वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी उपाय
आहे ती परिस्थिती स्वीकारा
वस्तूंच्या किंमती हळूहळू वाढत जातात तेव्हा महागाई इतकी जाणवत नाही. खासकरून त्यासोबत आपला पगारही वाढत असतो तेव्हा. पण किंमती एकदम वाढतात आणि पगार वाढत नाही तेव्हा मात्र चिंता वाटू लागते आणि खासकरून घरचे लोक आपल्यावर अवलंबून असतात तेव्हा आणखीनच चिंता वाटू लागते.
खरंतर वाढती महागाई रोखण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही. पण ही वस्तुस्थिती जर आपण स्वीकारली तर आपल्याला फायदा होईल हे मात्र नक्की.
हे का महत्त्वाचं आहे?
जे वाढत्या महागाईची वस्तुस्थिती मान्य करतात त्यांना . . .
मन शांत ठेवायला मदत होते. आपलं मन शांत असतं तेव्हा आपण नीट विचार करू शकतो आणि चांगले निर्णय घेऊ शकतो.
चुकीच्या सवयी, जसं की बिलं भरायला विनाकारण टाळाटाळ करणं किंवा नको त्या गोष्टींवर पैसा खर्च करणं यांसारख्या सवयी टाळायला मदत होते.
पैशांच्या बाबतीत घरच्यांसोबत वादविवाद टाळायला मदत होते.
महागाईचा सामना करायचे वेगवेगळे उपाय शोधता येतात. जसं की, जपून पैसे खर्च करणं किंवा कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत ते ठरवून त्याप्रमाणे खर्च करणं.
तुम्ही काय करू शकता?
परिस्थितीशी जुळवून घ्यायला तयार राहा. वस्तूंच्या किंमती आकाशाला भिडतात तेव्हा शक्य असेल तर खर्च कमी करा. काही लोकांची ऐपत नसली तरी त्यांना महागडी जीवनशैली जगायची हौस असते. पण हे जणू पाण्याच्या जोरदार प्रवाहाविरुद्ध पोहण्यासारखं आहे. अशी जीवनशैली टिकवून ठेवण्याच्या नादात ते पार थकून जातात. तुमच्यावर जर कुटुंबाची जबाबदारी असेल तर त्याबद्दल काळजी वाटणं साहजिक आहे. पण हे नेहमी लक्षात ठेवा, की इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा तुमच्या कुटुंबातल्या लोकांना तुमच्या प्रेमाची आणि वेळेची जास्त गरज आहे.
ऐपत नसतानाही महागडी जीवनशैली जगायचा प्रयत्न करणं हे जणू पाण्याच्या जोरदार प्रवाहाविरुद्ध पोहण्यासारखं आहे