धडा ३
राहाबनं यहोवावर विश्वास ठेवला
समज आपण यरीहो शहरात आहोत. हे शहर कनान देशात आहे. तिथले लोक यहोवाला मानत नाहीत. तिथं राहाब नावाची एक स्त्री राहते.
तिनं लहानपणी, मोशेनं तांबड्या समुद्राचे दोन भाग कसे केले, इस्राएली लोकांना इजिप्तमधून बाहेर कसं आणलं या गोष्टी ऐकल्या होत्या. यहोवानं इस्राएली लोकांना त्यांच्या शत्रूंवर विजय कसा मिळवून दिला होता तेही तिनं ऐकलं होतं. आता ती मोठी झालीय. आणि इस्राएली लोक यरीहो शहराजवळ राहायला आले आहेत, असं ती ऐकते.
राहाबनं हेरांना वाचवलं कारण तिचा यहोवावर विश्वास होता
एकदा संध्याकाळच्या वेळी दोन इस्राएली माणसं, यरीहो शहर कसं आहे ते पाहायला गुपचूप येतात. त्यांना हेर म्हटलं आहे. ते राहाबच्या घरी येतात. ती त्यांना रात्रीचं तिच्याच घरी राहायला सांगते. रात्रीच्या वेळी यरीहो शहराच्या राजाला कळतं, की यरीहो शहर गुपचूप पाहायला हेर आले आहेत व ते राहाबच्या घरी गेले आहेत. मग राजा या लोकांना धरून आणायला त्याच्या सेवकांना पाठवतो. पण राहाब या दोन हेरांना तिच्या घराच्या गच्चीवर असलेल्या गवतात लपायला सांगते. आणि राजाचे लोक तिच्या घरी येतात तेव्हा त्यांना म्हणते: ‘हो, ते हेर आले होते पण ते केव्हाच इथून निघून गेले. आतापर्यंत तर ते कदाचित शहराच्या बाहेरही गेले असतील. तुम्ही जर आता लगेच निघालात तर त्यांना पकडू शकाल.’ राहाबनं या हेरांना का वाचवलं माहीतंय?— कारण तिचा यहोवावर विश्वास होता आणि तो इस्राएली लोकांना कनान देश देईल, हे तिला पक्कं माहीत होतं.
आणि मग जेव्हा हे हेर राहाबच्या घरातून निघतात तेव्हा तिला काय प्रॉमिस करतात? ते तिला म्हणतात, की यरीहोचा नाश होत असताना, ती, तिचे आईबाबा आणि तिचे भाऊ-बहीण सर्व जण त्या नाशातून वाचतील. ते तिला काय करायला सांगतात माहीतंय?— ते म्हणतात: ‘हा लाल दोर घे आणि तुझ्या खिडकीच्या बाहेर तो लटकवून ठेव. असं केलंस तर तुझ्या घरात असलेले सर्व जण वाचतील.’ राहाब त्यांचं ऐकते. मग काय होतं माहीतंय?—
यहोवानं राहाबला, तिच्या आईबाबांना व भावा-बहिणींना वाचवलं
काही दिवसांनंतर इस्राएली लोक कसलाही आवाज न करता दिवसातून एकदा यरीहो शहराला गोल चक्कर मारतात. असं ते सहा दिवस करतात. पण सातव्या दिवशी ते सात वेळा चक्कर मारतात व मोठ्यानं ओरडतात. त्या वेळेला यहोवा देव यरीहो शहराच्या भोवती असलेली भिंत पाडतो. फक्त खिडकीत लाल दोर बांधलेलं घर पडत नाही! इथं चित्रात दिसतं का तुला ते घर?— राहाब, तिचे आईबाबा, तिचे भाऊ-बहीण सगळे वाचतात!
आपण राहाबकडून काय शिकू शकतो बरं?— यहोवानं केलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल राहाबनं ऐकलं होतं त्यामुळं तिनं यहोवावर विश्वास ठेवला. तूपण यहोवाबद्दलच्या चांगल्या गोष्टी आता शिकत आहेस. मग राहाबसारखा तुझाही यहोवावर विश्वास आहे का?— आहे, मला माहीत आहे!