वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • bt अध्या. १९ पृ. १४८-१५५
  • “बोलत राहा, शांत राहू नकोस!”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “बोलत राहा, शांत राहू नकोस!”
  • देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “त्यांचा तंबू बनवायचा व्यवसाय होता” (प्रे. कार्यं १८:१-४)
  • “करिंथमधल्या बऱ्‍याच लोकांनीही विश्‍वास ठेवला” (प्रे. कार्यं १८:५-८)
  • “या शहरात माझे आणखी बरेच लोक आहेत” (प्रे. कार्यं १८:९-१७)
  • “यहोवाची इच्छा असेल, तर” (प्रे. कार्यं १८:१८-२२)
  • अक्विला आणि प्रिसिल्ला एक आदर्श दांपत्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • यहोवाचे वचन प्रबल होते!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • “मी सगळ्या लोकांच्या रक्‍ताबद्दल निर्दोष आहे”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • प्रेषितांची कृत्ये पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
bt अध्या. १९ पृ. १४८-१५५

अध्याय १९

“बोलत राहा, शांत राहू नकोस!”

पौल आपल्या गरजा भागवण्यासाठी काम करतो, पण तरीही सेवाकार्यालाच पहिलं स्थान देतो

प्रे. कार्यं १८:१-२२ वर आधारित

१-३. प्रेषित पौल करिंथला कशासाठी आला आहे, आणि तिथे त्याच्यासमोर कोणत्या अडचणी आहेत?

इ.स. ५० हे वर्ष संपत आलं आहे. प्रेषित पौल आता करिंथमध्ये आहे. हे एक श्रीमंत व्यापारी शहर आहे. इथे मोठ्या प्रमाणात ग्रीक, रोमन आणि यहुदी लोक राहतात.a पौल इथे खरेदी-विक्री करण्यासाठी किंवा काम शोधण्यासाठी आलेला नाही. तर तो एका फार महत्त्वाच्या कामासाठी करिंथला आला आहे. त्याला देवाच्या राज्याबद्दल साक्ष द्यायची आहे. पण, पौलला इथे राहण्यासाठी जागा शोधावी लागणार आहे. तसंच, कोणत्याही परिस्थितीत त्याला इतरांवर ओझं बनायचं नाही. देवाची सेवा करत असल्यामुळे आपण इतरांकडून आर्थिक मदतीची अपेक्षा करत आहोत, असा कोणीही विचार करू नये अशी पौलची इच्छा आहे. मग, त्याने काय केलं?

२ पौलला तंबू बनवण्याचं काम येतं. हे काम सोपं नाही. पण स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी पौल मेहनत करायला तयार आहे. या गजबजलेल्या शहरात पौलला काम मिळेल का? त्याला राहण्यासाठी एखादं सोईस्कर ठिकाण सापडेल का? या सर्व अडचणी असूनही, पौल आपल्या सर्वात महत्त्वाच्या कामाकडे, म्हणजेच त्याच्या सेवाकार्याकडे कधीही दुर्लक्ष होऊ देत नाही.

३ पौल बराच काळ करिंथमध्ये राहिला आणि तिथे त्याचं सेवाकार्यही खूप फलदायी ठरलं. करिंथमध्ये पौलने केलेल्या कार्यावरून आपण आपल्या क्षेत्रात देवाच्या राज्याबद्दल अगदी पूर्णपणे साक्ष देण्याबद्दल काय शिकू शकतो?

करिंथ​—दोन समुद्रांच्या मधोमध वसलेलं शहर

ग्रीसचा मुख्य भूप्रदेश आणि दक्षिणेकडे असलेला पेलोपनीसचा भूभाग यांना जोडणाऱ्‍या जमिनीच्या अरुंद पट्ट्यावर करिंथ शहर होतं. सर्वात अरुंद ठिकाणी या पट्ट्याची रुंदी सहा किलोमीटरपेक्षाही कमी होती. त्यामुळे करिंथमध्ये दोन बंदरं होती. करिंथच्या खाडीवर लेखाऑन हे बंदर होतं, तर सॅरोनिक खाडीवर किंख्रियाचं बंदर होतं. लेखाऑन बंदरातून जहाजं पश्‍चिमेकडे असलेल्या इटली, सिसिली व स्पेनला जाऊ शकत होती. आणि किंख्रिया बंदरातून जहाजं एजियन प्रदेश, आशिया मायनर, सीरिया आणि इजिप्त इथे ये-जा करू शकत होती.

पेलोपनीसच्या दक्षिणेकडच्या समुद्रात सहसा खूप वादळं यायची. त्यामुळे त्या मार्गाने जहाजं न्यायला खलाशी घाबरायचे. त्याऐवजी, ते करिंथच्या दोन बंदरांपैकी एका बंदरात नांगर टाकून, जहाजांतला माल दुसऱ्‍या बंदरापर्यंत जमिनीवरून न्यायचे आणि पुन्हा जहाजांवर लादायचे. कमी वजनाची जहाजं तर चाकं लावलेल्या फळ्यांवर चढवून एका बंदरातून दुसऱ्‍या बंदरापर्यंत दगडी रस्त्यावरून ओढून नेली जाऊ शकत होती. करिंथचं शहर अशा खास ठिकाणी असल्यामुळे, पूर्व आणि पश्‍चिम दिशेला असलेल्या प्रदेशांत समुद्री मार्गाने चालणाऱ्‍या व्यापारावर; तसंच, उत्तर आणि दक्षिण दिशांना असलेल्या देशांमध्ये जमिनीवर केल्या जाणाऱ्‍या व्यापारावरही या शहराचं नियंत्रण होतं. व्यापारामुळे करिंथमध्ये भरपूर श्रीमंती तर आलीच, पण सहसा बंदर शहरांमध्ये चालणारी वाईट कामंही इथे होऊ लागली.

प्रेषित पौलच्या दिवसांत, करिंथ हे अखया या रोमन प्रांताचं राजधानी शहर होतं आणि इथूनच या प्रांताचा कारभार चालवला जायचा. शहरात वेगवेगळे धार्मिक विश्‍वास असलेले लोक होते. त्यामुळे इथे सम्राटाची उपासना करणाऱ्‍या एका गुप्त पंथाचं मंदिर, तसंच ग्रीक आणि इजिप्तच्या देवीदेवतांसाठी बांधलेली बरीच मंदिरं व देवळं, आणि एक यहुदी सभास्थानही होतं.​—प्रे. कार्यं १८:४.

करिंथजवळ असलेल्या इस्थमिया शहरात दर दोन वर्षांनी मैदानी खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जायच्या. ऑलिंपिक खेळांच्या खालोखाल या स्पर्धांचं महत्त्वाचं स्थान होतं. इस्थमिया इथे इ.स. ५१ मध्ये झालेल्या स्पर्धांच्या वेळी प्रेषित पौल करिंथमध्ये होता. म्हणूनच, बायबलच्या एका शब्दकोशात असं म्हटलं आहे, की पौलने “करिंथला लिहिलेल्या पत्रात पहिल्यांदाच एका खेळाडूचं उदाहरण वापरलं, ही आश्‍चर्याची गोष्ट नाही.”​—१ करिंथ. ९:२४-२७.

“त्यांचा तंबू बनवायचा व्यवसाय होता” (प्रे. कार्यं १८:१-४)

४, ५. (क) करिंथमध्ये असताना पौल कुठे राहिला, आणि त्याने कोणतं काम केलं? (ख) पौल तंबू बनवण्याचं काम कसं करू लागला असेल?

४ करिंथला आल्यावर काही काळाने पौलची भेट अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला या जोडप्याशी झाली. अक्विल्ला हा मुळात यहुदी होता आणि त्याच्या पत्नीचं नाव प्रिस्किल्ला किंवा प्रिस्का होतं. सम्राट क्लौद्य याने “सगळ्या यहुद्यांना रोम सोडून जायचा हुकूम दिल्यामुळे” ते करिंथला राहायला आले होते. (प्रे. कार्यं १८:१, २) अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला या दोघांनाही पाहुणचार करण्याची आवड होती. पौलला आपल्या घरी राहायला जागा देण्यासोबतच, त्यांनी आपल्या व्यवसायातही त्याला सामील केलं. अहवालात म्हटलं आहे: “त्यांचा एकच व्यवसाय असल्यामुळे तो [पौल] त्यांच्याच घरी राहून त्यांच्यासोबत काम करू लागला. त्यांचा तंबू बनवायचा व्यवसाय होता.” (प्रे. कार्यं १८:३) करिंथमध्ये सेवाकार्य करताना संपूर्ण काळात पौल या उदार जोडप्याच्या घरीच राहिला. अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला यांच्या घरी राहत असतानाच कदाचित पौलने त्याची काही पत्रं लिहिली असावीत. ही पत्रं नंतर बायबलचा भाग बनली.b

५ पण, “गमलियेलच्या पायाशी बसून” शिक्षण घेतलेला पौल हा तंबू बनवण्याचं काम कसं करू शकत होता? (प्रे. कार्यं २२:३) पहिल्या शतकातले यहुदी आपल्या मुलांना शिक्षण देण्यासोबतच त्यांना एखादं कामही शिकवायचे. त्यांना ही गोष्ट कमीपणाची वाटत नव्हती. पौल हा किलिकिया प्रांतातल्या तार्स शहराचा होता. या भागात तयार केलं जाणारं किलिकियम  नावाचं एक खास प्रकारचं कापड प्रसिद्ध होतं. याच कापडापासून तंबू बनवले जायचे. पौलने कदाचित लहानपणीच हे काम शिकून घेतलं असावं. पण तंबू बनवण्यासाठी कोणकोणती कामं करावी लागायची? त्यासाठी, तंबूचं कापड विणावं लागायचं किंवा ते कापावं लागायचं आणि मग हे कडक, खरबरीत कापड शिवून त्यापासून तंबू बनवावे लागायचे. साहजिकच, हे काही सोपं काम नव्हतं.

६, ७. (क) तंबू बनवण्याच्या कामाबद्दल पौलचा कसा दृष्टिकोन होता, आणि अक्विल्ला व प्रिस्किल्ला यांचाही तसाच दृष्टिकोन होता हे कशावरून दिसून येतं? (ख) आजही ख्रिस्ती कशा प्रकारे पौल, अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला यांच्या उदाहरणाचं अनुकरण करतात?

६ पण, तंबू बनवण्याचं काम हेच आपलं मुख्य काम आहे असा पौलने कधीही विचार केला नाही. तर, “कोणताही मोबदला न घेता” आनंदाचा संदेश घोषित करताना, स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी तो हे काम करायचा. (२ करिंथ. ११:७) अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला यांचा आपल्या व्यवसायाबद्दल कसा दृष्टिकोन होता? ख्रिस्ती असल्यामुळे त्यांचाही या कामाबद्दल साहजिकच पौलसारखाच दृष्टिकोन होता. इ.स. ५२ मध्ये जेव्हा पौल करिंथ सोडून गेला, तेव्हा अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला यांनीही तिथला व्यवसाय बंद केला आणि तेसुद्धा पौलसोबत इफिसला गेले. तिथे त्यांच्याच घरी मंडळीच्या सभा होऊ लागल्या. (१ करिंथ. १६:१९) नंतर, ते रोमला परतले आणि मग पुन्हा इफिसला गेले. या आवेशी जोडप्याने नेहमी राज्याच्या कार्याला जीवनात पहिलं स्थान दिलं. इतरांची सेवा करण्यासाठी ते मेहनत करायला तयार होते. म्हणूनच, “विदेशी लोकांच्या सगळ्या मंडळ्याही त्यांचे आभार” मानायच्या.​—रोम. १६:३-५; २ तीम. ४:१९.

७ आजच्या काळातले ख्रिस्तीही पौल, अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला यांच्या उदाहरणाचं अनुकरण करतात. आज आवेशी प्रचारक इतरांना “खर्चात पाडून [त्यांच्यावर] . . . ओझं बनू नये,” म्हणून खूप मेहनत करतात. (१ थेस्सलनी. २:९) बरेच पूर्णवेळेचे सेवक आपलं मुख्य काम म्हणजेच ख्रिस्ती सेवाकार्य करताना आपला खर्च भागवण्यासाठी पार्ट-टाईम किंवा वर्षातून काही महिने काम करतात. अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला यांच्याप्रमाणे कित्येक उदार मनाचे बांधव, आपल्या घरांत, विभागीय पर्यवेक्षकांच्या राहण्याची सोय करतात. अशा प्रकारे “पाहुणचार” करणाऱ्‍या बांधवांना यामुळे खूप प्रोत्साहन आणि आध्यात्मिक आशीर्वादही मिळतात.​—रोम. १२:१३.

प्रोत्साहन देणारी प्रेरित पत्रं

प्रेषित पौल इ.स. ५०-५२ दरम्यान दीड वर्ष करिंथमध्ये राहिला. या काळात त्याने कमीतकमी दोन पत्रं लिहिली. त्याची ही पत्रं, म्हणजेच थेस्सलनीकाकरांना लिहिलेलं पहिलं आणि दुसरं पत्र. ही पत्रं ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांचा भाग बनली. गलतीकरांनाही त्याने कदाचित याच काळात किंवा याच्या थोड्याच काळानंतर पत्र लिहिलं असावं.

थेस्सलनीकाकर यांना पहिलं पत्र  हे पौलच्या प्रेरित लिखाणांपैकी सर्वात पहिलं होतं. पौल इ.स. ५० च्या आसपास, त्याच्या दुसऱ्‍या प्रचार दौऱ्‍याच्या वेळी थेस्सलनीका इथे गेला होता. तिथे स्थापन झालेल्या मंडळीला लवकरच विरोधाचा सामना करावा लागला. त्यामुळे, पौल आणि सीला यांना शहर सोडून जाणं भाग पडलं. (प्रे. कार्यं १७:१-१०, १३) इथल्या नवीनच स्थापन झालेल्या मंडळीची काळजी वाटत असल्यामुळे पौलने दोन वेळा इथे परत येण्याचा प्रयत्न केला. पण, सैतान त्याच्या “मार्गात आडवा आला.” त्यामुळे, पौलने तिथल्या बांधवांना सांत्वन आणि प्रोत्साहन देण्यासाठी तीमथ्यला त्यांच्याकडे पाठवलं. कदाचित इ.स. ५० या वर्षाच्या शेवटी, तीमथ्य पुन्हा करिंथमध्ये पौलकडे गेला आणि त्याने थेस्सलनीकाच्या मंडळीच्या बांधवांबद्दल त्याला चांगल्या गोष्टी सांगितल्या. त्यानंतर, पौलने हे पत्र त्यांना लिहिलं.​—१ थेस्सलनी. २:१७–३:७.

थेस्सलनीकाकर यांना दुसरं पत्र  हे पहिलं पत्र लिहिल्यावर थोड्याच काळानंतर, कदाचित इ.स. ५१ मध्ये लिहिण्यात आलं असावं. दोन्ही पत्रांत पौलसोबतच तीमथ्य आणि सिल्वान (ज्याला प्रेषितांची कार्यं यात सीला म्हटलं आहे) हेसुद्धा बांधवांना नमस्कार सांगतात. पण, पौल करिंथ सोडून गेल्यानंतर हे तिघं एकत्र असल्याचा कुठेही उल्लेख नाही. (प्रे. कार्यं १८:५, १८; १ थेस्सलनी. १:१; २ थेस्सलनी. १:१) पौलने हे दुसरं पत्र का लिहिलं? ज्याने त्याचं पहिलं पत्र थेस्सलनीकाच्या बांधवांपर्यंत पोहोचवलं होतं, त्याच्याकडून पौलला या मंडळीबद्दल आणखी काही गोष्टी समजल्या असं दिसतं. त्या गोष्टी ऐकल्यावर पौलला ते बांधव दाखवत असलेलं प्रेम आणि धीर यांबद्दल त्यांची प्रशंसा करावीशी वाटली. आणि यासोबतच पौलला आपल्या पत्राद्वारे त्यांचा एक चुकीचा समज सुधारण्याचीही इच्छा होती. कारण, प्रभूचा दिवस लगेच येणार आहे, असा तिथे काही जण विचार करत होते.​—२ थेस्सलनी. १:३-१२; २:१, २.

गलतीकर यांना पत्र  या पौलच्या पत्रावरून असं दिसतं, की त्याने हे पत्र लिहिण्याआधी दोन वेळा गलतीयाच्या बांधवांना भेट दिली होती. इ.स. ४७-४८ मध्ये पौल आणि बर्णबा यांनी पिसिदियाचं अंत्युखिया, इकुन्या, लुस्त्र, आणि दर्बे या शहरांना भेट दिली. ही सर्व शहरं गलतीया या रोमन प्रांतात होती. इ.स. ४९ मध्ये पौल सीलासोबत पुन्हा या भागात आला. (प्रे. कार्यं १३:१–१४:२३; १६:१-६) पौलने या भागात भेट दिल्यानंतर लगेच, यहुदी मत समर्थक तिथे आले आणि ख्रिस्ती लोकांनी सुंता करणं आणि मोशेच्या नियमशास्त्राचं पालन करणं आवश्‍यक आहे, असं शिकवू लागले. या खोट्या शिकवणीबद्दल कळताच पौलने गलतीयाच्या बांधवांना पत्र लिहिलं असावं यात शंका नाही. कदाचित त्याने हे पत्र करिंथमधून लिहिलं असावं. पण सीरियाच्या अंत्युखियाला परत जाताना पौलने काही काळासाठी इफिस इथे मुक्काम केला होता. त्यामुळे, त्याने तिथून किंवा अंत्युखियाहून हे पत्र लिहिलं असण्याचीही शक्यता आहे.​—प्रे. कार्यं १८:१८-२३.

“करिंथमधल्या बऱ्‍याच लोकांनीही विश्‍वास ठेवला” (प्रे. कार्यं १८:५-८)

८, ९. पौलने यहुद्यांना केलेल्या आवेशी साक्षकार्याचा विरोध झाला तेव्हा त्याने काय केलं, आणि त्यानंतर प्रचारकार्य करण्यासाठी तो कुठे गेला?

८ पौल फक्‍त सेवाकार्य करताना स्वतःचा खर्च भागवण्यासाठी काम करायचा. सीला आणि तीमथ्य मासेदोनियाहून बांधवांनी पौलसाठी उदारपणे पाठवलेल्या भेटी घेऊन आले, तेव्हा ही गोष्ट स्पष्ट झाली. (२ करिंथ. ११:९) कारण, ते बांधव आल्यावर लगेच “पौलने प्रचारकार्यासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतलं.” (प्रे. कार्यं १८:५) पण यहुद्यांना आवेशाने साक्ष दिल्यामुळे पौलला विरोधाचा सामना करावा लागला. यहुद्यांनी ख्रिस्ताविषयीचा जीवनदायी संदेश नाकारला. यामुळे होणाऱ्‍या परिणामांसाठी आपण जबाबदार नाही, हे दाखवण्यासाठी पौलने आपले कपडे झटकून त्यांना म्हटलं: “तुमच्या रक्‍ताचा दोष तुमच्याच माथी येवो. मी निर्दोष आहे. आतापासून मी विदेशी लोकांकडे जाईन.”​—प्रे. कार्यं १८:६; यहे. ३:१८, १९.

९ मग आता पौल कुठे प्रचार करणार होता? सभास्थानाच्या शेजारीच राहणाऱ्‍या तीत युस्त नावाच्या एका माणसाने पौलचं आपल्या घरात स्वागत केलं. तो कदाचित यहुदी धर्म स्वीकारलेल्यांपैकी असावा. तर आता पौल सभास्थानात न शिकवता युस्तच्या घरी शिकवू लागला. (प्रे. कार्यं १८:७) करिंथमध्ये असेपर्यंत पौल अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला यांच्याच घरी राहिला. पण, लोकांना शिकवण्याचं काम मात्र तो युस्तच्या घरात करू लागला.

१०. पौल फक्‍त विदेश्‍यांनाच प्रचार करणार नव्हता हे कशावरून दिसून येतं?

१० यापुढे आपण विदेशी लोकांकडे जाऊ असं म्हटल्यानंतर, पौलने सर्व यहुद्यांना आणि यहुदी धर्म स्वीकारलेल्यांना, अगदी जे आवड दाखवत होते त्यांनाही प्रचार करण्याचं पूर्णपणे बंद केलं का? नाही. कारण अहवालात आपण पाहतो, की “सभास्थानाचा अधिकारी क्रिस्प आणि त्याच्या संपूर्ण घराण्याने प्रभूवर विश्‍वास ठेवला.” हे समजल्यावर सभास्थानाच्या बऱ्‍याच सदस्यांनीही क्रिस्पप्रमाणेच केलं. कारण बायबलमध्ये असं सांगितलं आहे, की “हे ऐकल्यावर करिंथमधल्या बऱ्‍याच लोकांनीही विश्‍वास ठेवला आणि बाप्तिस्मा घेतला.” (प्रे. कार्यं १८:८) अशा रितीने, करिंथमध्ये नवीनच स्थापन झालेल्या ख्रिस्ती मंडळीच्या सभा तीत युस्तच्या घरी होऊ लागल्या. प्रेषितांची कार्यं यातला अहवाल कदाचित लूकच्या नेहमीच्या पद्धतीने, म्हणजेच घटना घडल्या त्या क्रमाने लिहिलेला असावा. तर मग, पौलने आपले कपडे झटकून तो विदेश्‍यांकडे जात असल्याचं सांगितलं त्या घटनेनंतर,  क्रिस्प आणि इतर यहुद्यांनी ख्रिस्ती विश्‍वास स्वीकारला. खरंच, पौल परिस्थितीनुसार बदलायला तयार होता, याचं हे किती सुंदर उदाहरण!

११. ख्रिस्ती धर्मजगताचा भाग असलेल्या लोकांना मदत करताना यहोवाचे साक्षीदार आज पौलचं अनुकरण कसं करतात?

११ आज बऱ्‍याच देशांत ख्रिस्ती धर्मजगताची अनेक चर्च बऱ्‍याच काळापासून आहेत आणि त्यांच्या सदस्यांवर त्यांचा खूप प्रभाव आहे. जगभरातल्या वेगवेगळ्या देशांत ख्रिस्ती धर्मजगताच्या मिशनऱ्‍यांनी मोठ्या प्रमाणावर धर्मपरिवर्तन केलं आहे. स्वतःला ख्रिस्ती म्हणणारे हे लोक, पहिल्या शतकातल्या करिंथप्रमाणे, रूढीपरंपरांचं पालन करतात. तरीसुद्धा यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपण पौलप्रमाणे अशा लोकांना सत्य जाणून घ्यायला मदत करण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्याजवळ शास्त्रवचनांचं जे काही ज्ञान आहे त्याच्या आधारावर आपण बायबलची खरी शिकवण समजून घ्यायला त्यांना मदत करतो. त्यांनी आपला विरोध केला, किंवा त्यांच्या पाळकांनी आपला छळ केला तरीसुद्धा आपण निराश होत नाही. कारण, या लोकांना “देवाबद्दल आवेश तर आहे, पण तो अचूक ज्ञानाप्रमाणे नाही.” आणि त्यांच्यामध्ये असे बरेच नम्र मनाचे लोक असतील, ज्यांना आपण शोधण्याची गरज आहे.​—रोम. १०:२.

“या शहरात माझे आणखी बरेच लोक आहेत” (प्रे. कार्यं १८:९-१७)

१२. पौलला एका दृष्टान्तात कोणतं आश्‍वासन देण्यात आलं?

१२ करिंथमध्ये सेवाकार्य पुढे चालू ठेवावं का, अशी शंका जरी पौलच्या मनात आली असली, तरी एका रात्री प्रभू येशूने त्याला दाखवलेल्या दृष्टान्तामुळे ती नाहीशी झाली असेल. दृष्टान्तात येशू त्याला म्हणाला: “घाबरू नकोस! बोलत राहा, शांत राहू नकोस! कारण मी तुझ्यासोबत आहे. त्यामुळे कोणीही तुझ्यावर हल्ला करणार नाही किंवा तुझं काही नुकसान करणार नाही. कारण या शहरात माझे आणखी बरेच लोक आहेत.” (प्रे. कार्यं १८:९, १०) खरंच, पौलला त्या दृष्टान्तामुळे किती प्रोत्साहन मिळालं असेल! प्रभू येशूने स्वतः त्याला आश्‍वासन दिलं की त्याचं संरक्षण केलं जाईल. तसंच, त्याने पौलला हेही सांगितलं की त्या शहरात बरेच योग्य मनोवृत्तीचे लोक आहेत. हा दृष्टान्त पाहिल्यावर पौलने काय केलं? अहवालात म्हटलं आहे: “तो दीड वर्षं तिथे राहून त्यांना देवाचं वचन शिकवत राहिला.”​—प्रे. कार्यं १८:११.

१३. पौलला न्यायासनासमोर नेलं जात असताना त्याला कोणती घटना आठवली असेल, पण आपल्यासोबत तसं घडणार नाही असा विश्‍वास तो का बाळगू शकत होता?

१३ करिंथमध्ये साधारण वर्षभर राहिल्यानंतर, एक अशी घटना घडली ज्यामुळे पौलला प्रभू येशूचा पाठिंबा असल्याचा आणखी पुरावा मिळाला. नेमकं काय घडलं? “सगळे यहुदी लोक मिळून पौलविरुद्ध उठले” आणि त्यांनी त्याला “न्यायासनासमोर” नेलं. (प्रे. कार्यं १८:१२) हे न्यायासन म्हणजे, सुंदर नक्षीकाम केलेल्या निळ्या आणि पांढऱ्‍या संगमरवराचा एक उंच कट्टा असावा, असं काहींचं म्हणणं आहे. हे न्यायासन करिंथच्या बाजारपेठेजवळ असावं. न्यायासनासमोर असलेल्या मोकळ्या जागेत बरेच लोक एकत्र जमू शकत होते. या भागात सापडलेल्या पुरातन वस्तूंवरून असं दिसतं, की हे न्यायासन सभास्थानापासून आणि त्यामुळे युस्तच्या घरापासूनही फक्‍त काही पावलांच्या अंतरावर होतं. पौलला न्यायासनासमोर नेलं जात असताना, कदाचित त्याला स्तेफनला झालेला दगडमार आठवला असेल. स्तेफनला पहिला ख्रिस्ती शहीद म्हटलं जातं. पौल, ज्याला त्या वेळी शौल या नावाने ओळखलं जायचं, त्याला स्तेफनची “ही हत्या मान्य होती.” (प्रे. कार्यं ८:१) आता पौलसोबतही असंच काही होणार होतं का? नाही, कारण त्याला असं वचन देण्यात आलं होतं: “कोणीही . . . तुझं काही नुकसान करणार नाही.”​—प्रे. कार्यं १८:१०.

पौलवर आरोप लावणाऱ्‍या भडकलेल्या जमावासमोर गल्लियो पौलला निर्दोष ठरवून, जमावाला घालवून देतो. रोमी सैनिक जमावाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

“त्याने त्यांना न्यायासनापुढून घालवून दिलं.”​—प्रे. कार्यं १८:१६

१४, १५. (क) यहुद्यांनी पौलवर कोणता आरोप लावला, आणि गल्लियोने तो खटला रद्द का केला? (ख) सोस्थनेस याच्यासोबत काय घडलं, आणि पुढे कदाचित याचा कोणता परिणाम झाला असावा?

१४ पौलला न्यायासनासमोर आणल्यावर काय घडलं? न्यायासनावर बसलेला न्यायाधीश अखया प्रांताचा राज्यपाल गल्लियो होता. तो रोमन तत्त्वज्ञानी सेनेका याचा मोठा भाऊ होता. यहुद्यांनी लगेच पौलवर आरोप लावायला सुरुवात केली: “हा माणूस, नियमशास्त्राप्रमाणे योग्य नसलेल्या पद्धतीने देवाची उपासना करायला लोकांना शिकवतोय.” (प्रे. कार्यं १८:१३) पौल बेकायदेशीरपणे लोकांचं धर्मपरिवर्तन करत आहे, असं त्या यहुद्यांचं म्हणणं होतं. पण पौलने कोणतीही चूक किंवा ‘गंभीर अपराध’ केलेला नाही हे गल्लियोच्या लक्षात आलं. (प्रे. कार्यं १८:१४) त्याला यहुद्यांच्या आपसांतल्या वादांत पडायचं नव्हतं. त्यामुळे, पौलने आपल्या बचावात काही बोलण्याआधीच गल्लियोने तो खटला रद्द केला. यामुळे पौलवर आरोप करणाऱ्‍यांना खूप राग आला. त्यांनी आपला सगळा राग सभास्थानाचा अधिकारी, सोस्थनेस याच्यावर काढला. सोस्थनेस याला कदाचित क्रिस्प याच्या जागेवर नेमण्यात आलं असावं. त्यांनी सोस्थनेसला धरलं आणि ते “न्यायासनासमोर त्याला मारहाण करू लागले.”​—प्रे. कार्यं १८:१७.

१५ लोकांचा जमाव सोस्थनेसला मारहाण करत असताना गल्लियोने त्यांना का अडवलं नाही? कदाचित गल्लियोला असं वाटलं असेल, की सोस्थनेसनेच लोकांना पौलविरुद्ध भडकवलं होतं आणि त्यामुळे आता त्याला त्याची शिक्षा मिळत आहे. ही गोष्ट खरी आहे किंवा नाही हे जरी सांगता येत नसलं, तरी या घटनेमुळे एक चांगला परिणाम घडून आला. बऱ्‍याच वर्षांनंतर, करिंथच्या मंडळीला लिहिलेल्या पहिल्या पत्रात पौलने एका सोस्थनेस नावाच्या बांधवाचा उल्लेख केला. (१ करिंथ. १:१, २) करिंथमध्ये ज्याला मारहाण झाली होती, तोच हा सोस्थनेस असावा का? तसं असेल, तर या वाईट अनुभवामुळेच कदाचित त्याला ख्रिस्ती विश्‍वास स्वीकारायला मदत झाली असावी.

१६. “बोलत राहा, शांत राहू नकोस! कारण मी तुझ्यासोबत आहे,” या येशूच्या शब्दांमुळे आपल्याला सेवाकार्यासाठी कसं प्रोत्साहन मिळतं?

१६ आपण लक्षात ठेवलं पाहिजे, की यहुद्यांनी पौलचा संदेश नाकारल्यानंतरच प्रभू येशूने पौलला असं आश्‍वासन दिलं: “घाबरू नकोस! बोलत राहा, शांत राहू नकोस! कारण मी तुझ्यासोबत आहे.” (प्रे. कार्यं १८:९, १०) खासकरून जेव्हा लोक आपला संदेश ऐकायला नकार देतात तेव्हा आपण हे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत. यहोवा सर्वांच्या हृदयाचं परीक्षण करतो आणि प्रामाणिक मनाच्या लोकांना तो आपल्याकडे आकर्षित करतो, हे कधीही विसरू नका. (१ शमु. १६:७; योहा. ६:४४) या गोष्टीमुळे आपल्याला सेवाकार्यात आवेश दाखवण्याचं नक्कीच खूप प्रोत्साहन मिळतं! दरवर्षी लाखो लोकांचा बाप्तिस्मा होत आहे. याचा अर्थ, दररोज शेकडो लोक साक्षीदार बनतात. “सगळ्या राष्ट्रांच्या लोकांना शिष्य” बनवण्याच्या आज्ञेचं जे पालन करतात त्यांना येशू हे आश्‍वासन देतो: “जगाच्या व्यवस्थेच्या समाप्तीपर्यंत मी नेहमी तुमच्यासोबत असेन.”​—मत्त. २८:१९, २०.

“यहोवाची इच्छा असेल, तर” (प्रे. कार्यं १८:१८-२२)

१७, १८. इफिसला जाताना पौलने कदाचित कशाबद्दल विचार केला असेल?

१७ पौलवर आरोप लावणाऱ्‍या यहुद्यांशी गल्लियोने ज्या प्रकारे व्यवहार केला त्यामुळे, करिंथ इथल्या नवीनच स्थापन झालेल्या ख्रिस्ती मंडळीत शांतीचा काळ आला का, हे नक्की सांगता येत नाही. पण, पौल “बरेच दिवस” करिंथमध्ये राहिला आणि त्यानंतर त्याने तिथल्या बांधवांचा निरोप घेतला. इ.स. ५२ मध्ये त्याने किंख्रियाच्या बंदरावरून जहाजाने सीरियाला जायचं ठरवलं. किंख्रियाचं बंदर करिंथपासून ११ किलोमीटरच्या अंतरावर होतं. पण, किंख्रियाहून निघण्याआधी पौलने “एक नवस केला असल्यामुळे . . . आपल्या डोक्यावरचे केस कापले.”c (प्रे. कार्यं १८:१८) त्यानंतर अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला यांना सोबत घेऊन तो एजियन समुद्राच्या मार्गाने आशिया मायनर इथल्या इफिसला गेला.

१८ किंख्रिया इथून जहाजाने प्रवास करत असताना, पौलने कदाचित करिंथमध्ये आलेल्या सर्व अनुभवांबद्दल विचार केला असेल. त्याच्याजवळ बऱ्‍याच चांगल्या आठवणी होत्या आणि तिथे केलेल्या कार्याबद्दल त्याच्या मनात समाधानाची भावना होती. तिथे दीड वर्षं राहून त्याने जे सेवाकार्य केलं होतं, त्यामुळे बरेच चांगले परिणाम झाले होते. करिंथमध्ये पहिली ख्रिस्ती मंडळी स्थापन झाली होती आणि युस्तच्या घरात त्या मंडळीच्या सभा होत होत्या. युस्त, क्रिस्प आणि त्याच्या कुटुंबातल्या लोकांनी, तसंच आणखी बऱ्‍याच जणांनी विश्‍वास स्वीकारला होता. पौलने स्वतः त्या सर्वांना ख्रिस्ती बनायला मदत केली असल्यामुळे त्याचं त्यांच्यावर खूप प्रेम होतं. काही काळाने त्याने त्यांना पत्र लिहिलं, तेव्हा तुम्ही आमच्या हृदयावर लिहिलेली शिफारसपत्रं आहात असं तो त्यांना म्हणाला. खरी उपासना स्वीकारायला आपण ज्यांना मदत करतो त्यांच्यासोबत आपलंही खूप जवळचं नातं निर्माण होतं. अशी जिवंत “शिफारसपत्रं” पाहून आपल्याला खरंच किती आनंद होतो!​—२ करिंथ. ३:१-३.

१९, २०. इफिसला आल्यावर पौलने काय केलं आणि यहोवाच्या सेवेतली ध्येयं पूर्ण करण्याच्या बाबतीत आपण त्याच्याकडून काय शिकतो?

१९ इफिसला आल्यावर पौल लगेच कामाला लागला. तो “सभास्थानात गेला आणि यहुद्यांसोबत तर्क करू लागला.” (प्रे. कार्यं १८:१९) या वेळी पौल इफिसमध्ये फार काळ राहिला नाही. बांधवांनी त्याला आणखी काही काळ राहण्याची विनंती केली तरीही, “तो तयार झाला नाही.” इफिसच्या बांधवांचा निरोप घेताना तो त्यांना म्हणाला: “यहोवाची इच्छा असेल, तर मी तुमच्याकडे परत येईन.” (प्रे. कार्यं १८:२०, २१) इफिसमध्ये बरंच प्रचारकार्य करणं बाकी आहे, याची पौलला कल्पना होती. त्यामुळे इथे परत येण्याची त्याची इच्छा तर होती, पण त्याने सर्व गोष्टी यहोवाच्या हाती सोपवून दिल्या. हे आपल्यासाठी एक चांगलं उदाहरण आहे. यहोवाच्या सेवेतली ध्येयं पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना आपण पावलं उचलणं गरजेचं आहे. पण त्यासोबतच आपण मार्गदर्शनासाठी यहोवावर अवलंबून राहिलं पाहिजे आणि नेहमी त्याच्या इच्छेनुसार निर्णय घेतले पाहिजेत.​—याको. ४:१५.

२० अक्विल्ला आणि प्रिस्किल्ला यांना इफिसमध्ये सोडून पौल जहाजाने खाली कैसरीयाला आला. मग, “वर जाऊन” तो यरुशलेममधल्या मंडळीला भेटला. (अभ्यासासाठी माहिती-प्रे. कार्यं १८:२२, nwtsty-E) यानंतर, पौल सीरियाच्या अंत्युखियाला गेला. तो सहसा इथेच मुक्काम करायचा आणि इथूनच ठिकठिकाणी मिशनरी दौऱ्‍यांसाठी जायचा. पौलचा दुसरा मिशनरी दौरा आता यशस्वीपणे पूर्ण झाला होता. पण, त्याच्या शेवटच्या मिशनरी दौऱ्‍यात त्याला कसे अनुभव येणार होते?

पौलने केलेला नवस

प्रेषितांची कार्यं १८:१८ यात असं म्हटलं आहे, की किंख्रियामध्ये असताना पौलने “एक नवस केला असल्यामुळे . . . आपल्या डोक्यावरचे केस कापले.” हा कशा प्रकारचा नवस होता?

सहसा नवस हे एखादी गोष्ट करण्याचं, काही अर्पण देण्याचं किंवा एखादी खास स्थिती स्वीकारण्याचं देवाला दिलेलं वचन असतं. काहींचं असं म्हणणं आहे, की पौलने नाझीर होण्याचं वचन पूर्ण करण्यासाठी आपले केस कापले होते. पण, नाझीराने यहोवा देवाची खास सेवा करण्याचा काळ पूर्ण केल्यानंतर, “भेटमंडपाच्या प्रवेशाजवळ” आपले केस कापून घ्यावेत असं बायबलमध्ये सांगण्यात आलं होतं. या आज्ञेनुसार, पौल ही अट किंख्रियामध्ये नाही, तर यरुशलेममध्येच पूर्ण करू शकत होता.​—गण. ६:५, १८.

प्रेषितांची कार्यं पुस्तकाच्या अहवालात पौलने हा नवस का केला होता, याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. त्याने हा नवस ख्रिस्ती बनण्याआधी केला असण्याचीही शक्यता आहे. तसंच, पौलने हा नवस करून यहोवाला काही खास विनंती केली होती का, हेही अहवालात सांगितलेलं नाही. एका संदर्भ ग्रंथानुसार, कदाचित पौलने देवाचे आभार मानण्यासाठी आपले केस कापून घेतले असावेत, कारण “देवाने दिलेल्या संरक्षणामुळेच [पौलला] करिंथमध्ये त्याची सेवा पूर्ण करणं शक्य झालं होतं.”

a “करिंथ​—दोन समुद्रांच्या मधोमध वसलेलं शहर” ही चौकट पाहा.

b “प्रोत्साहन देणारी प्रेरित पत्रं” ही चौकट पाहा.

c “पौलने केलेला नवस” ही चौकट पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा