तणाव कसा कमी कराल?
तणाव म्हणजे काय?
एखाद्या आव्हानात्मक प्रसंगाला शरीर देत असलेला प्रतिसाद म्हणजे तणाव. तुमचा मेंदू तुमच्या शरीरातल्या सर्व भागांना भरपूर प्रमाणात हॉर्मोन्स पाठवतो. यामुळे तुमच्या हृदयाची गती, रक्तदाब, श्वास घेण्याचा वेग वाढतो आणि तुमच्या स्नायूंवर ताण येतो. तुमच्यासोबत काय घडत आहे याची पूर्णपणे जाणीव होण्याआधीच तुमचं शरीर तणावाचा सामना करायला तयार होतं. तणावपूर्ण परिस्थिती निघून गेल्यावर आपलं शरीर पूर्व स्थितीत येतं.
चांगला तणाव आणि वाईट तणाव
तणाव ही एक स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. एखाद्या आव्हानात्मक किंवा धोकेदायक परिस्थितीचा सामना करण्यासाठी या प्रतिक्रियेमुळे आपल्याला मदत होते. ही प्रतिक्रिया मेंदूमध्ये सुरू होते. चांगल्या प्रकारच्या तणावामुळे तुम्हाला लगेच कार्य करण्यासाठी किंवा प्रतिक्रिया देण्यासाठी मदत होते. काही प्रमाणात तणाव आल्यामुळे तुम्हाला फायदा होऊ शकतो. यामुळे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचायला आणि आणखी चांगल्या प्रकारे काम करायला मदत होऊ शकते. जसं की परीक्षेत असताना, इंटरव्यू देताना किंवा खेळांच्या स्पर्धेत भाग घेताना.
पण जास्त काळापर्यंत तीव्र किंवा सतत येणाऱ्या तणावामुळे तुमच्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. तुमचं शरीर तणावाचा सामना करण्यासाठी सतत तयार असल्यामुळे तुम्हाला शारीरिक, भावनिक आणि मानसिक रीत्या त्रास होऊ शकतो. यामुळे तुमच्या इतरांसोबतच्या वागण्याबोलण्यात बदल होऊ शकतो. ज्या लोकांना जास्त काळापर्यंत तणावाचा सामना करावा लागतो ते कदाचित अती प्रमाणात दारू पितात, ड्रग्स घेतात, जास्त प्रमाणात खातात, धूम्रपान करतात, औषधांचा दुरुपयोग करतात आणि स्वतःला इतर वाईट सवयी लावून घेतात. यामुळे एका व्यक्तीला पुढे जाऊन नैराश्य येऊ शकतं, ती पार गळून जाऊ शकते किंवा तिच्या मनात आत्महत्येचा विचारही येऊ शकतो.
तणावाचा सर्वांवर सारखाच परिणाम होत नसला तरी यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. आणि याचा परिणाम जवळजवळ शरीराच्या सर्वच भागांवर होऊ शकतो.