वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • fy अध्या. २ पृ. १३-२६
  • यशस्वी विवाहाकरता तयारी करणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यशस्वी विवाहाकरता तयारी करणे
  • कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही विवाहाकरता तयार आहात का?
  • प्रथम स्वतःला जाणून घ्या
  • सोबत्यात काय पाहावे?
  • आगाऊ शोध घ्या
  • तुमच्या प्रियाराधनेला आदरणीय ठेवा
  • लग्नसमारंभाच्याही पुढे पाहणे
  • तुमच्या विवाहाकरता उत्तम पाया घालणे
    तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी बनवणे
  • विवाह—प्रेमळ देवाकडून मिळालेली देणगी
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • यशस्वी विवाहासाठी कशाची गरज आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • विवाह जोडीदार निवडण्यासंबंधी देवाचा सल्ला
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य
fy अध्या. २ पृ. १३-२६

अध्याय २

यशस्वी विवाहाकरता तयारी करणे

१३ पानांवरील चित्र

१, २. (अ) येशूने योजना करण्याच्या महत्त्वावर कसा जोर दिला? (ब) योजना करणे, विशेषपणे कोणत्या क्षेत्रात आवश्‍यक आहे?

एखाद्या इमारतीची बांधणी करण्यासाठी काळजीपूर्वक तयारीची आवश्‍यकता असते. पाया घालण्याआधी जमीन खरेदी करून नकाशे तयार करावे लागतात. तथापि, आणखी एक गोष्ट महत्त्वपूर्ण असते. येशूने म्हटले: “तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही?”—लूक १४:२८.

२ इमारत बांधण्याच्या बाबतीत जे सत्य आहे तेच यशस्वी विवाहाची बांधणी करण्यासाठी देखील लागू होते. अनेक जण म्हणतात: “मला विवाह करायचा आहे.” परंतु, किती लोक अगोदर खर्चाचा अंदाज काढण्यासाठी विचार करतात? विवाहाबद्दल बायबल अनुकूलरितीने बोलत असले, तरी विवाहामुळे येणाऱ्‍या आव्हानांकडे देखील ते लक्ष वेधते. (नीतिसूत्रे १८:२२; १ करिंथकर ७:२८) या कारणास्तव, जे लोक विवाहाचा विचार करत आहेत त्यांना आशीर्वाद आणि विवाहित होण्याची किंमत यांचा वास्तव दृष्टिकोन असण्याची आवश्‍यकता आहे.

३. विवाहाची योजना करणाऱ्‍यांसाठी बायबल एक बहुमोल मदत का आहे आणि ते कोणत्या तीन प्रश्‍नांची उत्तरे देण्यात आपले साह्‍य करील?

३ बायबल मदत करू शकते. त्यातील सल्ला विवाहाचा मूळ निर्माता, यहोवा देव याने प्रेरित केला आहे. (इफिसकर ३:१४, १५; २ तीमथ्य ३:१६) प्राचीन असले तरी अतिशय अद्ययावत असलेल्या या मार्गदर्शक पुस्तकात सापडणाऱ्‍या तत्त्वांचा वापर करून आपण हे ठरवू या की (१) एखादी व्यक्‍ती विवाहाकरता तयार आहे की नाही हे कसे सांगू शकते? (२) सोबत्यात काय पाहिले पाहिजे? आणि (३) प्रियाराधन सन्माननीय कसे ठेवले जाऊ शकते?

तुम्ही विवाहाकरता तयार आहात का?

४. यशस्वी विवाह टिकवण्यासाठी महत्त्वपूर्ण घटक कोणता आहे व का?

४ इमारत बांधणे महागडे असू शकेल पण दीर्घ-पल्ल्यापर्यंत ती चांगल्या अवस्थेत ठेवण्यासाठी तिची निगा राखणे देखील खर्चाचेच आहे. विवाहाच्या बाबतीतही तसेच आहे. विवाह करणे हेच आव्हानात्मक वाटेल; परंतु, वर्षांनुवर्षे वैवाहिक नातेसंबंध चांगले ठेवण्याचा देखील विचार केला पाहिजे. अशा प्रकारचा नातेसंबंध चांगला ठेवण्यास काय भाग पाडते? महत्त्वपूर्ण घटक म्हणजे संपूर्ण अंतःकरणाची वचनबद्धता. वैवाहिक नातेसंबंधाचे वर्णन बायबल अशा प्रकारे करते: “पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्रीशी जडून राहील; ती दोघे एकदेह होतील.” (उत्पत्ति २:२४) पुनर्विवाह करण्याच्या शक्यतेसह घटस्फोट घेण्याकरता—“जारकर्म,” म्हणजे विवाहाबाहेरील अवैध लैंगिक संबंध, केवळ हाच एक शास्रवचनीय आधार येशू ख्रिस्ताने पुरवला. (मत्तय १९:९) तुम्ही जर विवाहाचा विचार करत आहात तर हे शास्रवचनीय दर्जे लक्षात ठेवा. जर तुम्ही या गंभीर वचनबद्धतेकरता तयार नसाल तर विवाहासाठी तुम्ही तयार नाहीत.—अनुवाद २३:२१; उपदेशक ५:४, ५.

५. विवाहातील गंभीर वचनबद्धतेमुळे काही लोकांना भय वाटत असले, तरी विवाह करण्याची इच्छा असणाऱ्‍यांनी ते मोलाचे का समजले पाहिजे?

५ गंभीर वचनबद्धता या कल्पनेची अनेकांना भीती वाटते. “आम्ही दोघे जीवनभर जखडले गेलो आहोत हे जाणल्याने मला एका कोनाड्यात बंद केल्यासारखे व पूर्णपणे कोंडून ठेवल्यासारखे वाटले,” असे एका तरुणाने कबूल केले. पण तुम्ही ज्या व्यक्‍तीसोबत विवाह करू इच्छिता तिच्यावर तुमचे खरे प्रेम असल्यास, वचनबद्धता तुम्हाला एखाद्या ओझ्यासमान वाटणार नाही. उलटपक्षी, त्याकडे सुरक्षिततेचा एक स्रोत या दृष्टीने पाहिले जाईल. विवाहात दाखवलेल्या वचनबद्धतेची जाणीव, जोडप्याला चांगल्या आणि खडतर काळात एकत्र मिळून राहण्याचे इच्छिण्यास आणि काही झाले तरी एकमेकांना आधार देण्यास मदत करील. ख्रिस्ती प्रेषित पौलाने लिहिले, की खरे प्रेम “सर्व काही सहन करिते” आणि “सर्वांसंबंधाने धीर धरते.” (१ करिंथकर १३:४, ७) एक स्त्री म्हणते, “विवाहातील वचनबद्धतेमुळे मला अधिक सुरक्षित असल्याचे वाटते. आम्ही दोघे जडून राहू इच्छितो हे स्वतःस आणि जगाला कबूल केल्यामुळे मिळणारे समाधान मला आवडते.”—उपदेशक ४:९-१२.

६. किशोरवयातच विवाह करण्याची घाई न करणे उत्तम का आहे?

६ अशा या वचनबद्धतेनुसार राहण्याकरता प्रौढता लागते. यास्तव, पौल सल्ला देतो की जोवर ‘कौमार्य उपवर होत’ नाही तोवर म्हणजे लैंगिक भावना जोमात असतात आणि एखाद्याच्या अंदाजाचा विपर्यास होऊ शकतो असा काळ जाईपर्यंत जे ख्रिस्ती विवाह करत नाहीत ते बरे करतात. (१ करिंथकर ७:३६) तरुण लोक मोठे होत असताना त्यांच्यात लवकर बदल होतात. लहान वयात ज्यांचा विवाह झाला आहे अशा बहुतेकांना नंतर कळते की, केवळ काही वर्षांनंतर त्यांच्या तसेच त्यांच्या सोबत्यांच्या गरजा आणि इच्छा बदलल्या आहेत. आकडेवार माहिती दाखवते की, विवाह करण्यासाठी प्रौढ वय होईपर्यंत जे थांबतात त्यांच्यापेक्षा किशोरवयात विवाहित झालेल्यांची दुःखी होण्याची व घटस्फोट घेण्याची अधिक शक्यता असते. म्हणूनच विवाह करण्याची घाई करू नका. तरुण आणि प्रौढावस्थेत घालवलेली काही वर्षे, तुम्हाला अधिक प्रौढ आणि एक अनुरूप सोबती बनण्यासाठी मोलवान अनुभव देऊ शकतात. विवाहाकरता थांबून राहिल्यामुळे तुम्हाला स्वतःस अधिक चांगल्याप्रकारे ओळखण्यास देखील मदत होऊ शकते—तुमच्या विवाहात यशस्वी नातेसंबंध विकसित करावयाचा असल्यास हे अत्यावश्‍यक आहे.

प्रथम स्वतःला जाणून घ्या

७. विवाह करण्याची योजना करणाऱ्‍यांनी प्रथम स्वतःची पारख का केली पाहिजे?

७ सोबत्यात जे गुण असावेत त्यांची यादी तयार करणे तुम्हाला सोपे वाटते का? अनेकांना वाटते. परंतु, तुमच्या स्वतःच्या गुणांबद्दल काय? यशस्वी विवाहाला साहाय्य करील असे कोणते गुण तुमच्याजवळ आहेत? तुम्ही कशाप्रकारचे पती किंवा पत्नी असणार? उदाहरणार्थ, तुम्ही स्वतःच्या चुका मोकळेपणाने कबूल करता आणि सल्ला स्वीकारता का किंवा चूक नजरेस आणून दिली जाते तेव्हा तुम्ही नेहमीच विरोध करता? सामान्यपणे तुम्ही आनंदी आणि आशावादी असता की खिन्‍न, वारंवार कुरकूर करण्याची तुमची प्रवृत्ती आहे? (नीतिसूत्रे ८:३३; १५:१५) विवाह तुमचे व्यक्‍तिमत्त्व बदलवणार नाही हे लक्षात ठेवा. अविवाहित असताना तुम्ही गर्विष्ठ, अति हळवे किंवा अति नैराश्‍यपूर्ण असल्यास विवाहानंतर देखील तुम्ही तसेच राहणार. दुसरे आपल्याकडे जसे पाहतात तसे स्वतःकडे पाहणे अवघड असल्यामुळे, पालक किंवा एखाद्या विश्‍वासू मित्राकडे मोकळेपणाने अभिप्राय मांडण्याची आणि सल्ल्यांची विचारणा का करू नये बरे? जे बदल केले जाऊ शकतात त्याबद्दल तुम्ही शिकल्यास विवाह करण्याचे पाऊल उचलण्याआधी त्यावर कार्य करा.

१९ पानांवरील चित्रं

सडे असताना, विवाहात चांगली मदत करतील असे गुण, सवयी आणि योग्यता विकसित करा

८-१०. विवाहाची तयारी करणाऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीला मदत करील असा कोणता सल्ला बायबल देते?

८ बायबल आपल्याला उत्तेजन देते की, “प्रीति, आनंद, शांति, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन,” हे गुण उत्पन्‍न करुन देवाच्या पवित्र आत्म्याला आपल्यात कार्य करू द्या. ते आपल्याला “आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे” आणि “सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्‍यांनी युक्‍त असा देव सदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा,” असे देखील सांगते. (गलतीकर ५:२२, २३; इफिसकर ४:२३, २४) या सल्ल्याचा अवलंब अविवाहित असतानाच केल्याने ते बँकेत पैसे ठेवण्यासारखे असेल—हे भविष्यात म्हणजेच तुम्ही विवाह कराल तेव्हा अधिक मोलवान शाबीत होईल.

९ उदाहरणार्थ, तुम्ही एक स्री असल्यास, तुमच्या शारीरिक रूपाकडे लक्ष देण्यापेक्षा ‘अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाकडे’ अधिक लक्ष देण्याचे शिका. (१ पेत्र ३:३, ४) विनयशीलता आणि मर्यादशीलपणा तुम्हाला बुद्धी, म्हणजेच खरा “सुंदर मुकुट” प्राप्त करण्यास मदत करील. (नीतिसूत्रे ४:९; ३१:१०, ३०; १ तीमथ्य २:९, १०) तुम्ही पुरुष असल्यास स्रियांना दयाळू आणि आदरपूर्ण रितीने वागवण्याचे शिका. (१ तीमथ्य ५:१, २) निर्णय आणि जबाबदारी खांद्यावर घेण्याचे शिकत असताना विनयशील आणि लीन होण्याचे देखील शिका. एखाद्याच्या कह्‍यात ठेवण्याची मनोवृत्ती विवाहात त्रासदायक ठरेल.—नीतिसूत्रे २९:२३; मीखा ६:८; इफिसकर ५:२८, २९.

१० या क्षेत्रात आपल्या मनाचे नविनीकरण करणे सोपे नसले तरी यावर सर्व ख्रिश्‍चनांनी कार्य करण्यास हवे. हे तुम्हाला चांगला वैवाहिक सोबती होण्यास मदत करील.

सोबत्यात काय पाहावे?

११, १२. दोन व्यक्‍तींना ते अनुरूप आहेत की नाही हे कसे कळू शकते?

११ तुम्ही राहत असलेल्या ठिकाणी एखाद्या व्यक्‍तीने त्याच्या किंवा तिच्या वैवाहिक सोबत्याची निवड स्वतः करावी हे रीतीरिवाजाप्रमाणे आहे का? असल्यास, तुम्हाला एखादी विरुद्ध लिंगी व्यक्‍ती आकर्षक वाटल्यास कसे पुढे जावे? प्रथम, स्वतःला विचारा, ‘विवाह हा माझा खराच हेतू आहे का?’ खोट्या अपेक्षांना वाढवण्याद्वारे दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या भावनांशी खेळणे हे क्रूर आहे. (नीतिसूत्रे १३:१२) मग स्वतःला विचारा, ‘मी विवाह करण्याच्या स्थितीत आहे का?’ या दोन्ही प्रश्‍नांची उत्तरे सकारात्मक असल्यास, पुढे तुम्ही जी पावले उचलणार ती स्थानिक रिवाजानुसार भिन्‍न असतील. काही देशांत, एखाद्या व्यक्‍तीचे काही काळ निरीक्षण केल्यावर, तुम्ही त्या व्यक्‍तीकडे जाऊ शकता आणि चांगले परिचित होण्याची इच्छा व्यक्‍त करू शकता. नकारात्मक प्रतिसाद मिळाल्यास, आक्षेपार्ह होण्याप्रत तसेच प्रयत्न करीत राहू नका. दुसऱ्‍या व्यक्‍तीला देखील त्या गोष्टीवर निर्णय घेण्याचा हक्क आहे हे लक्षात ठेवा. तथापि, सकारात्मक प्रतिसाद असल्यास, हितकारक कार्यहालचालींमध्ये एकत्र वेळ घालवण्याची योजना तुम्ही करू शकता. यामुळे त्या व्यक्‍तीसोबतचा विवाह सुज्ञ असेल का हे ठरवण्याची संधी मिळेल.a आता तुम्ही काय पाहिले पाहिजे?

१२ त्या प्रश्‍नाच्या उत्तरासाठी, दोन वाद्यांचा, कदाचित पियानो आणि गिटार यांची कल्पना करा. त्यांना उचितपणे संवादी केल्यास यातील कोणतेही एक वाद्य सुंदर संगीत निर्माण करू शकते. तथापि, ही वाद्ये सोबत वाजवल्यावर काय होऊ शकते? आता त्यांना एकदुसऱ्‍यांबरोबर पूर्ण संवादी झाले पाहिजे. हीच गोष्ट तुमच्या आणि भावी सोबत्याच्या बाबतीतही आहे. तुम्हापैकी प्रत्येकाने व्यक्‍तिगतपणे तुमच्या व्यक्‍तिमत्त्वाचे गुण “संवादी” करण्याकरता कदाचित परिश्रम घेतले असतील. परंतु, आता प्रश्‍न असा उभा राहतो: तुम्ही एकदुसऱ्‍याशी पूर्ण संवादी आहात का? दुसऱ्‍या शब्दांत सांगायचे झाल्यास, तुम्ही अनुरूप आहात काय?

१३. तुमच्या विश्‍वासाची सहभागिता न करणाऱ्‍यासोबत प्रियाराधना करणे मूर्खपणाचे का आहे?

१३ दोघांचे विश्‍वास आणि तत्त्वे सारखी असणे महत्त्वपूर्ण आहे. प्रेषित पौलाने लिहिले: “विश्‍वास न ठेवणाऱ्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका.” (२ करिंथकर ६:१४; १ करिंथकर ७:३९) देवावरील तुमच्या विश्‍वासात सहभागी होत नसलेल्याबरोबरच्या विवाहामुळे अधिक मदभेदाची बरीच शक्यता असेल. दुसऱ्‍या बाजूला पाहता, दोघांनी यहोवा देवाची केलेली भक्‍ती एकतेसाठी मजबूत आधार आहे. तुम्ही आनंदी असावे आणि तुम्ही विवाह करणाऱ्‍या व्यक्‍तीसोबत शक्यतो अगदी जवळच्या बंधनाचा आनंद घ्यावा असे यहोवा इच्छितो. तुम्ही त्याच्यासोबत व एकमेकांसोबत प्रेमाच्या तीनपदरी दोरीने बांधले जावे अशी त्याची इच्छा आहे.—उपदेशक ४:१२.

१४, १५. एक विश्‍वास असणे केवळ हाच विवाहातील ऐक्याचा पैलू आहे का? स्पष्ट करा.

१४ देवाची भक्‍ती एकत्र करणे हा एकतेचा महत्त्वपूर्ण पैलू असला तरी यात अधिक काही गोवलेले आहे. एकदुसऱ्‍यांशी एकवाक्यतेत असण्यासाठी, तुमची व तुमच्या भावी सोबत्याची ध्येये एकसारखीच असण्यास हवीत. तर मग, तुमची ध्येये कोणती आहेत? उदाहरणार्थ, मुले असावीत याबद्दल तुम्हा दोघांना काय वाटते? तुमच्या जीवनात कोणत्या गोष्टीला प्रथम स्थान आहे?b (मत्तय ६:३३) यशस्वी विवाहात, जोडपे चांगले मित्र असतात आणि त्यांना एकदुसऱ्‍यांची संगत आवडते. (नीतिसूत्रे १७:१७) याकरता त्यांच्या आस्था सारख्याच असाव्यात. त्यांच्या आस्था सारख्याच नसल्या तर जवळचे मैत्रिसंबंध टिकवणे अवघड जाते—विवाह टिकवणे तर अधिकच कठीण जाते. तरीसुद्धा, तुमच्या भावी सोबत्याला विशिष्ट कार्य जसे की पायरपेट करण्यास आवडते आणि तुम्हाला ते आवडत नाही याचा अर्थ तुम्ही दोघे विवाह करू शकत नाही असा होतो का? नक्कीच नाही. कदाचित तुमच्या इतर महत्त्वपूर्ण आवडी सारख्याच असणार. याशिवाय, हितकर कार्यहालचालींत भाग घेण्यामुळे दुसऱ्‍या व्यक्‍तीला त्याचा आनंद होत असल्यास तसा भाग घेऊन तुम्ही तुमच्या भावी सोबत्याला आनंदी करू शकता.—प्रेषितांची कृत्ये २०:३५.

१५ खरोखर, तुम्हा दोघांमध्ये किती साम्य आहे याऐवजी तुम्ही दोघे किती जुळवून घेणारे आहात यावरून मोठ्या प्रमाणात अनुरूपता ठरवली जाते. “प्रत्येक गोष्टीत आपण सहमत आहोत का?“ असे विचारण्याऐवजी “आपण असहमत असल्यास काय होते? आपण एकमेकांना आदर आणि मोठेपणा देऊन शांतपणे बाबींची चर्चा करू शकतो का? अथवा चर्चा अनेकदा संतप्त वादविवादाप्रत जातात का?” असे योग्य प्रश्‍न विचारले जाऊ शकतात. (इफिसकर ४:२९, ३१) तुम्हाला विवाह करावयाचा असल्यास, गर्विष्ठ आणि हेकेखोर, कधीच हातमिळवणी करण्याची इच्छा न करणारा, अथवा नेहमी मागणी करणारा आणि त्याच्या किंवा तिच्या स्वतःच्या मार्गानुसार कारस्थान रचणाऱ्‍या कोणाही व्यक्‍तीपासून सावध राहा.

आगाऊ शोध घ्या

१६, १७. भावी वैवाहिक सोबत्याचा विचार करताना पुरुष व स्रीने कोणत्या गोष्टी पाहाव्यात?

१६ ख्रिस्ती मंडळीत जबाबदारी सोपवलेल्यांची ‘अगोदर पारख व्हावी’ लागते. (१ तीमथ्य ३:१०) तुम्ही देखील हेच तत्त्व लागू करू शकता. उदाहरणार्थ, एखादी स्री कदाचित विचारू शकते, “या पुरुषाचा नावलौकिक कसा आहे? त्याचे मित्र कोण आहेत? तो आत्मसंयम दाखवतो का? वयस्करांशी तो कसा वागतो? तो कशा प्रकारच्या कुटुंबातील आहे? तो त्यांच्यासोबत कसा व्यवहार राखतो? पैशाबद्दल त्याची मनोवृत्ती काय आहे? तो मद्यार्कांचा दुरुपयोग करतो का? तो तापट स्वभावाचा व हिंसक देखील आहे का? मंडळीच्या कोणत्या जबाबदाऱ्‍या त्याच्याकडे आहेत आणि तो त्या कशा हाताळतो? मी त्याला गाढ आदर देऊ शकते का?”—लेवीय १९:३२; नीतिसूत्रे २२:२९; ३१:२३; इफिसकर ५:३-५, ३३; १ तीमथ्य ५:८; ६:१०; तीत २:६, ७.

१७ एखादा पुरुष विचारू शकतो, “ही स्री देवाला प्रेम आणि आदर दाखवते का? घरची काळजी घेण्यास ती योग्य आहे का? तिचे कुटुंब आम्हा दोघांकडून कशाची अपेक्षा करील? ती सुज्ञ, परिश्रमी आणि काटकसर करणारी आहे का? ती कशाविषयी बोलत असते? दुसऱ्‍यांच्या हिताची तिला खरीच काळजी आहे, की ती आत्मकेंद्रित व लुडबूड करणारी आहे? ती भरवशास पात्र आहे का? ती मस्तकपदाच्या अधीन राहण्यास इच्छुक आहे वा ती हट्टी कदाचित बंडखोर देखील आहे का?”—नीतिसूत्रे ३१:१०-३१; लूक ६:४५; इफिसकर ५:२२, २३; १ तीमथ्य ५:१३; १ पेत्र ४:१५.

१८. प्रियाराधनेच्या काळात किरकोळ स्वरूपाच्या कमतरता दिसल्यास, कोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे?

१८ तुम्ही कल्पित प्रणयकथेतील आदर्श नायक किंवा नायिकेबरोबर नव्हे तर आदामाच्या अपरिपूर्ण वंशजाबरोबर व्यवहार राखत आहात हे विसरू नका. प्रत्येकामध्ये उणिवा आहेत आणि यातील काहींकडे—तुम्हातील व तुमच्या भावी सोबत्यातील उणिवांकडे दुर्लक्ष करण्यास हवे. (रोमकर ३:२३; याकोब ३:२) शिवाय, दृष्टिपथात आलेली कमतरता आध्यात्मिकतेत वाढण्याची संधी प्रस्तुत करू शकते. उदाहरणार्थ, समजा प्रियाराधनेच्या काळात तुमच्यात वाद होतो. याचा विचार करा: एकदुसऱ्‍यांवर प्रेम करणाऱ्‍या आणि आदर देणाऱ्‍या लोकांत देखील काही वेळा मतभेद होतात. (पडताळा उत्पत्ति ३०:२; प्रेषितांची कृत्ये १५:३९.) तेव्हा, दोघांनी आपले ‘चित्त आणखी थोडे स्वाधीन’ ठेवावे आणि बाबींना अधिक शांतीने सोडवावे हे शिकण्याचीच केवळ गरज आहे असे असेल का? (नीतिसूत्रे २५:२८) तुमचा भावी सोबती सुधारणा करण्याची इच्छा दाखवतो का? तुम्ही दाखवता का? तुम्ही कमी संवेदनाप्रवण आणि कमी चिडखोर होण्याचे शिकू शकता का? (उपदेशक ७:९) समस्या सोडविण्यास शिकणे, हे तुम्हा दोघांचा विवाह झाल्यास आवश्‍यक असणाऱ्‍या प्रामाणिक दळणवळणाचा नमुना स्थापित करू शकते.—कलस्सैकर ३:१३.

१९. प्रियाराधनेच्या काळात काही गंभीर समस्या दिसल्यास, कोणते कार्य करणे सुज्ञतेचे असेल?

१९ पण, तुम्हाला अधिक त्रास देणाऱ्‍या गोष्टी आढळल्यास, मग काय? अशा संशयांचा काळजीपूर्वक विचार करण्यास हवा. परंतु, तुम्हाला कितीही रोमँटिक वाटत असले किंवा तुम्ही विवाह करण्यासाठी कितीही उत्सुक असला तरी गंभीर चुका पाहिल्यावर कानाडोळा करू नका. (नीतिसूत्रे २२:३; उपदेशक २:१४) ज्या व्यक्‍तीविषयी तुम्हाला गंभीर आक्षेप आहेत त्या व्यक्‍तीसोबत तुमचा नातेसंबंध असल्यास तो संपुष्टात आणणे व त्या व्यक्‍तीसोबत कायमचे वचनबद्ध होण्यापासून दूर राहणे सुज्ञपणाचे आहे.

तुमच्या प्रियाराधनेला आदरणीय ठेवा

२०. प्रियाराधना करीत असलेले जोडपे त्यांच्या नैतिक वर्तनाला दूषण लागण्यापासून कसे दूर राहू शकतात?

२० तुम्ही तुमच्या प्रियाराधनेला आदरणीय कसे ठेवू शकता? पहिली गोष्ट म्हणजे, तुमचे नैतिक वर्तन दूषण लागण्यापासून दूर असल्याची खात्री करा. तुम्ही जेथे राहता त्या ठिकाणी, अविवाहित जोडप्यांनी हात धरणे, चुंबन घेणे किंवा आलिंगन देणे याला उचित वागणूक समजली जाते का? प्रेमाच्या अशा वक्‍तव्यांना जरी नापसंती दाखवली जात नसली तरी विवाहाची योजना निश्‍चितपणे केली आहे तेथेच त्यास अनुमती दिली जावी. स्नेह दाखवताना, ते अशुद्ध वर्तणूक किंवा जारकर्म करण्याप्रत जाऊ नये याची खबरदारी घ्या. (इफिसकर ४:१८, १९; पडताळा गीतरत्न १:२; २:६; ८:५, ९, १०.) हृदय कपटी असल्यामुळे, तुम्ही दोघांनी घरात, अपार्टमेंटमध्ये, पार्क केलेल्या मोटारगाडीत किंवा इतर कोणत्याही ठिकाणी गैरवर्तन करण्यास संधी देणाऱ्‍या एकांतवासात राहण्याचे टाळणे सुज्ञतेचे असेल. (यिर्मया १७:९) तुमच्या प्रियाराधनेचा काळ नैतिकरित्या शुद्ध ठेवल्याने तुम्ही आत्मसंयम राखत असल्याचा आणि स्वतःच्या इच्छेपेक्षा दुसऱ्‍या व्यक्‍तीच्या हिताची निःस्वार्थी काळजी घेत असल्याचा स्पष्ट पुरावा देता. अधिक महत्त्वाचे म्हणजे, आपल्या सेवकांना अशुद्धता आणि जारकर्मापासून दूर राहण्याची आज्ञा देत असलेला यहोवा देव, शुद्ध प्रियाराधनेमुळे खूष होईल.—गलतीकर ५:१९-२१.

२१. प्रियाराधना आदरणीय ठेवण्यासाठी कशा प्रकारच्या प्रामाणिक दळणवळणाची आवश्‍यकता असू शकेल?

२१ दुसरी गोष्ट म्हणजे, आदरणीय प्रियाराधनेत प्रामाणिक दळणवळण देखील समाविष्ट आहे. तुमची प्रियाराधना विवाह करण्याप्रत जाते तेव्हा विशिष्ट गोष्टींची चर्चा मोकळेपणाने करण्याची गरज भासेल. तुम्ही कोठे राहाल? तुम्ही दोघेही प्रापंचिक नोकरी कराल का? तुम्हाला मुले हवीत का? तसेच, ज्याचा परिणाम विवाहावर होऊ शकतो अशा गोष्टींना, कदाचित एखाद्याच्या गतकाळाला प्रकट करणे न्याय्य आहे. यामध्ये मोठे कर्ज किंवा कर्तव्ये अथवा गंभीर आजार किंवा अवस्था यांसारख्या आरोग्य बाबी समाविष्ट आहेत. एचआयव्ही जीवाणूची (एड्‌स होणाऱ्‍या विषाणूची) लागण झालेल्या अनेक व्यक्‍तींमध्ये त्याची चिन्हे लगेच दिसत नसल्यामुळे एखाद्या व्यक्‍तीने किंवा काळजी घेणाऱ्‍या पालकांनी गतकाळात अनिर्बंध लैंगिक संबंध ठेवणाऱ्‍याला अथवा शिरेद्वारे मादक द्रव्य घेणाऱ्‍याला एड्‌स रक्‍त चाचणी करुन घेण्याची विनंती करणे चुकीचे असणार नाही. चाचणी पॉझिटिव्ह असल्यास, भावी सोबत्याला लागण झालेल्या व्यक्‍तीसोबत आपले नातेसंबंध तोडण्याची इच्छा असल्यास लागण झालेल्या व्यक्‍तीने त्यावर नातेसंबंध कायम ठेवण्याचा दबाव टाकू नये. खरोखर, जोखीमेच्या जीवनशैलीत जीवन व्यतीत केलेली व्यक्‍ती प्रियाराधना सुरू करण्याआधी स्वेच्छेने एड्‌स रक्‍त चाचणी करून घेते तेव्हा ती उचित करते.

लग्नसमारंभाच्याही पुढे पाहणे

२२, २३. (अ) लग्नसमारंभाची तयारी करताना समतोल कसा गमावला जाऊ शकतो? (ब) लग्नसमारंभाचा दिवस आणि विवाह यांचा विचार करताना कोणता समतोल दृष्टिकोन राखला पाहिजे?

२२ विवाहाआधीच्या शेवटल्या महिन्यांदरम्यान, लग्नसमारंभाची व्यवस्था करण्यात कदाचित तुम्ही दोघेही अधिक व्यग्र असाल. वाजवी राहून तुम्ही पुष्कळसा तणाव कमी करू शकता. मोठ्या थाटामाटात केलेल्या विवाहामुळे नातेवाईक आणि समाज खूष होईल पण नवविवाहित आणि त्यांची कुटुंबे शारीरिकरित्या थकलेल्या व आर्थिकरित्या ऱ्‍हास झालेल्या अवस्थेत राहतील. काही प्रमाणात स्थानिक रिवाज पाळणे योग्य आहे पण तिरस्करणीय आणि कदाचित चढाओढीच्या आहारी जाणे विवाह प्रसंगाच्या अर्थावर सावट पाडू शकते आणि तुम्हाला हवा असणारा आनंद हिरावून घेऊ शकते. दुसऱ्‍यांच्या भावनांचा विचार केला पाहिजे तरीसुद्धा लग्नसमारंभाच्या मेजवाणीच्या प्रसंगी काय केले जाईल याचा निर्णय घेण्यास प्रामुख्याने वर जबाबदार आहे.—योहान २:९.

२३ लक्षात ठेवा तुमचा लग्नसमारंभ फक्‍त एक दिवस टिकतो पण तुमचा विवाह जन्मभर टिकणारा आहे. लग्न दिवसावर अधिक केंद्रिभूत होण्याचे टाळा. उलटपक्षी, मार्गदर्शनासाठी यहोवा देवाकडे पाहा आणि विवाहबद्ध होण्याच्या जीवनासाठी आगाऊ योजना करा. मग तुम्ही यशस्वी विवाहाकरता चांगली तयारी केलेली असेल.

a ज्या देशांमध्ये भेटीगाठी घेणे ख्रिश्‍चनांकरता योग्य मानले जाते तेथे हे लागू होऊ शकते.

b ख्रिस्ती मंडळीत देखील कार्यहालचालींमध्ये तुरळकपणे सहभाग घेणारे काही असतील. देवाचे, अंतःकरणपूर्वक सेवक असण्याऐवजी ते जगाच्या प्रवृत्ती आणि वर्तणूक यांमुळे प्रभावित झाले असतील.—योहान १७:१६; याकोब ४:४.

ही बायबल तत्त्वे . . . यशस्वी विवाहाची तयारी करण्यासाठी एखाद्या व्यक्‍तीला कशी मदत करू शकतात?

पतीपत्नीने एकमेकांना वचनबद्ध असले पाहिजे.—उत्पत्ति २:२४.

बाह्‍य स्वरूपापेक्षा आंतरिक व्यक्‍ती अधिक महत्त्वपूर्ण आहे.—१ पेत्र ३:३, ४.

“संबंध जोडून विजोड होऊ नका.”—२ करिंथकर ६:१४.

नैतिकरित्या अशुद्ध असलेले लोक देवापासून पारखे आहेत.—इफिसकर ४:१८, १९.

रीतिरिवाज आणि बायबल

वधू-किंमत आणि हुंडा: काही देशांमध्ये वराकडील कुटुंबाने वधूच्या कुटुंबाला पैसे (वधू-किंमत) द्यावे अशी अपेक्षा केली जाते. इतर देशांत, वधूचे कुटुंब वराच्या कुटुंबाला पैसे (हुंडा) देते. असे रीतिरिवाज कायदेशीर आहेत तोवर यांत चुकीचे काही नाही. (रोमकर १३:१) तथापि, दोहोंपैकी कोणत्याही बाबतीत ते प्राप्त करणाऱ्‍या कुटुंबाने लोभिष्टपणे वाजवीपेक्षा अधिक पैशाची अथवा वस्तुंची मागणी करण्याचे टाळले पाहिजे. (नीतिसूत्रे २०:२१; १ करिंथकर ६:१०) याशिवाय, वधू-किंमतीवरून, पत्नी केवळ खरेदी केलेली मालमत्ता आहे, असा अर्थ कधीही लावू नये; तसेच पत्नी आणि सासू सासऱ्‍याविषयीची पतीची जबाबदारी केवळ आर्थिक स्वरूपाची आहे असे देखील त्याला वाटता कामा नये.

बहुपत्नीकत्व: काही संस्कृती एकापेक्षा अधिक बायका करण्याची अनुमती देतात. अशा परिस्थितीत पुरुष एक पती किंवा पिता असण्याऐवजी सर्वाधिपती बनतो. याशिवाय, बहुपत्नीकत्व विवाहामुळे पत्नींमध्ये अनेकदा स्पर्धा होत असते. ख्रिश्‍चनांसाठी बायबल केवळ सडेपणा अथवा एक-पत्नी (पती) करता अनुमती देते.—१ करिंथकर ७:२.

चाचणी विवाह: विवाहाआधी एकत्र राहिल्याने अनुरूपतेची चाचणी घेण्यास मदत होईल असा दावा अनेक जोडपी करतात. तरीही, चाचणी विवाहामुळे, विवाहातील सर्वाधिक महत्त्वपूर्ण घटकांची—वचनबद्धतेची कसोटी होत नाही. विवाहाव्यतिरिक्‍त कोणतीही व्यवस्था सर्वांना एकत्र येण्यामुळे जन्मास आलेल्या मुलांना देखील—सारख्याच प्रमाणात संरक्षण आणि सुरक्षितता देत नाही. यापेक्षाही अधिक महत्त्वाचे म्हणजे, निर्माणकर्ता, यहोवा देव याने अनुमती दिल्याप्रमाणे, एकत्र राहण्याकरता विवाह हीच एकमात्र व्यवस्था आहे. विवाहाशिवाय संगनमताने एकत्र राहणे, यहोवा देवाच्या दृष्टीत जारकर्म आहे.—१ करिंथकर ६:१८; इब्री लोकांस १३:४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा