वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • lv अध्या. १५ पृ. १९५-२०८
  • श्रम करून आपल्या जिवास सुख द्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • श्रम करून आपल्या जिवास सुख द्या
  • देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अप्रतिम कामगार व कुशल कारागीर
  • कष्टाच्या कामातून आनंद मिळवणे
  • नोकरीची निवड करताना समंजसपणा दाखवणे
  • कामाबद्दल संतुलित दृष्टिकोन बाळगणे
  • सेवेत परिश्रम घेणे
  • आपल्या सर्व परिश्रमात आनंदी राहा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१६
  • कामाविषयी संतुलित दृष्टिकोन कसा निर्माण करावा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • काम वरदान की शाप?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • तुम्हाला आनंद देऊ शकेल असे काम
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
अधिक माहिती पाहा
देवाच्या प्रेमात टिकून राहा
lv अध्या. १५ पृ. १९५-२०८
एका आफ्रिकन देशांत काबाड कष्ट करणाऱ्‍या स्त्रिया

अध्याय १५

श्रम करून आपल्या जिवास सुख द्या

‘मनुष्याने श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे.’—उपदेशक २:२४.

१-३. (क) कामाविषयी आज बहुतेक लोकांना कसे वाटते? (ख) बायबल आपल्याला, कष्टाच्या कामाविषयी कोणता योग्य दृष्टिकोन बाळगण्यास मदत करते व या अध्यायात आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

आज बहुतेक लोकांना काम म्हटले की नकोसे वाटते. मनापासून आवडत नसलेल्या नोकरीच्या ठिकाणी उशिरापर्यंत घाम गाळावा लागत असल्यामुळे, दररोज कामाला जायचे म्हटले की त्यांना अगदी जिवावर येते. अशी मनोवृत्ती असलेल्या लोकांना आपल्या कामात समाधान नाही, निदान आवड घेण्याची प्रेरणा तरी कशी मिळू शकेल?

२ बायबल आपल्याला, कष्टाच्या कामाविषयी योग्य दृष्टिकोन बाळगण्यास मदत करते. त्यात म्हटले आहे, की कष्टाचे काम आणि त्यातून मिळणारे फळ ही एक देणगी आहे. शलमोनाने असे लिहिले: “प्रत्येक मनुष्याने खावे, प्यावे व आपला सर्व उद्योग करून सुख मिळवावे हीहि देवाची देणगी आहे.” (उपदेशक ३:१३) आपल्यावर प्रेम करणाऱ्‍या व नेहमी आपल्या हिताचा विचार करणाऱ्‍या यहोवा देवाची अशी इच्छा आहे, की आपण आपल्या कामातून समाधान मिळवावे आणि आपल्या कष्टाच्या फळाचा आनंद उपभोगावा. आपण जर त्याच्या प्रेमात टिकून राहू इच्छित असू तर आपणही कामाच्या बाबतीत त्याच्यासारखा दृष्टिकोन बाळगला पाहिजे व कामाच्या संबंधाने असलेल्या तत्त्वांचे पालन केले पाहिजे.—उपदेशक २:२४; ५:१८.

३ या अध्यायात आपण चार प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत: श्रम करून आपण आपल्या जिवास सुख कसे देऊ शकतो? कोणत्या प्रकारची कामे ख्रिश्‍चनांनी करू नयेत? नोकरी आणि आपल्या उपासनेशी संबंधित कार्ये यांत आपण संतुलन कसे राखू शकतो? सर्वात महत्त्वाचे कोणते कार्य आपण करू शकतो? पण आधी आपण, विश्‍वातील दोन अप्रतिम कामगारांच्या उदाहरणांचे अर्थात यहोवा देव व येशू यांच्या उदाहरणांचे परीक्षण करूया.

अप्रतिम कामगार व कुशल कारागीर

४, ५. यहोवा एक उत्पादनक्षम कामगार आहे हे बायबलमधून कसे दिसून येते?

४ यहोवा हा अप्रतिम कामगार आहे. उत्पत्ति १:१ मध्ये असे म्हटले आहे: “प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्‍न केली.” पृथ्वीची निर्मिती केल्यानंतर तिला पाहून देवाने, “फार चांगले आहे,” असे म्हटले. (उत्पत्ति १:३१) दुसऱ्‍या शब्दांत, पृथ्वीच्या संबंधाने त्याने निर्माण केलेल्या गोष्टी पाहून तो पूर्णपणे समाधानी झाला. “धन्यवादित” अर्थात आनंदी असलेल्या यहोवा देवाला उत्पादनक्षम कामगार असण्यात खूप आनंद मिळाला.—१ तीमथ्य १:११.

५ आपल्या परिश्रमी देवाने काम करण्याचे सोडून दिलेले नाही. पृथ्वी आणि तिच्यावरील गोष्टींची निर्मिती करून झाल्याच्या अनेक काळानंतर येशूने असे म्हटले: “माझा पिता आजपर्यंत काम करीत आहे.” (योहान ५:१७) कोणते काम? स्वर्गातून तो मानवजातीला मार्गदर्शन देत आहे व त्यांची काळजी घेत आहे. त्याने, अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांची एक “नवी उत्पत्ती” केली आहे जी कालांतराने येशूसोबत स्वर्गात राज्य करेल. (२ करिंथकर ५:१७) मानवजातीबद्दल असलेला त्याचा उद्देश पूर्ण करण्याच्या दिशेने तो कार्य करत आहे. अर्थात, जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांना एका नवीन जगात सार्वकालिक जीवन मिळावे म्हणून तो कार्य करत आहे. (रोमकर ६:२३) आपले काम पाहून त्याला नक्कीच समाधान वाटत असावे. कारण, कोट्यवधी लोक राज्य संदेश स्वीकारून व त्याच्या प्रेमात टिकून राहण्याकरता आपल्या जीवनात बदल करून त्याच्या जवळ आले आहेत.—योहान ६:४४.

६, ७. अनेक काळापासून कष्ट करण्याच्या बाबतीत येशू कशा प्रकारे नावाजलेला होता?

६ अनेक काळापासून कष्टाचे काम करणारा म्हणून येशू नावाजलेला होता. मानव म्हणून पृथ्वीवर येण्याआधी, ‘आकाशात व पृथ्वीवर असलेल्या’ सर्व गोष्टींची सृष्टी करताना तो “कुशल कारागीर” म्हणून काम करत होता. (नीतिसूत्रे ८:२२-३१; कलस्सैकर १:१५-१७) पृथ्वीवर असतानाही येशूने कष्टाचे काम केले. लहानपणापासून सुतारकाम करण्यात तो इतका तरबेज झाला होता, की सर्व लोक त्याला “सुतार” म्हणून ओळखू लागले.a (मार्क ६:३) आजच्या प्रमाणे लाकूड कापायची यंत्रे, वखारी, वीजेवर चालणारी यंत्रे त्यावेळी नव्हती. तेव्हा सुतारकाम करण्यास बरीच मेहनत घ्यावी लागत होती व वेगवेगळी कौशल्ये लागत होती. येशूला कदाचित स्वतःच लाकूड तोडून आणावे लागत असावे; म्हणजे झाडे तोडून, तो जिथे काम करत होता तेथपर्यंत ती ओढून आणावी लागत असावी. तो घरे बनवत आहे, छप्परांसाठी वासे तयार करून ते लावत आहे, दारे बनवत आहे, घरासाठी काही लाकडी सामान बनवत आहे, अशी कल्पना करा. कष्टाच्या कामात हातोटी मिळवल्याने जे समाधान मिळते ते त्याने अनुभवले होते.

७ लोकांना राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्यासाठी देखील येशूने ढोर मेहनत घेतली. साडेतीन वर्षे त्याने या अतिशय महत्त्वाच्या कामात स्वतःला झोकून दिले. होता होईल तितक्या लोकांपर्यंत पोहचण्याकरता त्याने जराही वेळ वाया घालवला नाही. तो दररोज सकाळी लवकर उठत असे व रात्री उशिरापर्यंत सेवा करत असे. (लूक २१:३७, ३८; योहान ३:२) “तो उपदेश करीत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावोगावी” फिरायचा. (लूक ८:१) लोकांना सुवार्तेचा संदेश सांगण्याकरता येशूने अक्षरशः शेकडो किलोमीटर, धुळीच्या रस्त्यांवर पायी प्रवास केला.

८, ९. येशूने कष्टाच्या कामातून आनंद कसा मिळवला?

८ येशूने सेवेत घेतलेल्या कष्टाचे फळ पाहण्याचा आनंद त्याला मिळाला का? हो. त्याने राज्य सत्याचे बी लावले आणि कापणीसाठी पिकलेली शेते तयार केली. देवाचे काम पूर्ण केल्याने येशूला इतकी ताकद मिळायची की त्यासाठी तो अन्‍नाचा त्यागही करायला तयार होता. (योहान ४:३१-३८) पृथ्वीवरील त्याच्या सेवेच्या शेवटी त्याला त्याच्या कामाचे खूप समाधान मिळाले. म्हणून तो आपल्या पित्याला पूर्ण आत्मविश्‍वासाने असे म्हणू शकला: “जे काम तू मला करावयास दिले ते पुरे करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे.”—योहान १७:४.

९ यहोवा आणि येशू, स्वतःच्या कष्टाच्या कामात आनंद घेण्याच्या बाबतीत खरोखरच अप्रतिम उदाहरणे आहेत. यहोवावर आपले प्रेम असल्यामुळे आपण “त्याचे अनुकरण” करण्यास प्रवृत्त होतो. (इफिसकर ५:१) तसेच, येशूवर आपले प्रेम असल्यामुळे आपल्याला ‘त्याच्या पावलांवर पाऊल ठेवून चालण्याची’ प्रेरणा मिळते. (१ पेत्र २:२१) आपणही आपल्या कष्टाच्या कामात आनंद कसा मिळवू शकतो, याचे आता परीक्षण करून बघूया.

कष्टाच्या कामातून आनंद मिळवणे

एक मनुष्य खिडक्या साफ करत आहे आणि एक स्त्री ऑफिसमध्ये काम करत आहे

बायबल तत्त्वांचे पालन केल्यास तुम्हाला तुमच्या कष्टाच्या कामातून आनंद मिळवणे शक्य होईल

१०, ११. कोणती गोष्ट ध्यानात ठेवल्याने आपण आपल्या नोकरीबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगू?

१० खऱ्‍या ख्रिश्‍चनांनाही नोकरी-धंदा करावा लागतो. आपणही आपल्या कामातून आनंद व काही प्रमाणात समाधान मिळवू पाहतो परंतु आपण जर आपल्याला आवडत नसलेले काम करत असू तर कदाचित हे कठीण असू शकते. अशा परिस्थितीतही, आपण आपल्या कामातून आनंद कसा मिळवू शकतो?

११ सकारात्मक दृष्टिकोन विकसित करण्याद्वारे आपण आपल्या कामातून आनंद मिळवू शकतो. आपण प्रत्येक वेळी आपली परिस्थिती बदलू शकत नाही, पण आपला दृष्टिकोन मात्र बदलू शकतो. कामाच्या बाबतीत असलेल्या देवाच्या दृष्टिकोनावर मनन केल्याने आपल्याला, कामाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन बाळगण्यास मदत होईल. जसे की, तुम्ही जर एक कुटुंब प्रमुख आहात तर, तुम्ही करत असलेल्या नोकरीमुळे मग ती कितीही हलक्या दर्जाची असली तरी तिच्यामुळे तुम्ही आपल्या कुटुंबाचे भरणपोषण करू शकता, ही गोष्ट विसरू नका. आपल्या प्रिय जनांची काळजी घेणे देवाच्या नजरेत क्षुल्लक गोष्ट नाही. त्याच्या वचनात असे म्हटले आहे, की जो कोणी आपल्या कुटुंबाचे भरणपोषण करत नाही तो “विश्‍वास न ठेवणाऱ्‍या माणसापेक्षा वाईट आहे.” (१ तीमथ्य ५:८) तुम्ही नोकरी करत असल्यामुळे, देवाने तुम्हाला दिलेली जबाबदारी तुम्ही पूर्ण करू शकता, ही जाणीव बाळगल्यास तुम्ही तुमच्या कामातून समाधान मिळवू शकता व कामाचा उद्देश समजू शकता जो कदाचित तुमच्यासोबत काम करणारे समजू शकणार नाहीत.

१२. कामाच्या बाबतीत मेहनती व प्रामाणिक असल्याने आपल्याला कोणकोणते फायदे मिळू शकतात?

१२ मेहनती व प्रामाणिक असण्याद्वारे आपण आपल्या कामातून आनंद मिळवू शकतो. परिश्रमी असल्याने व आपले काम चोख करण्यास शिकल्याने आपल्याला बरेच फायदे मिळू शकतात. मालकांना सहसा मेहनती व कुशल कामगार आवडतात. (नीतिसूत्रे १२:२४; २२:२९) खरे ख्रिस्ती असल्यामुळे आपण आपल्या कामात प्रामाणिक असले पाहिजे. आपल्या मालकाचे पैसे, वस्तू अथवा वेळेची आपण चोरी करू नये. (इफिसकर ४:२८) प्रामाणिक असल्याचे खूप फायदे आहेत, हे आपण मागच्या अध्यायात शिकलो आहोत. प्रामाणिक कामगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या व्यक्‍तीवर भरवसा केला जातो. आणि आपण मेहनती आहोत हे आपल्या मालकाने पाहिले असले अथवा नसले तरी, प्रामाणिक ‘विवेक’ बाळगण्याचे तसेच आपण प्रेम करत असलेल्या देवाला आपण संतुष्ट करत आहोत हे समाधान आपल्याला मिळू शकते.—इब्री लोकांस १३:१८; कलस्सैकर ३:२२-२४.

१३. नोकरीच्या ठिकाणी आपल्या चांगल्या वर्तनाचे कोणते फायदे होऊ शकतात?

१३ आपल्या वर्तनामुळे देवाचा गौरव होतो ही जाणीव बाळगल्याने आपण आपल्या कामातून आनंद मिळवू शकतो. नोकरीच्या ठिकाणी आपण जेव्हा ख्रिस्ती वर्तनाचा उच्च दर्जा राखतो तेव्हा हे इतरांच्या लक्षात आल्यावाचून राहत नाही. याचा परिणाम काय होतो? ‘आपला तारणारा देव ह्‍याच्या शिक्षणास शोभा येते.’ (तीत २:९, १०) आपल्या उत्तम वर्तनामुळे, इतरांना आपल्या उपासनापद्धतीचे सौंदर्य पाहायला मिळते व तेही या उपासनेकडे आकर्षित होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुमचे उत्तम वर्तन पाहून तुमच्यासोबत काम करणारी एखादी व्यक्‍ती सत्य शिकायला लागली तर तुम्हाला किती आनंद होईल! आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या उत्तम वर्तनामुळे यहोवाचा गौरव होतो व त्याचे मन आनंदित होते ही जाणीव खूप आनंददायक आहे, नाही का?—नीतिसूत्रे २७:११; १ पेत्र २:१२.

नोकरीची निवड करताना समंजसपणा दाखवणे

१४-१६. नोकरी निवडण्याच्या बाबतीत आपल्याला निर्णय घ्यावा लागतो तेव्हा आपण कोणत्या दोन प्रमुख प्रश्‍नांवर विचार करू शकतो?

१४ कोणता नोकरी-धंदा करावा वा करू नये, याबाबत बायबल तपशीलवार माहिती देत नाही. याचा अर्थ, आपण कोणत्याही प्रकारची नोकरी करू शकतो, असा होत नाही. बायबल आपल्याला, देवाला संतुष्ट करणारे उत्पादनक्षम व प्रामाणिक स्वरूपाचे काम निवडण्यास तसेच त्याला असंतुष्ट करणारे काम टाळण्यास मदत करते. (नीतिसूत्रे २:६) नोकरी निवडण्याच्या बाबतीत आपल्याला निर्णय घ्यावा लागतो तेव्हा आपण दोन प्रमुख प्रश्‍नांवर विचार करू शकतो.

१५ ही नोकरी, बायबलमध्ये मना केलेली कृत्ये केल्यासारखीच असेल का? देवाच्या वचनात चोरी करणे, खोटे बोलणे व मूर्ती बनवणे यांसारख्या कामांचे स्पष्टपणे खंडन करण्यात आले आहे. (निर्गम २०:४; प्रेषितांची कृत्ये १५:२९; इफिसकर ४:२८; प्रकटीकरण २१:८) अशी कामे करावी लागत असलेली नोकरी आपण स्वीकारणार नाही. यहोवावर आपले प्रेम असल्यामुळे आपण त्याच्या आज्ञांचा भंग करणाऱ्‍या प्रथा समाविष्ट असलेली नोकरी कदापि स्वीकारणार नाही.—१ योहान ५:३.

१६ या नोकरीमुळे मी, एखाद्या चुकीच्या गोष्टीचा भागीदार किंवा समर्थक ठरेन का? उदाहरणार्थ, रिसेप्शनिस्टची नोकरी करण्यात काही चूक नाही. पण एका ख्रिस्ती व्यक्‍तीला जर गर्भपात केल्या जाणाऱ्‍या क्लिनिकमध्ये ही नोकरी मिळत असेल तर? कबूल आहे, की या नोकरीमुळे ख्रिस्ती व्यक्‍ती गर्भपात करण्याला थेटपणे मदत करणार नाही. तरीपण, तिच्या नेहमीच्या कामामुळे, देवाच्या वचनाच्या अगदी विरोधात असलेले कार्य अर्थात क्लिनिकमध्ये चालणारे गर्भपाताचे काम सुरळीतपणे चालणार नाही का? (निर्गम २१:२२-२४) आपण यहोवावर प्रेम करत असल्यामुळे, बायबलमध्ये खंडन करण्यात आलेल्या कोणत्याही प्रकारच्या कामाशी संबंध ठेवू इच्छित नाही.

१७. (क) नोकरीची निवड करताना आपण कोणकोणत्या गोष्टींचा विचार करू शकतो? (मी कोणती नोकरी निवडावी? हा चौकोन पाहा.) (ख) देवाला संतुष्ट करणारे निर्णय घेण्यास आपला विवेक आपली मदत कशी करू शकतो?

१७ नोकरीच्या संबंधाने असलेले अनेक प्रश्‍न, परिच्छेद १५ व १६ यांमध्ये चर्चा केलेल्या दोन प्रमुख प्रश्‍नांच्या उत्तरांचे काळजीपूर्वक परीक्षण केल्याने सोडवता येऊ शकतात. तसेच, नोकरी निवडताना आपण इतरही गोष्टींचा विचार केला पाहिजे.b उद्‌भवू शकणाऱ्‍या प्रत्येक परिस्थितीवर विश्‍वासू व बुद्धिमान दासाने नियम ठरवून द्यावेत, अशी आपण अपेक्षा करू शकत नाही. अशा वेळी आपण समंजसपणा दाखवला पाहिजे. दुसऱ्‍या अध्यायात पाहिल्याप्रमाणे, आपण आपला विवेक प्रशिक्षित करण्याची गरज आहे. याकरता आपण देवाच्या वचनाचा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून आपण त्यातील तत्त्वे आपल्या दैनंदिन जीवनात लागू करण्यास शिकू. अशा प्रकारच्या ‘सरावाद्वारे’ आपण आपल्या “ज्ञानेंद्रियांना” प्रशिक्षित करतो तेव्हा, आपला विवेक आपल्याला देवाला संतुष्ट करणारे निर्णय घेण्यास व त्याच्या प्रेमात टिकून राहण्यास मदत करेल.—इब्री लोकांस ५:१४.

मी कोणती नोकरी निवडावी?

एक मनुष्य पेपरमध्ये नोकरीसाठी असलेल्या जाहिराती पाहत आहे

बायबलचे तत्त्व: ‘सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करा.’—१ करिंथकर १०:३१.

आपण स्वतःला विचारू शकतो

  • देवाच्या वचनात स्पष्टपणे खंडन करण्यात आलेली कार्ये या नोकरीत गोवलेली आहेत का?—निर्गम २०:१३-१५.

  • या नोकरीमुळे मी, खंडन करण्यात आलेल्या प्रथेचा भागीदार ठरेन का?—प्रकटीकरण १८:४.

  • ही नोकरी शास्त्रवचनांनुसार आक्षेपार्ह नसून केवळ एका सामाजिक सेवेसारखीच आहे का?—प्रेषितांची कृत्ये १४:१६, १७.

  • या नोकरीचा परिणाम काय होऊ शकतो; इतर जण यामुळे अडखळतील का?—रोमकर १४:१९-२२.

  • मी जर माझ्या कुटुंबाला सोडून परदेशातील नोकरी निवडली तर याचा भावनिकरीत्या व आध्यात्मिकरीत्या माझ्या कुटुंबावर कोणता परिणाम होऊ शकतो?—इफिसकर ५:२८–६:४.

कामाबद्दल संतुलित दृष्टिकोन बाळगणे

१८. सदोदित यहोवाच्या कृपेत राहता येईल असे निर्णय घेणे नेहमीच सोपे का नसते?

१८ सदोदित यहोवाच्या कृपेत राहता येईल असे निर्णय घेणे “कठीण दिवस” असलेल्या या “शेवटल्या काळी” नेहमीच सोपे नसते. (२ तीमथ्य ३:१) नोकरी मिळवून ती टिकवून ठेवणे खरोखरच कठीण असू शकते. खरे ख्रिस्ती असल्यामुळे, आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करण्याकरता कष्ट करणे महत्त्वाचे आहे हे आपल्याला माहीत आहे. पण आपण जर सावध राहिलो नाही तर, नोकरीच्या ठिकाणी आपल्यावर येणाऱ्‍या दबावाचा किंवा जगाच्या भ्रष्ट भौतिक विचारशैलीचा, देवाची सेवा आणि उपासना यांजशी संबंधित असलेल्या आपल्या कार्यांवर परिणाम होऊ शकतो. (१ तीमथ्य ६:९, १०) तेव्हा, “जे श्रेष्ठ ते” अर्थात अधिक महत्त्वाच्या गोष्टींना प्राधान्य देऊन आपण कामाच्या बाबतीत संतुलन कसे बाळगू शकतो हे आता पाहूया.—फिलिप्पैकर १:१०.

१९. यहोवा भरवशालायक का आहे आणि त्याच्यावर भरवसा ठेवल्यामुळे आपण काय करत नाही?

१९ पूर्ण मनाने यहोवावर भरवसा ठेवा. (नीतिसूत्रे ३:५, ६) तो भरवशालायकच आहे, नाही का? कारण तो आपली काळजी घेतो. (१ पेत्र ५:७) आपल्यापेक्षा त्याला आपल्या गरजा चांगल्या प्रकारे माहीत आहेत आणि त्याचा हात तोकडा नाही. (स्तोत्र ३७:२५) त्यामुळे त्याचे वचन बायबल आपल्याला, “तुमची वागणूक द्रव्यलोभावाचून असावी; जवळ आहे तेवढ्यात तुम्ही तृप्त असावे; कारण [देवाने] स्वतः म्हटले आहे, ‘मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार नाही,’” अशी आठवण करून देते तेव्हा आपण त्याकडे लक्ष देतो. (इब्री लोकांस १३:५) जीवनात लागणाऱ्‍या गोष्टी पुरवण्याचे सामर्थ्य यहोवाजवळ आहे, याची साक्ष अनेक पूर्ण-वेळेचे सेवक देऊ शकतात. तो आपली काळजी घेईल, असा पूर्ण भरवसा आपण त्याच्यावर ठेवला तर, आपल्या कुटुंबाचे भरणपोषण कसे करायचे याबद्दल अनावश्‍यक चिंता आपण करत बसणार नाही. (मत्तय ६:२५-३२) नोकरी-धंद्यामुळे आपण, सुवार्तेचे प्रचारकार्य आणि सभा यांसारख्या आध्यात्मिक गोष्टींकडे दुर्लक्ष करणार नाही.—मत्तय २४:१४; इब्री लोकांस १०:२४, २५.

२०. डोळा निर्दोष ठेवण्याचा काय अर्थ होतो व हा दृष्टिकोन तुम्ही कसा टिकवून ठेवू शकता?

२० तुमचा डोळा निर्दोष ठेवा. (मत्तय ६:२२, २३) डोळा निर्दोष ठेवण्याचा अर्थ साधी जीवनशैली ठेवणे. ख्रिस्ती व्यक्‍तीचा निर्दोष डोळा, एकाच गोष्टीवर अर्थात देवाची इच्छा पूर्ण करण्यावर केंद्रित असतो. आपला डोळा योग्यरीतीने केंद्रित असेल तर आपण, लठ्ठ पगाराच्या नोकरीमागे व चैनीच्या जीवनशैलीमागे धावणार नाही. शिवाय, सर्वात आधुनिक व सर्वोत्तम भौतिक वस्तू मिळवण्याच्या कधीही न संपणाऱ्‍या शर्यतीततही आपण गुंतले जाणार नाही. कारण जाहिरातकर्ते, आनंदी राहण्याकरता आपल्याजवळ अमूक एक गोष्ट असलीच पाहिजे, असा आपल्याला विचार करायला लावत असतात. तुम्ही तुमची जीवनशैली साधी कशी ठेवू शकता? स्वतःवर कर्जाचे ओझे लादून घेऊ नका. आपला अमाप वेळ व शक्‍ती खर्च होईल अशी मालमत्ता बाळगून आपले जीवन क्लिष्ट करू नका. “अन्‍नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे,” या बायबलमधील सल्ल्याचे पालन करा. (१ तीमथ्य ६:८) होता होईल तितकी आपली जीवनशैली साधी बनवण्याचा प्रयत्न करा.

२१. जीवनात कोणत्या गोष्टींना प्रमुख स्थान द्यायचे हे आपण का ठरवले पाहिजे व कोणत्या गोष्टींना आपण प्राधान्य दिले पाहिजे?

२१ आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य द्या व त्यानुसार वागा. आपल्या हातात मर्यादित वेळ आहे. या वेळेत आपण कोणत्या गोष्टींना प्रमुख स्थान द्यायचे हे ठरवले पाहिजे. नाहीतर, अधिक महत्त्वाच्या गोष्टी बाजूला राहतील आणि बिनमहत्त्वाच्या गोष्टी करण्यातच आपला बहुतेक वेळ खर्च होईल. कोणत्या गोष्टींना आपण आपल्या जीवनात प्राधान्य दिले पाहिजे? जगातील पुष्कळ लोक, या युगात लठ्ठ पगाराची नोकरी मिळण्याकरता उच्च शिक्षणावर जास्त जोर देतात. पण येशूने आपल्या अनुयायांना “पहिल्याने त्याचे राज्य . . . मिळविण्यास झटा,” असे सांगितले. (मत्तय ६:३३) होय, खरे ख्रिस्ती या नात्याने आपण देवाच्या राज्याला आपल्या जीवनात प्राधान्य दिले पाहिजे. आपल्या जीवनशैलीवरून अर्थात आपण करत असलेल्या निवडी, आपली ध्येये, आपण पाठपुरावा करत असलेली कार्ये यांवरून हे दिसले पाहिजे, की भौतिक व इतर गोष्टींऐवजी देवाच्या राज्याशी संबंधित असलेली कार्ये आणि त्याची इच्छा पूर्ण करण्याला आपल्या जीवनात अधिक महत्त्व आहे.

माझ्या निवडीमुळे मी आज आनंदी व समाधानी आहे

“अभ्यासात हुशार असल्यामुळे मला न्यूयॉर्क सिटीतील एका नामवंत खासगी शाळेत स्कॉलरशीप मिळाली. मी अनेक प्रतिष्ठित विद्यापिठांमध्ये अर्ज करावा म्हणून माझे शालेय सल्लागार मागेच लागले. काही विद्यापिठांनी माझी निवडही केली आणि मी संयुक्‍त संस्थानातील एका अगदी नावाजलेल्या विद्यापिठात स्कॉलरशीपही मिळवली. पण मी ही स्कॉलरशीप दोन कारणांसाठी नाकारली. घरापासून दूर असलेल्या कॅम्पसवर राहणे माझ्यासाठी नैतिकरीत्या धोकेदायक होते आणि मला पायनियर सेवा करण्याची तीव्र इच्छा होती.

“मी २० पेक्षा अधिक वर्षांपासून सामान्य पायनियर म्हणून सेवा करत आहे. सेवेच्या विविध प्रकारांत, जसे की, प्रचारकांची जास्त गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करणे, राज्य सभागृह बांधकामात भाग घेणे व पीडित कार्यात हातभार लावणे, यांत मी स्वतःला व्यस्त ठेवले आहे. सध्या मी, न्यूयॉर्क सिटीतल्या एका विदेशी भाषा गटात सेवा करत आहे.

“पूर्ण वेळेच्या माझ्या करिअरकडे मी मागे वळून पाहते तेव्हा मला किती आशीर्वाद मिळाले आहेत याची मला जाणीव होते. माझ्या निवडीमुळे मी आज आनंदी व समाधानी आहे. या सेवेत मिळालेले अनुभव व मित्र यांच्या बदल्यात मला कोणी काहीही दिले तरी मी ते स्वीकारणार नाही.”—झनायडा.

सेवेत परिश्रम घेणे

एक जोडपं प्रचार करत आहे

प्रचार कार्याला आपल्या जीवनात प्राधान्य देऊन आपण यहोवावरील आपले प्रेम व्यक्‍त करतो

२२, २३. (क) खऱ्‍या ख्रिश्‍चनांचे प्रमुख कार्य कोणते आहे व हे कार्य आपल्याला महत्त्वाचे वाटते हे आपण कसे दाखवू शकतो? (माझ्या निवडीमुळे मी आज आनंदी व समाधानी आहे हा चौकोन पाहा.) (ख) नोकरी-धंद्याच्या बाबतीत तुम्ही कोणता ठाम निश्‍चय केला आहे?

२२ आपण अंताच्या अगदी जवळ येऊन ठेपलो आहोत ही जाणीव, आपल्यावर सोपवलेल्या प्रमुख कार्यावर अर्थात प्रचार व शिष्य बनवण्याच्या कार्यावर लक्ष केंद्रित करण्यास आपल्याला मदत करेल. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) आपला आदर्श येशू याच्याप्रमाणे आपणही, जीवन वाचवणाऱ्‍या कार्यात स्वतःला झोकून देऊ इच्छितो. हे कार्य आपल्याला महत्त्वाचे वाटते हे आपण कसे दाखवून देऊ शकतो? देवाच्या बहुतेक लोकांनी, मंडळीचे प्रचारक या नात्याने प्रचार कार्यासाठी पूर्णपणे स्वतःला वाहून घेतले आहे. पायनियर किंवा मिशनरी म्हणून सेवा करता यावी म्हणून काहींनी आपल्या जीवनात फेरफार केला आहे. यहोवाच्या सेवेशी संबंधित ध्येये महत्त्वाची आहेत, या जाणीवेमुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना पूर्ण वेळेच्या सेवेचे करिअर निवडण्याचे उत्तेजन दिले आहे. या आवेशी राज्य प्रचारकांना सेवेतील त्यांच्या कष्टातून आनंद मिळत आहे का? होय, नक्कीच मिळतो. यहोवाची सेवा पूर्ण मनाने करणे हा आनंद, समाधान व अगणित आशीर्वाद मिळवण्याचा खात्रीचा मार्ग आहे.—नीतिसूत्रे १०:२२.

२३ आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता आपल्यातील अनेकांना पुष्कळ तास नोकरी-धंदा करावा लागतो. आपल्या कष्टाच्या कामातून आपण आनंद प्राप्त करावा, अशी यहोवाची इच्छा आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे कामाविषयी त्याच्यासारखा दृष्टिकोन बाळगल्यास व कामाविषयी असलेल्या त्याच्या तत्त्वांनुसार वागल्यास आपणही आपल्या कामात समाधान मिळवू शकतो. तेव्हा, आपल्या नोकरी-धंद्याला आपण केव्हाही आपल्या प्रमुख कार्यापासून अर्थात देवाच्या राज्याच्या सुवार्तेच्या प्रचार कार्यापासून आपले लक्ष विचलित करू देणार नाही, असा ठाम निश्‍चय करा. या कार्याला आपल्या जीवनात प्राधान्य देऊन आपण दाखवू, की आपण यहोवावर प्रेम करतो व त्याच्या प्रेमात टिकून राहू इच्छितो.

a “सुतार” असे भाषांतर करण्यात आलेला ग्रीक शब्द, “लाकूडकाम करणाऱ्‍या कामगारासाठी सहसा वापरला जात असे. घरे बांधणाऱ्‍या, फर्निचर बनवणाऱ्‍या अथवा कोणत्याही प्रकारच्या लाकडी वस्तू बनवणाऱ्‍या कामगारालाही हा शब्द लागू होत असे.”

b नोकरी निवडताना विचारात घेण्याजोग्या कारणांच्या अधिक माहितीकरता टेहळणी बुरूज एप्रिल १५, १९९९, पृष्ठे २८-३० आणि टेहळणी बुरूज-E जुलै १५, १९८२, पृष्ठे २६ पाहा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा