वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • bt अध्या. २० पृ. १५७-१६४
  • विरोध असतानाही “वचन पसरत गेलं आणि त्याचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत गेला”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विरोध असतानाही “वचन पसरत गेलं आणि त्याचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत गेला”
  • देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • तो “शास्त्रवचनांचा जाणकार होता” (प्रे. कार्यं १८:२४-२८)
  • “राज्याबद्दल . . . पटण्यासारखे तर्क” (प्रे. कार्यं १८:२३; १९:१-१०)
  • दुष्ट स्वर्गदूतांचा विरोध असूनही “वचन पसरत गेलं आणि त्याचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत गेला” (प्रे. कार्यं १९:११-२२)
  • “बरीच खळबळ माजली” (प्रे. कार्यं १९:२३-४१)
  • अपुल्लोस ख्रिस्ती सत्याचा वक्‍तृत्वपूर्ण उद्‌घोषक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • शिष्य बनवण्याच्या उद्देशाने प्रचार करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • खऱ्‍या उपासनेची व मूर्तीपूजेची टक्कर झाली ते ठिकाण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • यहोवाचे वचन प्रबल होते!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
अधिक माहिती पाहा
देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
bt अध्या. २० पृ. १५७-१६४

अध्याय २०

विरोध असतानाही “वचन पसरत गेलं आणि त्याचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत गेला”

आनंदाच्या संदेशाच्या प्रसारासाठी अपुल्लो आणि पौल यांनी केलेली मेहनत

प्रे. कार्यं १८:२३–१९:४१ वर आधारित

१, २. (क) इफिसमध्ये पौल आणि त्याच्या साथीदारांसमोर कोणता धोका आहे? (ख) आपण या अध्यायात कशाविषयी चर्चा करणार आहोत?

इफिसच्या रस्त्यांवर लोकांची आरडाओरड आणि धावण्याचा आवाज ऐकू येत आहे. लोकांचा मोठा जमाव तयार झाला आहे आणि दंगल उसळली आहे. पौलच्या दोन साथीदारांना धरून हे लोक त्यांना रस्त्यावरून फरफटत नेत आहेत. दोन्ही बाजूने दुकानं असलेल्या या रस्त्यावरचे लोकही जमावात सामील होतात. वाढत चाललेला हा संतप्त जमाव घाईघाईने शहराच्या मोठ्या नाट्यगृहाकडे जातो. या नाट्यगृहात २५,००० लोक बसू शकतात. ही दंगल का उसळली आहे, याचं नक्की कारण या जमावातल्या बहुतेक लोकांना माहीत नाही. त्यांना फक्‍त एवढंच समजलं आहे, की त्यांची आवडती देवी अर्तमी आणि तिच्या मंदिराला धोका आहे. त्यामुळे हे लोक मोठ्याने ओरडू लागतात: “इफिसकरांची अर्तमी देवी महान!”​—प्रे. कार्यं १९:३४.

२ आनंदाच्या संदेशाचा प्रसार होऊ नये म्हणून सैतान लोकांच्या जमावाला कसं भडकवतो, हे आपण पुन्हा पाहतो. पण हिंसेचा धोका ही फक्‍त एकच युक्‍ती सैतान वापरत नाही. पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांची एकता तोडण्यासाठी आणि त्यांचं काम थांबवण्यासाठी सैतानाने कोणत्या वेगवेगळ्या युक्त्या वापरल्या हे आपण या अध्यायात पाहणार आहोत. पण, त्याने अनेक युक्त्या वापरल्या तरी, “यहोवाच्या शक्‍तीमुळे त्याचं वचन” कसं पसरत गेलं आणि त्याचा प्रभाव कसा वाढत गेला हेही आपण पाहू. (प्रे. कार्यं १९:२०) पहिल्या शतकातले ख्रिस्ती, सैतानावर विजय का मिळवू शकले? आणि आजच्या काळात आपण त्याच्यावर विजय कशामुळे मिळवतो? हे खरं आहे की हा विजय आपला नाही तर यहोवाचा आहे. पण हा विजय मिळवण्यासाठी आपण पहिल्या शतकातल्या ख्रिश्‍चनांप्रमाणे, आपल्याला दिलेल्या मार्गदर्शनाचं पालन केलं पाहिजे. सेवाकार्यात यशस्वी होण्यासाठी, यहोवाच्या पवित्र शक्‍तीच्या मदतीने आपण स्वतःमध्ये आवश्‍यक गुण वाढवू शकतो. त्यासाठी, सर्वातआधी आपण अपुल्लो याचं उदाहरण पाहू या.

तो “शास्त्रवचनांचा जाणकार होता” (प्रे. कार्यं १८:२४-२८)

३, ४. अपुल्लोच्या ज्ञानात कोणती कमी असल्याचं अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला यांच्या लक्षात आलं, आणि त्यांनी काय केलं?

३ आपल्या तिसऱ्‍या मिशनरी दौऱ्‍याच्यावेळी पौल इफिसला जात असताना, अपुल्लो नावाचा एक यहुदी माणूस या शहरात आला. तो इजिप्तमधल्या प्रसिद्ध आलेक्सांद्रिया शहराचा रहिवासी होता. अपुल्लोमध्ये अनेक चांगले गुण होते. तो खूप प्रभावीपणे भाषण द्यायचा. त्यासोबतच, तो “शास्त्रवचनांचा जाणकार होता.” अहवालात असंही म्हटलं आहे, की “तो पवित्र शक्‍तीमुळे खूप आवेशी होता.” त्यामुळे, यहुदी लोकांच्या सभास्थानात अपुल्लो अतिशय धाडसाने बोलायचा.​—प्रे. कार्यं १८:२४, २५.

४ अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला यांनी अपुल्लोचं भाषण ऐकलं. तो “येशूबद्दलच्या गोष्टी अचूकपणे” शिकवत होता हे पाहून त्यांना खरंच खूप आनंद झाला असेल. त्याने येशूबद्दल जे काही सांगितलं ते अगदी अचूक होतं. पण, अपुल्लोच्या ज्ञानात एका महत्त्वाच्या गोष्टीची कमी होती. त्याला “फक्‍त योहानने प्रचार केलेल्या बाप्तिस्म्याबद्दलच” माहीत होतं. आणि ही गोष्ट अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला या ख्रिस्ती जोडप्याच्या लगेच लक्षात आली. हे गरीब जोडपं तंबू बनवण्याचं साधं काम करायचं. पण अपुल्लोच्या प्रभावी भाषणामुळे आणि त्याच्या ज्ञानामुळे ते घाबरले नाहीत. याउलट, “त्यांनी त्याला आपल्यासोबत घेतलं. त्यांनी देवाच्या मार्गाबद्दल त्याला आणखी अचूकपणे समजावून सांगितलं.” (प्रे. कार्यं १८:२५, २६) प्रभावीपणे बोलू शकणाऱ्‍या आणि खूप ज्ञान असलेल्या अपुल्लोने या गोष्टीला कसा प्रतिसाद दिला? ख्रिश्‍चनांनी स्वतःमध्ये वाढवला पाहिजे असा एक सर्वात महत्त्वाचा गुण त्याने दाखवला. तो म्हणजे नम्रता.

५, ६. यहोवाची आणखी चांगल्या प्रकारे सेवा करणं अपुल्लोला कशामुळे शक्य झालं, आणि आपण त्याच्याकडून काय शिकू शकतो?

५ अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला यांनी केलेली मदत अपुल्लोने स्वीकारली. त्यामुळे तो यहोवाची आणखी चांगल्या प्रकारे सेवा करू शकला. त्यानंतर तो अखया इथे गेला. तिथे त्याने बांधवांची “खूप मदत” केली. येशू हा वचन दिलेला मसीहा नाही, असं म्हणणाऱ्‍या त्या क्षेत्रातल्या यहुद्यांनाही तो चांगली साक्ष देऊ शकला. लूकने अहवालात असं म्हटलं: “त्याने जाहीरपणे आणि खूप प्रभावीपणे बोलून यहुद्यांना पूर्णपणे निरुत्तर केलं. तसंच, येशू हाच ख्रिस्त असल्याचं शास्त्रवचनांतून सिद्ध करून दाखवलं” (प्रे. कार्यं १८:२७, २८) खरंच, अपुल्लो तिथल्या मंडळ्यांना किती चांगली मदत करू शकला! ‘यहोवाच्या वचनाचा’ प्रभाव दिवसेंदिवस वाढत जाण्यामध्ये त्याचाही वाटा होता. आपण अपुल्लोच्या उदाहरणातून काय शिकू शकतो?

६ ख्रिश्‍चनांनी स्वतःमध्ये नम्रतेचा गुण वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्यापैकी प्रत्येकाकडे देवाने दिलेले वेगवेगळे गुण आहेत. ते आपल्या जन्मापासूनच किंवा अनुभवामुळे किंवा आपण मिळवलेल्या ज्ञानामुळे आपल्याकडे असू शकतात. पण आपल्यामध्ये जी काही कौशल्यं असतील, त्यांपेक्षा जास्त नम्रपणा आपल्याकडे असायला हवा. नाहीतर आपले चांगले गुणच आपले दोष बनू शकतात. आणि हळूहळू आपल्यात गर्विष्ठपणाचा घातक गुण येऊ शकतो. (१ करिंथ. ४:७; याको. ४:६) आपण जर खरोखर नम्र असलो, तर आपण इतरांना स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजण्याचा प्रयत्न करू. (फिलिप्पै. २:३) इतर जण जेव्हा आपल्या चुका सुधारतात किंवा आपल्याला काही शिकवतात, तेव्हा आपल्याला त्यांचा राग येणार नाही. आपले विचार यहोवाच्या पवित्र शक्‍तीद्वारे दिलेल्या मार्गदर्शनानुसार नाहीत हे कळल्यावर, आपण स्वतःच्याच विचारांवर अडून राहणार नाही. आपण नम्र राहिलो तरच यहोवा आणि त्याचा मुलगा त्यांच्या सेवेसाठी आपला उपयोग करून घेतील.​—लूक १:५१, ५२.

७. पौल आणि अपुल्लो यांनी नम्रता दाखवण्याच्या बाबतीत चांगलं उदाहरण कसं मांडलं?

७ आपण नम्र असलो, तर आपल्यामध्ये स्पर्धा करण्याची भावना येणार नाही. सुरुवातीच्या त्या ख्रिश्‍चनांमध्ये फूट पाडण्यासाठी सैतान किती उत्सुक असेल याची तुम्ही कल्पना करू शकता का? जर अपुल्लो आणि प्रेषित पौल यांसारखे दोन प्रभावी सेवक एकमेकांचे प्रतिस्पर्धी बनले असते, किंवा मंडळ्यांमध्ये मोठेपणा मिळवण्यासाठी स्पर्धा करू लागले असते, तर सैतानाला किती आनंद झाला असता! खरंतर, त्यांच्या मनात सहज अशा भावना येऊ शकल्या असत्या. कारण करिंथ मंडळीत काही ख्रिस्ती असं म्हणू लागले होते, “मी पौलचा” तर काही म्हणत होते “मी अपुल्लोचा.” पण पौल आणि अपुल्लो यांनी अशा फूट पाडणाऱ्‍या विचारांना प्रोत्साहन दिलं का? नाही. याउलट, अपुल्लोनेही आनंदाच्या संदेशाच्या वाढीला हातभार लावला आहे, हे पौलने नम्रपणे कबूल केलं. तसंच, अपुल्लोनेही पौलच्या मार्गदर्शनाचं पालन केलं. (१ करिंथ. १:१०-१२; ३:६, ९; तीत ३:१२, १३) खरंच, एकमेकांसोबत मिळून काम करण्याचं किती चांगलं उदाहरण या दोघांनी आपल्यासाठी मांडलं आहे!

“राज्याबद्दल . . . पटण्यासारखे तर्क” (प्रे. कार्यं १८:२३; १९:१-१०)

८. पौल इफिसला कोणत्या मार्गाने परत गेला आणि का?

८ आपण इफिसला परत येऊ, असं पौलने तिथल्या बांधवांना वचन दिलं होतं. आणि त्याने आपला शब्द पाळला.a (प्रे. कार्यं १८:२०, २१) पण तो कसा परत गेला याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपण मागच्या अध्यायात पौलबद्दल बोललो होतो, तेव्हा तो सीरियाच्या अंत्युखियामध्ये होता. तिथून जवळच असलेल्या सलुकीयाच्या बंदरात येऊन तो जहाजाने सरळ इफिसला जाऊ शकला असता. पण तसं न करता, तो “आतल्या भागांतून” प्रवास करत तिथे गेला. प्रेषितांची कार्यं १८:२३ आणि १९:१ या वचनांवरून काही जाणकारांचा असा अंदाज आहे, की त्याने जवळजवळ १,६०० किलोमीटर प्रवास केला! पौलने हा इतका लांबचा आणि कठीण प्रवास का निवडला? कारण त्याला “सगळ्या शिष्यांचा विश्‍वास मजबूत” करायचा होता. (प्रे. कार्यं १८:२३) त्याच्या पहिल्या दोन मिशनरी दौऱ्‍यांप्रमाणेच त्याचा तिसरा मिशनरी दौराही त्याच्यासाठी कठीण असणार होता. पण बांधवांना मदत करण्यासाठी तो हा सर्व त्रास सहन करायला तयार होता. आजच्या काळात विभागीय पर्यवेक्षक आणि त्यांच्या पत्नीसुद्धा अशीच मनोवृत्ती दाखवतात. त्यांच्या या निःस्वार्थ प्रेमासाठी आपण त्यांची मनापासून कदर करतो.

आशियाची राजधानी​—इफिस

इफिस हे पश्‍चिम आशिया मायनरमधलं सर्वात मोठं शहर होतं. प्रेषित पौलच्या काळात या शहराची लोकसंख्या २,५०,००० पेक्षा जास्त होती. रोमच्या आशिया प्रांताचं राजधानी असलेल्या या शहराला “आशियाचं पहिलं आणि श्रेष्ठ महानगर” अशी पदवी देण्यात आली होती.

इफिस शहरात व्यापारामुळे आणि धर्मामुळे खूप संपत्ती होती. हे शहर एका नदीच्या तोंडाजवळ वसलेलं होतं. त्या नदीतून जहाजं प्रवास करू शकत होती. वेगवेगळ्या दिशांना जाणारे व्यापारी मार्ग या शहराच्या बंदरातून जायचे. इफिस हे अर्तमी देवीच्या मंदिरासाठी तर प्रसिद्ध होतंच, पण इथे अनेक ग्रीक आणि रोमन देवीदेवतांची, तसंच इजिप्तच्या आणि अनातोलियाच्या दैवतांचीही मंदिरं आणि देवळं होती.

अर्तमी देवीचं मंदिर प्राचीन काळात जगाच्या सात आश्‍चर्यांपैकी एक होतं. या मंदिराचा परिसर ३५० X १६० फूट होता. यात १०० संगमरवरी खांब होते. प्रत्येक खांबाची उंची ५५ फूट होती आणि त्याचा व्यास ६ फूट होता. संपूर्ण भूमध्य प्रदेशात या मंदिराला खूप पवित्र मानलं जायचं. अनेक लोक आपलं धन सुरक्षित ठेवण्यासाठी ते अर्तमी देवीच्या मंदिरात ठेवायचे. त्यामुळे या मंदिरात आशिया प्रांताची पैसे ठेवण्याची सर्वात मोठी पेढी होती.

इफिस शहरातल्या आणखी काही महत्त्वाच्या इमारती म्हणजे मैदानी खेळांसाठी किंवा माणसांमधल्या आणि जनावरांमधल्या सामन्यांसाठी असलेलं एक स्टेडियम. तसंच या शहरात एक नाट्यगृह, सरकारी इमारती, बाजारपेठा आणि विशाल खांब असलेल्या इमारतीही होत्या. या इमारतींमध्ये दुकानं असायची.

भूगोलाचा अभ्यास करणारा ग्रीक शास्त्रज्ञ स्ट्राबो याने लिहिलं, की इफिसच्या बंदरात नदीतून येणारा गाळ साठायचा. यामुळे काही काळाने या शहराच्या बंदराचा वापर करणं बंद झालं. आज इफिसच्या ठिकाणी कोणतंही नवीन शहर नाही. त्यामुळे, आजही जेव्हा पर्यटक इफिसला जातात तेव्हा त्यांना जुन्या शहराचे अवशेष पाहायला मिळतात. आणि त्या काळात हे शहर कसं होतं याची ते कल्पना करू शकतात.

९. योहानच्या शिष्यांनी पुन्हा बाप्तिस्मा घेणं का गरजेचं होतं, आणि आपण त्यांच्याकडून कोणता धडा शिकू शकतो?

९ इफिसला आल्यावर पौलला बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानचे १२ शिष्य भेटले. त्यांनी योहानकडून बाप्तिस्मा घेतला होता. पण ती व्यवस्था आता रद्द झाली होती. त्यांना पवित्र शक्‍तीबद्दलही फार कमी माहिती होती. पण, पौलने त्यांना येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेण्याच्या महत्त्वाबद्दल सांगितलं. त्या शिष्यांनीही अपुल्लोप्रमाणे नम्रता दाखवली आणि ते शिकायलाही उत्सुक होते. त्यांनी येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतल्यावर त्यांच्यावर पवित्र शक्‍ती आली. तसंच, त्यांना चमत्काराने काही देणग्याही मिळाल्या. आजही यहोवाची संघटना सतत पुढे वाटचाल करत आहे. जर आपण या संघटनेच्या मार्गदर्शनानुसार चालत राहिलो, तर आपल्याला नक्की आशीर्वाद मिळतील. या अहवालातून आपण हे स्पष्टपणे पाहू शकतो.​—प्रे. कार्यं १९:१-७.

१०. सभास्थानाऐवजी पौल शाळेतल्या सभागृहात का शिकवू लागला, आणि प्रचारकार्यासाठी त्याने आपल्यापुढे कोणतं उदाहरण मांडलं?

१० यहोवाची संघटना सतत पुढे वाटचाल कशी करते हे दाखवणारी आणखी एक घटना लवकरच घडली. पौलने तीन महिने सभास्थानात धाडसाने प्रचार केला. “राज्याबद्दल . . . पटण्यासारखे तर्क” तो लोकांपुढे मांडत होता. तरीही, काही लोक कठोर मनाचे होते आणि ते कट्टर विरोधक बनले. तेव्हा “प्रभूच्या मार्गाची निंदा” करणाऱ्‍यांमागे वेळ घालण्याऐवजी, पौलने एका शाळेच्या सभागृहात जाऊन शिकवायला सुरुवात केली. (प्रे. कार्यं १९:८, ९) ज्यांना यहोवाची सेवा करायची होती त्यांना आता सभास्थानातून त्या शाळेच्या सभागृहात यावं लागणार होतं. कधीकधी, प्रचारकार्यात आपल्याला कळतं, की घरमालकाला ऐकण्याची इच्छा नाही, किंवा त्याला फक्‍त वाद घालायचा आहे. तेव्हा, पौलप्रमाणे आपणही आपलं बोलणं थांबवून तिथून निघून गेलं पाहिजे. कारण, आपल्या क्षेत्रात मेंढरांसारखे अनेक नम्र मनाचे लोक आहेत. या लोकांना आपला दिलासा देणारा संदेश ऐकण्याची खूप गरज आहे.

११, १२. (क) प्रचारकार्यात मेहनत करण्याच्या बाबतीत आणि वेगवेगळ्या पद्धती वापरण्याच्या बाबतीत पौलने आपल्यासाठी चांगलं उदाहरण कसं मांडलं? (ख) यहोवाचे साक्षीदार आपल्या सार्वजनिक सेवाकार्यात मेहनत करण्याचा आणि वेगवेगळ्या पद्धती वापरण्याचा कसा प्रयत्न करतात?

११ त्या शाळेच्या सभागृहात पौल रोज सकाळी ११ वाजेपासून संध्याकाळी ४ वाजेपर्यंत शिकवत असावा. (अभ्यासासाठी माहिती-प्रे. कार्यं १९:९, nwtsty-E.) त्या वेळी अनेक जण जेवणासाठी किंवा आराम करण्यासाठी आपली कामं थांबवायचे. या दुपारच्या वेळी शांतता तर असायची पण खूप उष्णताही असायची. पौलने जर असंच दोन वर्षं सतत शिकवलं असेल तर त्याने शिकवण्यासाठी ३,००० पेक्षा जास्त तास खर्च केले असतील.b पौल मेहनती होता आणि तो आपल्या पद्धतीत बदल करायलाही तयार होता. यहोवाच्या वचनाचा प्रसार होण्याचं हे आणखी एक कारण होतं. तिथल्या लोकांच्या गरजांचा विचार करून पौलने आपल्या सेवाकार्याच्या वेळेत बदल केला. याचा काय परिणाम झाला? “आशिया प्रांतात राहणाऱ्‍या सगळ्या यहुदी आणि ग्रीक लोकांना प्रभूचं वचन ऐकायची संधी मिळाली.” (प्रे. कार्यं १९:१०) त्याने खरंच अगदी पूर्णपणे साक्ष दिली.

दोन बहिणी फोनवरून प्रचार करत आहेत.

आपण शक्य त्या मार्गाने लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो

१२ आजच्या काळातले यहोवाचे साक्षीदारही आनंदाचा संदेश घोषित करण्यासाठी मेहनत घेतात. तसंच ते वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करून लोकांना हा संदेश सांगतात. आपल्याला लोक जिथे भेटतील आणि ज्या वेळी भेटतील त्यानुसार आपण त्यांना भेटण्याचा प्रयत्न करतो. तसंच, रस्त्यांवर, बाजारांत किंवा पार्किंगच्या ठिकाणी आपण लोकांना साक्ष देतो. शिवाय, टेलिफोन आणि पत्रांद्वारेही आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि घरोघरचं प्रचारकार्य करताना लोक सहसा घरी भेटतात अशा वेळी आपण त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो.

दुष्ट स्वर्गदूतांचा विरोध असूनही “वचन पसरत गेलं आणि त्याचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत गेला” (प्रे. कार्यं १९:११-२२)

१३, १४. (क) यहोवाने पौलला काय करण्याची शक्‍ती दिली? (ख) स्किवाच्या मुलांनी कोणती चूक केली, आणि आज ख्रिस्ती धर्मजगतातले अनेक लोक तीच चूक कशी करत आहेत?

१३ लूकच्या अहवालातून आपल्याला कळतं, की त्यानंतरचा काळ फार खास होता. कारण, पौलच्या हातून यहोवा “खूप आश्‍चर्यकारक चमत्कार घडवत राहिला.” लोक त्याचे रुमाल आणि कपडेसुद्धा आजारी माणसांकडे घेऊन जायचे आणि त्यांचे रोग बरे व्हायचे. तसंच, त्यांच्यातले दुष्ट स्वर्गदूतसुद्धा बाहेर निघायचे.c (प्रे. कार्यं १९:११, १२) सैतानाच्या दुष्ट स्वर्गदूतांवर मिळवलेल्या या विजयाने अनेक लोकांचं लक्ष वेधलं. पण त्यातल्या सगळ्याच लोकांना यामुळे आनंद झाला नाही.

१४ “यहुद्यांपैकी काही जण, जे ठिकठिकाणी प्रवास करून दुष्ट स्वर्गदूत काढायचे” त्यांनी पौलसारखे चमत्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यातल्या काही जणांनी येशूच्या आणि पौलच्या नावाने दुष्ट स्वर्गदूत काढण्याचाही प्रयत्न केला. याजकांच्या घराण्यातला स्किवा याच्या सात मुलांबद्दल लूक आपल्याला सांगतो. त्यांनीही असंच करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दुष्ट स्वर्गदूत त्यांना म्हणाला: “मी येशूला ओळखतो आणि पौललाही ओळखतो, पण तुम्ही कोण?” मग दुष्ट स्वर्गदूताने पीडित असलेल्या त्या माणसाने त्या ढोंगी लोकांवर जंगली जनावराप्रमाणे हल्ला केला. जखमी झालेले ते लोक तिथून उघडेच पळून गेले. (प्रे. कार्यं १९:१३-१६) ‘यहोवाच्या वचनाचा’ हा फार मोठा विजय होता. एकीकडे पौलला देवाने दिलेली शक्‍ती आणि दुसरीकडे या खोट्या धर्मातल्या ढोंगी लोकांची निर्बलता यांतला फरक अगदी स्पष्टपणे दिसून आला. आजही लाखो लोकांना असं वाटतं, की नुसतं येशूचं नाव घेतलं किंवा स्वतःला “ख्रिश्‍चन” म्हटलं तर पुरेसं आहे. पण येशूने सांगितल्याप्रमाणे, जे त्याच्या पित्याच्या इच्छेनुसार चालतात त्यांनाच भविष्याबद्दल खरी आशा मिळू शकते.​—मत्त. ७:२१-२३.

१५. भूतविद्या आणि तिच्याशी संबंधित गोष्टींच्या बाबतीत आपण इफिसमधल्या लोकांचं अनुकरण कसं करू शकतो?

१५ स्किवाच्या मुलांची झालेली लाजिरवाणी स्थिती पाहून तिथल्या सर्वांमध्ये देवाचं भय पसरलं. आणि याचा परिणाम म्हणजे अनेक लोकांनी भूतविद्येशी संबंधित कामं सोडून ख्रिस्ती विश्‍वास स्वीकारला. इफिसमधल्या अनेक लोकांवर जादूटोण्याचा मोठा प्रभाव होता. लोक मंत्रतंत्र आणि गंडेदोरे यांचा सर्रास वापर करायचे. तसंच त्यांच्याकडे जादूटोण्याची पुस्तकंही होती. या घटनेमुळे इफिसमधल्या अनेक लोकांनी आपली जादूटोण्याची पुस्तकं घराबाहेर आणली आणि सर्वांसमोर ती जाळून टाकली. आजच्या तुलनेत आपण त्यांची किंमत केली, तर ती करोडो रुपयांमध्ये असेल.d लूकने असं लिहिलं: “अशा रितीने, यहोवाच्या शक्‍तीमुळे त्याचं वचन पसरत गेलं आणि त्याचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत गेला.” (प्रे. कार्यं १९:१७-२०) खोट्या शिकवणींवर आणि भूतविद्येवर सत्याचा हा किती मोठा विजय! त्या विश्‍वासू लोकांनी आपल्यासाठी खरंच एक चांगलं उदाहरण ठेवलं आहे. आजच्या काळातही लोक भूतविद्येला खूप मानतात. आपल्याला जर समजलं, की आपल्याकडे एखादी अशी गोष्ट आहे जिचा संबंध भूतविद्येशी आहे, तर इफिसमधल्या त्या लोकांप्रमाणे आपण लगेच तिचा नाश केला पाहिजे. काहीही झालं तरी अशा घृणा आणणाऱ्‍या गोष्टींपासून आपण दूर राहिलं पाहिजे.

“बरीच खळबळ माजली” (प्रे. कार्यं १९:२३-४१)

पौल बाजारत लोकांना प्रचार करत असताना, देमेत्रिय अर्तमी देवीचा चांदीचा देव्हारा उचलून रागाने इतर सोनारांसोबत बोलत आहे.

“याच धंद्यातून आपल्याला भरपूर पैसा मिळतो, हे तर तुम्हाला माहीतच आहे.”​—प्रे. कार्यं १९:२५

१६, १७. (क) देमेत्रियने इफिसमधल्या दंगलीची कशी सुरुवात केली? (ख) इफिसमधल्या लोकांनी ते धर्मामुळे आंधळे असल्याचं कसं दाखवलं?

१६ आता सैतानाने ख्रिस्ती विश्‍वासाच्या विरोधात आणखी एक युक्‍ती वापरली. यामुळे झालेल्या परिणामाबद्दल सांगताना लूकने असं लिहिलं, की “प्रभूच्या मार्गाबद्दल बरीच खळबळ माजली.” आणि परिस्थिती अगदी तशीच होती.e (प्रे. कार्यं १९:२३) देमेत्रिय नावाच्या एका सोनाराने त्याच्या सोबत्यांना बांधवांविरुद्ध भडकवायला सुरुवात केली. मूर्तींच्या व्यापारामुळेच त्यांना पैसे मिळतात याची त्याने त्यांना सर्वातआधी आठवण करून दिली. पौल जो संदेश सांगत होता, त्यामुळे त्यांचा व्यापार बंद पडेल असं तो त्यांना म्हणाला. कारण ख्रिस्ती लोक मूर्तींची उपासना करत नव्हते. त्यानंतर त्याने त्यांच्या शहराबद्दल आणि राष्ट्राबद्दल त्यांच्या मनात अभिमान जागवला. त्यांची देवी अर्तमी आणि तिचं जगप्रसिद्ध मंदिर धोक्यात असून “तिचं ऐश्‍वर्यसुद्धा धुळीला मिळेल” असंही तो त्यांना म्हणाला.​—प्रे. कार्यं १९:२४-२७.

१७ देमेत्रियच्या बोलण्याचा त्याला हवा होता तोच परिणाम झाला. त्याचे सर्व सोबती “इफिसकरांची अर्तमी देवी महान!” असं ओरडू लागले. या अध्यायाच्या सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे संपूर्ण शहरात लोकांच्या जमावामुळे दंगलीचं वातावरण निर्माण झालं आणि गोंधळ उडाला.f पौल आपल्या जिवाची पर्वा करणारा व्यक्‍ती नव्हता. त्याला नाट्यगृहात जाऊन या संतापलेल्या लोकांशी बोलायचं होतं. पण इतर बांधवांनी त्याला तिथे जाण्यापासून अडवलं. आलेक्सांद्र नावाचा एक व्यक्‍ती जमावापुढे उभा राहून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू लागला. तो यहुदी असल्यामुळे या ख्रिस्ती लोकांमधला आणि यहुदी लोकांमधला फरक त्यांना सांगायला तो उत्सुक असावा. पण त्या जमावावर या गोष्टीचा काही फरक पडणार नव्हता. तो यहुदी आहे हे जेव्हा त्यांना समजलं, तेव्हा ते त्याच्यासमोर आणखी मोठमोठ्याने ओरडू लागले. “इफिसकरांची अर्तमी देवी महान!” असं ते जवळजवळ दोन तास ओरडत राहिले. आजच्या काळातही लोक धर्मामुळे असेच आंधळेपणाने वागतात. त्यांना काही सांगण्याचा किंवा समजावण्याचा काहीच उपयोग होत नाही.​—प्रे. कार्यं १९:२८-३४.

१८, १९. (क) इफिस शहराच्या अधिकाऱ्‍याने जमावाला कसं शांत केलं? (ख) काही वेळा यहोवाच्या लोकांना जगातल्या अधिकाऱ्‍यांकडून कशा प्रकारे मदत मिळाली आहे, आणि या गोष्टीवर आपल्या वागण्याचा कसा प्रभाव पडू शकतो?

१८ शेवटी शहराच्या अधिकाऱ्‍याने जमावाला शांत केलं. हा समजूतदार अधिकारी प्रसंग ओळखून वागला. या ख्रिस्ती लोकांकडून अर्तमी देवीला किंवा तिच्या मंदिराला कोणताही धोका नसल्याची त्याने जमावाला खातरी दिली. पौलने आणि त्याच्या साथीदारांनी अर्तमी देवीच्या विरुद्ध कोणताच अपराध केला नव्हता असं तो म्हणाला. तसंच, अशा तक्रारी नोंदवण्यासाठी एक योग्य पद्धत आहे असंही त्याने त्यांना सांगितलं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्याने जमावाला याची आठवण करून दिली, की त्यांच्या या बेकायदेशीर आणि बेशिस्त वागण्यामुळे रोमन कायद्यानुसार त्यांनाच दंड दिला जाऊ शकतो. त्याचं हे बोलणं ऐकल्यावर जमाव लगेच शांत झाला आणि त्याने त्यांना निघून जायला सांगितलं. हा जमाव रागाने जसा लगेच पेटला होता, तसा तो या व्यावहारिक आणि समजूतदार शब्दांनी लगेच शांतही झाला.​—प्रे. कार्यं १९:३५-४१.

१९ येशूच्या शिष्यांचं संरक्षण करण्यासाठी जगातल्या एखाद्या समजूतदार अधिकाऱ्‍याने मदत करण्याची ही पहिलीच वेळ नव्हती, आणि शेवटचीही ठरणार नव्हती. प्रेषित योहाननेही याबद्दल एक दृष्टान्त पाहिला. या दृष्टान्तात, त्याने आजच्या मानवी समाजातल्या स्थिर आणि सुव्यवस्थित संघटनांना सूचित करणारी पृथ्वी पाहिली. ती येशूच्या शिष्यांविरुद्ध सैतानाच्या छळाचा मोठा पूर गिळून टाकते. (प्रकटी. १२:१५, १६) ही गोष्ट अगदी खरी ठरली आहे. कारण अनेक खटल्यांमध्ये पक्षपात न करणाऱ्‍या न्यायाधीशांनी यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिकारांचं संरक्षण केलं आहे. त्यामुळे एकत्र मिळून उपासना करण्याचं आणि इतरांना आनंदाचा संदेश सांगण्याचं त्यांना स्वातंत्र्य मिळालं आहे. पण, आपण कसं वागतो यावरही या खटल्यांचा निर्णय अवलंबून असतो. पौलच्या चांगल्या वागण्यामुळे इफिसमधले अनेक अधिकारी त्याचा आदर करायचे आणि या दंगलीतून तो सुखरूप सुटावा अशी त्यांची इच्छा होती. (प्रे. कार्यं १९:३१) आपणही ज्यांना भेटतो त्यांच्यावर चांगला परिणाम व्हावा म्हणून आपण त्यांच्याशी प्रामाणिकपणे आणि आदराने वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण याचे पुढे कसे चांगले परिणाम होतील हे आपल्याला आताच सांगता येणार नाही.

२०. (क) पहिल्या शतकात आणि आजही यहोवाच्या वचनाचा ज्या सामर्थ्यशाली पद्धतीने प्रसार झाला आहे त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं? (ख) आजच्या काळात यहोवाने मिळवून दिलेल्या विजयांमुळे तुम्ही कोणता निश्‍चय केला आहे?

२० पहिल्या शतकात “यहोवाच्या शक्‍तीमुळे त्याचं वचन” कसं पसरत गेलं, हे जाणून आपल्याला आनंद होत नाही का? तसंच, आजच्या काळातही आनंदाचा संदेश सांगण्यात यहोवा आपल्याला असेच विजय मिळवून देत आहे, हेही जाणून आपल्याला आनंद होतो. अशा विजयांमध्ये आपला थोड्या प्रमाणात तरी वाटा असावा, असं तुम्हाला वाटतं का? मग, आपण ज्या उदाहरणांचं परीक्षण केलं त्यांवरून तुम्ही शिकू शकता. तेव्हा नेहमी नम्रपणे वागा, सतत पुढे जात राहणाऱ्‍या यहोवाच्या संघटनेसोबत चालत राहा, मेहनत करा, भूतविद्येचा विरोध करा, आणि सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे प्रामाणिक आणि आदरपूर्वक वागून लोकांना चांगली साक्ष द्या.

a “आशियाची राजधानी​—इफिस” ही चौकट पाहा.

b करिंथकर यांना पहिलं पत्र हेही पौलने इफिसमध्ये असताना लिहिलं.

c डोळ्यांत घाम जाऊ नये म्हणून पौल कदाचित हे रुमाल डोक्याला बांधत असावा. आणि या वचनात उल्लेख केलेले कपडे म्हणजे त्याचे अंगरखे असावेत. कदाचित सकाळी जेव्हा त्याला मोकळा वेळ मिळायचा तेव्हा तंबू बनवण्याचं काम करत असताना तो हे अंगरखे घालत असावा.​—प्रे. कार्यं २०:३४, ३५.

d लूकने त्या पुस्तकांची किंमत ५०,००० चांदीच्या नाण्यांइतकी असल्याचं सांगितलं. जर तो दिनाराबद्दल बोलत असेल, तर त्या काळात एका मजुराला तितकी नाणी कमवण्यासाठी ५०,००० दिवस, म्हणजे जवळजवळ १३७ वर्षांपर्यंत आठवड्याचे सातही दिवस काम करावं लागलं असतं.

e पौलने करिंथच्या बांधवांना लिहिलेल्या पत्रात, “आमच्या जिवाचीही आम्हाला खातरी नव्हती” असं जेव्हा म्हटलं, तेव्हा तो याच घटनेबद्दल सांगत असावा असं काहींचं म्हणणं आहे. (२ करिंथ. १:८) पण पौलच्या मनात कदाचित याहीपेक्षा भयानक घटना असावी. पौलने लिहिलं, मी “इफिसमध्ये हिंस्र प्राण्यांशी लढलो.” तेव्हा तो रोमन अखाड्यात हिंस्र प्राण्यांशी त्याला कराव्या लागलेल्या सामन्याबद्दल किंवा लोकांनी केलेल्या विरोधाबद्दल बोलत असावा. (१ करिंथ. १५:३२) याचे शब्दशः किंवा लाक्षणिक दोन्ही अर्थ असू शकतात.

f कारागिरांचे असे संघ किंवा गट फार प्रभावशाली असायचे. या घटनेच्या जवळपास १०० वर्षांनंतर आणखी एका संघाने, म्हणजे बेकरी चालवणाऱ्‍यांच्या संघानेही इफिसमध्ये अशीच दंगल केली होती.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा