सहानुभूती दाखवा
समस्येचं मूळ कारण
इतर जण आपल्यापेक्षा किती वेगळे आहेत याचाच जर आपण विचार केला, तर त्यांच्यातला वेगळेपणा आपल्याला कमतरता किंवा दोष वाटू शकतो. आणि त्यामुळे आपण त्यांना कमी लेखू शकतो. आणि एकदा का अशी नकारात्मक भावना आपल्या मनात निर्माण झाली, की मग इतरांना सहानुभूती दाखवणं आपल्याला कठीण जाऊ शकतं. आणि सहानुभूती न दाखवणं हे भेदभावाच्या आजाराचं लक्षण असू शकतं.
बायबल कशी मदत करतं?
“आनंद करणाऱ्यांसोबत आनंद करा; रडणाऱ्यांसोबत रडा.”—रोमकर १२:१५.
या शास्त्रवचनातून आपण काय शिकतो? हेच, की आपण इतरांना सहानुभूती दाखवली पाहिजे. सहानुभूती दाखवणं म्हणजे स्वतःला इतरांच्या जागी ठेवून त्यांच्या भावना समजून घेणं.
सहानुभूती दाखवल्यामुळे कशी मदत होते?
आपण जेव्हा एखाद्याला सहानुभूती दाखवतो, तेव्हा त्याच्यात आणि आपल्यात किती सारखेपणा आहे हे आपल्या लक्षात येतं. आपल्याला दिसून येतं, की आपल्या जशा भावना आहेत तशाच त्याच्याही आहेत. एखाद्या परिस्थितीत आपण जसं वागतो तसंच तोही वागतो. आपण जेव्हा इतरांना सहानुभूती दाखवतो तेव्हा आपल्याला याची जाणीव होते, की सगळे लोक एकाच मानवी कुटुंबाचे भाग आहेत; मग ते कोणत्याही समाजातले किंवा संस्कृतीतले असोत. त्यामुळे, इतरांमध्ये आणि आपल्यामध्ये किती सारखेपणा आहे याचा जर आपण जास्त विचार केला, तर त्यांच्याबद्दल असलेलं आपलं चुकीचं मत बदलेल.
सहानुभूतीची भावना आपल्याला इतरांचा आदर करायलाही मदत करेल. सेनिगॉल देशात राहणाऱ्या ॲन-मेरीचाच विचार करा. तिच्या देशात असा एक गट आहे ज्यातले लोक खालच्या जातीचे आहेत असं मानलं जातं. एकेकाळी ॲन-मेरीसुद्धा त्यांना त्याच नजेरने पाहायची. पण मग सहानुभूती दाखवल्यामुळे तिला कशी मदत झाली त्याबद्दल तिने सांगितलं. तिने म्हटलं: “त्या लोकांना किती त्रास सहन करावा लागतो हे जेव्हा मी पाहिलं, तेव्हा मी स्वतःला विचारलं की ‘मी जर त्यांच्या जागी असते तर मला कसं वाटलं असतं.’ आणि त्यामुळे मला याची जाणीव होऊ लागली, की मी काही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ नाही. कारण आज मी जिथे आहे आणि माझ्याजवळ जे काही आहे त्यासाठी मी स्वतः काहीच केलेलं नाही.” या उदाहरणातून दिसून येतं, की इतरांच्या समस्या समजून घेण्याचा जर आपण प्रयत्न केला, तर त्यांची टीका करण्याऐवजी आपण त्यांना सहानुभूती दाखवू.
तुम्ही काय करू शकता?
एखाद्या गटातल्या लोकांबद्दल तुमच्या मनात नकारात्मक भावना आहे का? असेल, तर ते लोक आपल्यापेक्षा किती वेगळे आहेत हे पाहण्याऐवजी, त्यांच्यात आणि आपल्यात किती सारखेपणा आहे हे पाहण्याचा प्रयत्न करा. उदाहरणार्थ, पुढे दिलेल्या गोष्टी करत असताना त्यांना कसं वाटतं याची कल्पना करा:
सहानुभूती दाखवल्यामुळे आपल्याला याची जाणीव होते, की सगळे लोक एकाच मानवी कुटुंबाचे भाग आहेत
कुटुंबासोबत मिळून जेवताना
दिवसभर कष्ट करून घरी आल्यावर
मित्रांच्या सहवासात वेळ घालवताना
आपली आवडती गाणी ऐकताना
मग, स्वतःला त्यांच्या जागी ठेवा. आणि असं विचारा:
‘मी काहीच कामाचा नाही, असं जर कोणी माझ्याशी वागलं असतं, तर मी काय केलं असतं?’
‘माझ्याबद्दल काहीच जाणून न घेता कोणी माझ्याबद्दल मत बनवलं असतं, तर मला कसं वाटलं असतं?’
‘मी जर त्या गटातला असतो, तर इतरांनी माझ्याशी कसं वागावं अशी अपेक्षा मी केली असती?’