अध्याय १७
देवाच्या लोकांमध्ये सुरक्षितता मिळवा
१, २. मानवजातीची परिस्थिती झंझावाती वादळाने नासधूस झालेल्या क्षेत्रासारखी कशी आहे?
तुम्ही राहता त्या प्रदेशात एका झंझावाती वादळाने नासधूस केली आहे अशी कल्पना करा. तुमचे घर उद्ध्वस्त झाले आहे आणि तुमच्या सर्व मालकीच्या वस्तू नष्ट झाल्या आहेत. अन्नाचा तुटवडा जाणवत आहे. एकंदर परिस्थिती हताश दिसते. तेव्हा एकाएकी दुष्काळी मदत येते. अन्न व कपडे भरपूर प्रमाणात मिळतात. तुमच्याकरता एक नवे घर बांधून दिले जाते. अशा या तरतुदींचा पुरवठा करणाऱ्या व्यक्तीचे तुम्ही नक्कीच आभार मानाल.
२ असेच काही आज घडत आहे. त्या वादळाप्रमाणे आदाम व हव्वा यांनी आचरलेल्या बंडखोरीने मानवी वंशावर प्रचंड विनाश ओढवला. मानवजातीचे परादीसमय घर नष्ट झाले. तेव्हापासून मानवी सरकार युद्ध, गुन्हेगारी आणि अन्याय यापासून लोकांना संरक्षण देण्यात असमर्थ ठरेल. खोट्या धर्माने बहुतेकांना हितकारक आध्यात्मिक अन्नापासून क्षुधित ठेवले. तथापि, यहोवा आता, आध्यात्मिक दृष्टीने अन्न, वस्त्र व निवारा देत आहे. ते तो कसे करीत आहे?
“विश्वासू व बुद्धिमान दास”
३. यहोवा मानवजातीसाठी कशी तरतूद पुरवतो व हे कोणत्या उदाहरणांद्वारे दाखवण्यात आले आहे?
३ दुष्काळी मदत जशी संघटित माध्यमाद्वारे पुरवण्यात येते, त्याचप्रमाणे यहोवाने त्याच्या लोकांसाठी आध्यात्मिक मदतीची तरतूद पुरवली आहे. उदाहरणार्थ, इस्राएल लोक साधारण १,५०० वर्षे “यहोवाची मंडळी” या नात्याने ओळखले जात होते. यांच्यामध्ये त्याच्या नियमशास्त्राचे शिक्षण देण्याचे देवाचे माध्यम म्हणून सेवा करणारे काहीजण होते. (१ इतिहास २८:८, NW; २ इतिहास १७:७-९) सा. यु. पहिल्या शतकात यहोवाने ख्रिस्ती संघटन सामोरे आणले. मंडळ्या तयार झाल्या व त्यांचे कार्यवहन प्रेषित व वडील जनांच्या नियमन मंडळाकडील मार्गदर्शनाद्वारे झाले. (प्रेषितांची कृत्ये १५:२२-३१) त्याप्रमाणे आज यहोवा त्याच्या लोकांसोबत एक संघटित वर्गाद्वारे दळणवळण ठेवत आहे. हे आपल्याला कसे कळते?
४. आधुनिक काळात ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ कोण असल्याचे शाबीत झाले आणि देवाकडील आध्यात्मिक तरतुदी कशा उपलब्ध केल्या जातात?
४ येशूने म्हटले की, राज्य सामर्थ्यातील त्याच्या उपस्थितीच्या काळात ‘विश्वासू व बुद्धिमान दास’ त्याच्या अनुयायांना “यथाकाळी खावयास देण्यासाठी” अन्न पुरवीत असल्याचे दिसून येईल. (मत्तय २४:४५-४७) येशूला १९१४ मध्ये स्वर्गीय राजा म्हणून अधिष्ठित करण्यात आले तेव्हा कोण हा “दास” असल्याचे सिद्ध झाले? ख्रिस्ती धर्मजगतातील पाळक तर निश्चितच नाही. ते तर पहिल्या जागतिक युद्धात बहुतांशी त्यांच्या कळपाला स्वतःच्या राष्ट्रीय सरकारांना पाठबळ देणाऱ्या मतप्रणालींना भरवीत होते. परंतु, देवाच्या पवित्र आत्म्याने अभिषिक्त झालेला व जो येशूने संबोधलेल्या ‘लहान कळप’ याचा भाग आहे तो खऱ्या ख्रिश्चनांचा गट योग्य व समयोचित आध्यात्मिक अन्नाची पुरवणूक करीत होता. (लूक १२:३२) या अभिषिक्त ख्रिश्चनांनी मानवी सरकारांऐवजी देवाच्या राज्याचा प्रचार केला. याचा परिणाम, गेल्या काही वर्षांत धार्मिक वृत्तीची “दुसरी मेंढरे” अभिषिक्त ‘दासाला’ येऊन मिळाली व ती त्यांच्यासोबत खऱ्या धर्माचे आचरण करू लागले. (योहान १०:१६) विश्वासू दास व त्याच्या सध्याच्या नियमन मंडळाचा उपयोग करून देव आपल्या संघटित लोकांना, आध्यात्मिक अन्न, वस्त्र व निवारा या तरतुदी मिळवू इच्छिणाऱ्या सर्वासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्देश देतो.
“यथाकाळी अन्न”
५. जगात आज कोणती आध्यात्मिक स्थिती पसरलेली आहे, पण याबद्दल यहोवा काय करीत आहे?
५ येशूने म्हटले: “मनुष्य केवळ भाकरीने नव्हे, तर परमेश्वराच्या [यहोवा, NW] मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.” (मत्तय ४:४) तरीही, मानवजातीतील बहुतेक लोक देवाच्या वचनाकडे लक्ष देत नाहीत हे दुःखाचे आहे. यहोवाचा संदेष्टा आमोस याने भाकीत केल्याप्रमाणे “दुष्काळ पाण्याचा नव्हे, अन्नाचा किंवा पाण्याचा नव्हे, तर तो परमेश्वराची [यहोवा] वचने ऐकण्यासंबंधीचा” आहे. (आमोस ८:११) अत्यंत धार्मिक लोक सुद्धा आध्यात्मिक दुष्काळाने पछाडलेले आहेत. तरीसुद्धा यहोवाची इच्छा आहे की, “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे.” (१ तीमथ्य २:३, ४) त्यानुसार तो आध्यात्मिक अन्न विपुलतेने पुरवीत आहे. पण ते कोठे मिळू शकेल?
६. गत काळात यहोवाने त्याच्या लोकांना आध्यात्मिकरित्या कसे भरवले?
६ यहोवाने सबंध इतिहासात त्याच्या लोकांना एक गट या नात्याने आध्यात्मिक अन्न दिले. (यशया ६५:१३) उदाहरणार्थ, इस्राएली याजकांनी पुरुष, स्त्रिया व मुलांना देवाच्या नियमशास्त्राचे शिक्षण देण्याकरता एक गट या नात्याने एकत्रित केले. (अनुवाद ३१:९, १२) पहिल्या शतकातील ख्रिश्चनांनी नियमन मंडळाच्या मार्गदर्शनाखाली मंडळ्या संघटित केल्या व सर्वांना उत्तेजन व बोध मिळावा म्हणून सभा घेतल्या. (रोमकर १६:५; फिलेमोन १, २) यहोवाचे साक्षीदार हाच नमुना आचरतात. त्यांच्या सर्व सभांना उपस्थित राहण्याचे तुम्हाला हे हार्दिक निमंत्रण आहे.
७. ख्रिस्ती सभांच्या नियमित उपस्थितीचा ज्ञान व विश्वासाशी कसा संबंध आहे?
७ अर्थात, तुम्ही तुमच्या या वैयक्तिक बायबल अभ्यासाद्वारे बरेच काही शिकून घेतले आहे हे खरे. कदाचित कोणा साक्षीदाराने तुम्हाला ही मदत दिली असेल. (प्रेषितांची कृत्ये ८:३०-३५) पण तुमच्या विश्वासाची तुलना एखाद्या रोपासोबत करता येईल, ज्याला योग्य ती काळजी पुरवण्यात आली नाही तर ते लवकरच कोमेजून मरून जाईल. यास्तव, तुम्हाला योग्य आध्यात्मिक पोषण मिळाले पाहिजे. (१ तीमथ्य ४:६) ख्रिस्ती सभा तुम्हाला आध्यात्मिकरित्या पोषण मिळत राहावे म्हणून सूचना देण्याचा आणि तुम्ही देवाविषयीच्या ज्ञानात वाढ करत राहाल तसतसा तुमचा विश्वास वाढवण्याकरता नित्याचा कार्यक्रम सादर करतात.—कलस्सैकर १:९, १०.
८. आपल्याला यहोवाच्या साक्षीदारांच्या सभांना उपस्थित राहण्याचे का उत्तेजन दिले आहे?
८ सभांमुळे आणखी एक महत्त्वाचा उद्देश साध्य होतो. पौलाने लिहिले: ‘प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष देऊ. आपण एकत्र मिळणे सोडू नये.’ (इब्रीयांस १०:२४, २५) “उत्तेजन” असे भाषांतर करण्यात आलेल्या ग्रीक शब्दाचा अर्थ “धारदार करणे” असाही होतो. बायबलचे एक नीतिसूत्रे म्हणते: “तिखे तिख्याला पाणीदार करिते, तसा मनुष्य आपल्या मित्राचा चेहरा पाणीदार करितो.” (नीतिसूत्रे २७:१७) आम्हा सर्वांना सतत ‘धारदार’ राहण्याची आवश्यकता आहे. दरदिवशी येणारे दबाव आमचा विश्वास बोथट करू शकतात. आपण ख्रिस्ती सभांना उपस्थित राहतो तेव्हा परस्परांना उत्तेजन मिळते. (रोमकर १:११, १२) मंडळीतील सदस्य “एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्नति करा,” या प्रेषित पौलाच्या सल्ल्याचा अवलंब करतात, तेव्हा आपल्या विश्वासाला धारदारपणा येतो. (१ थेस्सलनीकाकर ५:११) ख्रिस्ती सभांमधील नियमित उपस्थिती आपली देवावर प्रीती आहे हे देखील सूचित करते व देवाची स्तुती करण्याची आम्हाला संधी देते.—स्तोत्र ३५:१८.
‘प्रीती धारण करा’
९. प्रेमाचे प्रदर्शन करण्यामध्ये यहोवाने कसे उदाहरण घालून दिले?
९ पौलाने लिहिले: “पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति ती ह्या सर्वांवर धारण करा.” (कलस्सैकर ३:१४) यहोवाने मोठ्या दयेने हे वस्त्र आम्हाला पुरवले आहे. ते कशा प्रकारे बरे? ख्रिस्तीजन प्रेम दाखवू शकतात, कारण ते यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या देव-प्रणीत फळांपैकी एक आहे. (गलतीकर ५:२२, २३) आपल्याला सार्वकालिक जीवनाची प्राप्ती व्हावी म्हणून स्वतःचा एकुलता एक पुत्र पाठवून यहोवाने स्वतः सर्वश्रेष्ठ प्रेम प्रकट केले आहे. (योहान ३:१६) प्रेमाच्या ह्या सर्वोच्च प्रदर्शनाने या गुणाचे वक्तव्य करण्याकरता आपल्याला नमुना दिला आहे. प्रेषित योहानाने लिहिले, “देवाने जर आपल्यावर अशा प्रकारे प्रीति केली, तर आपणहि एकमेकांवर प्रीति केली पाहिजे.”—१ योहान ४:११.
१०. आपल्याला ‘सबंध बंधुवर्गाच्या सहवासाकडून’ कसा लाभ मिळू शकतो?
१० राज्य सभागृहामध्ये सभांना उपस्थित राहिल्यामुळे तुम्हाला प्रीती प्रदर्शित करण्याची उत्तम संधी मिळेल. तेथे तुम्हाला विविध प्रकारांतील लोक भेटतील. तुम्ही त्यांच्यातील अनेकांकडे लगेच ओढले जाल यात काही संशय नाही. हे खरे की, यहोवाची सेवा करणाऱ्या व्यक्तींमध्येही फरक असतो. गतकाळात तुम्ही कदाचित, तुमच्या आस्थांमध्ये किंवा स्वभावाशी सहभागी न होणाऱ्या लोकांना टाळले असेल. पण ख्रिश्चनांना “सबंध बंधुवर्गावर प्रीती” करायची आहे. (१ पेत्र २:१७, NW) या कारणास्तव, राज्य सभागृहामध्ये भेटणाऱ्या सर्वांशी—मग त्यांचे वय, व्यक्तिमत्त्व, वंश व शैक्षणिक दर्जा तुमच्यापेक्षा भिन्न असला तरी—परिचित होण्याचे ध्येय ठेवा. तुम्हाला हे आढळेल की, प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या तरी चांगल्या गुणात श्रेष्ठ आहे.
११. यहोवाच्या लोकांमध्ये विविध व्यक्तिमत्त्व बघून तुम्हाला विचलित झाल्याचे का वाटू नये?
११ मंडळीतील वैयक्तिकांमधील विविधतेमुळे तुम्हाला विचलित होण्याची गरज नाही. उदाहरणार्थ, तुम्ही प्रवास करीत असता तुमच्या आजूबाजूने विविध वाहने जात असल्याची कल्पना करा. ती सर्वच एका वेगाने जात नाहीत किंवा त्या सर्वांची तांत्रिक स्थिती देखील एकसारखी नाही. काहींनी बराच मैल प्रवास केलेला असेल, पण तुम्हाप्रमाणे इतर काहीजणांनी नुकताच प्रवास आरंभ केला असेल. तथापि, इतके फरक असले तरी सर्व जण प्रवास करीत आहेत. हीच गोष्ट, ज्यांची मिळून मंडळी बनलेली आहे त्यांच्याबद्दल देखील खरी आहे. सर्वजण ख्रिस्ती गुणांची वाढ एकाच गतीने करीत नाहीत. तसेच, सर्वजण एकाच प्रकारच्या शारीरिक किंवा भावनिक स्थितीत नाहीत. काहींनी यहोवाची सेवा बऱ्याच वर्षापासून केली आहे तर इतरांनी नुकतीच सुरवात केली आहे. तरीही सर्व एकमेकांबरोबर मिळून “एकचित्ताने व एकमताने जोडलेले” असे सार्वकालिक जीवनाकडे नेणारा मार्ग आक्रमत आहेत. (१ करिंथकर १:१०) याकरता, मंडळीतील लोकांच्या श्रेष्ठ गुणांकडे बघा; त्यांच्या कमकुवत गुणांकडे बघू नका. तसे करण्यामुळे तुमच्या अंतःकरणाला तजेला मिळेल, कारण देव अशा लोकांमध्ये आहे याची तुम्हाला खरी जाणीव होईल. शिवाय ह्याच जागी राहण्याची तुमची खरी इच्छा असणार.—१ करिंथकर १४:२५.
१२, १३. (अ) मंडळीतील कोणी तुम्हाला दुखवले तर तुम्ही काय करू शकता? (ब) द्वेष न वाढवणे हे का महत्त्वाचे आहे?
१२ वस्तुतः सर्व मानव अपरिपूर्ण असल्यामुळे कधी कधी मंडळीतील कोणी असे काही म्हणेल वा करील ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ व्हाल. (रोमकर ३:२३) शिष्य याकोबाने अगदी खरेपणाने हे लिहिले: “आपण सगळेच पुष्कळ चुका करितो. कोणी जर बोलण्यात चुकत नाही तर तो मनुष्य पूर्ण होय.” (याकोब ३:२) कोणी तुम्हाला अडखळवले तर तुमची कशी प्रतिक्रिया असणार? बायबलचे एक नीतिसूत्रे म्हणते: “विवेकाने मनुष्य मंदक्रोध होतो; अपराधाची गय करणे त्याला भूषण आहे.” (नीतिसूत्रे १९:११) विवेक असण्याचा अर्थ, एखाद्याच्या परिस्थितीच्या खोलात जाऊन डोकावणे आणि कशामुळे तो मनुष्य तसा बोलतो वा वागतो त्याच्या मूळ कारणांना समजणे होय. आपल्या स्वतःच्या चुका आपण विवेकाने क्षम्य मानतो. तर मग, त्याचाच उपयोग इतरांचे अपरिपूर्णत्व समजण्यात व त्यावर पांघरूण घालण्यात का करू नये?—मत्तय ७:१-५; कलस्सैकर ३:१३.
१३ जर स्वतःला यहोवाकडून क्षमा मिळवावयाची आहे तर आपण देखील इतरांना क्षमा केलीच पाहिजे, हे आपण विसरता कामा नये. (मत्तय ६:९, १२, १४, १५) आपण सत्य आचरण्यास दुसऱ्यांना प्रेमळ मार्गाने वागवू. (१ योहान १:६, ७; ३:१४-१६; ४:२०, २१) यास्तव, मंडळीतील कोणाशी तुमचा वाद झाला तर त्याच्याविरुद्ध द्वेष बळावू नये म्हणून प्रतिकार करा. तुम्ही प्रीतीने वेष्ठीत झालेले आहात तर तो वाद मिटवण्याचा प्रयत्न कराल आणि जर चूक तुमचीच आहे तर क्षमा मागण्यामध्ये हयगय करणार नाही.—मत्तय ५:२३, २४; १८:१५-१७.
१४. आपण कोणत्या गुणांनी स्वतःला विभूषित करावे?
१४ आमच्या आध्यात्मिक वस्त्रप्रावरणात प्रीतीशी संबंधित असणाऱ्या इतर गुणांचा सुद्धा समावेश असला पाहिजे. पौलाने लिहिले: “करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा.” प्रीतीने वेढलेले हे गुण ईश्वरी ‘नव्या मनुष्यत्वाचे’ भाग आहेत. (कलस्सैकर ३:१०, १२) तुम्ही स्वतःला अशा प्रकारे विभूषित करण्यासाठी परिश्रम घ्याल का? तुम्ही स्वतःला बंधुप्रेमाने भूषित केले तर स्वतःवर येशूच्या शिष्यांचे ओळखचिन्ह धारण कराल, कारण त्याने म्हटले होते: “तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.”—योहान १३:३५.
सुरक्षिततेचे स्थान
१५. मंडळी एक प्रकारचा निवारा कसा आहे?
१५ मंडळी एक निवारा, संरक्षक आश्रयस्थान असू शकते, जेथे तुम्हाला सुरक्षित असल्याचे वाटेल. यामध्ये तुम्हाला देवाच्या दृष्टीने जे योग्य तेच आचरण्याचा प्रयत्न करणारे प्रामाणिक हृदयाचे लोक भेटतील. तुम्ही ज्या वाईट सवया व प्रवृत्त्यांवर विजय मिळवण्याकरता झगडत आहात त्या यापैकीच्या बहुतेकांनी काढून टाकल्या आहेत. (तीतास ३:३) ते तुम्हाला मदत करू शकतील, कारण आपल्याला “एकमेकांची ओझी वाहा,” असे सांगण्यात आले आहे. (गलतीकर ६:२) अर्थात, सार्वकालिक जीवनाकडे नेणारा मार्ग चोखाळणे ही स्वाभाविकपणे, तुमची सर्वतोपरी जबाबदारी आहे. (गलतीकर ६:५; फिलिप्पैकर २:१२) तरीही, यहोवाने मदत व आधार देण्याचे उपकरण म्हणून ख्रिस्ती मंडळीला पुरवले आहे. तुमची समस्या कितीही त्रासदायक असली तरीही तुम्हाला महत्त्वपूर्ण साधन उपलब्ध आहे—पीडादायक काळात किंवा संकटकाळात तुमच्या बाजूला उभी राहील अशी प्रेमळ मंडळी.—पडताळा लूक १०:२९-३७; प्रेषितांची कृत्ये २०:३५.
१६. मंडळीतील वडील कोणती मदत देतात?
१६ तुम्हाला आधार देण्यासाठी उभे असणाऱ्यांमध्ये “मानवांना देणग्या”—मंडळीतील नियुक्त वडील किंवा पर्यवेक्षक आहेत, जे कळपाची देखरेख स्वेच्छेने व उत्सुकतेने करतात. (इफिसकर ४:८, ११, १२; प्रेषितांची कृत्ये २०:२८; १ पेत्र ५:२, ३) यांच्याबद्दल यशयाने भविष्यवाणी केली होती: “वाऱ्यापासून आसरा व वादळापासून निवारा . . . रुक्ष भूमीत पाण्याचे नाले, तप्त भूमीत विशाळ खडकाची छाया” असे ते होतील.—यशया ३२:२.
१७. (अ) खासपणे कोणत्या प्रकारची मदत द्यायची येशूची इच्छा होती? (ब) देवाने त्याच्या लोकांसाठी कोणती तरतूद करण्याचे अभिवचन दिले?
१७ येशू पृथ्वीवर होता तेव्हा धर्मपुढाऱ्यांत प्रेमळ देखरेखीची खूपच उणीव दिसत होती. लोकांची स्थिती बघून त्याचे अंतःकरण विदारले; अशांना खास आध्यात्मिक मदत द्यायची त्याने उत्कट इच्छा धरली. येशूला त्यांची दया आली, कारण “मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते गांजलेले व पांगलेले होते.” (मत्तय ९:३६) हे, सध्या कितीतरी लोक ज्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या समस्यांना तोंड देत आहेत; पण आध्यात्मिक मदत व सांत्वन मिळण्यासाठी कोणाकडे वळता येत नाही त्या स्थितीचे केवढे समर्पक वर्णन देते! पण यहोवाच्या लोकांपाशी आध्यात्मिक मदत उपलब्ध आहे, कारण त्याने हे अभिवचन दिले: “मी त्यांजवर मेंढपाळ नेमीन, ते त्यांस चारितील, म्हणजे ते पुढे भिणार नाहीत, घाबरणार नाहीत, कमी होणार नाहीत.”—यिर्मया २३:४.
१८ आपल्याला आध्यात्मिक मदतीची गरज आहे तर वडिलांकडे का जावे?
१८ मंडळीतील नियुक्त वडिलांची ओळख करून घ्या. देवाविषयीच्या ज्ञानाचा अवलंब करण्यामध्ये त्यांना खूप अनुभव आहे, कारण यांनी बायबलमध्ये पर्यवेक्षकांकरता ज्या गुणवत्ता दर्शवण्यात आल्या आहेत त्या संपादन केल्या आहेत. (१ तीमथ्य ३:१-७; तीतास १:५-९) देवाच्या गरजांच्या विरुद्ध असणारी एखादी सवय किंवा लक्षण काढून टाकण्यासाठी तुम्हाला आध्यात्मिक मदत हवी असल्यास त्यांच्याकडे जाण्यासाठी कचरू नका. वडील पौलाच्या या सूचनेचा अवलंब करीत असल्याचे तुम्हाला दिसेल: “जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या, अशक्तांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा.”—१ थेस्सलनीकाकर २:७, ८; ५:१४.
यहोवाच्या लोकांसोबत सुरक्षिततेचा आनंद घ्या
१९. यहोवाने त्याच्या संघटनेचा आश्रय घेणाऱ्यांवर कोणता आशीर्वाद पाठवला आहे?
१९ आपण सध्या अपरिपूर्ण स्थितीत असलो तरीही यहोवा आपल्याला आध्यात्मिक अन्न, वस्त्र व निवारा देत आहे. अर्थात आपणाला पार्थिव परादीसचे लाभ अनुभवायचे आहेत तर देवाने अभिवचन दिलेल्या नव्या जगाकरता थांबून राहिले पाहिजे. पण जे यहोवाच्या संघटनेचे भाग आहेत ते सध्या आध्यात्मिक परादीसची सुरक्षितता अनुभवत आहेत. त्यांच्याबद्दल यहेज्केलने भविष्यकथन केले: “ते निर्भय वसतील; कोणी त्यांस भीति घालणार नाही.”—यहेज्केल ३४:२८; स्तोत्र ४:८.
२०. यहोवाच्या उपासनेकरता आपल्याला जो काही त्याग करावा लागेल त्याची भरपाई तो कशी करील?
२० यहोवा त्याचे वचन व संघटना यांद्वारे प्रेमळ आध्यात्मिक तरतुदी करीत आहे याबद्दल आपण किती कृतज्ञ आहोत! देवाच्या लोकांजवळ या. देवाविषयीचे ज्ञान घेता म्हणून आपल्याबद्दल मित्र किंवा नातेवाईक काय विचार करतील याचे भय वाटून माघार घेऊ नका. तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांसोबत संबंध ठेवून आहात व राज्य सभागृहात सभांना जाता हे काही लोकांना आवडणार नाही. पण देवाच्या उपासनेकरता तुम्ही जो काही त्याग कराल त्याची तो उदारतेने भरपाई करील. (मलाखी ३:१०) याशिवाय, येशूने म्हटले: “ज्याने ज्याने माझ्याकरिता व सुवार्तेकरता घरदार, बहीणभाऊ, आईबाप, मुलेबाळे किंवा शेतवाडी सोडली आहे, अशा प्रत्येकाला सांप्रतकाळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन ही मिळाल्याशिवाय राहणार नाहीत.” (मार्क १०:२९, ३०) होय, तुम्ही जे मागे टाकले आहे किंवा जे सहन करीत आहात ते काहीही असले तरी देवाच्या लोकांमध्ये आनंददायी मित्रत्वाचा आणि आध्यात्मिक सुरक्षेचा अनुभव घेऊ शकाल.
तुमच्या ज्ञानाचे परीक्षण करा
‘विश्वासू व बुद्धिमान दास’ कोण आहे?
यहोवाने आमची आध्यात्मिकरित्या भरवणूक व्हावी म्हणून काय तरतूद केली आहे?
ख्रिस्ती मंडळीत असणारे आमची कशी मदत करू शकतात?
[Full-page picture on page 165]