पाठ ८
आम्ही आमच्या सभांसाठी नीटनेटका पेहराव का करतो?
आइसलँड
मेक्सिको
गिनी-बिसाऊ
फिलिपीन्झ
यहोवाचे साक्षीदार त्यांच्या सभांसाठी किती नीटनेटका पेहराव करतात हे तुम्ही या माहितीपत्रकातील चित्रांत पाहिले का? आम्ही आमच्या केशभूषेकडे व वेशभूषेकडे इतके लक्ष का देतो?
आमच्या देवाला आदर देण्यासाठी. हे खरे आहे की देव केवळ आपल्या बाह्यस्वरूपाकडे पाहत नाही तर आपले हृदयही पाहतो. (१ शमुवेल १६:७) पण जेव्हा आम्ही देवाची उपासना करण्यासाठी एकत्र येतो तेव्हा देवाला व आमच्या सहविश्वासूंना आदर देण्याची आमची मनापासून इच्छा असते. जर आपण एका राजासमोर किंवा राष्ट्रपतीसमोर उभे राहणार असू तर आपण नक्कीच त्यांचे उच्च पद लक्षात घेऊन आपला पेहराव नीटनेटका आहे याची खातरी करू. त्याचप्रमाणे आम्ही सभांसाठी ज्या प्रकारचा पेहराव करतो त्यावरून आम्ही “सनातन, अविनाशी, अदृश्य राजा” यहोवा देव याचा आणि आमच्या उपासनास्थळाचा आदर करतो.—१ तीमथ्य १:१७.
आम्ही कोणत्या मूल्यांनुसार जीवन जगतो हे दाखवण्यासाठी. बायबल ख्रिश्चनांना असे उत्तेजन देते की त्यांनी “भिडस्तपणाने व मर्यादेने” पेहराव करावा. (१ तीमथ्य २:९, १०) “भिडस्तपणाने” पेहराव करणे म्हणजे असा पेहराव निवडणे जो शालीन आहे अर्थात अगदी गबाळा किंवा खूप दिखाऊ नाही. तसेच “मर्यादेने” पेहराव करणे म्हणजे दिखाऊ, उत्तेजक किंवा अंगप्रदर्शन करणारा पेहराव टाळणे. या तत्त्वांच्या अंतर्गतही पेहरावाच्या बाबतीत निवड करण्याचे आपल्याकडे बरेच पर्याय उरतात. आपल्या सभ्य पेहरावामुळे आपण “आपला तारणारा देव याच्या शिक्षणास शोभा” आणतो आणि “देवाचे गौरव” करतो. (तीत २:१०; १ पेत्र २:१२) आमच्या सभेसाठी नीटनेटका पेहराव करून आम्ही इतरांना यहोवाच्या उपासनेकडे आदराने पाहण्यास प्रवृत्त करतो.
तुमच्या परिस्थितीमुळे कदाचित तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे पेहराव करणे शक्य नसेल, पण या चिंतेमुळे स्वतःला राज्य सभागृहात येण्यापासून रोखू नका. आपले कपडे सभ्य, स्वच्छ आणि शालीन असण्यासाठी ते महागडे किंवा आकर्षक असण्याची गरज नाही.
उपासनेसाठी सभ्य पेहराव करणे इतके महत्त्वाचे का आहे?
केशभूषेच्या व वेशभूषेच्या बाबतीत बायबलची कोणती तत्त्वे आपल्याला मदत करू शकतात?