अध्याय १५
“मंडळ्यांचा विश्वास मजबूत” करण्यात आला
प्रवासी सेवक मंडळ्यांना विश्वासात मजबूत बनायला मदत करतात
प्रे. कार्यं १५:३६–१६:५ वर आधारित
१-३. (क) पौलचा प्रवासातला नवीन सोबती कोण आहे, आणि तो कसा आहे? (ख) या अध्यायात आपण काय शिकणार आहोत?
एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी कच्च्या रस्त्यावरून पायी प्रवास करत असताना, पौल आपल्यासोबत चालत असलेल्या तरुणाकडे पाहतो आणि विचार करू लागतो. त्या तरुणाचं नाव आहे तीमथ्य. हा उत्साही तरुण कदाचित वीस-बावीस वर्षांचा असावा. तो एकेक पाऊल पुढे टाकत आहे, तसतसं तो आपलं घर आणि कुटुंब यांपासून लांब जात आहे. दिवस मावळू लागतो, तसे ते पुढे चालत राहतात आणि त्यांच्यामागे लुस्त्र आणि इकुन्याची शहरं नजरेआड होतात. पण, आता पुढे काय? पुढचा प्रवास कसा असेल याबद्दल पौलला तर थोडीफार कल्पना आहे, कारण हा त्याचा दुसरा मिशनरी दौरा आहे. बऱ्याच धोकादायक परिस्थितींना आणि समस्यांना तोंड द्यावं लागणार आहे, हे त्याला चांगलं माहीत आहे. पण, त्याच्यासोबत निघालेल्या या तरुणाला या सर्व आव्हानांचा सामना करता येईल का?
२ पौलला तीमथ्यवर पूर्ण भरवसा आहे. कदाचित तितका भरवसा तीमथ्यलाही स्वतःवर नसेल. अलीकडेच घडलेल्या काही घटनांमुळे, प्रवासात सोबत नेण्यासाठी योग्य व्यक्तीला निवडणं किती महत्त्वाचं आहे, याची पौलला खातरी पटली आहे. या प्रवासादरम्यान त्यांना अनेक मंडळ्यांना भेटी देऊन बांधवांना विश्वासात मजबूत करायचं आहे. आणि या कामासाठी सोबत प्रवास करणाऱ्या सर्व बांधवांमध्ये निश्चयी वृत्ती असणं आणि त्यांच्या विचारांत एकता असणं महत्त्वाचं आहे, हे पौलला माहीत आहे. पौलला असं का वाटलं असावं? याआधी पौल आणि बर्णबा यांच्यामध्ये झालेला एक मतभेद हे कदाचित त्यामागचं एक कारण असावं.
३ या अध्यायात आपण आपसांतले मतभेद सोडवण्याचा सर्वात चागंला मार्ग कोणता, याबद्दल बरंच काही शिकणार आहोत. तसंच, पौलने प्रवासात आपल्यासोबत येण्यासाठी तीमथ्यला का निवडलं याबद्दलही आपण पाहू. आणि यासोबतच, आज विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करणारे कोणती महत्त्वाची जबाबदारी पार पाडतात, याबद्दलही सखोल माहिती आपल्याला मिळेल.
‘आपण परत जाऊन बांधवांची भेट घेऊ या’ (प्रे. कार्यं १५:३६)
४. दुसऱ्या मिशनरी दौऱ्यात पौलला काय करण्याची इच्छा होती?
४ याआधीच्या अध्यायात आपण पाहिलं होतं, की पौल, बर्णबा, यहूदा आणि सीला या चार बांधवांना नियमन मंडळातर्फे मंडळ्यांना भेट देण्यासाठी पाठवण्यात आलं. तसंच, या बांधवांनी अंत्युखियाच्या मंडळीला नियमन मंडळाचा सुंतेविषयीचा निर्णय सांगून कशा प्रकारे प्रोत्साहन दिलं हेही आपण पाहिलं होतं. त्यानंतर पौलने काय केलं? त्याने बर्णबाला प्रवासाच्या एका नवीन योजनेबद्दल सांगितलं. तो म्हणाला: “ज्या ज्या शहरात आपण यहोवाच्या वचनाची घोषणा केली होती, त्या त्या शहरात आपण परत जाऊ या आणि तिथल्या बांधवांची भेट घेऊन त्यांचं कसं चाललंय हे पाहू या.” (प्रे. कार्यं १५:३६) नवीनच ख्रिस्ती बनलेल्या त्या बांधवांना सहज भेटायला जाण्याबद्दल पौल सुचवत नव्हता. प्रेषितांची कार्यं पुस्तकात पौलच्या या दुसऱ्या मिशनरी दौऱ्याचा खरा उद्देश अगदी स्पष्ट सांगण्यात आला आहे. सगळ्यात आधी, तो वेगवेगळ्या मंडळ्यांमध्ये जाऊन नियमन मंडळाने घेतलेल्या निर्णयांबद्दल बांधवांना सांगणार होता. (प्रे. कार्यं १६:४) दुसरी गोष्ट म्हणजे, प्रवासी पर्यवेक्षक म्हणून पौलला मंडळ्यांना आध्यात्मिक रीत्या मजबूत करण्याची इच्छा होती. त्याला त्यांना विश्वासात मजबूत व्हायला मदत करायची होती. (रोम. १:११, १२) आज यहोवाच्या साक्षीदारांच्या संघटनेत प्रेषितांच्या उदाहरणाचं कसं अनुकरण केलं जातं?
५. आजच्या काळात नियमन मंडळ कशा प्रकारे मंडळ्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देतं?
५ आज ख्रिस्त, यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाद्वारे आपल्या मंडळीचं मार्गदर्शन करत आहे. हे विश्वासू अभिषिक्त बांधव पत्रं, छापलेलं आणि ऑनलाईन साहित्य, सभा आणि संपर्काच्या इतर माध्यमांचा उपयोग करून जगभरातल्या मंडळ्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देतात. तसंच, नियमन मंडळ प्रत्येक मंडळीशी जवळचा संपर्क ठेवण्याचा प्रयत्न करतं. असं करण्यासाठी ते प्रवासी पर्यवेक्षकांच्या व्यवस्थेचा उपयोग करतात. नियमन मंडळाने आजपर्यंत जगभरात हजारो सुयोग्य वडिलांना विभागीय पर्यवेक्षक म्हणून सेवा करण्यासाठी नेमलं आहे.
६, ७. विभागीय पर्यवेक्षकांच्या कोणत्या काही जबाबदाऱ्या आहेत?
६ आजच्या काळातले प्रवासी पर्यवेक्षकही वेगवेगळ्या मंडळ्यांना भेटी देऊन सर्व बांधवांकडे वैयक्तिक लक्ष देतात आणि त्यांना बायबलच्या आधारावर प्रोत्साहन देतात. असं करताना ते पौलसारख्या पहिल्या शतकातल्या बांधवांचं अनुकरण करतात. पौलने आपल्यासारखाच प्रवासी सेवक असलेल्या तीमथ्यला असा सल्ला दिला होता: “वचनाची घोषणा कर; काळाची गरज ओळखून चांगल्या आणि वाईट दोन्ही काळांत आवेशाने हे काम कर; पूर्ण सहनशीलतेने आणि कुशलतेने शिकवत असताना चूक करणाऱ्याचं ताडन कर, त्याला ताकीद आणि प्रोत्साहन दे. . . . प्रचारकाचं काम कर.”—२ तीम. ४:२, ५.
७ या सल्ल्याचं पालन करून विभागीय पर्यवेक्षक, आणि ते विवाहित असतील तर त्यांच्या पत्नीसुद्धा, मंडळीच्या प्रचारकांसोबत मिळून सेवाकार्याच्या वेगवेगळ्या प्रकारांत सहभागी होतात. हे प्रवासी बांधव सेवेत आवेशी असतात आणि बायबलमधून शिकवण्यात कुशल असतात. त्यांच्या या चांगल्या गुणांमुळे कळपातल्या बांधवांवर चांगला प्रभाव पडतो. (रोम. १२:११; २ तीम. २:१५) विभागीय कार्य करणारे बांधव सर्वात जास्त त्यांच्या निःस्वार्थ प्रेमासाठी ओळखले जातात. ते स्वतःच्या सोयीचा विचार न करता, कोणत्याही हवामानात आणि धोक्याच्या क्षेत्रातही प्रवास करतात. (फिलिप्पै. २:३, ४) हे बांधव बायबलवर आधारित भाषणं देऊन प्रत्येक मंडळीला प्रोत्साहन, शिक्षण आणि सल्ला देतात. मंडळीतल्या सर्वांनाच या प्रवासी सेवकांच्या चांगल्या वागणुकीकडे पाहून आणि त्यांच्या विश्वासाचं अनुकरण करून फायदा होतो.—इब्री १३:७.
“कडाक्याचं भांडण झालं” (प्रे. कार्यं १५:३७-४१)
८. “बांधवांची भेट” घेण्याच्या पौलने सुचवलेल्या योजनेला बर्णबाने कसा प्रतिसाद दिला?
८ “बांधवांची भेट” घेण्यासाठी पौलने सुचवलेली योजना बर्णबाला आवडली. (प्रे. कार्यं १५:३६) त्यांनी अनेक ठिकाणी प्रचार करण्यासाठी एकत्र प्रवास केला होता. त्यामुळे त्यांना त्या सर्व ठिकाणांबद्दल आणि तिथे राहणाऱ्या बांधवांबद्दल चांगली माहिती होती. (प्रे. कार्यं १३:२–१४:२८) तेव्हा, या दौऱ्यावर एकत्र जाण्याचा विचार योग्य आणि व्यावहारिक होता. पण एक समस्या उभी राहिली. प्रेषितांची कार्यं १५:३७ इथे म्हटलं आहे, “बर्णबाला कसंही करून मार्क म्हटलेल्या योहानला आपल्यासोबत घेऊन जायचं होतं.” बर्णबा ही गोष्ट फक्त सुचवत नव्हता. त्याला “कसंही करून” आपला नातेवाईक मार्क याला या मिशनरी दौऱ्यावर घेऊन जायचं होतं.
९. पौलला बर्णबाचं म्हणणं का पटलं नाही?
९ पौलला बर्णबाचं म्हणणं पटलं नाही. का? अहवालात पुढे असं म्हटलं आहे: “पौलला त्याला [मार्कला] सोबत न्यायची मुळीच इच्छा नव्हती. कारण तो पंफुल्या इथे त्यांना मधेच सोडून निघून गेला होता आणि प्रचारकार्यासाठी त्यांच्यासोबत पुढे गेला नव्हता.” (प्रे. कार्यं १५:३८) पौल आणि बर्णबा यांच्या पहिल्या मिशनरी दौऱ्यात, मार्कही त्यांच्यासोबत होता. पण त्याने त्यांना शेवटपर्यंत साथ दिली नाही. (प्रे. कार्यं १२:२५; १३:१३) दौरा सुरू झाल्याच्या काही काळानंतरच, म्हणजे ते पंफुल्या इथे असताना, मार्क त्यांना सोडून यरुशलेमला घरी परत गेला होता. तो का गेला, याबद्दल बायबलमध्ये सांगितलेलं नाही. पण तो असा परत गेल्यामुळे तो बेजबाबदारपणे वागला, असं पौलला वाटलं असावं. त्यामुळे, मार्क खरंच भरवशालायक आहे का याबद्दल त्याच्या मनात शंका होती.
१०. पौल आणि बर्णबा यांचं एकमेकांशी न पटल्यामुळे काय झालं, आणि त्याचा काय परिणाम झाला?
१० पण, तरीही मार्कला बरोबर घेण्याचं बर्णबाने पक्कं ठरवलं होतं. आणि मार्कला सोबत न नेण्याच्या विचारावर पौलही अडून होता. “यावरून त्यांच्यात इतकं कडाक्याचं भांडण झालं, की ते एकमेकांपासून वेगळे झाले,” असं प्रेषितांची कार्यं १५:३९ मध्ये म्हटलं आहे. यानंतर, बर्णबा मार्कला घेऊन जहाजाने त्याच्या मूळच्या ठिकाणी म्हणजे कुप्रला गेला. आणि पौलने ठरवल्याप्रमाणे तो आपल्या दौऱ्यावर निघाला. अहवालात पुढे असं सांगितलं आहे: “पौलने सीला याला निवडलं. मग बांधवांनी पौलला यहोवाच्या अपार कृपेच्या स्वाधीन केल्यावर तोही तिथून निघाला.” (प्रे. कार्यं १५:४०) पौल आणि सीला “सीरिया आणि किलिकिया प्रांतातून प्रवास करत आणि तिथल्या मंडळ्यांचा विश्वास मजबूत करत” गेले.—प्रे. कार्यं १५:४१.
११. आपल्यात मतभेद होतात, तेव्हा कायमचा दुरावा निर्माण होऊ नये म्हणून कोणते गुण दाखवणं गरजेचं आहे?
११ या अहवालामुळे आपल्याला या गोष्टीची जाणीव होते, की आपण सर्व अपरिपूर्ण आहोत. खरंतर, नियमन मंडळाने पौल आणि बर्णबा यांना खास सेवेसाठी निवडलं होतं. पौल पुढे स्वतः त्या नियमन मंडळाचा सदस्य बनला असावा. तरीही, या घटनेमध्ये पौल आणि बर्णबा आपल्या अपरिपूर्ण मानवी स्वभावाप्रमाणे वागले. पण या घटनेमुळे त्यांच्यात कायमचा दुरावा निर्माण झाला का? पौल आणि बर्णबा दोघंही अपरिपूर्ण असले, तरी नम्र मनाचे बांधव होते आणि त्यांची ख्रिस्तासारखी मनोवृत्ती होती. त्यामुळे त्यांनी काही काळ गेल्यावर ख्रिस्ती बांधवांप्रमाणे एकमेकांना नक्कीच क्षमा केली असेल. (इफिस. ४:१-३) पुढे, पौल आणि मार्क यांनीही देवाच्या सेवेत पुन्हा एकत्र मिळून काही कामं केली.a—कलस्सै. ४:१०.
१२. आजही देखरेख करणाऱ्यांनी पौल आणि बर्णबा यांच्याप्रमाणे कोणते गुण दाखवले पाहिजेत?
१२ पौल आणि बर्णबा यांच्यात एकदाच कडाक्याचं भांडण झालं. पण त्या दोघांचाही स्वभाव मुळात तसा नव्हता. बर्णबाला सर्व एक प्रेमळ आणि उदार व्यक्ती म्हणून ओळखायचे. तो इतका प्रेमळ आणि उदार होता, की त्याला त्याच्या योसेफ या नावाने हाक मारण्याऐवजी, प्रेषितांनी त्याला बर्णबा हे नाव दिलं होतं. त्या नावाचा अर्थ होता “सांत्वनाचा मुलगा.” (प्रे. कार्यं ४:३६) पौललाही बांधव त्याच्या कोमल स्वभावासाठी ओळखायचे. त्याला बांधवांबद्दल जिव्हाळा होता. (१ थेस्सलनी. २:७, ८) आज ख्रिस्ती मंडळीत देखरेख करणाऱ्या बांधवांनी, पौल आणि बर्णबाचं अनुकरण केलं पाहिजे. वडिलांनी तसंच विभागीय पर्यवेक्षकांनीही, इतर वडिलांशी आणि सर्व कळपाशी नम्रपणे आणि कोमलतेने वागण्याचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे.—१ पेत्र ५:२, ३.
“बांधव त्याची खूप प्रशंसा करायचे” (प्रे. कार्यं १६:१-३)
१३, १४. (क) तीमथ्य कोण होता, आणि पौल त्याला केव्हा भेटला? (ख) पौलचं तीमथ्यवर खास लक्ष का गेलं? (ग) तीमथ्यवर कोणती जबाबदारी सोपवण्यात आली?
१३ पौल आपला दुसरा मिशनरी दौरा करत असताना गलतीया या रोमन प्रांतात आला. इथे काही मंडळ्या सुरू करण्यात आल्या होत्या. “नंतर पौल दर्बे आणि लुस्त्र या शहरांतही” गेला. अहवालात असं म्हटलं आहे, की “तिथे तीमथ्य नावाचा एक शिष्य होता. तो प्रभूवर विश्वास ठेवणाऱ्या एका यहुदी स्त्रीचा मुलगा होता. पण त्याचे वडील ग्रीक होते.”—प्रे. कार्यं १६:१.b
१४ इ.स. ४७ मध्ये या भागात पहिल्यांदा प्रवास करताना पौल तीमथ्यच्या कुटुंबाला भेटला असावा. आता दोन-तीन वर्षांनंतर त्याच्या दुसऱ्या दौऱ्याच्यावेळी, पौलचं तरुण तीमथ्यवर खास लक्ष गेलं. का? कारण “बांधव त्याची खूप प्रशंसा करायचे.” त्याच्या शहरातले बांधव तर त्याची प्रशंसा करायचेच, पण इतर मंडळ्यांमध्येही त्याचं चांगलं नाव होतं. अहवालात असं म्हटलं आहे की लुस्त्र आणि तिथून जवळजवळ ३० किलोमीटर दूर असलेल्या इकुन्या इथले बांधवही त्याच्या चांगल्या कामांबद्दल त्याची प्रशंसा करायचे. (प्रे. कार्यं १६:२) आता पवित्र शक्तीच्या मार्गदर्शनाने, वडिलांनी तरुण तीमथ्यवर एक महत्त्वाची जबाबदारी सोपवली. त्यांनी तीमथ्यला, पौल आणि सीला यांच्यासोबत प्रवासात त्यांचा सेवक म्हणून पाठवायचं ठरवलं.—प्रे. कार्यं १६:३.
१५, १६. तीमथ्यने इतकं चांगलं नाव कशामुळे कमवलं होतं?
१५ इतक्या कमी वयात तीमथ्यने इतकं चांगलं नाव कसं कमवलं होतं? तो बुद्धिमान, देखणा असल्यामुळे किंवा त्याच्याजवळ बरीच कौशल्यं असल्यामुळे त्याला असं चांगलं नाव मिळालं होतं का? अशा गुणांमुळे सहसा माणसं प्रभावित होतात. एकदा संदेष्टा शमुवेलसुद्धा बाहेरच्या रूपामुळे खूप जास्त प्रभावित झाला होता. पण यहोवाने त्याला आठवण करून दिली, की “माणूस जसं पाहतो तसं देव पाहत नाही. माणूस फक्त बाहेरचं रूप पाहतो, पण यहोवा हृदय पाहतो.” (१ शमु. १६:७) तेव्हा, तीमथ्यच्या बाहेरच्या व्यक्तिमत्वामुळे नाही, तर त्याच्यात असलेल्या चांगल्या गुणांमुळे बांधव त्याची प्रशंसा करत होते.
१६ काही वर्षांनंतर प्रेषित पौलने तीमथ्यच्या काही आध्यात्मिक गुणांचा उल्लेख केला. त्याने तीमथ्यच्या चांगल्या स्वभावाची प्रशंसा केली. तसंच, त्याचं निःस्वार्थ प्रेम आणि देवाच्या सेवेत जबाबदाऱ्या पार पाडताना तो घेत असलेली मेहनत, यांचाही पौलने उल्लेख केला. (फिलिप्पै. २:२०-२२) तीमथ्य त्याच्या “निष्कपट” विश्वासामुळेही बांधवांमध्ये ओळखला जात होता.—२ तीम. १:५.
१७. आजचे तरुण तीमथ्यचं अनुकरण कसं करू शकतात?
१७ आज अनेक तरुण देवाला आवडणारे चांगले गुण विकसित करून तीमथ्यचं अनुकरण करतात. असं केल्यामुळे ते लहान वयातच यहोवाच्या आणि त्याच्या लोकांच्या नजरेत चांगलं नाव कमवतात. (नीति. २२:१; १ तीम. ४:१५) ते ढोंगीपणाचं जीवन जगत नाहीत आणि अशा प्रकारे आपला विश्वास “निष्कपट” असल्याचं दाखवून देतात. (स्तो. २६:४) जेव्हा हे तरुण आनंदाच्या संदेशाचे प्रचारक बनतात आणि पुढे प्रगती करून स्वतःचं जीवन यहोवाला समर्पित करतात आणि बाप्तिस्मा घेतात, तेव्हा मंडळीतल्या सर्व बांधवांना खूप प्रोत्साहन मिळतं. आज असे अनेक तरुण, तीमथ्यप्रमाणेच मंडळीत महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात.
“मंडळ्या विश्वासात मजबूत होत गेल्या” (प्रे. कार्यं १६:४, ५)
१८. (क) प्रवासी सेवक या नात्याने पौल आणि तीमथ्य यांनी कोणत्या खास जबाबदाऱ्या पार पाडल्या? (ख) यामुळे मंडळ्यांना कोणता फायदा झाला?
१८ पौल आणि तीमथ्य यांनी अनेक वर्षांपर्यंत सोबत मिळून काम केलं. प्रवासी सेवक या नात्याने त्यांनी नियमन मंडळातर्फे बऱ्याच कामगिऱ्या पार पाडल्या. बायबलमध्ये असं सांगितलं आहे: “प्रवासादरम्यान ते वेगवेगळ्या शहरांत गेले आणि यरुशलेममधल्या प्रेषितांनी आणि वडिलांनी घेतलेले निर्णय त्यांनी बांधवांना सांगितले.” (प्रे. कार्यं १६:४) आणि मंडळ्यांनी खरोखरच यरुशलेममधल्या प्रेषितांच्या व वडिलांच्या मार्गदर्शनाचं पालन केलं, असं दिसतं. कारण, अहवालात पुढे असं म्हटलं आहे, की “मंडळ्या विश्वासात मजबूत होत गेल्या आणि शिष्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली.”—प्रे. कार्यं १६:५.
१९, २०. यहोवाच्या लोकांनी “नेतृत्व” करणाऱ्या बांधवांच्या मार्गदर्शनाचं पालन का केलं पाहिजे?
१९ आज, जेव्हा यहोवाचे लोक त्यांच्यामध्ये “नेतृत्व” करणाऱ्या बांधवांच्या मार्गदर्शनाचं नम्रपणे पालन करतात, तेव्हा त्यांनाही अनेक आशीर्वाद मिळतात. (इब्री १३:१७) जगाची परिस्थिती सतत बदलत चालल्यामुळे, आपण “विश्वासू आणि बुद्धिमान” दासाकडून वेळोवेळी मिळणारं आध्यात्मिक अन्न घेत राहणं खूप महत्त्वाचं आहे. (मत्त. २४:४५; १ करिंथ. ७:२९-३१) असं केल्यामुळे आपण सत्यापासून दूर जाण्याचं टाळू शकतो आणि या वाईट जगातही स्वतःला निष्कलंक ठेवू शकतो.—याको. १:२७.
२० पौल, बर्णबा, मार्क आणि पहिल्या शतकातल्या इतर अभिषिक्त वडिलांप्रमाणेच आजच्या काळातले ख्रिस्ती वडीलही अपरिपूर्ण आहेत. इतकंच काय, तर नियमन मंडळातले बांधवसुद्धा अपरिपूर्ण आहेत. (रोम. ५:१२; याको. ३:२) पण, हे बांधव देवाच्या वचनाचं काटेकोरपणे पालन करत असल्यामुळे आणि पहिल्या शतकातल्या प्रेषितांचं अनुकरण करत असल्यामुळे, आपण त्यांच्यावर पूर्ण भरवसा ठेवू शकतो. (२ तीम. १:१३, १४) यामुळेच, आज मंडळ्या मजबूत होत आहेत आणि विश्वासात वाढत आहेत.
a “मार्कला मिळालेले बहुमान” ही चौकट पाहा.
b “‘आनंदाच्या संदेशाच्या वाढीसाठी मेहनत’ करणारा तीमथ्य” ही चौकट पाहा.