वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g16 क्र. १ पृ. ४-५
  • घरातील भांडणं आपण कशी टाळू शकतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घरातील भांडणं आपण कशी टाळू शकतो?
  • सावध राहा!—२०१६
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • १. प्रत्युत्तर देऊ नका.
  • २. आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घ्या.
  • ३. स्वतःलाही शांत करा.
  • ४. काय बोलणार आणि कसं बोलणार याचा नीट विचार करा.
  • ५. आवाज चढवू नका आणि समेट करण्याची इच्छा आहे हे दाखवा.
  • ६. लगेच क्षमा मागा आणि परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही काय कराल ते सांगा.
  • जीभेवर ताबा ठेवण्याद्वारे प्रेम आणि आदर दाखवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • मतभेद मिटवणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
  • तुम्हाला दिलगिरी व्यक्‍त करण्याची खरोखरच आवश्‍यकता आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • समेट करणे हितावह का आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२०१६
g16 क्र. १ पृ. ४-५
पत्नी आपल्या भावना व्यक्‍त करत असताना पती ऐकत आहे

मुख्य विषय | घरात शांती कशी टिकवाल?

घरातील भांडणं आपण कशी टाळू शकतो?

तुमच्या कुटुंबात कायम भांडणाचाच आवाज येत असतो का? तुमच्यात सतत वाद होऊन ते विकोपाला जातात का? कधीकधी तर भांडण कसं सुरू झालं हेदेखील तुम्हाला कळत नसेल. तुम्ही खरंतर एकमेकांना दुखवू पाहत नाही कारण तुमचं एकमेकांवर प्रेम असतं.

घरातील गोष्टींवर तुमचं एकमत होत नसेल तर तुम्ही असं समजू नये की तुमचं कौटुंबिक जीवन उध्वस्त होत आहे. तुमच्यातील वाद नव्हे तर हे वाद तुम्ही कसे सोडवता यावर, घरात शांती टिकून राहील किंवा नाही हे ठरेल. भांडणं टाळण्यासाठी तुम्ही पुढील काही गोष्टी करू शकता.

१. प्रत्युत्तर देऊ नका.

एका हातानं टाळी वाजत नाही. एक व्यक्‍ती रागानं बोलत असते, तेव्हा दुसऱ्‍यानं शांतपणे ऐकून घेतलं तर वाद टाळता येतो. तुम्ही कितीही चिडला असाल तरी प्रत्युत्तर देण्याचं टाळा. आपण जेव्हा स्वतःवर ताबा ठेवतो तेव्हा आपला आत्मसन्मान टिकून राहतो. वादात कोण जिंकलं यापेक्षा घरातील शांती टिकवणं महत्त्वाचं आहे हे आपण कायम लक्षात ठेवलं पाहिजे.

“सरपण नसल्यामुळे विस्तव विझतो; कानाशी लागणारा कोणी नसला म्हणजे तंटा मिटतो.”—नीतिसूत्रे २६:२०.

२. आपल्या जोडीदाराच्या भावना समजून घ्या.

कुठल्याही प्रकारचा पूर्वग्रह न ठेवता, सहनशीलतेनं आपण जोडीदाराचं बोलणं ऐकून घेतलं तर त्याचा राग कमी होईल आणि घरातली शांती टिकवून ठेवता येईल. दोष लावण्याऐवजी एकमेकांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराकडून एखादी गोष्ट चुकून झाली असेल तर ती मुद्दामहून केली आहे असा विचार मनात आणू नका. एखाद्याचं बोलणं तुमच्या मनाला लागलं असेल तर, तुमचा सूड उगवण्यासाठी तो तसं बोलला असं समजू नका. त्याच्या अविचारीपणामुळं किंवा त्याचं मन दुखावल्यामुळं कदाचित तोही रागाच्या भरात नाही-नाही ते बोलून गेला असावा.

“करुणायुक्‍त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा.”—कलस्सैकर ३:१२.

३. स्वतःलाही शांत करा.

तुम्हाला तुमच्या भावनांवर ताबा ठेवणं कठीण होत असेल तर तुम्ही आपला राग शांत करण्यासाठी तिथून निघून जाणं योग्य ठरेल. स्वतःवर ताबा मिळवण्यासाठी तुम्ही दुसऱ्‍या खोलीत किंवा घराबाहेर कुठंतरी जाऊ शकता. असं करून तुम्ही ती परिस्थिती टाळत नसता किंवा आपल्या जोडीदाराबरोबर अबोला धरत नसता. पण हा वेळ तुम्ही देवाला प्रार्थना करून त्याच्याकडे बुद्धी, समज आणि सहनशीलता मागण्यासाठी वापरू शकता.

“भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी.”—नीतिसूत्रे १७:१४.

४. काय बोलणार आणि कसं बोलणार याचा नीट विचार करा.

तुम्ही आपल्या सोबत्याच्या मनाला टोचेल असं काही बोलणार असाल तर अशानं परिस्थिती आणखी बिघडेल. यापेक्षा त्याच्या दुखऱ्‍या मनाला फुंकर घालता येईल असं काहीतरी बोला. त्यानं कसा दृष्टिकोन ठेवला पाहिजे हे सांगण्यापेक्षा, प्रेमानं त्याला झाल्या प्रसंगाबद्दल विचारा आणि त्यानं सांगितलेल्या गोष्टींबद्दल किंवा दिलेल्या सल्ल्याबद्दल त्याचे आभार माना.

“कोणी असा असतो की तरवार भोसकावी तसे अविचाराचे भाषण करतो, परंतु सुज्ञांची जिव्हा आरोग्यदायी आहे.”—नीतिसूत्रे १२:१८.

५. आवाज चढवू नका आणि समेट करण्याची इच्छा आहे हे दाखवा.

एका सोबत्यानं जर धीरानं घेतलं नाही तर दुसऱ्‍याचाही पारा चढू शकतो. तुम्हाला कितीही राग आला असला तरी, टोचून बोलण्याचं, आवाज चढवायचं किंवा अपमानास्पद बोलण्याचं टाळा. “तुम्हाला माझी काळजीच नाही,” “तुम्ही माझं बोलणं ऐकतच नाही,” असे आरोप करू नका कारण यामुळं एकमेकांचं मन दुखावू शकतं. यापेक्षा “तुम्ही जेव्हा असं बोलता तेव्हा मला त्याचा त्रास होतो,” असं शांतपणे सांगितल्यानं त्याच्या वागण्यानं तुमच्यावर काय परिणाम झाला आहे हे त्याला कळेल. एकमेकांवर हात उचलणं, मारहाण करणं, ढकलणं कधीच योग्य ठरणार नाही. इतकंच नाही तर एकमेकांना नावं ठेवणं, घालून पाडून बोलणं किंवा धमकी देणंदेखील चुकीचं आहे.

“सर्व प्रकारचे कडूपण, संताप, क्रोध, गलबला व निंदा ही, अवघ्या दुष्टपणासह तुम्हापासून दूर करण्यात येवोत.”—इफिसकर ४:३१.

६. लगेच क्षमा मागा आणि परिस्थिती सुधारण्यासाठी तुम्ही काय कराल ते सांगा.

घरामध्ये शांती असणं हा तुमचा मुख्य उद्देश असल्यामुळं मनात येणाऱ्‍या नकारात्मक भावना काढून टाका. तुम्ही एकमेकांबरोबर भांडता तेव्हा दोघंही हरता पण शांती टिकवून ठेवता तेव्हा दोघांचाही विजय होतो. भांडणाला कुठंतरी तुम्हीही जबाबदार आहात याची जाणीव ठेवा. तुमची काहीच चूक नाही अशी तुम्हाला खातरी असली तरी रागावल्याबद्दल, प्रत्युत्तर दिल्याबद्दल आणि नकळत भांडण वाढवल्याबद्दल तुम्ही क्षमा मागू शकता. स्वतःचा अभिमान आणि वादात जिंकणं यापेक्षा कुटुंबातील शांती जास्त महत्त्वाची आहे. जोडीदारानं माफी मागितली तर क्षमा करायला लगेच तयार राहा.

“जा आणि नम्र होऊन आपल्या शेजाऱ्‍याला आग्रह कर.”—नीतिसूत्रे ६:३, पं.र.भा.

एकदा भांडण संपलं की कुटुंबातील शांती टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही काय करू शकता हे आपण पुढच्या लेखात पाहू. (g15-E 12)

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा