वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g17 क्र. २ पृ. ८-९
  • घरातल्या कामांमध्ये हातभार लावण्याचं महत्त्व

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घरातल्या कामांमध्ये हातभार लावण्याचं महत्त्व
  • सावध राहा!—२०१७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • हे कठीण का आहे?
  • तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे?
  • तुम्ही काय करू शकता?
  • जबाबदार व्यक्‍ती कसं बनावं?
    सावध राहा!—२०१९
  • स्वतंत्र होऊ देण्यास शिकणे
    सावध राहा!—१९९८
  • नम्रता कशी विकसित कराल?
    सावध राहा!—२०१९
  • मुलांना शिस्त लावण्यास बायबल मदत करू शकते?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०१७
g17 क्र. २ पृ. ८-९
वडील भिंतीला रंगवत असताना एक लहान मुलगा त्याची खेळणी आवरून ठेवत आहे

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला | पालकांसाठी

घरातल्या कामांमध्ये हातभार लावण्याचं महत्त्व

हे कठीण का आहे?

मुलांनी घरातल्या कामात मदत करावी अशी अपेक्षा काही कुटुंबात केली जाते. आणि अशा कुटुंबात मुलंसुद्धा तक्रार न करता मदत करतात. पण इतर कुटुंबात, पालक आपल्या मुलांकडून फार अपेक्षा ठेवत नाहीत. म्हणून मग मुलंही घरातल्या कामांमध्ये जास्त हातभार लावत नाही.

संशोधकांना दिसून आलं आहे, की खासकरून पाश्‍चात्त्य देशातल्या मुलांचा इतरांची सेवा करण्याऐवजी सेवा करून घेण्याकडे जास्त कल असतो. स्टीवन नावाच्या वडिलांचं असं म्हणणं आहे, की घरात काम करण्याच्या बाबतीत “आजकाल मुलांकडून फार कमी अपेक्षा केल्या जातात. त्यांना व्हिडिओ गेम्स खेळण्यासाठी, इंटरनेटवर वेळ घालवण्यासाठी किंवा टिव्ही बघण्यासाठी मोकळीक दिली जाते.”

याबाबतीत तुम्हाला काय वाटतं? घरकामात हातभार लावणं खरंच महत्त्वाचं आहे का? यामुळे घर टापटिप राहण्यासोबतच मुलांचा विकास होण्यासही मदत होते का?

तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे?

मुलं आठवडाभर खूप व्यस्त असतात. त्यांना शाळेचा भरपूर होमवर्क असतो. त्यांना शाळेनंतर इतर काही उपक्रमही दिले जातात. खासकरून अशा वेळी काही पालक मुलांना घरातली कामं देण्याचं टाळतात. पण त्यांना मदतीसाठी सोबत घेण्याचे कोणते काही फायदे आहेत, ते आपण पाहू या.

मुलांना जबाबदार बनण्यासाठी मदत होते. जी मुलं घरातल्या कामांमध्ये मदत करतात, ती सहसा शाळेमध्ये अभ्यासात किंवा इतर बाबतीत हुशार असतात. मुलांमध्ये शिकण्यासाठी आवश्‍यक असणारे गुण, जसं की आत्मविश्‍वास, शिस्त, निश्‍चयीपणा हे घरात हातभार लावल्यामुळे विकसित व्हायला मदत होते.

सेवा करण्याची वृत्ती निर्माण होण्यासाठी मदत होते. जी मुलं घरात मदत करतात ती सहसा मोठी होऊन समाज सेवा करण्याचं निवडतात, असं काहींच्या लक्षात आलं आहे. घरातली कामं केल्यामुळे ते आधी इतरांच्या गरजांचा विचार करायला शिकतात. दुसरीकडे पाहता, आधी उल्लेख केलेल्या स्टीवनच्या म्हणण्यानुसार, “मुलांकडून जेव्हा कामाच्या बाबतीत काहीच अपेक्षा केल्या जात नाहीत, तेव्हा इतरांनी आपली सेवा करावी असं त्यांचं मत तयार होतं. यामुळे मोठे झाल्यावर येणाऱ्‍या जबाबदाऱ्‍या हाताळण्यासाठी आणि मेहनत करण्यासाठी ते तयार झालेले नसतात.”

कुटुंबात ऐक्य वाढतं. घरातल्या कामांमध्ये मदत केल्यामुळे मुलांना हे समजायला मदत होते, की कुटुंबात त्यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे आणि कुटुंबाप्रती त्यांच्याही काही जबाबदाऱ्‍या आहेत. पण जर पालकांनी शाळेनंतरच्या उपक्रमांना घरातल्या कामांपेक्षा जास्त महत्त्व दिलं, तर मुलांना या गोष्टीची जाणीव होत नाही. म्हणून स्वतःला विचारा: ‘माझ्या मुलाने त्याच्या फुटबॉल टीमसोबत जास्त वेळ घालवला, त्यांच्यासोबत जवळचं नातं जोडलं, पण कुटुंब म्हणून जी टीम आहे त्यापासून तो दुरावला तर काय फायदा?’

तुम्ही काय करू शकता?

लहान वयापासूनच सुरुवात करा. मुलं तीन वर्षांची असतात तेव्हापासूनच त्यांना मदतीसाठी सोबत घेतलं पाहिजे, असं काही पालकांचं म्हणणं आहे. इतर काही सुचवतात, की दोन किंवा त्यापेक्षाही कमी वय असतानाच आपण मुलांना काही कामं दिली पाहिजेत. कारण मुलांना पालकांसोबत काम करायला आणि त्यांचं अनुकरण करायला आवडतं.—बायबल तत्त्व: नीतिसूत्रे २२:६.

वयानुसार काम द्या. तीन वर्षांचं मूल खेळणी आवरण्याचं, लहान-सहान डाग पुसण्याचं किंवा धुण्याचे कपडे वेगळे करण्याचं काम करू शकतं. तसंच, मुलं मोठी असली तर कचरा काढणं, गाडी धुणं, किंवा जेवण बनवण्याचं कामही ती करू शकतात. मुलांच्या क्षमतेनुसार त्यांना काम द्या. तुमची मुलं दिलेली कामं किती आनंदाने करतात हे पाहून कदाचित तुम्हाला आश्‍चर्य वाटेल.

कामाला कमी प्राधान्य देऊ नका. मुलांना दररोज भरपूर होमवर्क असतो. म्हणून कदाचित पालकांना आपल्या मुलांना काम देणं इतकं महत्त्वपूर्ण वाटणार नाही. द प्राइज ऑफ प्रिवलेज या पुस्तकात म्हटलं आहे, की शाळेत मुलांना चांगले मार्क्स मिळावेत म्हणून आईवडील त्यांना काम देत नाहीत. आणि यावरून हेच दिसून येतं, की कामाला कमी प्राधान्य दिलं जातं. पण आधी सांगितल्याप्रमाणे, घरकामात हातभार लावल्यामुळे मुलांना चांगले विद्यार्थी बनण्यासाठी मदत होते. ते जे काही शिकतात त्याचा फायदा त्यांना मोठं झाल्यावर, जेव्हा त्यांचं स्वतःचं एक कुटुंब असेल तेव्हा होईल.—बायबल तत्त्व: फिलिप्पैकर १:१०.

काम देण्यामागचा उद्देश लक्षात ठेवा. तुमची मुलं काम संपवण्यासाठी कदाचित जास्त वेळ घेऊ शकतात. तसंच, काम आणखीन चांगल्या प्रकारे करता येईल, असंही तुम्हाला वाटू शकतं. पण अशा वेळी ते काम स्वतः करण्याचा मोह टाळा. कारण मुलांनी मोठ्यांसारखं कुशलतेनं काम करावं हा काम देण्यामागचा उद्देश नाही, तर त्यांनी जबाबदार बनावं आणि कामातून आनंद मिळवावा हा आहे.—बायबल तत्त्व: उपदेशक ३:२२.

कामाच्या मोबदल्यात पैसे देण्याचं टाळा. काहींचं असं म्हणणं आहे, की मुलांना कामाच्या मोबदल्यात पैसे दिले पाहिजे, म्हणजे ते जबाबदार बनतात. याउलट इतरांचं असं म्हणणं आहे, की असं केल्याने मुलांचं लक्ष, कुटुंबाची मदत करण्याऐवजी त्यांच्याकडून काय मिळेल यावर असतं. तसंच ते हेसुद्धा म्हणतात, की मुलांकडे जास्त पैसे आले की ते काम करण्यासही नाकारू शकतात. यावरून दिसून येतं, की मुलांना कामात हातभार लावण्याचं महत्त्व समजलेलं नाही. मग यातून आपण काय शिकतो? मुलांना कामाच्या मोबदल्यात पैसे देणं योग्य ठरणार नाही.

मुख्य शास्त्रवचनं

  • “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही.”—नीतिसूत्रे २२:६.

  • “कोणत्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या आहेत याची तुम्ही नेहमी खातरी करून घ्यावी.”—फिलिप्पैकर १:१०.

  • “मनुष्याने आपल्या कामात हर्ष करावा यापेक्षा काही उत्तम नाही.”—उपदेशक ३:२२, पं.र.भा.

स्टीवन आणि स्टेफनी

“घरातल्या कामात मदत केल्यामुळे कुटुंबासाठी काहीतरी केल्यासारखं वाटतं. जेव्हा आम्ही कुटुंब मिळून बागेत किंवा घरात काम करतो, तेव्हा आमच्यातली जवळीक वाढते. प्रत्येकाने मदत केल्यामुळे आम्हाला सर्वांनाच खूप बरं वाटतं.”—स्टीवन.

“आमच्या मुलींना आम्ही लहान वयापासूनच घरात काम करण्याची सवय लावली. त्यामुळे मोठं झाल्यावर जीवनात येणाऱ्‍या जबाबदाऱ्‍या हाताळणं त्यांना सोपं गेलं. आपलं कुटुंब हे एका टीमसारखं आहे आणि आपण सोबत मिळून काम केलं पाहिजे, याची आम्ही त्यांना आठवण करून देण्याचं नेहमी प्रयत्न करतो. जेव्हा आम्ही पालक या नात्याने कामाप्रती सकारात्मक दृष्टिकोन बाळगतो, तेव्हा आमच्या मुलींनाही तसाच दृष्टिकोन बाळगायला मदत होते.”—स्टेफनी.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा