डिसेंबर
रविवार, १ डिसेंबर
मला बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे?—प्रे. कार्यं ८:३६.
इथियोपियाच्या दरबारातला अधिकारी खरंच बाप्तिस्म्यासाठी तयार होता का? विचार करा, इथियोपियाचा माणूस “यरुशलेमला उपासना करायला गेला होता.” (प्रे. कार्यं ८:२७) यावरून कळतं की त्याने यहुदी धर्म स्वीकारलेला असावा. तो नक्कीच हिब्रू शास्त्रवचनांच्या पवित्र लिखाणांमधून यहोवाबद्दल शिकला असेल. तरी त्याला आणखी जास्त शिकायचं होतं. जेव्हा फिलिप्प त्याला रस्त्यात भेटला तेव्हा तो यशयाच्या गुंडाळीतून वाचत होता. (प्रे. कार्यं ८:२८) त्याला आणखीन शिकत राहायची इच्छा होती. तो इथियोपियावरून इतक्या लांब यरुशलेमच्या मंदिरात यहोवाची उपासना करण्यासाठी गेला. इथियोपियाच्या त्या माणसाने फिलिप्पकडून काही महत्त्वाची नवीन सत्यं शिकून घेतली; जसं की येशू ख्रिस्तच मसीहा आहे. (प्रे. कार्यं ८:३४, ३५) त्यामुळे यहोवावरचं आणि त्याच्या मुलावरचं त्याचं प्रेम वा़ढलं. म्हणून त्याला येशूचा शिष्य या नात्याने बाप्तिस्मा घ्यायचा एक मोठा निर्णय घेता आला. फिलिप्पने पाहिलं की हा माणूस आता बाप्तिस्मा घेण्यासाठी तयार आहे, म्हणून त्याने त्याला बाप्तिस्मा दिला. टेहळणी बुरूज२३.०३ ८-९ ¶३-६
सोमवार, २ डिसेंबर
तुमचं बोलणं नेहमी प्रेमळ असावं.—कलस्सै. ४:६.
आपण जर खोटं बोललो तर यहोवा कधीच खूश होणार नाही. (नीति. ६:१६, १७) आज बऱ्याच लोकांना असं वाटू शकतं की खोटं बोलण्यात काहीच गैर नाही. पण यहोवा याबद्दल काय विचार करतो हे आपल्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. (स्तो. १५:१, २) हे खरंय की आपण सरळ-सरळ खोटं बोलणार नाही. पण आपण अर्धसत्य सांगून लोकांचा चुकीचा समज होईल अशीही माहिती देणार नाही. दुसऱ्यांबद्दल वाईट बोललायचंही आपण टाळलं पाहिजे. (नीति. २५:२३; २ थेस्सलनी. ३:११) जर तुमच्या लक्षात आलं की एखादी व्यक्ती तुम्हाला इतरांबद्दल काही वाईट सांगत आहे तर संभाषण लगेच प्रोत्साहन देणाऱ्या गोष्टीकडे वळवा. आज असभ्य आणि वाईट भाषा बोलणारे लोक सगळीकडे असल्यामुळे त्यांचा आपल्यावर प्रभाव पडू नये आणि आपलं बोलणं यहोवाचं मन आनंदित करणारं असावं म्हणून आपण मेहनत घेतली पाहिजे. आपण सेवाकार्यात, सभांमध्ये आणि इतर वेळी एकमेकांसोबत बोलताना आपलं बोलणं चांगलं ठेवण्यासाठी मेहनत घेतली आणि समोरच्याला प्रोत्साहन मिळेल असंच बोललो तर यहोवा त्यावर भरभरून आशीर्वाद देईल. पुढे जेव्हा या दुष्ट जगाचा नाश होईल तेव्हा यहोवाचा आदर होईल अशा प्रकारे बोलणं आपल्याला सोपं जाईल.—यहू. १५. टेहळणी बुरूज२२.०४ ९ ¶१८-२०
मंगळवार, ३ डिसेंबर
आधी त्याने आपल्यावर प्रेम केलं, म्हणून आपण प्रेम करतो.—१ योहा. ४:१९.
यहोवा आणि येशू आपल्यावर किती प्रेम करतात याचा आपण विचार करतो तेव्हा आपल्याही मनात त्यांच्याबद्दल प्रेम दाटून येतं. (१ योहा. ४:१०) आणि येशूने ‘खास माझ्यासाठी’ स्वतःचं जीवन दिलं याची जेव्हा आपल्याला जाणीव होते, तेव्हा त्या दोघांवरचं आपलं प्रेम आणखीनच वाढतं. या गोष्टीची प्रेषित पौललासुद्धा जाणीव होती, आणि म्हणून गलतीकरांना लिहिलेल्या पत्रात त्याने म्हटलं: “[देवाच्या मुलाने] माझ्यावर प्रेम केलं आणि माझ्यासाठी स्वतःला अर्पण केलं.” (गलती. २:२०) खंडणी बलिदानामुळेच यहोवाने तुम्हाला त्याचे मित्र होण्यासाठी त्याच्याकडे आकर्षित केलं आहे. (योहा. ६:४४) यहोवाने तुमच्यामध्ये काहीतरी चांगलं पाहिलं आणि तुम्हाला त्याचे मित्र बनता यावं म्हणून त्याने किती मोठी किंमत दिली याचा विचार करून तुमचं मन भरून येत नाही का? यहोवा आणि येशूवरचं तुमचं प्रेम आणखी वाढत नाही का? म्हणूनच आपण स्वतःला विचारलं पाहिजे, ‘हे प्रेम मला काय करायला भाग पाडतं?’ यहोवा आणि येशूवर आपलं प्रेम असल्यामुळे आपण इतरांवरही प्रेम करायला प्रवृत्त होतो.—२ करिंथ. ५:१४, १५; ६:१, २. टेहळणी बुरूज२३.०१ २८ ¶६-७
बुधवार, ४ डिसेंबर
मी लोकांची भाषा बदलून त्यांना एक शुद्ध भाषा देईन.—सफ. ३:९.
आपल्या उपासकांनी “खांद्याला खांदा लावून” आपली उपासना करावी हा यहोवाचा जो मूळ उद्देश होता तो बायबलमुळे पूर्ण होत आहे. त्याने शास्त्रवचनांतल्या बऱ्याच गोष्टी अशा प्रकारे लिहून घेतल्या आहेत, की फक्त नम्र मनाचे लोकच त्या समजू शकतात. (लूक १०:२१) आज जगभरातले बरेच लोक बायबल वाचतात. पण फक्त नम्र मनाचे लोकच त्यातल्या गोष्टी समजू शकतात आणि त्याप्रमाणे चालू शकतात. (२ करिंथ. ३:१५, १६) यहोवा बुद्धिमान आहे, हे आपल्याला बायबलमुळे कळतं. यहोवा बायबलद्वारे आपल्या सगळ्यांनाच शिकवतो. पण तो आपल्याला फक्त एक गट म्हणून नाही, तर आपल्यापैकी प्रत्येकाला एक व्यक्ती म्हणूनसुद्धा शिकवतो आणि सांत्वन देतो. आपण बायबल वाचतो तेव्हा आपल्या प्रत्येकाबद्दल यहोवाला किती काळजी आहे, ते आपल्याला जाणवतं. (यश. ३०:२१) तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का, की बायबलमधून एखादं वचन वाचल्यावर तुम्हाला जाणवतं, की हे खास माझ्यासाठीच लिहिलंय? बायबल खरंतर लाखो-करोडो लोकांसाठी लिहिण्यात आलं होतं. पण तरीसुद्धा असं कसं होऊ शकतं, की त्यातली माहिती आजही लागू होते आणि ती वाचत असताना जणू तुमच्यासाठीच लिहिली आहे, असं तुम्हाला वाटतं? कारण बायबलचा लेखक विश्वातला सर्वात बुद्धिमान व्यक्ती आहे.—२ तीम. ३:१६, १७. टेहळणी बुरूज२३.०२ ४-५ ¶८-१०
गुरुवार, ५ डिसेंबर
या गोष्टींबद्दल खोलवर विचार करत राहा; त्यांत अगदी गढून जा, म्हणजे तुझी प्रगती सर्वांना स्पष्टपणे दिसून येईल.—१ तीम. ४:१५.
खरे ख्रिस्ती या नात्याने आपलं यहोवावर खूप प्रेम आहे. म्हणूनच पूर्ण जीव ओतून आपण त्याची सेवा करावी अशी आपली इच्छा आहे. पण असं करण्यासाठी आपल्याला काही ख्रिस्ती गुण वाढवणं, यहोवाच्या सेवेत उपयोगी पडतील अशी कौशल्यं शिकून घेणं आणि वेगवेगळ्या मार्गांनी आपल्या भाऊबहिणींची मदत करणं, यांसारखी काही आध्यात्मिक ध्येयं ठेवावी लागतील. आध्यात्मिक ध्येयं ठेवून आपण ती गाठण्याचा प्रयत्न का केला पाहिजे? याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे, आपलं आपल्या स्वर्गातल्या पित्यावर प्रेम आहे. आणि आपण जेव्हा त्याच्या सेवेत आपल्या कौशल्यांचा आणि क्षमतेचा पुरेपूर वापर करतो तेव्हा त्याला खूप आनंद होतो. तसंच, आपल्या भाऊबहिणींची मदत करायची आपली मनापासून इच्छा असल्यामुळे आपण आध्यात्मिक ध्येयं ठेवतो आणि गाठण्याचा प्रयत्न करतो. (१ थेस्सलनी. ४:९, १०) आपण सत्यात कितीही वर्षांपासून असलो, तरी आपण आध्यात्मिक ध्येयं ठेवून ती गाठण्याचा प्रयत्न करू शकतो. टेहळणी बुरूज२२.०४ २२ ¶१-२
शुक्रवार, ६ डिसेंबर
ते तिचं मांस खातील आणि तिला आगीत पूर्णपणे जाळून टाकतील.—प्रकटी. १७:१६.
या जगातली सरकारं लवकरच मोठ्या बाबेलवर म्हणजेच खोट्या धर्माच्या जागतिक साम्राज्यावर हल्ला करतील. आणि हीच मोठ्या संकटाची सुरुवात असेल. या घटनेमुळे अचानक बरेच लोक यहोवाची उपासना करू लागतील का? नाही. उलट, प्रकटीकरणाच्या ६ व्या अध्यायातून आपल्याला कळतं, की त्या वेळी जे लोक यहोवाची सेवा करत नाहीत ते संरक्षणासाठी या जगातल्या राजकीय आणि व्यापारी संघटनांकडे धाव घेतील. या संघटनांची तुलना पर्वतांशी केली आहे. हे लोक देवाच्या राज्याची बाजू घेणार नाहीत आणि यामुळे यहोवा त्यांना आपला विरोधी समजेल. (लूक ११:२३; प्रकटी. ६:१५-१७) मोठ्या संकटाच्या त्या कठीण काळात, यहोवाचे विश्वासू सेवक इतर सर्व लोकांपेक्षा वेगळे दिसून येतील. कारण संपूर्ण पृथ्वीवर फक्त तेच असे लोक असतील जे यहोवाची सेवा करतील आणि ‘जंगली पशूला’ पाठिंबा देणार नाहीत.—प्रकटी. १३:१४-१७. टेहळणी बुरूज२२.०५ १६-१७ ¶८-९
शनिवार, ७ डिसेंबर
त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्या प्रत्येक लोकसमूहाच्या, राष्ट्राच्या, वंशाच्या आणि भाषेच्या लोकांना घोषित करण्यासाठी सर्वकाळाचा आनंदाचा संदेश आहे.—प्रकटी. १४:६.
पण देवाचे लोक फक्त “आनंदाचा संदेश” घोषित करत नाहीत. (मत्त. २४:१४) तर प्रकटीकरण अध्याय ८ ते १० मध्ये सांगितलेल्या स्वर्गदूतांच्या कामालाही त्यांनी हातभार लावणं गरजेचं आहे. ते स्वर्गदूत देवाच्या राज्याचा विरोध करणाऱ्यांवर एकापाठोपाठ एक येणाऱ्या पीडा घोषित करतात. म्हणूनच यहोवाचे साक्षीदारसुद्धा आनंदाच्या संदेशासोबतच सैतानाच्या दुष्ट जगाच्या वेगवेगळया भागांवर येणाऱ्या देवाच्या न्यायदंडाचा संदेशसुद्धा घोषित करत आहेत. या न्यायदंडाच्या संदेशाला प्रकटीकरणाच्या भविष्यवाणीत “गारा आणि अग्नी” असं म्हणण्यात आलं आहे. (प्रकटी. ८:७, १३) जगाचा अंत किती जवळ आहे हे लोकांना सांगणं आज खूप महत्त्वाचं आहे. यामुळे ते आपल्या जीवनात आवश्यक बदल करू शकतील आणि यहोवाच्या क्रोधाच्या दिवशी स्वतःचा जीव वाचवू शकतील. (सफ. २:२, ३) पण हा संदेश बहुतेक लोकांना आवडत नाही. आणि म्हणून तो सांगण्यासाठी आपल्याला धैर्याची गरज आहे. मोठ्या संकटादरम्यान आपण जो शेवटचा न्यायदंडाचा संदेश घोषित करू, तो तर आणखीनच जहाल असेल.—प्रकटी. १६:२१. टेहळणी बुरूज२२.०५ ७ ¶१८-१९
रविवार, ८ डिसेंबर
तू आपला देव यहोवा याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने आणि पूर्ण बुद्धीने प्रेम कर.—मत्त. २२:३७.
लवकरच आईवडील बनणाऱ्या एका ख्रिस्ती जोडप्याचा विचार करा. पूर्वी त्यांनी मुलांचं संगोपन कसं करावं या विषयावर बरीच भाषणं ऐकलेली असतात. पण आता तीच तत्त्वं त्यांच्यासाठी जास्त महत्त्वाची असतात. कारण आता आपल्या स्वतःच्या मुलाला लहानाचं मोठं करायची जबाबदारी त्यांच्यावर आलेली असते. ही खरंच किती मोठी जबाबदारी आहे! आपली परिस्थिती बदलते तेव्हा बायबलमधल्या काही विशिष्ट तत्त्वांबद्दल आपला दृष्टिकोनही बदलतो. म्हणूनच, जे यहोवाची उपासना करतात ते बायबल वाचतात आणि इस्राएलच्या राजांना सांगण्यात आलं होतं त्याप्रमाणे “आयुष्यभर” त्याच्यावर मनन करतात. (अनु. १७:१९) आईवडिलांनो, आपल्या मुलांना यहोवाबद्दल शिकवण्याचा एक खूप मोठा बहुमान तुम्हाला मिळाला आहे. पण ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी मुलांना देवाबद्दल फक्त माहिती देणं पुरेसं नाही. तर त्याच्यावर मनापासून प्रेम करायला मुलांना शिकवणंही गरजेचं आहे. टेहळणी बुरूज२२.०५ २६ ¶२-३
सोमवार, ९ डिसेंबर
देवाकडून असलेलं नवीन व्यक्तिमत्त्व घाला.—कलस्सै. ३:१०.
आपण केलेल्या पापाबद्दल फक्त वाईट वाटणं पुरेसं नाही, तर आपण योग्य पाऊल उचलणंही गरजेचं आहे. एखाद्याला माफ करायचा निर्णय घेताना एक गोष्ट जी यहोवा पाहतो, ती म्हणजे त्या व्यक्तीने स्वतःमध्ये बदल केलाय का? स्वतःमध्ये बदल करणं किंवा “मागे वळणं” म्हणजे आपला चुकीचा मार्ग सोडून देणं आणि यहोवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे जगायचा प्रयत्न करणं. (यश. ५५:७) पाप करणाऱ्या व्यक्तीने आपल्या विचार करायच्या पद्धतीत बदल केला पाहिजे आणि यहोवासारखा विचार करायला शिकलं पाहिजे. (रोम. १२:२; इफिस. ४:२३) आपले पूर्वीचे वाईट विचार आणि कामं पूर्णपणे सोडून द्यायचा त्याने निश्चय केला पाहिजे. (कलस्सै. ३:७-९) हे खरं आहे, की ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानावर असलेल्या आपल्या विश्वासाच्या आधारावर यहोवा आपल्याला माफ करतो. पण त्यासाठी आपण आपल्या वागणुकीत बदल करायचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत हे त्याला दिसून आलं पाहिजे. तरच तो या बलिदानाच्या आधारावर आपल्याला माफ करेल.—१ योहा. १:७. टेहळणी बुरूज२२.०६ ६ ¶१६-१७
मंगळवार, १० डिसेंबर
तुला लवकरच जी दुःखं सहन करावी लागणार आहेत त्यांची भीती बाळगू नकोस.—प्रकटी. २:१०.
आदाम आणि हव्वा यांनी यहोवाविरुद्ध बंड केल्यापासून माणूस माणसावर अत्याचार करत आलाय. (उप. ८:९) उदाहरणार्थ, अधिकाराच्या पदावर असलेले बरेच लोक, इतरांवर अत्याचार करतात. गुन्हेगार क्रूर अपराध करतात. शाळा कॉलेजात काही मुलं रॅगींग करतात आणि इतर मुलांना त्रास देतात. आणि काही जण तर आपल्या कुटुंबातल्या सदस्यांशी निर्दयीपणे वागतात. म्हणूनच आज माणसाला माणसाची भीती वाटते! मग सैतान या भीतीचा फायदा घ्यायचा कसा प्रयत्न करतो? सैतान माणसाच्या भीतीचा वापर करून आपल्याला प्रचारकार्य करण्यापासून थांबवायचा प्रयत्न करतो. तसंच, यहोवा ज्या इतर गोष्टी आपल्याला सांगतो त्या गोष्टी करण्यापासूनही सैतान रोखायचा प्रयत्न करतो. सैतानाच्या प्रभावामुळेच बऱ्याच सरकारांनी आपल्या कामावर बंदी आणली आहे आणि आपला छळ केलाय. (लूक २१:१२) तसंच, सैतानाच्या या जगात यहोवाच्या साक्षीदारांबद्दल बरीच चुकीची आणि खोटी माहिती पसरवली जात आहे. काही लोक या गोष्टींवर विश्वास ठेवून आपली थट्टा करतात किंवा आपल्याला मारहाणही करतात. (मत्त. १०:३६) पण सैतान करत असलेल्या या गोष्टींचं आपल्याला आश्चर्य वाटायला हवं का? नक्कीच नाही. कारण या गोष्टी तो पहिल्या शतकातसुद्धा करत होता.—प्रे. कार्यं ५:२७, २८, ४०. टेहळणी बुरूज२२.०६ १६ ¶१०-११
बुधवार, ११ डिसेंबर
जे अनेकांना नीतिमत्त्वाच्या मार्गावर आणतात, ते सदासर्वकाळ ताऱ्यांसारखे चमकतील.—दानी. १२:३.
“अनेकांना नीतिमत्त्वाच्या मार्गावर” आणलं जाईल. मग यांत कोणकोण असतील? यांत पुनरुत्थान झालेले, हर्मगिदोनमधून बचावलेले आणि नवीन जगात झालेली मुलंसुद्धा असतील. १,००० वर्षं संपेपर्यंत पृथ्वीवर असलेले सगळे जण परिपूर्ण झालेले असतील. आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की एखादी व्यक्ती परिपूर्ण आहे म्हणून तिला आपोआपच सदासर्वकाळाचं जीवन मिळेल असं नाही. आदाम आणि हव्वा यांचा विचार करा. ते परिपूर्ण होते, पण त्यांनी देवाच्या आज्ञा पाळल्या तरच त्यांना सदासर्वकाळाचं जीवन मिळणार होतं. पण दुःखाची गोष्ट म्हणजे, त्यांनी देवाची आज्ञा मोडली. (रोम. ५:१२) १,००० वर्षांच्या शेवटी सर्व जण परिपूर्ण झालेले असतील. मग हे सगळे परिपूर्ण लोक यहोवाच्या राज्याला कायमसाठी आपला पूर्ण पाठिंबा देतील का? की त्यांच्यापैकी काही जण आदाम आणि हव्वाप्रमाणे परिपूर्ण असूनही यहोवाच्या विरोधात जातील? या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं असेल. टेहळणी बुरूज२२.०९ २२-२३ ¶१२-१४
गुरुवार, १२ डिसेंबर
जगाचं राज्य आता आपल्या प्रभूचं आणि त्याच्या ख्रिस्ताचं झालं आहे.—प्रकटी. ११:१५.
आज आपण जगाची परिस्थिती पाहिली तर काय दिसतं? कुटुंबातली नाती बिघडत चालली आहेत. लोक खूप क्रूर, हिंसक आणि स्वार्थी बनले आहेत. बऱ्याच लोकांचा अधिकाऱ्यांवरून भरवसा उडालाय. ही सगळी परिस्थिती पाहून तुम्हाला कधीकधी निराश वाटतं का? कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की ही परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. पण खरं पाहिलं, तर आज घडत असलेल्या या सगळ्या वाईट गोष्टींमुळेच आपल्याला ही खातरी मिळते की लवकरच चांगली परिस्थिती येईल. आपण असं का म्हणू शकतो? कारण बायबलमध्ये ‘शेवटच्या दिवसांबद्दलच्या’ एका लक्षवेधक भविष्यवाणीत जसं सांगण्यात आलं होतं अगदी तसंच आज लोक वागत आहेत. (२ तीम. ३:१-५) ही भविष्यवाणी इतक्या अचूकपणे पूर्ण होत आहे, की कोणताही प्रामाणिक माणूस त्याला नाकारू शकत नाही. आणि ही भविष्यवाणी अगदी स्पष्टपणे दाखवून देते, की देवाच्या राज्याचा राजा, ख्रिस्त येशू याचं राज्य स्वर्गात सुरू झालंय. पण बायबलमध्ये देवाच्या राज्याबद्दलची ही काही एकच भविष्यवाणी नाही. देवाच्या राज्याबद्दलच्या आणखी बऱ्याच भविष्यवाण्या अलीकडच्या वर्षांमध्ये पूर्ण झाल्या आहेत. तुम्ही कधी जिगसॉ पझल पाहिलंय का? हा एक असा गेम असतो ज्यात चित्राचे छोटे-छोटे तुकडे एकमेकांना जोडून एक पूर्ण चित्र तयार केलं जातं. त्याच प्रकारे या सगळ्या भविष्यवाण्यांचा एकमेकांशी काय संबंध आहे याचं परीक्षण केल्यावर आपण अंताच्या किती जवळ येऊन पोहोचलो आहोत याचं एक स्पष्ट चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभं राहील. टेहळणी बुरूज२२.०७ २ ¶१-२
शुक्रवार, १३ डिसेंबर
बुद्धी कार्यांनी सिद्ध होते.—मत्त. ११:१९.
महामारीच्या काळात मंडळीच्या सभा कशा घेतल्या जाव्यात आणि प्रचारकार्य कसं केलं जावं, याबद्दलसुद्धा स्पष्ट मार्गदर्शन पुरवण्यात आलं. आपण लगेचच इंटरनेटच्या मदतीने आपल्या सभा, संमेलनं आणि अधिवेशनं सुरू केली. तसंच आपण पत्राद्वारे आणि टेलिफोनद्वारे आपलं साक्षकार्य करायला सुरवात केली. आणि यहोवाने आपल्या या सगळ्या प्रयत्नांवर आशीर्वाद दिला. बऱ्याच शाखाकार्यालयांनी या काळात प्रचारकांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं सांगितलं. आणि बऱ्याच प्रचारकांना या काळात साक्षकार्यात खूप चांगले अनुभव आले. महामारीच्या काळात संघटना जरा जास्तच सावधगिरी बाळगत आहे, असं कदाचित काही जणांना वाटलं असेल. पण आपल्याला मिळालेलं मार्गदर्शन किती योग्य होतं, हे वारंवार सिद्ध झालंय. खरंच आज येशू खूप प्रेमळपणे आपल्या लोकांचं मार्गदर्शन करत आहे. आणि आपण यावर जितकं मनन करू, तितकीच आपल्याला या गोष्टीची खातरी पटेल, की पुढे काहीही झालं तरी यहोवा आणि येशू आपल्याला मदत करायला नेहमी आपल्यासोबत असतील.—इब्री १३:५, ६. टेहळणी बुरूज२२.०६ १३ ¶१५-१६
शनिवार, १४ डिसेंबर
प्रार्थना करत राहा. सर्व गोष्टींसाठी आभार माना. तुमच्यासाठी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे.—१ थेस्सलनी. ५:१७, १८.
प्रार्थनेत यहोवाची स्तुती करण्यासोबतच, त्याने दिलेल्या चांगल्या गोष्टींसाठी आपण त्याचे आभारसुद्धा मानले पाहिजेत. जसं की, रंगीबेरंगी फूलं तसंच तऱ्हे-तऱ्हेच्या आणि स्वादिष्ट वस्तूंसाठी आपण आभार मानले पाहिजेत. शिवाय मंडळीतल्या प्रेमळ भाऊबहिणीसाठीसुद्धा आपण यहोवाचे आभार मानू शकतो. या आणि अशा कितीतरी गोष्टी यहोवाने आपल्याला दिल्या आहेत. कारण त्याची इच्छा आहे की आपण आनंदी राहावं. (स्तो. १०४:१२-१५, २४) पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यहोवा आपल्याला भरपूर प्रमाणात आध्यात्मिक अन्न पुरवतो, आणि त्याने भविष्यासाठी आपल्याला एक सुंदर आशा दिली आहे. या गोष्टींबद्दलही आपण त्याचे नेहमी आभार मानले पाहिजेत. यहोवा आपल्यासाठी जे काही करतो त्याबद्दल आभार मानायला आपण कधीकधी विसरून जातो. मग असं होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो? आपण ज्या विशिष्ट गोष्टींसाठी यहोवाला प्रार्थना केली होती, त्याची एक लिस्ट बनवू शकतो. आणि मग यहोवाने या प्रार्थनांचं कशा प्रकारे उत्तर दिलंय ते आपण वेळोवेळी तपासून पाहू शकतो. मग त्याने केलेल्या मदतीसाठी आपण प्रार्थना करून त्याचे आभार मानू शकतो.—कलस्सै. ३:१५. टेहळणी बुरूज२२.०७ २२ ¶८-९
रविवार, १५ डिसेंबर
तो यहोवाच्या नियमशास्त्रावर मनापासून प्रेम करतो, आणि रात्रंदिवस त्याच्यावर विचार करतो.—स्तो. १:२.
आपल्याला माहीत आहे, की फक्त अभ्यास करणं पुरेसं नाही. सत्याचा पूर्ण फायदा होण्यासाठी आपण शिकलेल्या गोष्टींप्रमाणे जीवन जगलं पाहिजे. असं केलं तरच आपल्याला सत्यामुळे खरा आनंद मिळू शकतो. (याको. १:२५) पण आपण सत्याप्रमाणे जीवन जगत आहोत की नाही, हे आपल्याला कसं कळेल? एका भावाने असं सांगितलं, की यासाठी आपण स्वतःचं परीक्षण केलं पाहिजे. म्हणजेच आपण कोणत्या बाबतीत चांगलं करत आहोत आणि कोणत्या बाबतीत आणखी सुधारणा करायची गरज आहे, हे ओळखायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रेषित पौलने याबद्दल असं म्हटलं: “आत्तापर्यंत आपण जी प्रगती केली आहे, त्याच मार्गाने आपण पुढेही नीट चालत राहू या.” (फिलिप्पै. ३:१६) ‘सत्याच्या मार्गावर चालत राहिल्यामुळे’ खरंच आपल्याला किती फायदे होतात! यामुळे आपलं स्वतःचं जीवन तर सुधारतंच, पण यहोवाला आणि आपल्या भाऊबहिणींनाही खूप आनंद होतो. (नीति. २७:११; ३ योहा. ४) सत्याची कदर करण्याची आणि सत्याप्रमाणे जीवन जगायची यापेक्षा आणखी मोठी कारणं कोणती असू शकतात? टेहळणी बुरूज२२.०८ १८-१९ ¶१६-१८
सोमवार, १६ डिसेंबर
देवाच्या कळपाचा सांभाळ करा.—१ पेत्र ५:२.
मंडळीतले वडील कसं दाखवू शकतात की यहोवा आणि येशूवर त्यांचं प्रेम आहे? एक महत्त्वाचा मार्ग म्हणजे, येशूच्या मेंढरांची काळजी घेणं. (१ पेत्र ५:१, २) ही गोष्ट, येशूने पेत्रला जे म्हटलं त्यावरून स्पष्ट होते. पेत्रने येशूला तीन वेळा नाकारलं होतं. त्यामुळे येशूवर आपलं खूप प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी पेत्र कदाचित धडपड करत असावा. म्हणून आपल्या पुनरुत्थानानंतर येशूने त्याला विचारलं: “योहानच्या मुला शिमोन, तू यांच्यापेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करतोस का?” आपल्या प्रभूवर आपलं प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी पेत्र काहीही करायला तयार झाला असता असं आपण खातरीने म्हणू शकतो. मग येशू पेत्रला म्हणाला: “माझ्या लहान मेढरांची काळजी घे.” (योहा. २१:१५-१७) तेव्हापासून अगदी शेवटपर्यंत, पेत्रने प्रभूच्या मेंढरांची खूप प्रेमळपणे काळजी घेतली, आणि असं करून येशूवर असलेलं आपलं दाखवून दिलं. वडिलांनो, येशूने पेत्रला म्हटलेले शब्द तुमच्यासाठीही तितकेच महत्त्वाचे आहेत हे तुम्ही कसं दाखवू शकता? एक म्हणजे, भाऊबहिणींना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही नियमितपणे मेंढपाळ भेटी घेऊ शकता. तसंच, जे सेवेत थंड पडले आहेत त्यांना पुन्हा यहोवाकडे आणण्यासाठी खास प्रयत्न करू शकता. असं करून यहोवा आणि येशूवर तुमचं किती प्रेम आहे हे तुम्हाला दाखवता येईल.—यहे. ३४:११, १२. टेहळणी बुरूज२३.०१ २९ ¶१०-११
मंगळवार, १७ डिसेंबर
देव विश्वासू आहे आणि तुम्ही सहन करू शकणार नाही अशी एकही परीक्षा तो तुमच्यावर येऊ देणार नाही.—१ करिंथ. १०:१३.
एखाद्या कमतरतेशी झगडत असताना आपल्याला किती त्रास होतोय हे दुसरं कोणीच समजू शकणार नाही, असा विचार करू नका. असा विचार करणं धोकादायक आहे. कारण असा विचार केल्यामुळे आपण अगदी असाहाय्य आहोत आणि चुकीच्या इच्छांवर आपण कधीच मात करू शकत नाही, असं तुम्हाला वाटेल. पण हे खरं नाही. बायबल असं म्हणतं: “परीक्षेच्या वेळी तिच्यातून बाहेर पडायचा मार्गही तो तयार करेल, म्हणजे तुम्हाला ती सहन करता येईल.” त्यामुळे एखादी चुकीची इच्छा कितीही तीव्र असली, तरी आपण तिच्यावर मात करू शकतो आणि यहोवाच्या मदतीने आपण चुकीचं करण्यापासून स्वतःला आवरू शकतो. आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की आपण अपरिपूर्ण असल्यामुळे अशा चुकीच्या इच्छा आपल्या मनात वेळोवेळी येतील, त्यांना आपण टाळू शकत नाही. पण या इच्छांचा आपण ठामपणे विरोध नक्कीच करू शकतो. योसेफनेही असंच केलं. पोटीफरच्या बायकोने जेव्हा त्याला मोहात पाडायचा प्रयत्न केला, तेव्हा तो तिथून लगेच पळून गेला. (उत्प. ३९:१२) त्यामुळे चुकीच्या इच्छांपुढे हात टेकायची काहीच गरज नाही. टेहळणी बुरूज२३.०१ १२-१३ ¶१६-१७
बुधवार, १८ डिसेंबर
देव कधीच भेदभाव करत नाही.—रोम. २:११.
यहोवा एक न्यायी देव आहे. (अनु. ३२:४) आणि जो न्यायी आहे तो कधीच भेदभाव करत नसतो. यहोवासुद्धा कधीच भेदभाव करत नाही. (प्रे. कार्यं १०:३४, ३५) बायबल ज्या भाषांमध्ये लिहिण्यात आलं होतं त्यावरून यहोवाचा हा सुंदर गुण दिसून येतो. यहोवाने असं वचन दिलं होतं, की अंताच्या समयात बायबलमध्ये असलेलं “खरं ज्ञान खूप वाढेल,” आणि अनेकांना ते कळेल. (दानी. १२:४) आज बायबल आणि बायबल आधारित साहित्याचं खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतर केलं जात आहे, प्रकाशित केलं जात आहे आणि वितरण केलं जात आहे. आणि अशा प्रकारे बायबलमधलं खरं ज्ञान वाढत आहे. पण यहोवाच्या साक्षीदारांनी मात्र संपूर्ण बायबल किंवा त्याच्या काही भागांचं २४० पेक्षा जास्त भाषांमध्ये भाषांतर केलं आहे. आणि ते मिळवण्यासाठी आज एक पैसासुद्धा द्यावा लागत नाही. त्यामुळे अंत येण्याआधी आज सगळ्या राष्ट्रांमधले लोक ‘राज्याच्या या आनंदाच्या संदेशाला’ खूप चांगला प्रतिसाद देत आहेत. (मत्त. २४:१४) यहोवाची अशी इच्छा आहे, की जगातल्या जास्तीत जास्त लोकांनी बायबल वाचून त्याला जाणून घ्यावं. यातून तो किती न्यायी देव आहे हे दिसून येतं. तसंच तो किती प्रेमळ आहे, हेसुद्धा दिसून येतं. टेहळणी बुरूज२३.०२ ५ ¶११-१२
गुरुवार, १९ डिसेंबर
या जगाच्या व्यवस्थेचं अनुकरण करू नका. तर आपली विचारसरणी बदलून स्वतःचं रूपांतर होऊ द्या.—रोम. १२:२.
तुमचंही नीतिमत्त्वावर प्रेम आहे का? नक्कीच असेल! पण आपण सगळे अपरिपूर्ण आहोत. आणि आपण जर सावध राहिलो नाही तर नीतिमत्त्वाबद्दल जगाच्या दृष्टिकोनाचा आपल्यावर अगदी सहज प्रभाव पडू शकतो. (यश. ५:२०) काही जण नियमांवर अडून बसतात आणि ते स्वतःला जास्तच धार्मिक समजतात. दुसऱ्यांकडून थोडी जरी चूक झाली तरी ते लगेच त्यांच्याकडे बोट दाखवतात. असे लोक स्वतःला नीतिमान समजत असले तरी त्याला नीतिमत्त्व म्हणता येणार नाही. कारण देवाला अशा प्रकारचं वागणं बिलकुल आवडत नाही. येशूच्या काळातसुद्धा काही धर्मपुढारी स्वतःला जास्तच नीतिमान समजायचे. आणि योग्य काय, अयोग्य काय याबद्दल त्यांनी स्वतःचे स्तर ठरवले होते. (उप. ७:१६; लूक १६:१५) पण जो खरोखर नीतिमान असतो तो स्वतःला इतरांपेक्षा कधीच श्रेष्ठ समजत नाही. नीतिमत्त्व हा एक सुंदर गुण आहे. पण नीतिमत्त्व म्हणजे नेमकं काय? सोप्या शब्दात सांगायचं तर यहोवाच्या नजरेत जे योग्य ते करणं म्हणजे नीतिमत्त्व. बायबलमध्ये “नीतिमत्त्वाबद्दल” बोलताना जे शब्द वापरलेत त्याचा अर्थ सगळ्यात उच्च स्तरांप्रमाणे म्हणजे यहोवाच्या स्तरांप्रमाणे जीवन जगणं असा होतो. टेहळणी बुरूज२२.०८ २७ ¶३-५
शुक्रवार, २० डिसेंबर
मी तर तुम्हाला मित्र म्हटलंय.—योहा. १५:१५.
येशूच्या शिष्यांकडून चुका झाल्या तरी त्याने त्यांच्यावर भरवसा ठेवला. (योहा. १५:१६) एकदा याकोब आणि योहानने येशूला विनंती केली की त्याने त्याच्या राज्यात आपल्याला एक खास पद द्यावं. पण तेव्हा येशूने असा विचार केला नाही की ते चुकीच्या हेतूने यहोवाची सेवा करत आहेत किंवा आता ते प्रेषित राहायच्या योग्य नाहीत. (मार्क १०:३५-४०) पुढे येशूला अटक करण्यात आली त्या रात्री त्याचे सगळे शिष्य त्याला सोडून पळून गेले. (मत्त. २६:५६) पण तरी येशूने त्यांच्यावर भरवसा ठेवायचं सोडलं नाही. त्यांच्यामध्ये बऱ्याच कमतरता आहेत हे त्याला माहीत होतं. तरीसुद्धा “त्यांच्यावर त्याने शेवटपर्यंत प्रेम केलं.” (योहा. १३:१) पुनरुत्थान झाल्यानंतर येशूने त्याच्या ११ विश्वासू प्रेषितांवर काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवल्या. त्याने त्यांना शिष्य बनवण्याच्या कामात पुढाकार घ्यायची आणि आपल्या मेंढरांची काळजी घ्यायची जबाबदारी सोपवली. (मत्त. २८:१९, २०; योहा. २१:१५-१७) येशूने या अपरिपूर्ण शिष्यांवर जो भरवसा ठेवला तो योग्य होता. कारण त्यांनी शेवटपर्यंत विश्वासूपणे सेवा केली. खरंच येशूने इतरांवर भरवसा ठेवायच्या बाबतीत एक चांगलं उदाहरण मांडलं. टेहळणी बुरूज२२.०९ ६ ¶१२
शनिवार, २१ डिसेंबर
यहोवा माझ्या बाजूने आहे; मी घाबरणार नाही.—स्तो. ११८:६.
यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे आणि तो आपल्या बाजूने आहे या गोष्टीची जर आपल्याला खातरी असेल तर सैतानाने काही जरी केलं तरी आपल्याला भीती वाटणार नाही. उदाहरणार्थ, स्तोत्र ११८ च्या लेखकाला त्याच्या जीवनात खूप वाईट परिस्थितीचा सामना करावा लागला होता. त्याला बरेच शत्रू होते आणि त्यांच्यापैकी काही उच्च पदावर असलेले अधिकारीसुद्धा होते (वचन ९, १०). कधीकधी तर त्याला खूप मानसिक ताण सहन करावा लागला (वचन १३). यासोबतच त्याला यहोवाकडून ताडनही मिळालं होतं (वचन १८). तरीसुद्धा हे स्तोत्र लिहिणारा लेखक असं म्हणाला, “मी घाबरणार नाही.” यहोवाने त्याला ताडन दिलेलं असलं, तरी आपल्या स्वर्गीय पित्याचं आपल्यावर खूप प्रेम आहे ही गोष्ट त्याला माहीत होती. आणि म्हणून त्याला खातरी होती, की त्याच्या जीवनात कोणतीही परिस्थिती आली तरी यहोवा त्याला प्रेमळपणे मदत करेल. (स्तो. ११८:२९) यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे या गोष्टीची आपल्याला खातरी असणं खूप महत्त्वाचंय. ही खातरी असल्यामुळे आपल्याला तीन गोष्टींच्या भीतीवर मात करता येईल. (१) कुटुंबाच्या गरजा भागवता येणार नाहीत अशी भीती; (२) माणसाची भीती, आणि (३) मरणाची भीती. टेहळणी बुरूज२२.०६ १५ ¶३-४
रविवार, २२ डिसेंबर
जो माणूस धीराने परीक्षा सहन करतो तो सुखी! कारण परीक्षा पार केल्यावर त्याला जीवनाचा मुकुट मिळेल.—याको. १:१२.
आपल्या जीवनात यहोवाच्या उपासनेला सगळ्यात पहिलं स्थान आहे या गोष्टीची खातरी करा. यहोवा आपला निर्माणकर्ता असल्यामुळे आपण त्याची उपासना केली पाहिजे. (प्रकटी. ४:११; १४:६, ७) आणि त्याला आवडेल अशा प्रकारे, म्हणजे “पवित्र शक्तीने आणि सत्याप्रमाणे” आपण त्याची उपासना केली पाहिजे. आणि याच गोष्टीला आपल्या जीवनात सगळ्यात जास्त महत्त्वं असलं पाहिजे. (योहा. ४:२३, २४) आपली उपासना देवाच्या वचनात असलेल्या सत्याप्रमाणे असावी म्हणून पवित्र शक्तीने आपलं मार्गदर्शन करावं अशी आपली इच्छा आहे. ज्या ठिकाणी आपल्या कामावर निर्बंध लावण्यात आले आहेत किंवा आपल्या कामावर बंदी आहे, अशा ठिकाणी जरी आपण राहत असलो तरी यहोवाच्या उपासनेला आपल्या जीवनात आपण सगळ्यात पहिलं स्थान दिलं पाहिजे. आज १०० पेक्षा जास्त भाऊबहीण फक्त यहोवाचे साक्षीदार असल्यामुळे जेलमध्ये आहेत. असं असलं तरी प्रार्थना करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी आणि इतरांना देवाच्या राज्याबद्दल सांगण्यासाठी त्यांना जे जमेल ते आनंदाने करायचा ते प्रयत्न करतात. आपलाही जेव्हा छळ केला जातो किंवा निंदा केली जाते, तेव्हा यहोवा आपल्यासोबत आहे आणि तो आपल्याला नक्की प्रतिफळ देईल या जाणिवेने आपणसुद्धा आनंदी राहू शकतो.—१ पेत्र ४:१४. टेहळणी बुरूज२२.१० ९ ¶१३
सोमवार, २३ डिसेंबर
बुद्धीमुळे संरक्षण मिळतं.—उप. ७:१२.
नीतिवचनं या पुस्तकात यहोवाने बऱ्याच गोष्टींबद्दल आपल्याला व्यावहारिक सल्ले दिले आहेत, जे नेहमीच फायद्याचे ठरतात. कारण त्यांमुळे आपलं जीवन आणखी आनंदी आणि अर्थपूर्ण होऊ शकतं. पहिलं, आहे त्यात समाधानी राहा. नीतिवचनं २३:४, ५ असा सल्ला देतं: “संपत्ती मिळवण्यासाठी आपली शक्ती वाया घालवू नकोस. . . . तिला गरुडासारखे पंख फुटतील आणि ती उडून जाईल.” पण तरीसुद्धा गरीब-श्रीमंत असे सगळेच हात धुवून पैशाच्या मागे लागतात. पैसा मिळवण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. त्यामुळे त्यांचं नाव खराब होतं, नातेसंबंध बिघडतात आणि त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. (नीति. २८:२०; १ तीम. ६:९, १०) दुसरं, बोलण्याआधी विचार करा. आपण विचार न करता बोललो तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं. नीतिवचनं १२:१८ म्हणतं: “विचार न करता बोललेले शब्द, तलवारीच्या घावांसारखे असतात, पण बुद्धिमानाच्या शब्दांमुळे घाव भरून निघतात.” आपण इतरांच्या चुकांची चहाडी करायचं टाळलं तर आपल्यातली शांती टिकून राहील.—नीति. २०:१९. टेहळणी बुरूज२२.१० २१ ¶१४; २२ ¶१६-१७
मंगळवार, २४ डिसेंबर
ही गुंडाळी खा आणि इस्राएलच्या घराण्याशी जाऊन बोल.—यहे. ३:१.
यहेज्केलला जो संदेश घोषित करायचा होता, तो त्याने पूर्णपणे समजून घेणं गरजेचं होतं. तो संदेश त्याच्या अगदी मनापर्यंत पोहोचणं गरजेचं होतं. कारण यामुळेच त्याला तो इतरांना सांगण्याची प्रेरणा मिळणार होती. मग एक आश्चर्याची गोष्ट घडली. यहेज्केलने ती गुंडाळी खाल्ली तेव्हा त्याला ती “मधासारखी गोड लागली.” (यहे. ३:३) यावरून काय सूचित होतं? हेच की यहोवाच्या वतीने लोकांना एक संदेश सांगणं हा यहेज्केलसाठी एक सुंदर, सुखद आणि आनंद देणारा अनुभव होता. (स्तो. १९:८-११) यहोवाने त्याला आपला संदेष्टा म्हणून सेवा करण्यासाठी निवडलं होतं याबद्दल तो खूप आभारी होता. मग यहोवा यहेज्केलला म्हणाला: “मी जे काही तुला सांगतोय ते सगळं लक्षपूर्वक ऐक आणि त्याकडे आपलं मन लाव.” (यहे. ३:१०) असं म्हणून यहोवाने यहेज्केलला गुंडाळीतले सगळे शब्द लक्षात ठेवायला आणि त्यांवर मनन करायला सांगितलं. असं केल्यामुळे यहेज्केलचा स्वतःचा विश्वास तर मजबूत झालाच, पण त्यासोबत लोकांना कोणता जबरदस्त संदेश सांगायचा आहे हेसुद्धा त्याला कळलं. (यहे. ३:११) अशा रीतीने यहेज्केलला देवाचा संदेश पूर्णपणे समजला आणि त्यावर त्याचा विश्वास बसला. आणि यामुळे आता तो इतरांना जाऊन हा संदेश सांगायला तयार होता. टेहळणी बुरूज२२.११ ६ ¶१२-१४
बुधवार, २५ डिसेंबर
बलिदानापेक्षा आज्ञा पाळणं चांगलं.—१ शमु. १५:२२.
संघटनेत होणाऱ्या बदलांमुळे आपल्या एकनिष्ठेची परीक्षा होते तेव्हा आपण काय केलं पाहिजे? संघटनेत बदल होतात तेव्हा मनापासून सहकार्य करा. इस्राएली लोक ओसाड रानातून प्रवास करत होते तेव्हा, त्यांच्यातले कहाथी लोक एक महत्त्वाची जबाबदारी पार पाडायचे. जेव्हा-जेव्हा इस्राएली लोक आपली छावणी दुसरीकडे हलवायचे तेव्हा कहाथी लोकांपैकी काही जण कराराची पेटी घेऊन सर्व लोकांच्या पुढे चालायचे. (गण. ३:२९, ३१; १०:३३; यहो. ३:२-४) हा खरंच त्यांच्यासाठी एक मोठा सन्मान होता! पण जेव्हा इस्राएली लोक वचन दिलेल्या देशात राहू लागले तेव्हा परिस्थिती बदलली. आता कराराची पेटी सतत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची गरज राहिली नाही. त्यामुळे कहाथी लोकांना इतर जबाबदऱ्या देण्यात आल्या. (१ इति. ६:३१-३३; २६:१, २४) हा बदल झाला तेव्हा कहाथी लोकांनी कुरकुर केली का किंवा पूर्वी आम्ही इतकी खास जबाबदारी पार पाडायचो, त्यामुळे आता आम्हाला आणखी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाव्यात अशी मागणी त्यांनी केली का? बायबलमध्ये असं कुठंही सांगितलेलं नाही. मग यातून आपण काय शिकू शकतो? यहोवाच्या सेवेत जेव्हा बदल केले जातात तेव्हा कधी-कधी त्यांचा तुमच्या नेमणुकीवरही परिणाम होऊ शकतो. असं असलं तरी या सगळ्या बदलांना मनापासून सहकार्य करा. तुम्हाला जी काही जबाबदारी दिली जाते ती आनंदाने पार पाडा. संघटनेत तुम्ही कोणती जबाबदारी पार पाडता यावरून यहोवाच्या नजरेत तुमचं मोल ठरत नाही, हे नेहमी लक्षात असू द्या. तुम्ही कोणती जबाबदारी पार पाडता यापेक्षा तुम्ही किती मनापासून यहोवाच्या आज्ञा पाळता, हे त्याच्यासाठी जास्त महत्त्वाचंय. टेहळणी बुरूज२२.११ २३ ¶१०-११
गुरुवार, २६ डिसेंबर
माझ्या बेड्यांची त्याला लाज वाटली नाही.—२ तीम. १:१६.
पौलला कैद करण्यात आलं तेव्हा अनेसिफरने पौलचा शोध घेतला आणि त्याची भेट झाल्यावर त्याने वेगवेगळ्या मार्गांनी त्याला मदत केली. पौलला मदत करण्यासाठी अनेसिफरने आपला जीवसुद्धा धोक्यात घातला. मग यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? आपल्या बांधवांचा छळ केला जातो तेव्हा आपण माणसांच्या भीतीला बळी पडू नये. उलट, आपण आपल्या बांधवांना मदत करत राहिलं पाहिजे. आपण सतत त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि व्यावहारिक मार्गांनी त्यांना मदत करायचा प्रयत्न केला पाहिजे. (नीति. १७:१७) छळाचा सामना करत असताना या बांधवांना आपल्या प्रेमाची आणि आपल्या मदतीची गरज आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. रशियातल्या आपल्या प्रिय भाऊबहिणींना तुरुंगात टाकण्यात आलं, तेव्हा तिथले इतर भाऊबहीण त्यांची मदत करण्यासाठी कसे पुढे आले याचा विचार करा. या भाऊबहिणींवर खटला सुरू असताना त्यांना आपला पाठिंबा दाखवण्यासाठी बरेच भाऊबहीणसुद्धा कोर्टात यायचे. त्यांच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो? जेव्हा जबाबदार बांधवांची बदनामी केली जाते, किंवा त्यांना अटक केली जाते, किंवा त्यांचा छळ केला जातो, तेव्हा आपण घाबरून जाऊ नये. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना केली पाहिजे, त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांची काळजी घेतली पाहिजे आणि इतर व्यावहारिक मार्गांनी त्यांना कशी मदत करता येईल, याचा विचार केला पाहिजे.—प्रे. कार्यं १२:५; २ करिंथ. १:१०, ११. टेहळणी बुरूज२२.११ १७ ¶११-१२
शुक्रवार, २७ डिसेंबर
त्यांनी मला खूप सांत्वन दिलं आहे.—कलस्सै. ४:११.
विपत्ती येते तेव्हा मंडळीतल्या भाऊबहिणींना भावनिक आधार देणं आणि आध्यात्मिक रितीने त्यांना मदत करणं, हीसुद्धा मंडळीतल्या वडिलांची एक जबाबदारी आहे. (१ पेत्र ५:२) विपत्तीच्या काळात भाऊबहीण सुरक्षित आहेत का? त्यांच्याकडे खाण्यापिण्याच्या वस्तू, कपडे आणि राहण्याचं सुरक्षित ठिकाण आहे का, या गोष्टींची वडिलांनी खातरी करून घेणं गरजेचं आहे. विपत्ती येऊन गेल्यानंतरसुद्धा भाऊबहिणींना कदाचित बराच काळ किंवा बरेच महिने धीर देण्याची किंवा वचनांतून प्रोत्साहन देण्याची गरज पडू शकते. (योहा. २१:१५) याबद्दल हेरल्ड नावाचे भाऊ काय म्हणतात ते पाहा. ते शाखा समितीचे सदस्य म्हणून सेवा करत आहेत. आणि त्यांनी बऱ्याच विपत्तीग्रस्त भाऊबहिणींना भेट दिली आहे. ते म्हणतात: “भाऊबहिणींना दुःखातून सावरायला वेळ लागू शकतो. ते कदाचित सावरतीलही. पण आपल्या जवळच्या व्यक्तीला किंवा जिवापाड जपलेल्या वस्तूंना गमावल्याचं दुःख त्यांना कदाचित लगेच विसरता येणार नाही. त्यांच्या आठवणी किंवा त्या भयंकर परिस्थितीतून ते कसे थोडक्यात वाचले होते, त्याच्या आठवणी पुन्हा-पुन्हा त्यांच्या डोळ्यांसमोर येतील. पण याचा अर्थ असा होत नाही, की त्यांचा विश्वास कमजोर आहे. कारण अशा प्रकारच्या भावना मनात येणं साहजिक आहे.” “रडणाऱ्यांसोबत रडा,” हा बायबलमध्ये दिलेला सल्ला वडील पाळण्याचा प्रयत्न करतात.—रोम. १२:१५. टेहळणी बुरूज२२.१२ २२ ¶१; २४-२५ ¶१०-११
शनिवार, २८ डिसेंबर
पवित्र शक्तीच्या मार्गदर्शनाप्रमाणे चालत राहा, म्हणजे तुम्ही शारीरिक वासना पूर्ण करणारच नाही.—गलती. ५:१६.
जे योग्य आहे ते करत राहण्यासाठी आपल्याला मदत व्हावी म्हणून यहोवा उदारपणे आपल्याला त्याची पवित्र शक्ती पुरवतो. जेव्हा आपण देवाच्या वचनातून अभ्यास करतो, तेव्हा या शक्तीचा प्रभाव आपल्यावर होत असतो. तसंच आपण ख्रिस्ती सभांना जातो तेव्हासुद्धा आपल्याला देवाची ही पवित्र शक्ती मिळते. या सभांमध्ये आपण आपल्या भाऊबहिणींसोबत वेळ घालवतो, कारण तेही आपल्यासारखंच योग्य ते करत राहण्यासाठी खूप मेहनत घेतात. आणि यामुळे आपल्यालाही प्रोत्साहन मिळतं. (इब्री १०:२४, २५; १३:७) शिवाय, आपण जेव्हा यहोवाला आपल्या कमतरतांविरुद्ध लढत राहण्यासाठी कळकळीची विनंती करतो, तेव्हा या कमतरतांविरुद्ध लढत राहण्यासाठी तो आपल्याला पवित्र शक्ती देतो. या सगळ्या गोष्टी केल्यामुळे चुकीच्या इच्छा आपल्यामधून आपोआप निघून जाणार नाहीत. पण त्याप्रमाणे वागण्याचा मोह आपल्याला टाळता येईल. आध्यात्मिक गोष्टी नियमितपणे करत राहायची सवय लावल्यानंतर आपण ती सवय टिकवून ठेवली पाहिजे आणि योग्य इच्छा आपण आपल्या मनात उत्पन्न करत राहिलं पाहिजे. टेहळणी बुरूज२३.०१ ११ ¶१३-१४
रविवार, २९ डिसेंबर
मी कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाणार नाही.—१ करिंथ. ६:१२.
बायबल हे आरोग्याबद्दलचं किंवा आहाराबद्दलचं पुस्तक नसलं, तरी त्या बाबतींत यहोवा कसा विचार करतो हे आपल्याला त्यातून कळतं. उदाहरणार्थ, तो आपल्याला बायबलमधून सांगतो, की “नुकसान करणाऱ्या गोष्टी आपल्या शरीरापासून दूर” ठेवा. (उप. ११:१०) दारूबाजीमुळे आणि अधाशीपणामुळे आपल्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टी खूप वाईट आहेत असं बायबलमध्ये म्हटलंय. (नीति. २३:२०) आपण काय आणि किती प्रमाणात खावं-प्यावं हे ठरवताना आपण संयम राखावा अशी यहोवा आपल्याकडून अपेक्षा करतो. (१ करिंथ. ९:२५) यहोवाने दिलेल्या जीवनाच्या देणगीची आपल्याला कदर आहे हे दाखवण्यासाठी आपण आपल्या विचारशक्तीचा उपयोग करून चांगले निर्णय घेऊ शकतो. (स्तो. ११९:९९, १००; नीति. २:११) उदाहरणार्थ, आपण काय खातो, काय पितो या गोष्टींकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. एखादी गोष्ट आपल्याला आवडत असेल, पण ती खाल्ल्यामुळे जर आपल्याला त्रास होत असेल तर आपण ती टाळली पाहिजे. तसंच, जेव्हा आपण पुरेशी झोप घेतो, नियमितपणे व्यायाम करतो, स्वच्छ राहतो आणि आपलं घरसुद्धा स्वच्छ ठेवतो तेव्हा आपण समंजसपणा दाखवत असतो. टेहळणी बुरूज२३.०२ २१ ¶६-७
सोमवार, ३० डिसेंबर
तू काय वाचलं आहेस?—लूक १०:२६.
बायबलमधली ही मौल्यवान रत्नं आपण कशी शोधू शकतो? त्यासाठी २ तीमथ्य ३:१६, १७ मध्ये काय म्हटलंय त्याकडे लक्ष द्या. तिथे म्हटलंय, “संपूर्ण शास्त्र” (१) शिकवण्यासाठी, (२) ताडन देण्यासाठी, (३) सुधारणूक करण्यासाठी आणि (४) शिस्त लावण्यासाठी “उपयोगी आहे.” बायबलमधला एखादा अहवाल वाचताना त्यातून तुम्हाला यहोवाबद्दल, त्याच्या उद्देशाबद्दल आणि तत्त्वांबद्दल काय शिकायला मिळतं याचा विचार करा. यासोबतच स्वतःचं ताडन करण्यासाठी ते कसं मदत करतं याचाही विचार करा; दुसऱ्या शब्दांत, बायबलची ही वचनं तुमच्यातल्या चुकीच्या प्रवृत्ती किंवा कल ओळखून त्यांत बदल करायला आणि यहोवाला विश्वासू राहायला कशी मदत करतात याचा विचार करा. त्यासोबतच बायबलचा हा अहवाल एखादा चुकीचा दृष्टिकोन सुधारायला कशी मदत करतो याचाही विचार करा. उदाहरणार्थ, सेवाकार्यात तुम्हाला अशी एखादी व्यक्ती भेटली असेल जिचा एखाद्या विषयाबद्दल चुकीचा दृष्टिकोन असेल. मग तो सुधारण्यासाठी तुम्ही या अहवालाचा उपयोग कसा करू शकता याचा विचार करा. तसंच, बायबलची ही वचनं स्वतःला शिस्त लावायला, म्हणजेच सगळ्या गोष्टींच्या बाबतीत यहोवासारखा विचार करायला कशी मदत करतात याचा विचार करा. बायबल वाचत असताना हे चार फायदे लक्षात ठेवल्यामुळे बायबलमधली मौल्यवान रत्नं शोधायला तुम्हाला मदत होईल आणि त्यामुळे बायबल वाचनातून तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल. टेहळणी बुरूज२३.०२ ११ ¶११
मंगळवार, ३१ डिसेंबर
त्याच्या राज्याचा कधीही नाश होणार नाही.—दानी. ७:१४.
दानीएलच्या पुस्तकातल्या आणखी एका भविष्यवाणीत असं सांगितलं होतं, की सात काळ म्हटलेला एक लाक्षणिक काळ पूर्ण झाल्यानंतर येशू त्याचं राज्य सुरू करेल. मग येशूने त्याचं राज्य नेमकं कधी सुरू केलं, हे आपल्याला कसं कळतं? (दानी. ४:१०-१७) भविष्यवाणीत सांगितलेले “सात काळ” २,५२० वर्षांचा काळ आहे. हा काळ इ.स.पू. ६०७ मध्ये सुरू झाला. त्या वर्षी बॅबिलोनी लोकांनी यरुशलेममध्ये देवाच्या वतीने राज्य करणाऱ्या शेवटच्या राजाला सत्तेवरून काढून टाकलं. इ.स.पू. ६०७ मध्ये सुरू झालेले सात काळ कधी पूर्ण झाले? इ.स. १९१४ मध्ये जेव्हा यहोवाने देवाच्या राज्याचा राजा म्हणून “कायदेशीर हक्क” असलेल्या येशूवर आपलं राज्य सोपवलं त्या वेळी हे सात काळ पूर्ण झाले. (यहे. २१:२५-२७) या भविष्यवाणीमुळे आपल्याला कसा फायदा होतो? ‘सात काळांबद्दल’ जाणून घेतल्यामुळे आपल्याला ही खातरी मिळते, की यहोवाने जे काही सांगितलंय ते तो अगदी योग्य वेळेवर पूर्ण करतो. ज्याप्रमाणे त्याने ठरवलेल्या निश्चित वेळी येशूला राजा बनवलं त्याचप्रमाणे बाकीच्या सगळ्या भविष्यवाण्यासुद्धा तो अगदी योग्य वेळी पूर्ण करेल. आपण पूर्ण खातरीने म्हणू शकतो की यहोवाचा दिवस अगदी योग्य वेळी येईल. “त्याला उशीर होणार नाही.”—हब. २:३. टेहळणी बुरूज२२.०७ ३ ¶३-५