याला वाचवत नाही. (यश. ४३:२) पण या परीक्षांना तू “ओलांडशील” असं अभिवचन मात्र तो आपल्याला देतो. कोणत्याही समस्येमुळे किंवा परीक्षांमुळे तो कधीच आपलं कायमचं नुकसान होऊ देणार नाही. तसंच येणाऱ्या परीक्षांना आपल्याला धीराने तोंड देता यावं म्हणून तो त्याची पवित्र शक्तीसुद्धा देतो. (लूक ११:१३; फिलिप्पै. ४:१३) त्यामुळे परीक्षांना धीराने सहन करायला आणि विश्वासू राहायला ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे अगदी त्याच गोष्टी तो आपल्याला पुरवेल अशी खातरी आपण ठेवू शकतो. आपण यहोवावर भरवसा ठेवावा अशी तो आपल्याकडून अपेक्षा करतो. (इब्री ११:६) आपल्यावर येणाऱ्या परीक्षांमुळे कधीकधी आपण भारावून जाऊ शकतो. इतकंच काय तर यहोवा आपल्याला मदत करेल की नाही अशीसुद्धा शंका आपल्या मनात येऊ शकते. पण बायबल याची खातरी देतं की देवाच्या सामर्थ्याने आपण “तट ओलांडू शकतो.” (स्तो. १८:२९) त्यामुळे अशा शंकांना बळी पडण्याऐवजी आपण पूर्ण विश्वासाने यहोवाला प्रार्थना केली पाहिजे आणि तो आपल्या प्रार्थनेचं उत्तर नक्की देईल असा भरवसा ठेवला पाहिजे.—याको. १:६, ७. टेहळणी बुरूज२३.११ २२ ¶८-९
शनिवार, ८ नोव्हेंबर
प्रेमाच्या ज्वाला धगधगत्या आगीसारख्या आहेत. ती याहची ज्वाला आहे. पाण्याचे लोट प्रेमाला विझवू शकत नाहीत आणि नद्या त्याला बुडवू शकत नाहीत.—गीत. ८:६, ७.
खऱ्या प्रेमाचं हे किती सुंदर वर्णन आहे. पती-पत्नींनो तुमच्यामध्ये कधीही न मिटणारं प्रेम असू शकतं याची खातरी या शब्दांमधून मिळते. एका जोडप्यामधलं प्रेम शेवटपर्यंत टिकेल की नाही हे त्यांच्यावरच अवलंबून असतं. उदाहरणार्थ, एखादी शेकोटी कायम जळत राहू शकते, पण त्यासाठी त्यामध्ये कायम लाकडं टाकत राहावी लागतील. असं केलं नाही तर शेकोटी हळूहळू विझून जाईल. त्याचप्रमाणे, पती-पत्नीमधलं प्रेमही शेवटपर्यंत टिकून राहू शकतं, पण त्यासाठी त्यांना आपल्या नात्याला खतपाणी घालत राहावं लागेल. काही वेळा एखाद्या जोडप्याला जाणवेल, की त्यांचं आपसातलं प्रेम कमी होत चाललंय. खासकरून आर्थिक संकटाचं, आरोग्याच्या समस्यांचं किंवा मुलांना वाढवायच्या जबाबदारीचं दडपण असतं तेव्हा. म्हणून “याहची ज्वाला” जर जिवंत ठेवायची असेल, तर पती-पत्नी दोघांनीही यहोवासोबतचं त्यांचं नातं मजबूत ठेवण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे. टेहळणी बुरूज२३.०५ २०-२१ ¶१-३
रविवार, ९ नोव्हेंबर
तू घाबरू नकोस.—दानी. १०:१९.
धैर्य हा गुण जर आपल्यामध्ये वाढवायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे? आपण धैर्य दाखवायला कचरू नये म्हणून कदाचित आपले आईवडील आपल्याला प्रोत्साहन देतील. पण हा गुण ते आपल्याला वारशाने देऊ शकत नाहीत. म्हणून धैर्य हा गुण दाखवायला आपण स्वतःच शिकलं पाहिजे. हे एखादं नवीन कौशल्य शिकण्यासारखं आहे. आपल्याला जर एखादं कौशल्य चांगल्या प्रकारे शिकायचं असेल, तर त्याचा एक मार्ग म्हणजे आपल्याला शिकवणारी व्यक्ती काय करते याचं अगदी जवळून निरीक्षण करून तिचं अनुकरण आपण केलं पाहिजे. त्याचप्रमाणे इतर जण धैर्य कसं दाखवत आहेत याचं जवळून निरीक्षण करून आणि त्यांच्या उदाहरणाचं अनुकरण करून आपण धैर्य दाखवू शकतो. म्हणून दानीएलसारखं आपणसुद्धा देवाच्या वचनाचा चांगल्या प्रकारे अभ्यास केला पाहिजे, त्याच्याशी मनमोकळेपणाने आणि वारंवार बोलत राहिलं पाहिजे आणि त्याच्याशी एक चांगलं नातं जोडलं पाहिजे. तसंच, तो आपल्याला कधीच सोडणार नाही असा भरवसा आपण बाळगला पाहिजे. मग जेव्हा आपल्या विश्वासाची परीक्षा होईल, तेव्हा आपल्यालासुद्धा धैर्य दाखवता येईल. जे लोक धैर्य दाखवतात, त्यांचा इतर जण सहसा आदर करतात. शिवाय, त्यामुळे नम्र मनाचे लोक यहोवाकडे आकर्षित होतात. तर मग, धैर्य हा गुण स्वतःमध्ये वाढवण्यासाठी आपल्याकडे नक्कीच खूप चांगली कारणं आहेत. टेहळणी बुरूज२३.०८ २ ¶२; ४ ¶८-९
सोमवार, १० नोव्हेंबर
सगळ्या गोष्टींची खातरी करा.—१ थेस्सलनी. ५:२१.
या वचनात “खातरी करा” असं ज्या ग्रीक शब्दाचं भाषांतर केलं आहे तो शब्द सहसा सोन्याचांदीसारख्या मौल्यवान धातूंची पारख करण्यासाठी वापरला जायचा. त्यामुळे आपणसुद्धा ऐकलेल्या किंवा वाचलेल्या एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याआधी ती खरी आहे का याची पारख करणं गरजेचं आहे. मोठं संकट इतकं जवळ असताना आज आपल्यासाठी ही गोष्ट जास्त गरजेची आहे. म्हणून सगळ्याच गोष्टींवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याऐवजी आपण आपल्या विचारशक्तीचा वापर केला पाहिजे. आणि आपण जे काही वाचतो किंवा ऐकतो त्याची तुलना बायबल आणि यहोवाची संघटना आपल्याला जे सांगते त्याच्याशी केली पाहिजे. असं केल्यामुळे दुष्ट स्वर्गदूतांनी प्रेरित केलेल्या आणि दिशाभूल करणाऱ्या गोष्टींमुळे आपण फसणार नाही. (नीति. १४:१५; १ तीम. ४:१) एक गट या नात्याने देवाच्या लोकांचा मोठ्या संकटातून नक्की बचाव होईल. पण आपल्यापैकी प्रत्येकाच्या बाबतीत उद्या काय होईल हे सांगता येत नाही. (याको. ४:१४) कदाचित मोठं संकट आपण पार करू किंवा त्याच्या आधीच आपला मृत्यू होईल. पण एक गोष्ट मात्र पक्की आहे, की आपण जर विश्वासू राहिलो तर कायमच्या जीवनाचं प्रतिफळ आपल्याला मिळेल. तेव्हा ही सुंदर आशा आपण आपल्या डोळ्यांसमोर नेहमी ठेवू या आणि यहोवाच्या दिवसासाठी तयार राहू या! टेहळणी बुरूज२३.०६ १३ ¶१५-१६
मंगळवार, ११ नोव्हेंबर
तो आपल्या मनातली गोष्ट आपल्या सेवकांना सांगेल.—आमो. ३:७.
बायबलच्या काही भविष्यवाण्या कशा पूर्ण होतील हे आपल्याला माहीत नाही. (दानी. १२:८, ९) एखादी भविष्यवाणी कशी पूर्ण होईल हे आपल्याला पूर्णपणे समजत नसलं, तर याचा अर्थ असा होत नाही की ती भविष्यवाणी पूर्ण होणारच नाही. आधीच्या काळातसुद्धा भविष्यवाण्या कशा पूर्ण झाल्या, हे यहोवाने आपल्या सेवकांना योग्य वेळी सांगितलं. म्हणून, आपण या गोष्टीची खातरी बाळगू शकतो, की आपल्याला ज्या गोष्टी माहीत असल्या पाहिजेत, त्या तो आपल्याला योग्य वेळी सांगेल. लवकरच, “शांती आहे, सुरक्षा आहे!” अशी घोषणा केली जाईल. (१ थेस्सलनी. ५:३) त्यानंतर जगाच्या राजकीय सत्ता खोट्या धर्मावर हल्ला करतील आणि त्याचा पूर्णपणे नाश करतील. (प्रकटी. १७:१६, १७) मग त्या देवाच्या लोकांवर हल्ला करतील. (यहे. ३८:१८, १९) या घटनांनी हर्मगिदोनच्या युद्धाची सुरुवात होईल. (प्रकटी. १६:१४, १६) आपण या गोष्टीची खातरी बाळगू शकतो, की या घटना लवकरच होतील. तोपर्यंत आपण बायबलमधल्या भविष्यवाण्यांचा अभ्यास करत राहू या. आणि इतरांनाही तसं करत राहण्यासाठी मदत करू या. हे करून आपल्याला दाखवून देता येईल, की स्वर्गातल्या आपल्या पित्याबद्दल आपल्याला कदर आहे. टेहळणी बुरूज२३.०८ १३ ¶१९-२०
बुधवार, १२ नोव्हेंबर
आपण एकमेकांवर प्रेम करत राहू या, कारण प्रेम देवापासून आहे.—१ योहा. ४:७.
प्रेषित पौलने जेव्हा विश्वास, आशा आणि प्रेम या गुणांचा उल्लेख केला, तेव्हा शेवटी त्याने म्हटलं की “प्रेम या सगळ्यांत श्रेष्ठ आहे.” (१ करिंथ. १३:१३) त्याने असं का म्हटलं? कारण भविष्यात देवाची अभिवचनं पूर्ण झालेली असतील, त्यामुळे आपल्याला त्यांवर विश्वास ठेवायची गरज पडणार नाही. पण आपल्या मनात यहोवाबद्दल आणि त्याच्या लोकांबद्दल प्रेम असणं नेहमी गरजेचं असेल. इतकंच काय तर हे प्रेम नेहमी वाढत जाईल. तसंच, प्रेम हे खऱ्या ख्रिश्चनांचं ओळख चिन्ह आहे. येशूने त्याच्या प्रेषितांना म्हटलं: “तुमचं एकमेकांवर प्रेम असेल, तर यावरूनच सगळे ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात.” (योहा. १३:३५) तसंच प्रेम असल्यामुळे आपल्यातली एकी टिकून राहते. पौलने म्हटलं की प्रेम हे “ऐक्याचं परिपूर्ण बंधन” आहे. (कलस्सै. ३:१४) प्रेषित योहानने भाऊबहिणींना एका पत्रात लिहिलंय.: “जो कोणी देवावर प्रेम करतो, त्याने आपल्या भावावरही प्रेम केलं पाहिजे.” (१ योहा. ४:२१) जेव्हा आपण एकमेकांवर प्रेम करतो, तेव्हा आपलं देवावर प्रेम आहे हे दिसून येतं. टेहळणी बुरूज२३.११ ८ ¶१, ३
गुरुवार, १३ नोव्हेंबर
प्रत्येक ओझं काढून टाका.—इब्री १२:१.
बायबलमध्ये एका ख्रिस्ती व्यक्तीच्या जीवनाची तुलना शर्यतीत धावण्याशी करण्यात आली आहे. या शर्यतीत जी व्यक्ती यशस्वीपणे अंतीम रेषा पार करते, तिला सर्वकाळच्या जीवनाचं बक्षीस मिळेल. (२ तीम. ४:७, ८) या शर्यतीत धावण्यासाठी आपण आपल्या परीने पूर्ण प्रयत्न केले पाहिजेत, कारण अंतीम रेषा खूप जवळ आहे. प्रेषित पौलने ही शर्यत जिंकण्यासाठी कशामुळे मदत होऊ शकते हे ओळखलं. म्हणून त्याने आपल्याला असा सल्ला दिला: “आपण प्रत्येक ओझं . . . काढून टाकू या आणि आपल्यासमोर असलेल्या शर्यतीत धीराने धावू या.” एका ख्रिस्ती व्यक्तीने कोणतंच ओझं घेऊ नये असं पौलला म्हणायचं होतं का? नाही. उलट त्याला असं म्हणायचं होतं, की ज्या गोष्टींचं ओझं वाहणं गरजेचं नाही असं प्रत्येक ओझं आपण काढून टाकलं पाहिजे. कारण अशा प्रकारच्या ओझ्यांमुळे आपल्या धावण्याचा वेग कमी होऊ शकतो आणि आपण थकून जाऊ शकतो. त्यामुळे जीवनाच्या शर्यतीत आपल्याला धावत राहायचं असेल, तर अशी अनावश्यक ओझी कोणती आहेत हे आपण लगेच ओळखलं पाहिजे आणि त्यांना काढून टाकलं पाहिजे. पण जी ओझी वाहणं गरजेची आहेत तीच आपण काढून टाकली तर आपण या शर्यतीत धावण्यासाठी अपात्र ठरू.—२ तीम. २:५. टेहळणी बुरूज२३.०८ २६ ¶१-२
शुक्रवार, १४ नोव्हेंबर
बाहेरून दिसणाऱ्या गोष्टींनी आपलं सौंदर्य वाढवायचा प्रयत्न करू नका.—१ पेत्र ३:३.
समजूतदार राहिल्यामुळे आपल्याला इतरांच्या मतांचा आदर करता येईल. उदाहरणार्थ, आपल्या काही बहिणींना मेकअप करायला आवडतं, तर काहींना आवडत नाही. काही ख्रिश्चनांना योग्य प्रमाणात दारू प्यायला आवडतं, तर काही पूर्णपणे दारूपासून दूर राहतात. सगळ्याच ख्रिश्चनांना चांगलं आरोग्य हवं असतं. आणि गरज असते तेव्हा ते उपचारासाठी वेगवेगळ्या पद्धती निवडतात. पण आपल्याला जर आपलीच मतं योग्य वाटत असतील आणि ती जर आपण मंडळीवर लादायचा प्रयत्न करत असू, तर त्यामुळे इतरांना अडखळण होईल आणि मंडळीत फुटी निर्माण होतील. (१ करिंथ. ८:९; १०:२३, २४) उदाहरणार्थ, आपण कशा प्रकारचे कपडे घातले पाहिजेत याबद्दल कडक नियम बनवण्याऐवजी यहोवाने आपल्याला काही तत्त्वं दिली आहे. आणि म्हणून देवाच्या सेवकांना शोभतील असे कपडे आपण घातले पाहिजेत. आणि त्यातून आपला समजूतदारपणा आणि ‘विचारशीलपणा’, तसंच आपली सभ्यता दिसून आली पाहिजे. (१ तीम. २:९, १०) त्यामुळे लोकांचं लक्ष विनाकारण आपल्याकडे आकर्षित होईल असे कपडे आपण घालणार नाही. बायबलची तत्त्वं समजून घेतल्यामुळे मंडळीतले वडीलसुद्धा कपडे आणि हेअरस्टाईलबद्दल स्वतःचे नियम बनवत नाहीत. टेहळणी बुरूज२३.०७ २३-२४ ¶१३-१४
शनिवार, १५ नोव्हेंबर
माझं लक्षपूर्वक ऐका आणि चांगलं ते खा, म्हणजे चमचमीत अन्न खाऊन तुम्हाला आनंद मिळेल.—यश. ५५:२.
एक चांगलं भविष्य मिळवण्यासाठी काय करणं गरजेचं आहे ते यहोवाने आपल्याला समजावून सांगितलंय. जे लोक मोठमोठ्याने बोलणाऱ्या ‘मूर्ख स्त्रीचं’ आमंत्रण स्वीकारतात त्यांना गुप्तपणे केल्या जाणाऱ्या अनैतिक कामांची मजा घ्यायची असते. आणि म्हणूनच त्यांना ती कामं “गोड” वाटतात. शेवटी त्यांचा अंत “कबरेच्या खोल ठिकाणांत” होतो. (नीति. ९:१३, १७, १८) पण ‘खऱ्या बुद्धीचं’ आमंत्रण स्वीकारणाऱ्या लोकांचं भविष्य किती वेगळं आहे! (नीति. ९:१) म्हणून यहोवा ज्या गोष्टींवर प्रेम करतो त्यांवर प्रेम करायला आणि ज्या गोष्टींचा तो द्वेष करतो त्यांचा द्वेष करायला आपण शिकत आहोत. (स्तो. ९७:१०) शिवाय, इतरांना ‘खऱ्या बुद्धीचा’ फायदा व्हावा म्हणून आपण त्यांनाही आमंत्रण देतो आणि त्यामुळे आपल्याला आनंद मिळतो. आपण जणू अशा सेवकांसारखे आहोत, जे शहराच्या उंच ठिकाणांहून अशी घोषणा करतात, की “जे भोळे आहेत, त्यांनी इथे यावं.” जे खऱ्या बुद्धीचं आमंत्रण स्वीकारतात त्यांना फक्त आज आणि आत्तापूरताच फायदा होत नाही तर भविष्यातही फायदा होतो. ते कायम “जिवंत” राहतील आणि “समजशक्तीच्या मार्गाने” पुढे चालत राहतील.—नीति. ९:३, ४, ६. टेहळणी बुरूज२३.०६ २४ ¶१७-१८
रविवार, १६ नोव्हेंबर
जो लगेच रागावत नाही, तो शूरवीरापेक्षा शक्तिशाली असतो; रागावर नियंत्रण करणारा, शहर जिंकणाऱ्यापेक्षा ताकदवान असतो.—नीति. १६:३२.
शाळा-कॉलेजमधले किंवा तुमच्या कामावरचे लोक जेव्हा तुम्हाला तुमच्या विश्वासाबद्दल विचारतात, तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला अवघडल्यासारखं वाटतं का? आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं. पण लोक जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न विचारतात, तेव्हा ते कसा विचार करतात याबद्दल किंवा त्यांच्या विश्वासाबद्दल आपल्याला बऱ्याच गोष्टी समजू शकतात. आणि त्यामुळे त्यांना साक्ष द्यायची चांगली संधी आपल्याला मिळू शकते. पण नेहमीच असं होत नाही. कधीकधी काही जण फक्त आपल्याशी वाद घालण्याच्या हेतूने आपल्याला प्रश्न विचारतात. पण आपल्याला त्याचं आश्चर्य वाटत नाही. कारण काही जणांना आपल्या विश्वासाबद्दल चुकीची माहिती देण्यात आली आहे. (प्रे. कार्यं २८:२२) शिवाय, आपण “शेवटच्या दिवसांत” म्हणजे अशा एका काळात जगत आहोत, जिथे लोक “कोणत्याही गोष्टीशी सहमत न होणारे” आणि “क्रूर” आहेत. (२ तीम. ३:१, ३) पण जेव्हा कोणी तुमच्या विश्वासाबद्दल प्रश्न विचारून तुमच्याशी वाद घालायचा प्रयत्न करतो, तेव्हा तुम्ही त्याला शांतपणे आणि समंजसपणे कसं उत्तर देऊ शकता? अशा वेळी कोणती गोष्ट तुम्हाला मदत करेल? एका शब्दात सांगायचं झालं तर, सौम्यता! सौम्यतेने वागणाऱ्या व्यक्तीला जेव्हा कोणी राग येईल असं काहीतरी बोलतं किंवा एखाद्याला कसं उत्तर द्यायचं हे तिला समजत नसतं, तेव्हा ती लगेच अस्वस्थ होत नाही. तर तिचं स्वतःवर नियंत्रण असतं. टेहळणी बुरूज२३.०९ १४ ¶१-२
सोमवार, १७ नोव्हेंबर
तू त्यांना संपूर्ण पृथ्वीवर प्रधान म्हणून नेमशील.—स्तो. ४५:१६.
काही वेळा संघटनेकडून आपल्याला अशा सूचना मिळू शकतात ज्यांमुळे आपलं संरक्षण होतं. जसं की, जास्त पैसा कमवण्याच्या मोहापासून आणि यहोवाला न आवडणाऱ्या गोष्टी करण्यापासून आपल्याला नेहमी सावध केलं जातं. या मार्गदर्शनाचं पालन करूनसुद्धा आपल्याला आशीर्वाद मिळू शकतात. (यश. ४८:१७, १८; १ तीम. ६:९, १०) यात काहीच शंका नाही, की यहोवा मोठ्या संकटादरम्यान आणि येशूच्या हजार वर्षांच्या राज्यातही मानवांचा वापर करून आपल्याला मार्गदर्शन पुरवत राहील. मग आपण त्याचं पालन करत राहू का? आपण जर आत्ताच स्वतःला यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन करायची सवय लावली तर त्या वेळी आपल्याला हे करणं सोपं जाईल. तर मग आपण नेहमी यहोवाच्या मार्गदर्शनाचं पालन करत राहू या, मग ते आपलं रक्षण करणाऱ्या मानवांकडून देण्यात आलं तरी! (यश. ३२:१, २; इब्री १३:१७) असं करत असताना आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो की आपला गाईड यहोवा आपल्याला त्याच्यासोबतचं नातं धोक्यात येईल अशा गोष्टींपासून दूर ठेवेल आणि कायमचं जीवन असलेल्या नवीन जगाच्या मार्गावर चालत राहायला मदत करेल. टेहळणी बुरूज२४.०२ २३-२४ ¶१३-१४
मंगळवार, १८ नोव्हेंबर
देवाच्या अपार कृपेमुळे तुमचं तारण झालं आहे.—इफिस. २:५.
प्रेषित पौलने यहोवाची सेवा आनंदाने केली. पण त्याच्यासाठी हे नेहमीच सोपं नव्हतं. त्याला लांब-लांब प्रवास करावा लागायचा आणि त्या काळात प्रवास करणं कठीण होतं. प्रवासादरम्यान काही वेळा त्याला ‘नद्यांवरच्या संकटांचा’ आणि ‘लुटारूंच्या संकटांचा’ सामना करावा लागला. काही वेळा तर विरोधकांनी त्याला मारहाणसुद्धा केली. (२ करिंथ. ११:२३-२७) इतकंच नाही, तर पौल भाऊबहिणींना मदत करण्यासाठी जे प्रयत्न करत होता, त्याची भाऊबहिणींना काही वेळा कदरसुद्धा नव्हती. (२ करिंथ. १०:१०; फिलिप्पै. ४:१५) यहोवाची सेवा करत राहायला पौलला कशामुळे मदत झाली? त्याने शास्त्रवचनांतून आणि स्वतःच्या अनुभवातून यहोवा कसा आहे हे समजून घेतलं. त्याला खातरी पटली, की यहोवाचं आपल्यावर खरंच खूप प्रेम आहे. (रोम. ८:३८, ३९; इफिस. २:४, ५) आणि त्याचंही यहोवावर असलेलं प्रेम वाढत गेलं. त्याने “पवित्र जनांची सेवा केली” आणि पुढेही तो करत राहिला. असं करून त्याने यहोवावर असलेलं त्याचं प्रेम दाखवून दिलं.—इब्री ६:१०. टेहळणी बुरूज२३.०७ ९ ¶५-६
बुधवार, १९ नोव्हेंबर
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधीन राहा.—रोम. १३:१.
बरेच लोक हे मान्य करतात, की त्यांना सरकारची गरज आहे आणि त्यांनी ‘वरिष्ठ अधिकाऱ्यांनी’ घालून दिलेले काही नियम तरी पाळले पाहिजेत. पण याच लोकांना जेव्हा काही नियम आवडत नाहीत किंवा त्यांना ते चुकीचे वाटतात, तेव्हा ते हे नियम पाळत नाहीत. बायबल सांगतं की मानवी सरकारं सैतानाच्या नियंत्रणात आहेत. त्यांच्यामुळे बऱ्याचदा आपल्याला समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणून लवकरच त्यांचा नाश करण्यात येणार आहे. (स्तो. ११०:५, ६; उप. ८:९; लूक ४:५, ६) पण बायबल असंही सांगतं की “जो अधिकाराचा विरोध करतो तो देवाने घालून दिलेल्या व्यवस्थेचा विरोध करतो.” म्हणून सर्वकाही सुव्यवस्थित राहण्यासाठी यहोवाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्पुरत्या काळासाठी जो अधिकार दिलाय, त्याच्या आपण अधीन असलं पाहिजे. तसंच, आपल्याला त्यांना ‘जे द्यायचं आहे ते दिलं पाहिजे.’ म्हणजेच आपण कर भरला पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे आणि त्यांच्या आज्ञेत राहिलं पाहिजे. (रोम. १३:१-७) कदाचित त्यांनी घालून दिलेला एखादा नियम आपल्या सोयीचा नसेल किंवा आपल्याला तो चुकीचा वाटत असेल, किंवा त्याच्यामुळे आपल्याला आर्थिक फटका बसत असेल. पण जोपर्यंत ते आपल्याला यहोवाच्या आज्ञेविरोधात काही करायला सांगत नाहीत, तोपर्यंत यहोवाच्या सांगण्याप्रमाणे आपण त्यांच्या आज्ञेत राहिलं पाहिजे.—प्रे. कार्यं ५:२९. टेहळणी बुरूज२३.१० ८ ¶९-१०
गुरुवार, २० नोव्हेंबर
यहोवाची पवित्र शक्ती शमशोनवर कार्य करू लागली.—शास्ते १५:१४.
शमशोनचा जन्म झाला तेव्हा पलिष्टी लोक इस्राएलवर राज्य करत होते आणि त्यांचा खूप छळ करत होते. (शास्ते १३:१) त्यांच्या या क्रूर छळामुळे इस्राएली लोकांना खूप दुःख सोसावं लागत होतं. म्हणून यहोवाने “इस्राएलला पलिष्टी लोकांच्या हातून” वाचवण्यासाठी शमशोनला निवडलं. (शास्ते १३:५) ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी शमशोनला पूर्णपणे यहोवावर विसंबून राहावं लागणार होतं. एकदा असं झालं, की पलिष्ट्यांच्या सैन्याने शमशोनला पकडण्यासाठी लेही इथे छावणी केली होती. आणि हे ठिकाण यहूदामध्ये असावं. हे पाहून यहूदाचे लोक खूप घाबरले आणि त्यांनी शमशोनला शत्रूंच्या हाती द्यायचं ठरवलं. शमशोनच्या स्वतःच्याच लोकांनी त्याला दोन नवीन रश्यांनी बांधलं आणि ते त्याला पलिष्ट्यांकडे घेऊन आले. (शास्ते १५:९-१३) पण “त्या वेळी यहोवाची पवित्र शक्ती शमशोनवर कार्य करू लागली” आणि त्याने स्वतःला सोडवलं. मग त्याला “गाढवाच्या जबड्याचं हाड” सापडलं आणि त्याने त्याचा उपयोग करून १,००० पलिष्टी लोकांना मारून टाकलं.—शास्ते १५:१४-१६. टेहळणी बुरूज२३.०९ २ ¶३-४
शुक्रवार, २१ नोव्हेंबर
देवाने ख्रिस्ताच्या, म्हणजेच आपल्या प्रभू येशूच्या बाबतीत केलेल्या त्याच्या सर्वकाळाच्या उद्देशाप्रमाणे हे आहे.—इफिस. ३:११.
यहोवाने त्याच्या ‘सर्वकाळाच्या उद्देशाबद्दल’ आपल्याला हळूहळू कळवलं आहे आणि याबद्दल आपण त्याचे खरंच आभार मानले पाहिजे. “यहोवा आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी सर्वकाही घडवून आणतो,” त्यामुळे आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी कोणत्याही मार्गाने तो नेहमी यशस्वी ठरतो. (नीति. १६:४) आणि तो जे काही करतो त्याचे परिणाम कायम राहतात. तर मग यहोवाचा उद्देश काय आहे? आणि तो पूर्ण करण्यासाठी यहोवाने कोणकोणते फेरबदल केले आहेत? यहोवाने आपल्या पहिल्या पालकांना म्हणजे आदाम आणि हव्वाला त्याच्या उद्देशाबद्दल सांगितलं होतं. तो म्हणजे: “फलदायी व्हा, आपली संख्या वाढवा आणि पूर्ण पृथ्वीला भरून टाका आणि . . . सर्व प्राणी यांवर अधिकार चालवा.” (उत्प. १:२८) पण आदाम आणि हव्वाने जेव्हा बंड केलं, तेव्हा सर्व मानवी कुटुंब पापी बनलं. त्यामुळे यहोवाच्या मूळ उद्देशाला जरी अडथळा निर्माण झाला, तरी तो पूर्ण व्हायचा राहिला नाही. यहोवाने आपला उद्देश पूर्ण करण्याचा मार्ग बदलला. त्याने लगेच एक स्वर्गीय राज्य स्थापन करायचं ठरवलं. आणि त्या राज्याद्वारे तो मानवजातीसाठी आणि पृथ्वीसाठी असलेला त्याचा मूळ उद्देश पूर्ण करणार होता.—मत्त. २५:३४. टेहळणी बुरूज२३.१० २० ¶६-७
शनिवार, २२ नोव्हेंबर
यहोवा माझा सहायक नसता, तर माझा कधीच नाश झाला असता.—स्तो. ९४:१७.
हार न मानता टिकून राहायला यहोवा आपल्याला मदत करतो. पण हे नेहमीच सोपं नसतं, खासकरून जेव्हा आपण बऱ्याच काळापासून एखाद्या कमतरतेवर मात करायचा प्रयत्न करत असतो तेव्हा. आपल्याला असंही वाटू शकतं, की पेत्रने ज्या कमतरतांचा सामना केला, त्यापेक्षा आपल्या कमतरतांचा सामना करणं जास्त कठीण आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की अशा वेळी हार न मानता प्रयत्न करत राहायला यहोवा आपल्याला मदत करेल. (स्तो. ९४:१८, १९) उदाहरणार्थ, आपला एक भाऊ सत्य शिकण्याआधी बऱ्याच वर्षांपासून समलिंगी जीवन जगत होता. पण बायबलचं सत्य शिकल्यानंतर त्याने या अनैतिक सवयी सोडून दिल्या आणि जीवनात मोठे बदल केले. पण त्याला आजही काही वेळा चुकीच्या इच्छांशी झगडावं लागतं. पण हार न मानता प्रयत्न करत राहायला कोणत्या गोष्टीमुळे त्याला मदत होते? याबद्दल तो म्हणतो: “यासाठी यहोवा नेहमी आपल्याला बळ देतो. यहोवाच्या पवित्र शक्तीच्या मदतीने . . . आपण सत्याच्या मार्गावर चालत राहू शकतो. . . . यहोवा आजही त्याच्या सेवेसाठी माझा उपयोग करत आहे. आणि माझ्यात कमतरता असतानाही त्यांच्याशी झगडत राहायला तो मला ताकद देत आलाय.” टेहळणी बुरूज२३.०९ २३ ¶१२
रविवार, २३ नोव्हेंबर
नम्र राहिल्याने आणि यहोवाची भीती बाळगल्याने संपत्ती, गौरव आणि जीवन मिळतं.—नीति. २२:४.
तरुण भावांनो, तुम्ही आपोआपच एक प्रौढ ख्रिस्ती व्यक्ती बनू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला चांगलं उदाहरण असलेल्यांचं अनुकरण करावं लागेल, विचारशक्ती वाढवावी लागेल, भरवशालायक असावं लागेल आणि काही व्यावहारिक कौशल्यं शिकून घ्यावी लागतील. आणि यासोबतच तुम्हाला पुढे येणाऱ्या जबाबदाऱ्यांसाठी तयारी करावी लागेल. या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्ही कदाचित भारावून जाल. पण तुम्ही यशस्वी होऊ शकता. कारण हे नेहमी लक्षात ठेवा की यहोवा तुम्हाला मदत करायला आतुर आहे. (यश. ४१:१०, १३) तसंच, मंडळीतले भाऊबहीणसुद्धा तुम्हाला या बाबतीत नक्कीच मदत करतील. जेव्हा तुम्ही आध्यात्मिक रित्या प्रौढ ख्रिस्ती व्यक्ती बनाल, तेव्हा तुमचं जीवन आनंदी आणि समाधानी असेल. तेव्हा तरुण भावांनो, आम्हाला तुमचं खरंच खूप कौतुक करावंस वाटतं! प्रौढ ख्रिस्ती व्यक्ती बनण्यासाठी तुम्ही जी काही मेहनत घेत आहात त्यावर यहोवाचा आशीर्वाद असो! टेहळणी बुरूज२३.१२ २९ ¶१९-२०
सोमवार, २४ नोव्हेंबर
अपराधाकडे दुर्लक्ष करा.—नीति. १९:११.
कल्पना करा, की तुम्ही भाऊबहिणींसोबत एकत्र वेळ घालवत आहात. तुम्ही छान वेळ घालवता आणि शेवटी काही फोटोपण घेता. आणि एखादा फोटो खराब आला तर तुमच्याकडे निदान चांगले फोटो असावेत म्हणून तुम्ही एक नाही तर दोन-तीन फोटो घेता. आता समजा तुमच्याकडे तीन फोटो आहेत. पण त्यांतल्या एका फोटोमध्ये एका भावाचा फोटो चांगला आलेला नाही. तुम्ही तो फोटो नक्कीच डिलीट कराल, कारण बाकीचे दोन फोटो चांगले आहेत आणि सगळ्यांचेच चेहरे हसरे आहेत. आपल्याजवळ सहसा भाऊबहिणींसोबत वेळ घालवल्याच्या चांगल्या आठवणी असतात. पण समजा अशाच एखाद्या प्रसंगी एखाद्या भावाने किंवा बहिणीने तुम्हाला वाईट वाटेल असं काहीतरी बोललं किंवा केलं, तर अशा वाईट आठवणींचं तुम्ही काय कराल? जो फोटो चांगला आला नाही, त्याला आपण फोनमधून काढून टाकतो. तसंच या वाईट आठवणींना आपण आपल्या मनातून काढून टाकू नये का? (इफिस. ४:३२) आपण असं करू शकतो कारण त्या भावासोबत किंवा बहिणीसोबत आपल्या बऱ्याच चांगल्या आठवणीही आहेत. त्या आठवणी आपल्यासाठी खूप मौल्यवान आहेत आणि आपण त्यांना जपून ठेवलं पाहिजे. टेहळणी बुरूज२३.११ १२-१३ ¶१६-१७
मंगळवार, २५ नोव्हेंबर
स्त्रियांनी योग्य पेहराव करून स्वतःला सजवावं. स्वतःला देवाच्या उपासक म्हणवणाऱ्या स्त्रियांना शोभेल अशा प्रकारे त्यांनी आपलं सौंदर्य वाढवावं.—१ तीमथ्य २:९, १०.
इथे ज्या ग्रीक शब्दांचा वापर करण्यात आलाय, त्यांवरून कळतं की ख्रिस्ती स्त्रियांचा पेहराव पाहून इतरांच्या मनात आदर निर्माण झाला पाहिजे. तसंच, त्या इतरांच्या भावनांचा आणि मतांचा विचार करतात हेही त्यांच्या पेहरावावरून दिसून आलं पाहिजे. ज्या ख्रिस्ती बहिणींचा असाच शालीन पेहराव असतो, त्यांचं आम्हाला खरंच कौतुक करावंसं वाटतं. समंजसपणा हा आणखी एक असा गुण आहे, जो सगळ्या प्रौढ ख्रिस्ती बहिणींमध्ये असला पाहिजे. समंजसपणा म्हणजे काय? योग्य आणि अयोग्य यांतला फरक ओळखून योग्य ते करण्याची क्षमता म्हणजे समंजसपणा. अबीगईलचंच उदाहरण घ्या. तिच्या पतीने एक चुकीचा निर्णय घेतला होता आणि त्याचे गंभीर परिणाम त्याच्या संपूर्ण घराण्याला भोगावे लागणार होते. पण अबीगईलने लगेच पाऊल उचललं आणि तिने योग्य निर्णय घेतल्यामुळे बऱ्याच लोकांचा जीव वाचला. (१ शमु. २५:१४-२३, ३२-३५) समंजसपणामुळे आपल्याला कधी बोलायचं आणि कधी शांत राहायचं हे समजायला मदत होते. त्यासोबतच एक समंजस व्यक्ती इतरांची विचारपूस करताना त्यांच्या खाजगी गोष्टींबद्दल असं काही विचारणार किंवा बोलणार नाही, ज्यांमुळे त्यांना अवघडल्यासारखं वाटेल.—१ थेस्सलनी. ४:११. टेहळणी बुरूज२३.१२ २० ¶८-९
बुधवार, २६ नोव्हेंबर
देवाच्या गौरवाची जी आशा आपल्याला मिळाली आहे, तिच्यामुळे आपण आनंदी होऊ या.—रोम. ५:२.
पौलने हे शब्द रोममधल्या मंडळीला लिहिले. तिथल्या भाऊबहिणींना जेव्हा यहोवाबद्दल आणि येशूबद्दल समजलं, तेव्हा त्यांनी विश्वास ठेवला आणि ते ख्रिस्ती बनले. म्हणूनच देवाने त्यांना विश्वासामुळे नीतिमान ठरवलं आणि आपल्या पवित्र शक्तीने त्यांचा अभिषेक केला. (रोम. ५:१) आणि अशा प्रकारे त्यांना एक खरीखुरी आणि सुंदर आशा मिळाली. पौलने नंतर इफिसमधल्या अभिषिक्त ख्रिश्चनांना एक पत्र लिहिलं. आणि या पत्रात देवाने त्यांना जी आशा दिली होती त्याबद्दल सांगितलं. या आशेप्रमाणे त्यांना ‘पवित्र जणांसाठी राखून ठेवलेला’ वारसाही मिळणार होता. (इफिस. १:१८) तसंच, पौलने कलस्सैकरांनाही त्यांची ही आशा कुठे पूर्ण होणार आहे याबद्दल सांगितलं. त्याने म्हटलं, की ही आशा त्यांच्यासाठी स्वर्गात राखून ठेवण्यात आली आहे. (कलस्सै. १:४, ५) यावरून म्हणता येईल, अभिषिक्त ख्रिश्चनांचं सर्वकाळच्या जीवनासाठी स्वर्गात पुनरुत्थान करण्यात येईल आणि तिथे ते येशूसोबत राज्य करतील. याच आशेबद्दल पौल बोलत होता.—१ थेस्सलनी. ४:१३-१७; प्रकटी. २०:६. टेहळणी बुरूज२३.१२ ९ ¶४-५
गुरुवार, २७ नोव्हेंबर
सर्व समजशक्तीच्या पलीकडे असलेली देवाची शांती तुमच्या मनाचं आणि बुद्धीचं रक्षण करेल.—फिलिप्पै. ४:७.
या वचनामध्ये सांगितलंय, की देवाची शांती आपल्या “मनाचं आणि बुद्धीचं रक्षण” करते. “रक्षण” यासाठी वापरण्यात आलेला मूळ शब्द शत्रूच्या आक्रमणापासून शहराचं रक्षण व्हावं म्हणून पहारा देणाऱ्या सैनिकांच्या संदर्भात हा वापरला जायचा. त्या शहरातले लोक शांतपणे झोपायचे कारण त्यांना माहीत असायचं की शहराच्या फाटकाजवळ सैनिक उभे आहेत. तसंच एका सैनिकाप्रमाणे देवाची शांती आपल्या मनाचं आणि बुद्धीचं रक्षण करते तेव्हा आपण सुरक्षित आहोत या भावनेने आपलं मन शांत होतं. (स्तो. ४:८) हन्नाप्रमाणे आपली परिस्थिती लगेच बदलणार नाही. पण आपलं मन शांत होऊ शकतं. (१ शमु. १:१६-१८) यामुळे स्पष्टपणे विचार करायला आणि चांगले निर्णय घ्यायला सहसा आपल्याला सोपं जातं. आपण काय करू शकतो? जेव्हा तुमच्यावरती एखादं संकट येतं तेव्हा सैनिकाला बोलवा. म्हणजेच देवाची शांती मिळेपर्यंत त्याला प्रार्थना करा. (लूक ११:९; १ थेस्सलनी. ५:१७) जर तुम्हीही संकटाचा सामना करत असाल तर सारखं–सारखं यहोवाला प्रार्थना करा. यामुळे मनाचं आणि बुद्धीचं रक्षण करणारी यहोवाची शांती तुम्ही अनुभवाल.—रोम. १२:१२. टेहळणी बुरूज२४.०१ २१ ¶५-६
शुक्रवार, २८ नोव्हेंबर
हे आमच्या स्वर्गातल्या पित्या, तुझं नाव पवित्र मानलं जावो.—मत्त. ६:९.
आपल्या पित्याचं नाव पवित्र करण्यासाठी येशूने प्रत्येक प्रकारचा छळ, अपमान आणि बदनामी सहन केली. पण अशा कुठल्याच गोष्टीची त्याला लाज वाटली नाही कारण आपण प्रत्येक बाबतीत आपल्या पित्याची आज्ञा पाळली हे त्याला माहीत होतं. (इब्री १२:२) तसंच, त्या कठीण काळात सैतान थेट आपल्यावर हल्ला करत आहे ही गोष्टसुद्धा येशूला माहीत होती. (लूक २२:२-४; २३:३३, ३४) पण आपण येशूला यहोवाविरुद्ध जायला भाग पाडू याची सैतानाला पूर्ण खातरी होती. पण या बाबतीत तो पूर्णपणे अपयशी ठरला! येशूने शेवटी हे दाखवून दिलं, की सैतान अतिशय क्रूर आणि खोटा आहे. तसंच, अगदी वाईट परिस्थितीतून जात असताना यहोवाचे विश्वासू सेवक त्याला एकनिष्ठ राहू शकतात हेसुद्धा येशूने सिद्ध केलं. तुमच्या वैभवी राजाला तुम्हाला खूश करायचं आहे का? तर मग यहोवाच्या नावाची स्तुती करत राहा आणि इतरांना त्याच्या सुंदर गुणांबद्दल शिकून घ्यायला मदत करा. असं केल्यामुळे तुम्ही येशूचं अनुकरण कराल. (१ पेत्र २:२१) तसंच, येशूप्रमाणे तुम्ही यहोवाचं मन आनंदित कराल आणि देवाचा विरोध करणाऱ्या सैतानाला खोटं ठरवाल. टेहळणी बुरूज२४.०२ ११-१२ ¶११-१३
शनिवार, २९ नोव्हेंबर
यहोवाने माझ्यावर जे उपकार केले आहेत, त्या सर्वांच्या बदल्यात मी त्याला काय देऊ?—स्तो. ११६:१२.
गेल्या पाच वर्षांत लाखो लोकांनी यहोवाचे साक्षीदार म्हणून बाप्तिस्मा घेतलाय. जेव्हा तुम्ही यहोवाला आपलं जीवन समर्पित करता, तेव्हा तुम्ही येशूचे शिष्य बनण्याचा आणि आपल्या जीवनात देवाच्या इच्छेला सगळ्यात जास्त महत्त्व देण्याचा निश्चय करता. मग तुम्हाला जर समर्पण करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? येशूने म्हटलं: “जर कोणाला माझ्यामागे यायचं असेल, तर त्याने स्वतःला नाकारावं.” (मत्त. १६:२४) म्हणजे यहोवाचा समर्पित सेवक या नात्याने तुम्हाला देवाच्या इच्छेविरुद्ध असणाऱ्या कोणत्याही गोष्टीला नाकारावं लागेल. (२ करिंथ. ५:१४, १५) यात अनैतिक लैंगिक कामांसारख्या ‘शरीराच्या कामांना’ नाकारणंसुद्धा सामील आहे. (गलती. ५:१९-२१; १ करिंथ. ६:१८) पण यामुळे तुम्हाला जीवन जगणं कठीण होईल असं वाटतं का? तुमचं जर यहोवावर प्रेम असेल आणि त्याचे नियम तुमच्या चांगल्यासाठीच आहेत, याची तुम्हाला खातरी असेल तर तुम्हाला नक्कीच असं वाटणार नाही.—स्तो. ११९:९७; यश. ४८:१७, १८. टेहळणी बुरूज२४.०३ २ ¶१; ३ ¶४
रविवार, ३० नोव्हेंबर
तू माझं मन आनंदित केलं आहेस.—लूक ३:२२.
ज्यांना यहोवाची स्वीकृती असते त्यांना तो आपली पवित्र शक्ती देतो. (मत्त. १२:१८) त्यामुळे आपण स्वतःला विचारू शकतो, ‘मी माझ्या जीवनात देवाच्या पवित्र शक्तीने निर्माण होणारे गुण दाखवतो का?’ तुम्ही सत्य शिकण्याआधी लोकांशी जसं वागत होता त्यापेक्षा आता जास्त धीराने वागता का? खरंतर, देवाच्या पवित्र शक्तीने निर्माण होणारे गुण तुम्ही जितके जास्त दाखवायला शिकाल, तितकंच यहोवाची तुम्हाला स्वीकृती आहे या गोष्टीचे पुरावे तुम्हाला मिळत जातील. यहोवा ज्यांच्यावर खूश असतो त्यांना तो खंडणी बलिदानाचे फायदे घेण्याची संधी देतो. (१ तीम. २:५, ६) पण, खंडणी बलिदानावर आपला विश्वास असला आणि आपण बाप्तिस्मा घेतलेला असला, तरी यहोवा आपल्यावर खूश आहे हे आपलं मन मानायला तयार नसेल तर काय? अशा वेळी लक्षात ठेवा की आपण नेहमीच आपल्या मनावर नाही तर यहोवावर भरवसा ठेवला पाहिजे. ज्यांचा खंडणी बलिदानावर विश्वास आहे त्यांना यहोवा नीतिमान समजतो आणि त्यांना आशीर्वाद द्यायचं वचन देतो—स्तो. ५:१२; रोम. ३:२६. टेहळणी बुरूज२४.०३ ३० ¶१५; ३१ ¶१७