धडा २६
जगात वाईट गोष्टी आणि दुःख का आहे?
एखादी वाईट घटना घडते तेव्हा प्रत्येकाच्या मनात असा प्रश्न येतोच, की “अशा गोष्टी का घडतात?” पण तुम्हाला हे जाणून बरं वाटेल, की बायबलमध्ये या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर दिलंय.
१. सैतानाने वाईट गोष्टींची सुरुवात कशी केली?
दियाबल सैतानाने देवाविरुद्ध बंड केलं. सैतानाला दुसऱ्यांवर अधिकार गाजवण्याची इच्छा होती. म्हणून त्याने पहिल्या मानवी जोडप्याला, आदाम आणि हव्वाला बहकवलं, आणि आपल्या बंडात सामील केलं. यासाठी सैतान हव्वाशी खोटं बोलला. (उत्पत्ती ३:१-५) जणू काय तो तिला म्हणत होता, की ‘तुझ्या फायद्याचं काहीतरी यहोवा तुझ्यापासून दूर ठेवतोय.’ तो असं सांगायचा प्रयत्न करत होता, की माणसांनी देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत, तर ते जास्त आनंदी होतील. सैतानाने हव्वाला सांगितलं की तिने देवाची आज्ञा मोडली तरी ती मरणार नाही. अशा रितीने, सैतान जगातलं पहिलं खोटं बोलला. म्हणूनच बायबलमध्ये त्याला “खोटारडा आणि खोटेपणाचा बाप” असं म्हटलंय.—योहान ८:४४.
२. आदाम आणि हव्वाने कोणता निर्णय घेतला?
यहोवाने आदाम आणि हव्वाला सगळं काही दिलं होतं. ते एदेन बागेच्या प्रत्येक झाडाचं फळ खाऊ शकत होते. फक्त एका झाडाचं फळ खाण्याची देवाने त्यांना मनाई केली होती. (उत्पत्ती २:१५-१७) पण असं असूनही आदाम आणि हव्वाने त्या झाडाचं फळ खायचं ठरवलं. हव्वाने “त्याचं फळ तोडलं आणि ते खाल्लं.” नंतर आदामनेही “ते खाल्लं.” (उत्पत्ती ३:६) अशा रितीने त्या दोघांनी देवाची आज्ञा मोडली. आदाम आणि हव्वा परिपूर्ण असल्यामुळे योग्य ते करणं त्यांच्या स्वभावातच होतं. त्यामुळे देवाची आज्ञा मोडायचा त्यांचा हा निर्णय, जाणूनबुजून घेतलेला निर्णय होता. अशा प्रकारे त्यांनी पाप केलं आणि देवाचा अधिकार नाकारला. या निर्णयामुळे त्यांच्यावर खूप दुःख ओढवलं.—उत्पत्ती ३:१६-१९.
३. आदाम आणि हव्वाच्या निर्णयामुळे आपल्यावर काय परिणाम झालाय?
आदाम आणि हव्वाने पाप केल्यामुळे ते अपरिपूर्ण बनले. आणि त्यांनी ही अपरिपूर्णता एखाद्या आनुवंशिक आजाराप्रमाणे आपल्या सगळ्या वंशजांना वारशाने दिली. बायबल म्हणतं, “एका माणसाद्वारे [आदामद्वारे] पाप जगात आलं आणि पापाद्वारे मरण आलं आणि अशा रितीने सर्व माणसांमध्ये मरण पसरलं.”—रोमकर ५:१२.
आज आपल्याला वेगवेगळ्या कारणांमुळे दुःख सोसावं लागतं. कधी आपल्याला स्वतःच्या, तर कधी दुसऱ्यांच्या चुकांमुळे दुःख सोसावं लागतं. आणि कधीकधी अनपेक्षित घटनांमुळे आपल्यावर दुःख ओढवतं.—उपदेशक ९:११ वाचा.
आणखी जाणून घेऊ या
आज जगात दिसणाऱ्या वाईट गोष्टींसाठी आणि दुःखासाठी आपण देवाला जबाबदार का ठरवू शकत नाही? आणि आपल्याला सोसाव्या लागणाऱ्या दुःखाबद्दल त्याला कसं वाटतं? यावर आता विचार करू या.
४. आपल्या दुःखासाठी कोण जबाबदार आहे?
पुष्कळ लोकांना असं वाटतं की या संपूर्ण जगावर देव नियंत्रण करतो. पण हे खरंय का? व्हिडिओ पाहा.
याकोब १:१३ आणि १ योहान ५:१९ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
जगातल्या वाईट गोष्टींसाठी आणि दुःखांसाठी देव जबाबदार आहे का?
५. सैतानाच्या शासनामुळे झालेले परिणाम
उत्पत्ती ३:१-६ वाचा, आणि मग या प्रश्नांवर चर्चा करा:
सैतान कोणतं खोटं बोलला?—४ आणि ५ ही वचनं पाहा.
मानवांच्या फायद्याचं काहीतरी यहोवा त्यांच्यापासून दूर ठेवतोय, असं सांगायचा सैतानाने कसा प्रयत्न केला?
आनंदी राहण्यासाठी मानवांनी यहोवाला शासक म्हणून स्वीकारणं गरजेचं आहे असं सैतानाला वाटतं का?
उपदेशक ८:९ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
यहोवा आज जगाचा शासक नसल्यामुळे जगाची काय स्थिती झाली आहे?
१. आदाम आणि हव्वा परिपूर्ण होते आणि नंदनवनात राहत होते. पण सैतानाचं ऐकून त्यांनी यहोवाविरुद्ध बंड केलं
२. यहोवाची आज्ञा मोडल्यामुळे या जगात पाप, दुःख आणि मृत्यू आला
३. यहोवा लवकरच पाप, दुःख आणि मृत्यू काढून टाकेल. मग पुन्हा एकदा मानव परिपूर्ण होतील आणि नंदनवनात राहतील
६. आपलं दुःख पाहून यहोवालाही दुःख होतं
आपल्या दुःखामुळे देवाला काहीच फरक पडत नाही, हे खरंय का? दावीद राजाने आणि प्रेषित पेत्रने काय म्हटलं ते पाहा. स्तोत्र ३१:७ आणि १ पेत्र ५:७ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
यहोवाला आपल्या दुःखाची जाणीव आहे आणि त्याला आपली काळजी आहे, हे समजल्यावर तुम्हाला कसं वाटतं?
७. आपली सगळी दुःखं देव काढून टाकेल
यशया ६५:१७ आणि प्रकटीकरण २१:३, ४ वाचा, आणि मग या प्रश्नावर चर्चा करा:
यहोवाने वचन दिलंय की सगळ्या वाईट गोष्टी आणि त्यांमुळे आलेलं दुःख तो कायमचं काढून टाकेल. हे समजल्यावर तुम्हाला कसं वाटतं, आणि का?
तुम्हाला माहीत होतं का?
सैतान पहिलं खोटं बोलला तेव्हा त्याने यहोवावर चुकीचे आरोप लावून त्याला बदनाम केलं. यहोवा न्यायाने आणि प्रेमाने शासन करत नाही असं म्हणून सैतानाने त्याचं नाव खराब केलं. लवकरच जेव्हा यहोवा मानवांची सगळी दुःखं काढून टाकेल, तेव्हा तो हे दाखवून देईल की त्याच्यावर लावण्यात आलेले सगळे आरोप खोटे आहेत. दुसऱ्या शब्दांत, तो हे सिद्ध करून दाखवेल की त्याचं शासनच सगळ्यात चांगलं आहे. यहोवाच्या नावावरचा कलंक मिटवून ते पवित्र केलं जाणं, यापेक्षा महत्त्वाची दुसरी कोणतीच गोष्ट या विश्वात नाही.—मत्तय ६:९, १०.
काही जण म्हणतात: “देव जसं सुख देतो, तसंच दुःखही देतो.”
तुम्ही काय म्हणाल?
थोडक्यात
जगातल्या सगळ्या वाईट गोष्टींसाठी मुळात सैतान आणि पहिलं मानवी जोडपं जबाबदार आहे. आपल्या दुःखाबद्दल यहोवाला खूप वाईट वाटतं आणि लवकरच तो ते पूर्णपणे काढून टाकणार आहे.
उजळणी
सैतानाने हव्वाला काय खोटं सांगितलं?
आदाम आणि हव्वाने देवाची आज्ञा मोडल्यामुळे आपल्यावर काय परिणाम झालाय?
आपल्यावर येणाऱ्या दुःखांबद्दल यहोवाला वाईट वाटतं हे आपण कशावरून म्हणू शकतो?
हेसुद्धा पाहा
पाप म्हणजे काय हे बायबलमधून जाणून घ्या.
एदेन बागेत सैतानाने यहोवावर कोणते आरोप लावले याबद्दल माहिती घ्या.
एका महत्त्वाच्या प्रश्नाची दिलासा देणारी उत्तरं जाणून घ्या.
“यहूदियों का कत्लेआम क्यों हुआ? ईश्वर ने इसे रोका क्यों नहीं?” (वेबसाईटवरचा लेख)
जगात दिसणाऱ्या दुःखाबद्दल एका माणसाला काय कळलं हे पाहा.