पाठ ९
सभांची तयारी करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता?
कंबोडिया
युक्रेन
तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करत असाल तर प्रत्येक अभ्यासाआधी तुम्ही तो भाग नक्कीच वाचून ठेवत असाल. सभांचा पूर्णपणे फायदा घेण्यासाठीही असेच करणे आवश्यक आहे. या बाबतीत चांगला नित्यक्रम राखल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.
कोणत्या वेळी व कोठे अभ्यास करायचा हे ठरवा. दिवसाच्या कोणत्या वेळी तुम्ही एकाग्रतेने अभ्यास करू शकता? दिवसभराची कामे सुरू करण्याआधी सकाळी की रात्री मुले झोपल्यानंतर? तुम्ही जरी अभ्यासासाठी जास्त वेळ देऊ शकत नसला, तरीही दिवसातून किती वेळ तुम्ही देऊ शकता ते ठरवा आणि दुसऱ्या कोणत्याच गोष्टीला त्याच्या आड येऊ देऊ नका. अभ्यासासाठी शांत जागा निवडा आणि तुमचे लक्ष विचलित करतील अशा सर्व गोष्टी जसे मोबाईल, टीव्ही, रेडिओ बंद करा. अभ्यासाच्या सुरुवातीला देवाला प्रार्थना केल्याने तुम्हाला दिवसभराच्या चिंता बाजूला सारून देवाच्या वचनावर लक्ष केंद्रित करणे शक्य होईल.—फिलिप्पैकर ४:६, ७.
सभेची पूर्वतयारी करा आणि सभेत सहभाग घ्या. सुरुवातीला लेखाचा एकंदरीत विषय काय आहे तो समजून घ्या. लेखाचे किंवा अध्यायाचे शीर्षक पाहा व त्यावर विचार करा, प्रत्येक उपशीर्षक लेखाच्या शीर्षकाशी कसे जुळते ते पाहा, आणि त्यात जर काही चित्रे असतील तर ती निरखून पाहा; तसेच मुख्य मुद्द्यांवर भर देणाऱ्या उजळणी प्रश्नांचे परीक्षण करा. त्यानंतर प्रत्येक परिच्छेद वाचा व छापील प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा. उल्लेख केलेली शास्त्रवचने वाचा आणि ती विषयाशी कशी जुळतात ते पाहा. (प्रेषितांची कृत्ये १७:११) छापील प्रश्नाचे उत्तर सापडल्यावर त्यातील काही शब्द किंवा वाक्यांश अधोरेखित करा ज्यामुळे सभेत तुम्हाला ते उत्तर आठवेल. मग सभेमध्ये हात वर करून तुम्ही तुमच्या शब्दांत उत्तर देऊ शकता.
दर आठवडी सभेमध्ये चर्चा केल्या जाणाऱ्या निरनिराळ्या विषयांची तयारी केल्यामुळे तुमच्या ज्ञानाच्या भांडारात नवनवीन विचारांची भर पडेल.—मत्तय १३:५१, ५२.
सभेची तयारी करण्यासाठी तुम्ही कोणता नित्यक्रम राखू शकता?
सभेमध्ये उत्तर देण्यासाठी तुम्ही कशी तयारी करू शकता?