प्रकरण ७
आपण येथे का आहोत
१. विचारवंतांनी कोणते अनुमान काढले आहे?
भूतलावरील आपल्या जीवनाचा अर्थ काय असावा याचा विचार लोक अनादिकालापासून करीत आहेत. त्यांनी ताऱ्यांनी नटलेले आकाश पाहिले. गुलाल उधळणारे सूर्यास्त व सुंदर प्रदेश पाहिले. या सर्वांना उद्दात हेतु असावा असे सर्व विचारवंतांना वाटते. परंतु या प्रचंड विश्वात आपले स्थान कोणते असावे याबद्दल मात्र त्यांना प्रश्न पडला आहे.—स्तोत्रसंहिता ८:३, ४.
२. लोकांना कोणते प्रश्न पडले आहेत?
२ पदरी पडेल ते घेऊन थोडा वेळ जगावे आणि मग मरावे, यासाठीच का आपण अस्तित्वात आहोत? असा प्रश्न बहुतेक लोकांना आयुष्यात एकदा तरी पडतो. आपण खरोखर कोठे चाललो आहोत? जन्म, जीवन व मृत्युच्या संक्षिप्त चक्रापेक्षा आपण अधिक अपेक्षा करावी का? (इयोब १४:१, २) आपण इथे कसे आलो ते कळल्यास वरील प्रश्नांची उत्तरे समजण्यास मदत होईल.
उत्क्रांती की निर्मिती?
३. उत्क्रांतीवाद काय शिकवतो?
३ आपल्या भोवतालच्या गोष्टी आपोआप अपघाताने अस्तित्वात आल्या असे काही ठिकाणी शिकवले जाते. असे म्हणतात की, कोट्यावधी वर्षांच्या कालावधीत, जीवन खालच्या पातळीच्या प्राण्यांपासून उत्क्रांत वा प्रगत होत होत शेवटी मानव अस्तित्वात आला. जगात अनेक ठिकाणी हा उत्क्रांतीवाद निर्विवाद सत्य म्हणून शिकवला जातो. परंतु लाखो वर्षांपूर्वीच्या माकडांपासून आपण बनलो हे खरे आहे का? हे अफाट विश्व काय अपघाताने बनले?
४. “देवाने आकाश व पृथ्वी उत्पन्न केली” यावर आपण विश्वास का ठेवू शकतो?
४ पवित्र शास्त्र म्हणतेः “प्रारंभी देवाने आकाश व पृथ्वी ही उत्पन्न केली.” (उत्पत्ती १:१) असंख्य ताऱ्यांनी भरलेले आकाश व पृथ्वी यांना निश्चित सुरुवात आहे असे विज्ञानानेहि सिद्ध झाले आहे. त्यांना उत्पन्न केले गेले. अनेक वर्षांनी तारे व ग्रहांचे स्थान कोणते असेल ते आधीच अचूक सांगता येते इतकी त्याची गति नियमित आहे. ताऱ्यांची व ग्रहांची गति गणिताच्या नियमांना व तत्वांना अनुसरुन असते. केंब्रिज विश्वविद्यालयाचे गणिताचे प्राध्यापक पी. डायरॅक यांनी सायंटिफिक अमेरिकन या नियतकालिकात म्हटलेः “देव अत्यंत उच्च कोटीचा गणिततज्ञ असून विश्वाची रचना करताना त्याने अतिशय प्रगत गणिताचा उपयोग केला आहे असे म्हणता येईल.”
५. आपण उत्क्रांतीमुळे उत्पन्न झालेले नसून निर्माण केलेले आहोत, हे आपल्या शरीरावरुन कसे कळते?
५ पवित्र शास्त्र म्हणतेः “यहोवा हाच देव आहे हे जाणा. त्यानेच आम्हाला उत्पन्न केले; आम्ही स्वतःला उत्पन्न केले नाही.” (स्तोत्रसंहिता १००:३) आपले शरीर इतके अद्भुत आहे की, “भयप्रद व अद्भुत रितीने माझी घडण झाली आहे म्हणून मी तुझे उपकारस्मरण करतो. मी गुप्त स्थानी निर्माण होत असताना . . . माझी आकृति तुला गुप्त नव्हती. मी गर्भात पिंडरुपाने असताना तुझ्या नेत्रांनी मला पाहिले; आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते तुझ्या वहीत नमूद करुन ठेवले होते.” असे एका शास्त्र लेखकाने देवाला भारावून म्हटले. (स्तोत्रसंहिता १३९:१४-१६) आपल्या आईच्या गर्भात मूल अद्भुत रितीने वाढते. त्याबद्दल न्यूजवीक नियतकालिक म्हणतेः “सोप्या शब्दात, तो एक चमत्कारच आहे. गर्भधारणा कोणत्या क्षणी होते हे कोणत्याहि तंत्राने सांगता येत नाही. त्यानंतर मानवी गर्भाचे अवयव व मज्जातंतूंचे जाळे बनण्यासाठी कोणती अद्भूत शक्ति कार्य करते ते कोणाही शास्त्रज्ञाला सांगता येत नाही.”
६. उत्क्रांतीपेक्षा निर्मितीवर विश्वास ठेवणे अधिक शहाणपणाचे का आहे?
६ या अफाट विश्वाचा तसेच आपल्या स्वतःच्या अद्भुत शरीर-रचनेचा व योजनेचा विचार करा. तेव्हा या गोष्टी उत्क्रांत होऊन वा आपोआप बनलेल्या नाहीत असे लक्षात येईल. त्यांची योजना करणारा व निर्माता असलाच पाहिजे. आपल्या भोवतालच्या इतर गोष्टी पहा. आपली खुर्ची, टेबल, दिवे, पलंग, भिंती, घर हे काय स्वतःच उत्क्रांत झाले? की त्यांना कोणीतरी बनवावे लागले? नक्कीच कोणा बुद्धीमान व्यक्तिने त्यांना घडविले! मग, गुंतागुंतीचे हे विश्व व आपल्यालाही निर्माण करण्यास कोणा निर्मात्याची गरज नाही असे कसे म्हणता येईल? आणि देवाने आपल्याला या जगात ठेवले असल्यास त्यामागे निश्चितच त्याचा काही हेतू असेल.
७. (अ) निर्मितीवर विश्वास असल्याचे येशूने कसे दाखवले? (ब) आदाम ही खरी व्यक्ति असल्याचा अधिक पुरावा कोणता?
७ पहिल्या स्त्री व पुरुषाबद्दल बोलताना येशूही म्हणालाः “उत्पन्नकर्त्याने सुरुवातीलाच नर व नारी अशी ती निर्माण केली व म्हटलेः ‘ह्याकरता पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या बायकोशी जडून राहील व ती दोघे एकदेह होतील.’” (मत्तय १९:४, ५) येथे येशूने, आदाम व हव्वा यांच्या निर्मितीसंबंधी उत्पत्ती १:२७ व २:२४ मधील अवतरणे दिली. अशा रितीने पवित्र शास्त्रातील हा वृत्तांत खरा असल्याचे त्याने सूचित केले. (योहान १७:१७) तसेच पवित्र शास्त्रात हनोखला “आदामापासून सातवा पुरुष” म्हटले आहे. (यहुदा १४) जर आदामच खरोखरचा नसता तर पवित्र शास्त्राने हनोखची अशी ओळख करुन दिली नसती.—लूक ३:३७, ३८.
८. माणसाच्या उत्पत्तीबद्दल पवित्र शास्त्र कोणती शिकवण देत नाही?
८ देवाने उत्क्रांतीद्वारे मानवाची निर्मिती केली असे काही लोक म्हणतात. उत्क्रांतीपासून मानव निर्माण होऊन त्याने एक विशिष्ट टप्पा गाठल्यावर, देवाने त्याच्यामध्ये जीव घातला असेही ते म्हणतात. परंतु ही कल्पना पवित्र शास्त्रात कोठेही आढळत नाही. उलट पवित्र शास्त्र म्हणतेः “प्रत्येक जातीचे प्राणी व वनस्पती देवाने निर्माण केले.” (उत्पत्ती १:११, २१, २४) एका जातीचा प्राणी वा वनस्पति कालांतराने दुसऱ्या जातीमध्ये बदलत नाही असे दिसून येते. आपण उत्क्रांतीने उत्पन्न झालो नाही हे सिद्ध करणारी अधिक माहिती लाईफ—हाव डिड इट गेट हिअर, बाय इव्होल्युशन ऑर बाय क्रिएशन? पुस्तकात सापडेल.
देवाने माणसाला कसे निर्माण केले
९. (अ) मनुष्याच्या निर्मितीचे वर्णन पवित्र शास्त्रात कसे केले आहे? (ब) देवाने मनुष्याच्या नाकपुड्यात “जीवनाचा श्वास” फुंकल्याने काय झाले?
९ देवाने माणसाला मातीपासून व पृथ्वीवर राहण्यासाठी बनविले. पवित्र शास्त्रात म्हटले आहेः “यहोवा देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जिवंत जीव झाला.” (उत्पत्ती २:७, न्यू. व.) यावरुन प्रत्यक्ष देवाने मानवाची निर्मिती केली असे दिसून येते. निर्मितीच्या विशेष कृतीमधून देवाने घडलेला माणूस पूर्ण व अव्यंग होता. देवाने माणसाच्या नाकपुड्यात “जीवनाचा श्वास” फुंकल्यावर माणसाची फुप्फुसे हवेने तर भरलीच पण त्याशिवाय अधिक साध्य झाले. देवाने अशा रितीने माणसाच्या शरीराला जीवन दिले. ही जीवनशक्ति श्वासोच्व्छासाद्वारे टिकविली जाते.
१०. मानवी जीव म्हणजे काय व त्याची निर्मिती कशी झाली?
१० परंतु देवाने माणसाला आत्मा दिला, असे पवित्र शास्त्र म्हणत नाही याची नोंद घ्या. ते म्हणते की, देवाने माणसाचा श्वास सुरु केल्यावर “मनुष्य जिवंत जीव झाला.” जो माणूस डॉक्टर होतो तो डॉक्टर असतो. तसेच मनुष्य स्वतः जीव होता. (१ करिंथकर १५:४५) ज्याने भौतिक शरीर बनते ती “जमिनीतील माती” जीव नव्हे. तसेच “जीवनाचा श्वास” म्हणजे जीव असेहि पवित्र शास्त्र म्हणत नाही. तर या दोन्ही गोष्टी एकत्र केल्याने “मनुष्य जिवंत जीव झाला” असे ते म्हणते.
११. जीव व्यक्तिपासून वेगळे अस्तित्व असलेली वस्तू नाही हे पवित्र शास्त्रावरुन कसे कळते?
११ मनुष्य स्वतःच एक जीव असल्याने ती शरीरात राहणारी, पण मृत्युनंतर शरीरातून बाहेर पडणारी अदृश्य गोष्ट नव्हे. सोप्या शब्दात, तुमचा जीव म्हणजे तुम्ही स्वतः आहात असे पवित्र शास्त्र शिकविते. उदाहरणार्थ, पवित्र शास्त्र म्हणते की, जिवाला भौतिक अन्नाची भूक लागते. “तुझ्या जिवाला मांस खाण्याची इच्छा होईल.” (अनुवाद १२:२०) तसेच जिवाच्या नसात रक्त वाहते असेही ते म्हणते. “निर्दोष, दीन जिवांचे रक्त.”—यिर्मया २:३४.
देवाने माणसाला या जगात का ठेवले
१२. माणसाला भूतलावर ठेवण्यात देवाचा काय हेतू होता?
१२ आदाम व हव्वेने कालांतराने मरावे व इतरत्र कोठे जावे असा देवाचा उद्देश नव्हता. पृथ्वी व तिजवरील सर्व जिवांची देखभाल करत त्यांनी येथेच रहावयाचे होते. पवित्र शास्त्रात म्हटल्याप्रमाणे, “देवाने त्यांना आशीर्वाद दिला. देव त्यांस म्हणालाः ‘फलद्रुप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेत आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांच्यावर सत्ता करा.’” (उत्पत्ती १:२८; २:१५) देवाने त्यांना सोपवलेले काम करीत, आदाम, हव्वा व त्यांची मुले पृथ्वीवर अनंतकाल आनंदात राहिले असते.
१३. (अ) आपण आनंदी कसे होऊ शकतो? (ब) आपल्या जीवनाला कशामुळे खरा अर्थ प्राप्त होईल?
१३ “देवाने त्यांना आशीर्वाद दिला” याची नोंद घ्या. भूतलावरल्या आपल्या अपत्यांची देवाला काळजी होती. याकरताच एखाद्या प्रेमळ पित्याप्रमाणे, त्याच्या भल्यासाठी देवाने त्यांना काही सूचना दिल्या. या सूचनांचे पालन केल्यामुळे त्यांना सौख्यानंद मिळणार होता. येशूलाही हे माहीत होते. म्हणून तो म्हणालाः “जे देवाचे वचन ऐकतात व पाळतात तेच धन्य.” (लूक ११:२८) येशूने देवाचे वचन पाळले. तो म्हणालाः “जे त्याला आवडते ते मी सर्वदा करतो.” (योहान ८:२९) आपल्या जगातील अस्तित्वाचेही हेच कारण आहे. ते म्हणजे, देवाच्या इच्छेनुसार जगून परिपूर्ण व आनंदी जीवन घालवावे. यहोवाची सेवा करण्याने आपल्या जीवनाला खरा अर्थ प्राप्त होईल व त्यामुळे भूतलावर नंदनवनात अनंतकाल राहण्यास आपण पात्र ठरु.—स्तोत्रसंहिता ३७:११, २९.
आम्ही वृद्ध होण्याचे व मरण्याचे कारण काय
१४. यहोवाची अवज्ञा करुन आदाम व हव्वा यांनी काय साधले?
१४ सध्या आपण सर्व वृद्ध होतो व मरतो. ते का? मागच्या प्रकरणात आपण पाहिल्याप्रमाणे आदाम व हव्वेने केलेल्या बंडखोरीमुळे ते घडले. देवाशी आज्ञाधारक राहण्याची गरज आदाम व हव्वेला कळावी अशी एक अट यहोवाने त्याच्यावर घातली होती. त्याने आदामला सांगितलेः “बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ यथेच्छ खा; पण बऱ्या-वाईटाचे ज्ञान करुन देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको. कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील, त्या दिवशी तू खास मरशील.” (उत्पत्ती २:१६, १७) त्या झाडाचे फळ खाऊन आदाम व हव्वेने आपल्या स्वर्गीय पित्याकडे पाठ फिरवली. त्याच्या मार्गदर्शनाचा अव्हेर केला. अवज्ञा करुन जे आपले नाही ते त्यांनी घेतले. दारिद्र्य व यातना भोगाव्या न लागता ते नंदनवनामध्ये आनंदात राहिले असते. पण आता त्यांनी स्वतःवर पापाची शिक्षा ओढवून घेतली. ती शिक्षा म्हणजेच व्यंगत्व व मृत्यु.—रोमकर ६:२३.
१५. आदामाकडून आपल्याला पाप कसे मिळाले?
१५ आदामाकडून आपल्याला पाप कसे मिळाले ते तुम्हाला माहीत आहे का? आदामामध्ये व्यंग आल्यानंतर त्याने आपल्या सर्व मुलांना व्यंग व मृत्युचा वारसा दिला. (इयोब १४:४; रोमकर ५:१२) बेकरीमध्ये खळगा पडलेल्या थाळीत पाव भाजल्याने काय परिणाम होतो ते पाहिल्यास आदामाचे व्यंग त्याच्या मुलात कसे आले ते समजण्यास मदत होईल. त्या थाळीमध्ये भाजलेल्या प्रत्येक पावावर त्याची खूण उमटेल. आदाम त्या थाळीसारखा झाला, आणि आपण पावासारखे आहोत. देवाची आज्ञा मोडून त्यात व्यंग आले. जणू त्याला खळगा अथवा वाईट खूण पडली. यामुळेच, त्याला नंतर झालेल्या सर्व मुलांवर पाप अथवा व्यंगाची खूण उमटली.
१६, १७. पापामुळे मानवजातीवर आजारपण आलेले आहे हे येशूने केलेल्या एका चमत्कारावरुन कसे दिसून येते?
१६ आदामाकडून आपणा सर्वांना मिळालेल्या पाप व व्यंगामुळे आता आपण आजारी पडतो व वृद्ध होतो. येशूने केलेल्या एका चमत्कारावरुन हेच दिसून येते. येशू त्याच्या राहत्या घरी लोकांना शिक्षण देत असताना एवढा मोठा जमाव झाला की, आणखी कोणाला त्या खोलीत शिरता येईना. पक्षघात झालेल्या एका माणसाला खाटेसह घेऊन जेव्हा चार माणसे तेथे पोहंचली तेव्हा आत जाणे अशक्य आहे असे त्यांना दिसून आले. तेव्हा ते छतावर गेले. छताला त्यांनी भोक पाडले व त्यामधून खाटेसह त्या माणसाला येशूच्या शेजारी खाली उतरविले.
१७ त्यांचा हा असीम विश्वास पाहून, येशू पक्षघात झालेल्या माणसाला म्हणालाः “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” परंतु येशू पापांची क्षमा करु शकेल असे तेथे जमलेल्या काही लोकांना पटेना. त्यामुळे येशू म्हणालाः “‘मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे तुम्हाला समजावे म्हणून.’ तो पक्षघाती माणसाला म्हणालाः ‘मी तुला सांगतो, उठ, आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा.’ मग तो उठला व लागलाच आपली बाज उचलून सर्वांच्या देखत निघाला.”—मार्क २:१-१२.
१८. देवाच्या सेवकांना कशा प्रकारच्या भविष्याची आशा आहे?
१८ क्षणभर विचार करा. येशूचे हे सामर्थ्य आपल्याला किती हितकारक आहे! देवाच्या राज्याच्या अंमलाखाली जे लोक देवाची प्रेमभावाने सेवा करतील त्या सर्वांची पापे येशू माफ करु शकेल. म्हणजेच सर्व दुःखे व आजार समूळ नाहीसे केले जातील. कोणालाही वृद्ध होऊन मरावे लागणार नाही! भविष्याची ही किती अप्रतिम आशा! जन्म, अल्प जीवन व मरण याहून कितीतरी अधिक गोष्टींची अपेक्षा आपण खरोखरच करु शकतो. सतत देवाबद्दल ज्ञान मिळवल्याने व त्याची सेवा केल्याने आपण भूतलावरील नंदनवनात अनंतकाल राहू शकू यात कसलाच संशय नाही.
[६९ पानांवरील चित्रं]
जीवनाच्या अर्थाबद्दल पुष्कळांना नवल वाटते
[७० पानांवरील चित्रं]
या सर्व गोष्टी उत्क्रांत झाल्या की त्या घडविण्यात आल्या?
[७५ पानांवरील चित्रं]
एका पक्षघात झालेल्या माणसाला येशूने बरे केले या घटनेचा पवित्र शास्त्रीय अहवाल दाखवितो की, आदामाच्या पापामुळे लोक आजारी पडतात