पचनक्रियेशी संबंधित असलेली मज्जासंस्था (निळा भाग) आपल्या पचनमार्गात असते
आपल्या पोटात “दुसरा मेंदू” आहे का?
तुमच्या शरीरात किती मेंदू आहेत? साहजिकच तुम्ही “एक” असं उत्तर द्याल. आणि हे बरोबरसुद्धा आहे. पण तुमच्या शरीरात इतरही मज्जासंस्था आहेत. त्यातल्या एका मज्जासंस्थेतल्या न्यूरॉन्सचं जाळं खूप विशाल आहे. इतकं, की काही वैज्ञानिक त्याला “दुसरा मेंदू” असंदेखील म्हणतात. हा दुसरा मेंदू म्हणजे पचनक्रियेशी संबंधित असलेली मज्जासंस्था. ही मुख्यतः तुमच्या पोटातून कार्य करते.
अन्न पचवून त्याचं उर्जेत रूपांतर करण्यासाठी खूप जास्त मेहनत आणि कमालीचा ताळमेळ लागतो. आणि म्हणूनच मेंदू, पचनक्रिया नियंत्रित करण्याची जास्तीतजास्त जबाबदारी या मज्जासंस्थेवर सोपवतो. खरंतर, मेंदूची रचनाच अशा प्रकारे करण्यात आली आहे.
ही संस्था मेंदूइतकी गुंतागुंतीची नसली, तरी ती खूप जटील आहे. मानवांमधल्या या मज्जासंस्थेत २० ते ६० करोड इतके न्यूरॉन्स असतात. जटील न्यूरॉन्सचं हे जाळं आपल्या पचन संस्थेत असतं. वैज्ञानिक म्हणतात, की पचनक्रियाशी संबंधित असलेली ही मज्जासंस्था जर आपल्या मेंदूतून कार्य करत असती, तर त्यासाठी लागणाऱ्या मज्जातंतू खूप जाड असत्या. “पचनक्रियेशी संबंधित सर्व कार्य [पचन संस्थेनेच] पाहणं सुरक्षित आणि सोयीस्करसुद्धा आहे,” असं द सेकंड ब्रेन या पुस्तकात म्हटलं आहे.
“एक रासायनिक कार्यशाळा”
अन्न पचन होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे विशिष्ट रासायनिक मिश्रण तयार होणं गरजेचं आहे. तसंच, ते योग्य वेळेत आणि योग्य ठिकाणी पोहोचणंसुद्धा गरजेचं आहे. गॅरी मॉ नावाच्या प्रोफेसरने पचन संस्थेला अगदी योग्य नाव दिलं आहे. ते म्हणजे “एक रासायनिक कार्यशाळा.” या रासायनांचं कार्य इतकं कुशलपणे होतं, की त्यावर आपण विचार केला तर चक्रावून जाऊ. उदाहरणार्थ, आतड्यांच्या आतल्या बाजूला विशिष्ट प्रकारच्या पेशींचं अस्तर असतं. या पेशी अन्नात कोणती रासायनं आहेत ते ओळखतात. या माहितीमुळे मज्जासंस्थेला योग्य पाचकरसांची यादी तयार करण्यासाठी मदत होते. मग या पाचकरसांमुळे अन्नाचे विघटन होऊन त्याचे शरीरात शोषण होते. तसंच ही मज्जासंस्था आणखी एक महत्त्वपूर्ण भूमिका निभावते. ती म्हणजे, पित्त व इतर रासायने नियंत्रित ठेवणं आणि पाचकरसात गरजेनुसार फेरफार करणं.
पचनमार्गामध्ये अन्न ज्या प्रकारे पुढे सरकतं आणि त्यासाठी ही मज्जासंस्था त्याचं मार्गदर्शन कसं करतं, ही खरंच एक आश्चर्यकारक गोष्ट आहे. आपला “दुसरा मेंदू” म्हणजे ही मज्जासंस्था, पचनमार्गाच्या आतल्या भागातील स्नायूंना आकुंचन होण्याचं निर्देशन देते. त्यामुळे अन्न पुढे सरकतं. तसंच, पचनक्रिया सुरळीत चालण्यासाठी स्नायूंचं आकुंचन किती वेळा झालं पाहिजे आणि त्यासाठी किती ताकद लागली पाहिजे हे ठरवून, हवे ते फेरबदल करण्याचं काम मज्जासंस्था करते.
ही मज्जासंस्था सुरक्षेचं कामसुद्धा पाहते. आपल्या पोटात जे अन्न जातं, त्यात बरेचसे हानिकारक जिवाणू असतात. आणि कदाचित त्यामुळेच ७० ते ८० टक्के पांढऱ्या पेशी आपल्या पोटात असतात! या पेशींमुळे रोगांचं प्रतिकार करण्यासाठी मदत होते. जर आपल्या पोटात जास्त प्रमाणात हानिकारक जिवाणू गेले, तर मज्जासंस्था आपलं संरक्षण करते. यासाठी ती स्नायूंच्या आकुंचनाची क्षमता वाढवते, त्यामुळे हानिकारक पदार्थ उल्टीद्वारे किंवा अतिसाराद्वारे बाहेर पडतात.
चांगला संवाद
ही मज्जासंस्था जरी स्वतंत्रपणे कार्य करत असली, तरी मेंदूसोबत तिचा सतत संवाद असतो. उदाहरणार्थ, गरजेनुसार हार्मोन्स कमी-जास्त करण्यासाठी ही मज्जासंस्था मदत करते. त्यामुळे केव्हा खावं व किती खावं याचे संकेत मेंदूला मिळतात. तसंच, या मज्जासंस्थेतली मज्जातंतू पोट भरल्याचं संकेतसुद्धा मेंदूला पोहोचवतात. आणि समजा आपण जास्त खात असू, तर ही मज्जासंस्था असे काही संकेत पाठवते ज्यामुळे आपल्याला मळमळतं.
आपला मेंदू आणि पचनमार्ग या दोघांमध्ये संवाद होत असावा, याची कल्पना कदाचित तुम्हाला हा लेख वाचण्याआधीच झाली असेल. एखादं विशिष्ट प्रकारचं पदार्थ खाल्लं की आपला मूड चांगला होतो, याकडे तुम्ही कधी लक्ष दिलं का? संशोधक म्हणतात की ही मज्जासंस्था आपल्या मेंदूला “आनंदाचे संकेत” पाठवते आणि त्यामुळे आपल्याला हळूहळू बरं वाटू लागतं. म्हणूनच तणावात असताना बरं वाटण्यासाठी, काही लोक विशिष्ट प्रकारचे पदार्थ का खातात ते यावरून समजतं. वैज्ञानिकसुद्धा कृत्रिम पद्धतीने मज्जासंस्थेला उत्तेजन कसं देता येईल यावर शोध करत आहेत. यामुळे नैराश्यावर इलाज करण्यासाठी मदत होईल.
मज्जासंस्था आणि मेंदू यात संवाद होतो याचं आणखीन एक उदाहरण म्हणजे, ज्याला आपण ‘पोटात गोळा येणं’ असं म्हणतो. जेव्हा आपला मेंदू तणावाचा किंवा चिंतेचा सामना करतो, तेव्हा मज्जासंस्था पोटाकडे होणारा रक्त पुरवठा दुसरीकडे वळवते. कदाचित त्यामुळेच आपल्या पोटात गोळा आल्यासारखं आपल्याला वाटतं. तसंच, तणावात असताना मेंदू, स्नायूंचं नेहमीप्रमाणे आकुंचन न करण्यासाठी मज्जासंस्थेला निर्देशन देतो. यामुळे आपल्याला मळमळल्यासारखं वाटतं.
पचनक्रियेशी संबंधित असलेल्या मज्जासंस्थेला “दुसरं मेंदू” असं म्हटलं असलं, तरी ती तुमच्यासाठी विचार करण्याचं किंवा निर्णय घेण्याचं काम करू शकत नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचं, तर ही मज्जासंस्था काही खरोखरचा मेंदू नव्हे. ती तुम्हाला गाणं लिहायला, हिशोब करायला किंवा तुमचा होमवर्क करायला मदत करू शकत नाही. ही मज्जासंस्था जरी मेंदू नसली, तरी तिच्या जटीलतेनं अनेक वैज्ञानिकांना आश्चर्यात टाकलं आहे. आणि खरंतर या मज्जासंस्थेच्या जटीलतेबद्दल अजूनपर्यंत पूर्णपणे उलगढासुद्धा होऊ शकलेला नाही. तेव्हा पुढच्या वेळी काही खाण्याआधी दोन मिनिटं थांबा आणि अन्न खाल्ल्यावर तुमच्या पचन संस्थेत नियंत्रण, माहितीचा वापर, आपसातला ताळमेळ आणि संवाद या सर्व गोष्टी कशा घडणार आहेत यावर जरूर विचार करा.