इतरांमधले चांगले गुण ओळखा
समस्येचं मूळ कारण
गर्वाच्या भावनेमुळे आपल्यात भेदभाव करायची प्रवृत्ती येऊ शकते. एक गर्विष्ठ व्यक्ती स्वतःला नको तितकं महत्त्व देत असते. ती स्वतःला इतरांपेक्षा खूप श्रेष्ठ समजते, आणि जे तिच्या बरोबरीचे नसतात अशांना ती तुच्छ लेखते. अशी प्रवृत्ती कोणामध्येही येऊ शकते. एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिका यात असं म्हटलं आहे: “जवळजवळ प्रत्येक संस्कृतीच्या लोकांना असं वाटतं, की आपलीच संस्कृती सगळ्यात श्रेष्ठ आहे. आपलं राहणीमान, खाणं-पिणं, पेहराव, सवयी, धार्मिक विश्वास, मूल्यं आणि इतर गोष्टी दुसऱ्यांपेक्षा सगळ्यात चांगल्या आहेत.” पण असा चुकीचा विचार करायचं आपण कसं टाळू शकतो?
बायबल कशी मदत करतं?
“नम्रतेने इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजा.”—फिलिप्पैकर २:३.
या शास्त्रवचनातून आपण काय शिकतो? हेच, की गर्व टाळण्यासाठी आपण नम्र असलं पाहिजे. आपण जर नम्र असलो, तर इतर जण काही बाबतींत आपल्यापेक्षा चांगले आहेत ही गोष्ट आपण नक्कीच ओळखू. कारण सगळे चांगले गुण आणि क्षमता एकाच गटातल्या लोकांमध्ये असतात असं नाही.
स्टेफनच्या उदाहरणाचा विचार करा: तो एका साम्यवादी देशात लहानाचा मोठा झाला होता. त्यामुळे साम्यवादी नसलेल्या इतर देशातल्या लोकांबद्दल त्याच्या मनात द्वेषाची भावना होती. पण या भावनेवर त्याने मात केली. तो म्हणतो: “भेदभावाची भावना मनातून काढून टाकण्यासाठी इतरांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ समजणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला सगळंच माहीत असतं असं नाही. प्रत्येक व्यक्तीकडून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं.”
तुम्ही काय करू शकता?
आपल्यातसुद्धा कमतरता असतात हे नेहमी लक्षात असू द्या. आणि काही गोष्टींच्या बाबतींत इतर जण आपल्यापेक्षा चांगले आहेत हे मान्य करा. तसंच, एखाद्या विशिष्ट गटातल्या सगळ्या लोकांमध्ये सारखेच दोष असतात असं समजू नका.
एका विशिष्ट गटातल्या व्यक्तीबद्दल नकारात्मक विचार करण्याऐवजी स्वतःला असं विचारा:
काही गोष्टींच्या बाबतींत इतर जण आपल्यापेक्षा चांगले आहेत हे मान्य करा
‘त्या व्यक्तीचे जे गुण मला आवडत नाहीत, ते खरंच वाईट आहेत का, की ते फक्त वेगळे आहेत म्हणून मला ते आवडत नाहीत?’
‘माझ्यामध्येसुद्धा अशा काही गोष्टी आहेत का ज्या त्या व्यक्तीला आवडत नसतील?’
‘अशी कोणती कामं आहेत जी ती व्यक्ती माझ्यापेक्षा चांगल्या प्रकारे करते?’
या प्रश्नांची तुम्ही प्रामाणिकपणे उत्तरं दिली, तर तुम्हाला त्या व्यक्तीमध्ये अनेक चांगले गुण दिसतील आणि त्यामुळे तिच्याबद्दल असलेली भेदभावाची भावना तुम्हाला मनातून काढून टाकता येईल.