वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • pe अध्या. २८ पृ. २३१-२३७
  • एकमेकांसोबत प्रेमाने राहणे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एकमेकांसोबत प्रेमाने राहणे
  • तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अपूर्णतेचे परिणाम
  • प्रेमाने समस्या सोडवणे
  • एकमेकांवरचं प्रेम आपण मजबूत कसं करत राहू शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • मनापासून क्षमा करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
  • तुमचं प्रेम वाढत राहो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१९
  • “सर्वात महत्त्वाची बाब ही आहे की, तुम्ही एकमेकांवर गाढ प्रीती करीत राहा”
    जागृत राहा!
अधिक माहिती पाहा
तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल
pe अध्या. २८ पृ. २३१-२३७

प्रकरण २८

एकमेकांसोबत प्रेमाने राहणे

१. (अ) तुम्ही देवाच्या संघटनेत कसे सहभागी होऊ शकाल? (ब) तर मग तुम्ही कोणती आज्ञा पाळली पाहिजे?

यहोवा देव आणि त्याच्या हेतूविषयी तुमचे ज्ञान व जाणीव जसजशी वाढत जाईल तसतसे त्याच विश्‍वासात व आशेमध्ये सहभागी असलेल्या लोकांचा सहवास नेमाने घडावा असे तुम्हाला वाटेल. तसे केल्याने तुम्ही देवाच्या दृश्‍य संघटनेचे, खऱ्‍या ख्रिस्ती बंधुत्वाचे भागीदार व्हाल. तेव्हा, “बंधुवर्गावर प्रीती करा” या आज्ञेचे पालन तुम्हाला करावे लागेल.—१ पेत्र २:१७; ५:८, ९.

२. (अ) येशूने आपल्या अनुयायांना कोणती नवी आज्ञा दिली? (ब) “एकमेकांवर” या शब्दप्रयोगाने काय स्पष्ट होते? (क) प्रेम असणे हे किती महत्त्वाचे आहे?

२ आपल्या अनुयायांनी एकमेकांवर प्रीती करणे किती महत्वाचे आहे यावर येशू ख्रिस्ताने भर दिला. तो त्यांना म्हणालाः “मी तुम्हास नवी आज्ञा देतो की, तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. . . . तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरुन सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा.” (योहान १३:३४, ३५) “एकमेकांवर” या शब्दप्रयोगानेच कळते की, सर्व खरे ख्रिस्ती एका गटात वा संघटनेमध्ये एकत्रित झालेले असतील. (रोमकर १२:५; इफिसकर ४:२५) शिवाय ती संघटना, त्यातील सभासदांच्या एकमेकांवरील प्रीतीमुळेच ओळखली जाईल. जर कोणाठायी प्रीती नसेल तर सर्व काही व्यर्थ आहे.—१ करिंथकर १३:१-३.

३. ख्रिस्ती बांधवांवर प्रीती करण्यावर व त्यांची काळजी वाहण्यावर पवित्र शास्त्राने कसा भर दिला आहे?

३ याकरताच आरंभीच्या ख्रिस्तीजनांना अनेकदा याविषयीचे स्मरण याप्रकारे देण्यात आले होतेः “एकमेकांचा स्वीकार करा.” “एकमेकांचे दास व्हा.” “एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा.” “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा.” “एकमेकांचे सांत्वन करा व एकमेकांची उन्‍नती करा.” “आपसात शांतीने राहा.” “एकमेकांवर एकनिष्ठेने प्रीती करा.”—रोमकर १२:१०; १५:७; गलतीकर ५:१३; इफिसकर ४:३२; कलस्सैकर ३:१३, १४; १ थेस्सलनीकाकर ५:११, १३; १ पेत्र ४:८; १ योहान ३:२३; ४:७, ११.

४. (अ) “एकमेकां”शिवाय इतरांवरही ख्रिस्ती लोकांनी प्रेम करावे हे कशावरुन दिसून येते? (ब) ख्रिश्‍चनांनी विशेषतः कोणावर प्रेम केले पाहिजे?

४ परंतु याचा असा अर्थ नव्हे की, खऱ्‍या ख्रिश्‍चनांनी केवळ देवाच्या संघटनेतील सभासद बंधूवरच प्रीती करावी. त्यांनी इतरांवर देखील प्रीती करावी. खरे म्हणजे, त्यांची “प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढावी,” असे उत्तेजन पवित्र शास्त्र देते. (१ थेस्सलनीकाकर ३:१२; ५:१५) समतोल दृष्टीने सांगताना प्रेषित पौलाने लिहिलेः “आपण सर्वांचे व विशेषतः विश्‍वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे.” (गलतीकर ६:१०) तेव्हा ख्रिस्ती लोकांनी शत्रूसह सर्वांना प्रेम दाखवावयाचे आहे तरीही देवाच्या संघटनेच्या सभासदांवर, त्यांच्या आध्यात्मिक बंधु-भगिनींवर, त्यांनी विशेष प्रेम केले पाहिजे.—मत्तय ५:४४.

५. पुरातन काळी तसेच आजही खरे ख्रिश्‍चन त्यांच्या प्रीतीबद्दल वाखाणले जात आहेत हे कशावरुन दिसून येते?

५ एकमेकांवर असे प्रेम असण्याबद्दल आरंभीच्या ख्रिस्ती लोकांची विशेष ख्याति होती. ‘पहा, ते एकमेकांवर कसे प्रेम करतात व एकमेकांसाठी प्राण देण्यास कसे तयार असतात!’ असे त्यांच्याबद्दल लोक म्हणत असत असे टर्टुलियन या दुसऱ्‍या शतकातील लेखकाने लिहिले आहे. हेच प्रेम आजच्या खऱ्‍या ख्रिस्तीजनांमध्येही दिसते आहे. पण याचा अर्थ खऱ्‍या ख्रिश्‍चनात समस्या वा अडचणी कधीच उद्‌भवत नाही असा आहे का?

अपूर्णतेचे परिणाम

६. खरे ख्रिस्ती सुद्धा कधी तरी एकमेकांविरुद्ध पाप का करतात?

६ पवित्र शास्त्राच्या अभ्यासावरुन तुम्हाला हे कळलेच आहे की, आदाम व हव्वा या आपल्या मूळ पूर्वजापासून अनुवंशिकतेने आपणा सर्वांना अपूर्णता मिळालेली आहे. (रोमकर ५:१२) त्यामुळे चुका करण्याकडे आपला कल असतो. पवित्र शास्त्र म्हणतेः “आपण सगळेच पुष्कळ चुका करतो.” (याकोब ३:२; रोमकर ३:२३) तेव्हा, देवाच्या संघटनेतील सभासद देखील अपूर्ण असून ते कधी कधी अयोग्य गोष्टी करतात हे तुम्हाला माहीत असले पाहिजे. यामुळेच खऱ्‍या ख्रिश्‍चनांमध्येही समस्या व अडचणी येतात.

७. (अ) “एकचित्त व्हा” असे युवदिया व सुंतुखेला सांगण्याची जरुरी का पडली? (ब) मुळात त्या चांगल्या ख्रिस्ती स्त्रिया होत्या हे कशावरुन दिसून येते?

७ फिलिप्पै येथील मंडळीमधील युवदिया व सुंतुखे या दोन स्रियांमधील परिस्थितीच पहा. प्रेषित पौलाने लिहिलेः “मी युवदियेला विनंती करतो व सुंतुखेला विनंती करतो की तुम्ही प्रभूच्या ठायी एकचित्त व्हा.” या दोन स्त्रियांना “एकचित्त व्हा” असे पौलाने का उत्तेजन दिले? त्या दोघींमध्ये काही भानगड होती हे उघड आहे. ती कोणती ते पवित्र शास्त्र सांगत नाही. कदाचित काही कारणांमुळे त्यांच्याविषयी परस्परांविषयी मत्सर उद्‌भवला असेल. परंतु मुळात त्या चांगल्या स्त्रिया होत्या. त्या ख्रिस्ती होऊन काही काळ लोटला होता, कारण काही वर्षांपूर्वी त्या प्रचार कार्यात पौलासोबत सहभागी झाल्या होत्या. यासाठीच त्याने त्या मडळीला लिहिलेः “ह्‍या ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर . . . सुवार्तेच्या कामी श्रम केले त्यांना सहाय्य कर.”—फिलिप्पैकर ४:१-३.

८. (अ) पौल व बर्णबा यांच्यामध्ये कोणता वाद झाला? (ब) तुम्ही तेथे असता आणि हा वाद पाहिला असता तर तुम्ही काय निष्कर्ष काढला असता?

८ तसेच पौल व प्रवासातील त्याचा सोबती वर्णबा यांच्यामध्ये एकदा वाद निर्माण झाला. प्रचारासाठी दुसऱ्‍यांदा ते प्रवासास निघाले तेव्हा आपला भाऊ मार्क याला बरोबर न्यावे अशी बर्णबाची इच्छा होती. परंतु त्यांच्या पहिल्या प्रवासात तो त्यांना सोडून मध्येच घरी परतला होता. यासाठीच त्याला सोबत नेण्याची पौलाची इच्छा नव्हती. (प्रे. कृत्ये १३:१३) पवित्र शास्त्र म्हणतेः “ह्‍यावरुन त्यांच्यामध्ये तीव्र मतभेद उपस्थित होऊन ते एकमेकांपासून वेगळे झाले.” (प्रे. कृत्ये १५:३७-४०) हे असे काही घडू शकेल असे तुम्हाला वाटते का? तुम्ही त्या घटनास्थळी असता व हा “तीव्र मतभेद” पाहिला असता तर पौल व बर्णबा यांनी जी वागणूक केली ती बघून हे दोघे देवाच्या संघटनेचे सभासद नाहीत असा तुम्ही निष्कर्ष काढला असता का?

९. (अ) पेत्राने कोणते पाप केले, व तो असा का वागला? (ब) त्या घटना पाहून पौलाने काय केले?

९ दुसऱ्‍या एका प्रसंगी प्रेषित पेत्राची चूक घडली. यहुदी मतातून ख्रिस्ती धर्मात परिवर्तित झालेले काही लोक आपल्या परराष्ट्रीय बंधूना तुच्छ समजत. यांच्या मर्जीतून आपण उतरु या भीतीने पेत्राने परराष्ट्रीय ख्रिस्ती बांधवाशी घनिष्ट सहवास राखणे थांबवले. (गलतीकर २:११-१४) पेत्राचे हे वर्तन पौलाच्या नजरेस आले तेव्हा त्याने सर्वांसमक्ष पेत्राला त्याच्या गैरवर्तनाबद्दल फटकारले. त्या घटनास्थळी तुम्हीच पेत्र असता तर तुम्हाला काय वाटले असते?—इब्रीयांस १२:११.

प्रेमाने समस्या सोडवणे

१०. (अ) पेत्राची चूक निदर्शनाला आणली तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय झाली? (ब) पेत्राच्या उदाहरणावरुन आपल्याला काय शिकता येते?

१० पेत्र पौलावर चिडला असता. पौलाने ज्या रितीने सर्वांसमक्ष त्याला ताडण केले त्यामुळे पेत्राने मन दुखावून घेतले असते. (उपदेशक ७:९) पण पेत्र नम्र होता. त्याने वाग्दंडाचा स्वीकार कला व पौलाविषयी आपल्या मनातील प्रेम कमी होऊ दिले नाही. (१ पेत्र ३:८, ९) पेत्राने काही काळानंतर ख्रिस्ती बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी लिहिलेल्या पत्रामध्ये पौलाचा कसा उल्लेख केला आहे ते पहा. तो म्हणतोः “आपल्या प्रभुची सहनशीलता तारणच आहे असे समजा; आपला प्रिय बंधु पौल ह्‍याला देण्यात आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेही तुम्हास असेच लिहिले आहे.” (२ पेत्र ३:१५) होय. आपल्याच अयोग्य वर्तनाने निर्माण झालेल्या या समस्येवर पेत्राने प्रेमाने पांघरुण घातले.—नीतीसूत्रे १०:१२.

११. (अ) पौल व बर्णबा यांजमध्ये संतापाचा उद्रेक झाला होता तरी या दोघांनीही, आपण खरे ख्रिस्ती असल्याचे कसे दर्शविले? (ब) त्यांच्या उदाहरणाने आपला कसा फायदा होतो?

११ पण, पौल व बर्णबा यांच्यामध्ये घडलेल्या वादाविषयी काय समजावे? तोही प्रेमाने मिटवला गेला. कारण कालांतराने पौलाने करिंथ येथील मंडळीस पत्र लिहिले तेव्हा त्याने बर्णबाचा उल्लेख जिवलग सहकारी असा केला. (१ करिंथकर ९:५, ६) जरी पौलाला मार्क हा सहप्रवासी म्हणून येण्यास अपात्र आहे असे काही सबळ कारणास्तव त्यावेळी वाटले होते तरी, कालांतराने या तरुणाने स्वतःमध्ये इतकी प्रौढता आणली की पौल तीमथ्याला हे लिहू शकलाः “मार्काला आपल्या बरोबर घेऊन ये. कारण तो सेवेसाठी मला उपयोगी आहे.” (२ तीमथ्य ४:११) अशाप्रकारे, समस्या कशा सोडविता येतात याबद्दल ह्‍या उदाहरणाद्वारे आपल्याला फायदा घेता येतो.

१२. (अ) युवदिया व सुंतुखे यांनी आपसातील मतभेद मिटवले असावेत असे आपण का गृहीत धरु शकतो? (ब) गलतीकर ५:१३-१५ नुसार ख्रिश्‍चनांनी आपले मतभेद प्रेमाने मिटवणे अत्यंत जरुरीचे का आहे?

१२ याचप्रमाणे युवदिया व सुंतुखे यांच्याविषयी काय म्हणता येईल? परस्परांविरुद्ध जे काही पाप त्यांनी केले असेल त्यावर प्रेमाने पांघरुन घालून त्यांनी आपले मतभेद मिटविले का? त्यांचे शेवटी काय झाले ते पवित्र शास्त्र आपल्याला सांगत नाही. पण ख्रिस्ती सेवेमध्ये पौलाच्या बरोबर त्यांनी काम केले होते यावरुन त्यांना मिळालेला सल्ला त्यांनी नम्रतेने स्विकारला असेल असे गृहीत धरणे तर्कशुद्ध होईल. पौलाचे पत्र मिळाल्यावर त्यांनी एकमेकींकडे जाऊन आपली समस्या प्रेमाने कशी सोडवली असेल याची आपण कल्पना करु शकतो.—गलतीकर ५:१३-१५.

१३. प्रेम दाखविण्यात यहोवा देव कोणते उदाहरण घालून देतो?

१३ मंडळीतील विशिष्ट अशा एका किंवा अनेक व्यक्‍तींबरोबर जुळवून घेणे तुम्हाला कदाचित जड जात असेल. यांना खरे ख्रिस्ती गुण अजूनही पूर्णपणे आत्मसात झालेले नसले तरी विचार कराः लोकांनी त्यांचे सर्व वाईट मार्ग सोडेपर्यंत यहोवा देव त्यांना प्रेम दाखवण्याचे थांबवतो का? नाही. पवित्र शास्त्र म्हणते की, “देव आपणावरील स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला.” (रोमकर ५:८) देवाच्या या उदाहरणाचे अनुकरण करुन आपण सुद्धा वाईट व मूर्खपणाच्या गोष्टी करणाऱ्‍यांवर प्रेम केले पाहिजे.—इफिसकर ५:१, २; १ योहान ४:९-११; स्तोत्रसंहिता १०३:१०.

१४. दुसऱ्‍यांविषयी टिका न करण्याबद्दल येशूने काय सल्ला दिला?

१४ वस्तुतः आपण सर्व अपूर्ण आहोत त्यामुळे आपण इतरांवर टिका करु नये असे येशूने शिकवले. दुसऱ्‍यांच्या चुका घडतात हे खरे, पण तशाच आपल्या देखील होतात. “तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ का पाहतोस?” (मत्तय ७:१-५) हा सद्‌बोध ध्यानात ठेवल्याने आपल्या बंधू व भगिनींसोबत जुळवून घेण्यास मदत होईल.

१५. (अ) दुसऱ्‍यांविरुद्ध खरोखरच गाऱ्‍हाणे असले तरी त्यांना आपण क्षमा करणे का महत्त्वाचे आहे? (ब) मत्तयाच्या १८ व्या अध्यायातील दृष्टांतामध्ये क्षमाशीलतेविषयीची गरज येशूने कशी शिकविली?

१५ आपण दयाळू व क्षमाशील असणे अत्यंत जरुरीचे आहे. हे खरे की, एखाद्या बंधू वा भगिनीविरुद्ध तुमच्या तक्रारीत काही तथ्य असेल. पण पवित्र शास्त्राचा सल्ला लक्षात घ्याः “एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्‍हाणे असल्यास आपसात क्षमा करा.” पण, तुमचे कोणाविरुद्ध खरेच गाऱ्‍हाणे आहे तर तुम्ही त्याला क्षमा का करावी? पवित्र शास्त्र याचे उत्तर देताना म्हणतेः “कारण यहोवाने तुम्हाला क्षमा केली.” (कलस्सैकर ३:१३) आपल्या देवाकडून क्षमा हवी असल्यास आपण सुद्धा इतरांना क्षमा केली पाहिजे असे येशू म्हणाला. (मत्तय ६:९-१२, १४, १५) येशूच्या एका दृष्टांतातील राजाप्रमाणे यहोवाने आपल्याला हजारो वेळा क्षमा केली आहे. तर मग, आपण आपल्या बंधूला थोड्या वेळाही क्षमा करु शकत नाही का?—मत्तय १८:२१-३५; नीतीसूत्रे १९:११.

१६. (अ) १ योहान ४:२०, २१ नुसार देवाशी असलेल्या प्रीतीचा व ख्रिस्ती बंधुवरील प्रीतीचा कसा संबंध आहे? (ब) तुमच्या बंधूचे तुम्हाविरुद्ध गाऱ्‍हाणे असल्यास तुम्ही काय केले पाहिजे?

१६ सत्य आचरत असता आपण आपल्या बंधू व भगिनींसोबत प्रेमहीन व अक्षमाशीलतेने वागूच शकत नाही. (१ योहान ४:२०, २१; ३:१४-१६) तेव्हा, जर कधी आपल्या ख्रिस्ती सहकाऱ्‍यासोबत काही समस्या उत्पन्‍न झाली तर त्याच्याशी बोलणे बंद करु नका. मनात राग धरु नका, उलट प्रेमाने समस्या सोडवा. आपल्या बंधूचे मन तुम्ही दुखावले असल्यास माफी व क्षमा मागण्यास तत्पर असा.—मत्तय ५:२३, २४.

१७. कोणी तुम्हाला त्रास दिल्यास कोणत्या मार्गाने जाणे योग्य आहे?

१७ परंतु, तुमचा कोणी अपमान केला वा कोणत्या इतर मार्गाने तुम्हाला त्रास दिला तर काय? पवित्र शास्त्र सल्ला देतेः “मी जशास तसे करीन, त्याचे उसने फेडीन असे म्हणू नको.” (नीतीसूत्रे २४:२९; रोमकर १२:१७, १८) येशू ख्रिस्ताने सांगितलेः “जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर.” (मत्तय ५:३९) गालावरील चापट मारण्यात शारीरिक दुखापत करण्याचा हेतू नसतो, तर केवळ अपमान करण्याचा वा डिवचण्याचा असतो. अशारितीने, येशू आपल्या अनुयायांना मारामारी वा बाचाबाची कशी टाळावी हे शिकवीत होता. “वाईटाबद्दल वाईट व निंदेबद्दल निंदा” करण्याऐवजी तुम्ही “शांतीच्या प्राप्तीसाठी झटावे व तिचा मार्ग धरावा.”—१ पेत्र ३:९, ११; रोमकर १२:१४.

१८. सर्व लोकांवर प्रीती करण्याच्या देवाच्या उदाहरणावरुन आपण काय शिकले पाहिजे?

१८ आपण “बंधुवर्गावर प्रीती” करावी याची आठवण ठेवा. (१ पेत्र २:१७) याचे उदाहरण यहोवा देवाने घालून दिले आहे. तो पक्षपाती नाही. त्याच्या दृष्टीने सर्व वंश समान आहेत. (प्रे. कृत्ये १०:३४, ३५; १७:२६) येणाऱ्‍या “मोठ्या संकटातून” वाचणारे लोक, “सर्व राष्ट्रे, वंश, लोक व निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक” यातून निवडले जातील. (प्रकटीकरण ७:९, १४-१७) यास्तव, देवाचे अनुकरण करुन दुसरे लोक वेगळ्या वंशाचे, देशाचे, सामाजिक स्तरातले वा वेगळ्या वर्णाचे आहेत म्हणून त्यांच्यावर कमी प्रीती करु नये.

१९. (अ) आपण आपल्या ख्रिस्ती बांधवांकडे कशा दृष्टीने पहावे व त्यांच्याशी कसे वागावे? (ब) आपल्याला कोणता विलोभनीय हक्क अनुभवण्यास मिळेल?

१९ ख्रिस्ती मंडळीतील सर्वांसोबत चांगली ओळख करुन घ्या म्हणजे तुम्हाला त्यांच्याबद्दल प्रेम व आवड वाटेल. वडीलधाऱ्‍यांना आई-वडिलांसारखे समजून वागा, लहानांना भाऊ व बहिणी समजून वागा. (१ तीमथ्य ५:१, २) ज्याचे सभासद एकमेकांशी प्रेमाने जुळवून घेतात अशा कुटुंबासारख्या देवाच्या संघटनेत असणे हा खरोखरीच विलोभनीय असा हक्क आहे. अशा प्रेमळ कुटुंबासह पृथ्वीवरील नंदनवनात अनंतकाल जगणे हे किती छान असेल!—१ करिंथकर १३:४-८.

[२३३ पानांवरील चित्रं]

युवदिया व सुंतुखे यांच्या घटनेमुळे आपल्याला काय शिकायला मिळते?

[२३५ पानांवरील चित्रं]

पौल व बर्णबा यांजमध्ये जो वाद झाला होता त्यामुळे ते देवाच्या संघटनेचे भाग नव्हते असा अर्थ होतो का?

[२३६ पानांवरील चित्रं]

खरे ख्रिस्ती तक्रारीच्या सर्व कारणांवर प्रेमाने पांघरुन घालतात

[२३७ पानांवरील चित्रं]

देवाच्या संघटनेत ख्रिस्ती लोक प्रेमाने इतरांना आपल्यासमान वागणूक देतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा