सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
कोणत्याही माणसाला सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य असे विश्वसनीयपणे म्हणता येणे शक्य आहे का? कोणा माणसाच्या श्रेष्ठत्वाचे मोजमाप कसे करतात? त्याच्या अलौकिक लष्करी नैपुण्याद्वारे? त्याच्या शारीरिक सामर्थ्याने? त्याच्या असामान्य बौद्धिक कौशल्याने?
इतिहासकार एच. जी. वेल्स यांनी म्हटले की, ‘आपल्यामागे वाढण्यासाठी सोडलेल्या गोष्टी आणि आपल्या पश्चात टिकणाऱ्या जोमाने त्याने इतरांना नव्या दिशेने विचार करण्याची सुरवात करून दिली किंवा नाही,’ याद्वारे माणसाची श्रेष्ठता मोजता येऊ शकते.
थोर सिकंदर, चार्लमॅग्ने (याला त्याच्या हयातीतच “थोर” म्हटले गेले), आणि नेपोलियन बोनापार्ट हे सामर्थ्यशाली राज्यकर्ते होते. त्यांच्या जबरदस्त व्यक्तीमत्त्वाने त्यांच्या प्रभुत्वाखालच्या लोकांवर ते प्रचंड प्रभाव टाकीत. तरी, नेपोलियनने एकदा असे म्हटल्याचे सांगण्यात येते की, “येशू ख्रिस्ताने आपल्या शारीरिक उपस्थितीविना आपल्या प्रजाजनांवर प्रभाव टाकला आहे व प्रभुत्व केले आहे.”
खरेच, येशूने आपल्या चेतनापूर्ण शिकवणीने व तिला अनुरुप असणाऱ्या आपल्या राहणीमानाने लोकांच्या जीवनावर प्रभाव टाकला आहे. एका लेखकाने यथायोग्य व्यक्त केल्याप्रमाणे, “आजपर्यंत चाल करून गेलेली सर्व सैन्ये, उभारलेल्या सर्व नौसेना, भरवलेल्या सर्व लोकसभा आणि सर्व राजांच्या कारकिर्दी या सर्वांनी मिळून या पृथ्वीवरील मानवाच्या जीवनावर येशूइतका जोरदार प्रभाव कोणी टाकलेला नाही.”
एक ऐतिहासिक व्यक्ती
पण विलक्षण गोष्ट अशी की, येशू कधी अस्तित्वातच नव्हता, तो पहिल्या शतकातील काही लोकांच्या कल्पनेतून साकारला आहे असे काहीजण म्हणतात. अशा शंकेखोर लोकांना उत्तर देताना सन्माननीय इतिहासकार विल ड्यूरांट यांनी प्रतिपादन केलेः “मूठभर साध्या लोकांनी, एका पिढीमध्ये, इतके जबरदस्त व आकर्षक व्यक्तीमत्त्व, इतकी उदात्त नैतिकता आणि मानवी बंधुत्वाचे इतके प्रेरणादायक ध्येय जोपासावे हा, येशूच्या चरित्रांमध्ये नमूद केलेल्या कोणत्याही चमत्कारापेक्षा अविश्वसनीय चमत्कार ठरेल.”
स्वतःला विचाराः कधीही अस्तित्वात नसलेला माणूस मानवी इतिहासावर इतक्या विलक्षणपणे परिणाम करू शकला असता का? द हिस्टोरियन्स हिस्टरी ऑफ द वर्ल्ड म्हणतेः “निव्वळ धर्मातीत भूमिकेतूनही, इतिहासातील इतर कोणत्याही व्यक्तीपेक्षा [येशूच्या] कार्याचे ऐतिहासिक परिणाम अधिक महत्त्वाचे आहेत. जगातील प्रमुख संस्कृतींनी मान्यता दिलेली नवी कालगणना त्याच्या जन्मापासूनच सुरु होते.”
होय, अमंळ विचार करा. आजची कॅलेंडरही, ज्या वर्षी येशू जन्मला आहे असा समज आहे त्यावर आधारलेली आहेत. द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडिआ खुलासा करतोः “त्या वर्षापूर्वीच्या तारखा इ. स. पू. किंवा इसा [येशू] च्या सनावळीपूर्वी [वर्षापूर्वी] म्हटल्या जातात. त्या नंतरच्या तारखा इ. स. म्हणजे इसा [येशू] चे सन [वर्ष] म्हटल्या जातात.”
असे असले तरीही, टिकाकार याकडे लक्ष वेधतात की, येशूबद्दल आपल्याला असलेली बहुतेक माहिती पवित्र शास्त्रात आढळते. ते म्हणतात की, त्याच्यासंबंधी इतर कोणतेही समकालीन वृत्तांत अस्तित्वात नाही. एच. जी. वेल्स यांनीही लिहिलेः “जुन्या रोमी इतिहासकारांनी येशूकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले; त्याच्या काळातील ऐतिहासिक अहवालांवर त्याने ठसा सोडला नाही.” पण हे खरे आहे का?
आरंभीच्या प्रापंचिक इतिहासकारांनी येशूचा केलेला उल्लेख अल्प असला तरी असे उल्लेख अस्तित्वात आहेत. पहिल्या शतकातील एक सन्मान्य रोमी इतिहासकार, कॉर्नोलियस टॅसिटस याने लिहिलेः “टायबेरियसच्या कारकिर्दीत प्रोक्युरेटर पॉन्टियस पायलट याने वध करवलेल्या ख्रिस्तापासून [ख्रिस्ती] हे नाव बनले आहे.” त्या काळचे इतर रोमी लेखक स्यूटोनियस आणि धाकटा प्लिनी यांनीही ख्रिस्ताचा उल्लेख केला. त्याशिवाय, पहिल्या शतकातील फ्लॅवियस जोसेफस या यहुदी इतिहासकाराने याकोबाबद्दल लिहिलेः “ख्रिस्त म्हटलेल्या येशूचा भाऊ.”
यामुळे द न्यू एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिका असे अनुमान काढतोः “अपुऱ्या आधारावर १८व्या शतकाच्या शेवटी, १९व्या शतकात आणि २०व्या शतकाच्या सुरवातीला प्रथम आक्षेप घेतल्या गेलेल्या येशूच्या ऐतिहासिकपणाबद्दल प्राचीन काळी ख्रिस्ती धर्माच्या विरोधकांनीही कधी शंका घेतली नाही असे हे स्वतंत्र अहवाल सिद्ध करतात.”
तथापि, प्रामुख्यत्वे येशूबद्दलची सर्व माहिती पहिल्या शतकातील त्याच्या अनुयायांनी नमूद केली होती. त्यांचे अहवाल पवित्र शास्त्रातील मत्तय, मार्क, लूक व योहान यांनी लिहिलेल्या पुस्तकात जतन केलेले आहेत. येशूची ओळख देताना हे अहवाल काय म्हणतात?
खरोखर, तो कोण होता?
पहिल्या शतकातील येशूच्या सहकाऱ्यांनी या प्रश्नावर विचार केला. येशूने वादळी समुद्राला दटावून अद्भुतरित्या शांत केलेले पाहिल्यावर, आश्चर्यचकित होऊन त्यांना हा प्रश्न पडलाः “हा आहे तरी कोण?” पुढे दुसऱ्या एके प्रसंगी येशूने त्याच्या प्रेषितांना विचारलेः “तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?”—मार्क ४:४१; मत्तय १६:१५.
तुम्हाला तोच प्रश्न विचारला गेला असता तर तुम्ही कसे उत्तर दिले असते? येशू वस्तुतः देव होता का? आज अनेकजण म्हणतात की, तो देव होता. पण तो देव होता असा विश्वास त्याच्या सोबत्यांनी कधीही धरला नाही. येशूच्या प्रश्नाला प्रेषित पेत्राची प्रतिक्रिया अशी होतीः “आपण ख्रिस्त, जिवंत देवाचे पुत्र आहा.”—मत्तय १६:१६.
देव असल्याचा दावा येशूने कधीही केला नाही. पण तो वचनयुक्त मशीहा वा ख्रिस्त असल्याचे त्याने मान्य केले. तो देव नव्हे तर “देवाचा पुत्र” होता असेही त्याने म्हटले. (योहान ४:२५, २६; १०:३६) येशू, इतर कोणत्याही माणसासारखा माणूस होता असे पवित्र शास्त्र म्हणत नाही. इतर सर्व गोष्टींपूर्वी देवाने त्याला घडविले होते. या कारणामुळे तो अत्यंत विशेष व्यक्ति होता. (कलस्सैकर १:१५) भौतिक विश्व देखील बनवले जाण्यापूर्वी, कोट्यावधी वर्षे, एक आत्मिक व्यक्ती म्हणून येशू स्वर्गात राहात होता आणि त्याचा पिता, निर्माणकर्ता यहोवा देव याच्याशी तो घनिष्ट सोबतीचा आस्वाद घेत होता.—नीतीसूत्रे ८:२२, २७-३१.
मग, सुमारे दोन हजार वर्षापूर्वी देवाने त्याच्या पुत्राचे जीवन एका स्त्रीच्या उदरात स्थलांतरित केले; आणि येशू सामान्य रितीने स्त्रीपासून जन्माला आलेला देवाचा मानवी पुत्र झाला. (गलतीकर ४:४) उदरात येशूची वाढ होत असता तसेच बालक म्हणून तो मोठा होता असताना, देवाने त्याचे पृथ्वीवरील आईवडील होण्यासाठी निवडलेल्यांवर तो अवलंबून होता. कालांतराने येशू पौरुषत्वाला आला आणि पूर्वी स्वर्गात देवाशी असलेल्या त्याच्या सोबतीची पूर्ण आठवण त्याला बहाल करण्यात आली.—योहान ८:२३; १७:५.
त्याला सर्वश्रेष्ठपणा कशामुळे मिळाला
आपल्या स्वर्गीय पित्याचे काळजीपूर्वक अनुकरण केल्यामुळे येशू सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य बनला. एक निष्ठावंत पुत्र या नात्याने येशूने त्याच्या पित्याची इतकी हुबेहुब नक्कल केली की, तो आपल्या अनुयायांना सांगू शकला की, “ज्याने मला पाहिले आहे त्याने पित्याला पाहिले आहे.” (योहान १४:९, १०) पृथ्वीवर कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याच्या पित्याने, सर्वसमर्थ देवाने, जसे केले असते तसेच त्याने केले. येशूने खुलासा केलाः “मी आपण होऊन काही करीत नाही, तर मला पित्याने शिकवल्याप्रमाणे मी ह्या गोष्टी बोलतो.” (योहान ८:२८) त्यामुळे आपण येशूच्या जीवनाचा अभ्यास करतो तेव्हा वस्तुतः आपल्याला देव कसा आहे याचीच स्पष्ट कल्पना मिळते.
अशाप्रकारे, “देवाला कोणीही कधीच पाहिले नाही,” असे योहानाने मान्य केले असले तरीही तो लिहू शकला की, “देव प्रीती आहे.” (योहान १:१८; १ योहान ४:८) खरे म्हणजे, येशू त्याच्या पित्याचे तंतोतंत प्रतिरुप असल्यामुळे योहानाने येशूमध्ये जे काही पाहिले त्याद्वारे त्याला देवाचे प्रेम समजू शकले व यामुळेच तो वर असलेले विधान लिहू शकला. येशू दयाळू, कृपाळू, नम्र व लोकांना जवळ करणारा होता. पुरुष, स्त्रिया, मुले, श्रीमंत, दरिद्री, बलवान, अत्यंत पापी अशा सर्व लोकांप्रमाणे दीन व दलितांना देखील त्याच्या सान्निध्यात तजेला वाटत असे. तो केवळ दुष्ट अंतःकरणाच्या लोकांना आवडला नाही.
परस्परांवर प्रेम करावे असे येशूने त्याच्या अनुयायांना नुसते शिकवले नाही; तर खरोखर ते कसे करावे हे त्याने त्यांना दाखवले. तो म्हणालाः “जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी.” (योहान १३:३४) त्याच्या एका प्रेषिताने स्पष्ट केले की, “ख्रिस्ताची प्रीती” जाणणे “बुद्धीस अगम्य” आहे. (इफिसकर ३:१९) होय, ख्रिस्ताने प्रदर्शित केलेले प्रेम कोरड्या ज्ञानापेक्षा उदात्त असून त्याला प्रतिसाद देण्यासाठी इतरांना “गळ घालते.” (२ करिंथकर ५:१४; पंडिता रमाबाई भाषांतर) अशा प्रकारे, येशूच्या, विशेषतः प्रेमाच्या अतुलनीय उदाहरणाने त्याला सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य केले गेले. गेल्या अनेक शतकांमध्ये, त्याच्या प्रेमाने लाखो लोकांच्या अंतःकरणाला स्पर्श केला असून त्यांच्या जीवनावर चांगला प्रभाव टाकला आहे.
तरीही काही लोक आक्षेप घेतील व म्हणतीलः “क्रुसेड युद्धे, इन्क्विझिशन (मध्ययुगातील धार्मिक चौकशा) आणि युद्धात परस्पर-विरुद्ध बाजूस उभ्या ठाकलेल्या, ख्रिस्ती असल्याचा दावा करणाऱ्या लाखो लोकांनी एकमेकांना मारले अशी ती युद्धे, अशा ख्रिस्ताच्या नावाने करण्यात आलेल्या या सर्व गुन्ह्यांकडे पहा.” पण, खरी गोष्ट अशी की, हे लोक, येशूचे अनुयायी असल्याचा त्यांच्या दाव्याला आचरणात आणण्यात उणे पडले आहेत. हिंदू महात्मा गांधींनाही असे म्हणावे लागलेः “मला ख्रिस्त आवडतो. पण ख्रिस्ताच्या आचरणासारखे त्यांचे आचरण नसल्याने मला ख्रिस्ती लोकांचा तिरस्कार वाटतो.”
त्याच्याबद्दल माहिती शिकून घेऊन लाभ मिळवून घ्या
येशूचे जीवन व सेवाकार्य यांच्या तुलनेत कोणताही इतर अभ्यास निश्चितच महत्त्वाचा नाही. प्रेषित पौलाने आग्रहाने सांगितलेः “येशूकडे लक्षपूर्वक पहा.” “त्याच्याविषयी खरोखर, मनापासून विचार करा.” (न्यू.व.) आपल्या पुत्रासंबंधाने देवाची स्वतःची आज्ञा आहेः “ह्याचे तुम्ही ऐका.” हेच करण्यासाठी, सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य हे पुस्तक तुम्हाला मदत देईल.—इब्रीयांस १२:२, ३; मत्तय १७:५.
येशूसंबंधी शुभवर्तमानाच्या चारही पुस्तकांमध्ये नमूद केलेली माहिती, त्याने दिलेली भाषणे आणि त्याचे दाखले व चमत्कार यांच्यासह येशूच्या पृथ्वीवरील जीवनातील प्रत्येक घटना सादर करण्याचा येथे प्रयत्न करण्यात आला आहे. शक्यतो, सर्व गोष्टी ज्या क्रमाने घडल्या तशा सांगितल्या आहेत. प्रत्येक अध्यायाच्या शेवटी, तो अध्याय ज्या पवित्र शास्त्र वचनांवर आधारित आहे त्यांची यादी आहे. ती शास्त्रवचने वाचावीत आणि दिलेल्या चाचणी प्रश्नांची उत्तरे द्यावी असे आम्ही तुम्हाला उत्तेजन देतो.
शिकागो युनिव्हर्सिटीतील एका विद्वानाने नुकताच दावा केलाः “गेल्या दोन हजार वर्षांपेक्षा मागच्या वीस वर्षात येशूबद्दल अधिक लिहिले गेले आहे.” तसे असले तरीही शुभवर्तमान अहवालांचा व्यक्तीगतपणे विचार करण्याची गरज आहे, कारण द एन्सायक्लोपिडिआ ब्रिटानिका मध्ये म्हटल्यानुसारः “आधुनिक अभ्यासकांपैकी अनेकजण येशू व शुभवर्तमान याबद्दल परस्पर विरोधी मिमांसेमध्ये इतके गढले आहेत की, त्यांचे या मूळ स्रोतांच्या अभ्यासाकडे जवळजवळ दुर्लक्षच झालेले आहे.”
शुभवर्तमानांच्या अहवालांचा बारकाईने व कोणताही पूर्वग्रह न धरता अभ्यास केल्यावर, नासरेथकर येशू ज्यावेळी पृथ्वीवर आला आणि आम्हाखातर त्याने आपले जीवन दिले तेव्हा रोमी कैसर ऑगस्टस याच्या कारकिर्दीत मानवी इतिहासातील सर्वात मोठी घटना घडली या गोष्टीशी तुम्ही सहमत व्हाल अशी आम्हाला खात्री वाटते.