माझा ध्येय गाठण्याचा निश्चय
मार्टा चवेस सर्ना यांच्याद्वारे कथित
मी १६ वर्षांची होते. घरातलं काम करत असताना एकदा मी बेशुद्ध पडले. मला शुद्ध आली तेव्हा मी बिछान्यावर होते. मी गोंधळलेल्या मनःस्थितीत होते. माझं डोकं खूप दुखत होतं. मला कितीतरी मिनिटांसाठी नीट दिसत नव्हतं आणि नीट ऐकूही येत नव्हतं. मी घाबरले. मला काय झालं होतं?
माझ्या चिंतातूर आईवडिलांनी मला डॉक्टरांकडे नेलं. डॉक्टरांनी मला व्हिटामीन घ्यायला सांगितले. रात्री उशिरापर्यंत झालेल्या जागरणांमुळे मी बेशुद्ध पडले होते, असं डॉक्टर म्हणाल्या. काही महिन्यांनंतर मला पुन्हा एक झटका आला आणि मग तिसरा झटका. आम्ही दुसऱ्या एका डॉक्टरांकडे गेलो. त्यांना वाटलं, मला मज्जासंस्थेचा विकार आहे म्हणून त्यांनी मला झोपेच्या गोळ्या दिल्या.
पण, माझे झटके दिवसेंदिवस वाढतच राहिले. मी कधीही बेशुद्ध होऊन खाली पडायचे; यामुळे मला कुठंही लागायचं. कधीकधी माझी दातखीळ बसायची. मी माझी जीभ, माझे गाल आतून चावायचे. शुद्ध आल्यावर माझं डोकं भयंकर दुखायचं, मला मळमळायचे. माझं संपूर्ण शरीर दुखायचं. आणि पुष्कळदा मला, बेशुद्ध व्हायच्या आधी काय झालं होतं ते आठवायचं नाही. बरं व्हायला मला एक किंवा दोन दिवसांसाठी झोपून राहावं लागायचं. तरीपण माझी खात्री होती, की माझा हा त्रास जास्त काळ चालणार नाही, लवकरच मी बरी होईन.
माझ्या आरोग्याचा माझ्या ध्येयांवर परिणाम
मी खूप लहान होते तेव्हा माझ्या कुटुंबानं यहोवाच्या साक्षीदारांबरोबर बायबलचा अभ्यास करायला सुरुवात केली होती. आम्हाला बायबल शिकवायला येणारे दोघंही खास पायनियर किंवा पूर्ण वेळेचे सेवक होते. ते दर महिन्याला लोकांना बायबलमधील सत्य शिकवण्यात कित्येक तास खर्च करायचे. या सेवेमुळे या पायनियरांना किती आनंद मिळत होता, हे मी पाहू शकत होते. मग मी देखील जेव्हा माझ्या शिक्षकांना, शाळेतील सोबत्यांना बायबलमधील अभिवचनांविषयी सांगू लागले तेव्हा मलाही एकप्रकारचा आनंद मिळू लागला.
काही काळातच, आमच्या कुटुंबातील बहुतेक जण यहोवाचे साक्षीदार बनले. मला सुवार्तेचा प्रचार करण्यात किती आनंद मिळायचा! मी सात वर्षांची होते तेव्हा, खास पायनियर बनण्याचं ध्येय ठेवलं. वयाच्या १६ व्या वर्षी, या ध्येयाच्या दिशेने प्रगती करण्याकरता मी बाप्तिस्मा घेतला. पण त्यानंतर लगेच मला झटके येऊ लागले.
पायनियर सेवा
हा आजार असतानाही मला वाटायचं की मी यहोवाच्या साक्षीदारांची पूर्णवेळेची सेवक बनू शकते. पण आठवड्यातून दोनदा तरी मला झटके येत असल्यामुळे, मंडळीतल्या काहींना वाटायचं, की मी इतकी मोठी जबाबदारी घेऊ नये. मी खूप निराश झाले. पण काही दिवसांनी, मेक्सिकोतील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरात काम करणारं एक जोडपं आमच्या मंडळीत आलं होतं. त्यांना जेव्हा कळलं, की मी पायनियर बनू इच्छित होते तेव्हा त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. माझ्या आजारपणामुळे मला माझी पायनियरींग थांबवायची काही गरज नाही, हे त्यांनी मला पटवून सांगितलं.
त्यामुळे, १ सप्टेंबर, १९८८ रोजी मला सामान्य पायनियर म्हणून नियुक्ती मिळाली. मला माझ्याच गावात म्हणजे मेक्सिकोतील सॅन आन्द्रेस चिऊटला इथं पायनियर म्हणून नेमण्यात आलं. मी दर महिन्याला सुवार्तेचा प्रचार करण्यात पुष्कळ तास खर्च करायचे. झटक्यामुळे मला कधी प्रचाराला जाता आलंच नाही तर मी क्षेत्रातील लोकांना शास्त्रवचनीय मुद्द्यांवर पत्रं लिहायचे आणि पत्रानं त्यांना बायबलचा अभ्यास करण्याचं उत्तेजन द्यायचे.
माझ्या आजाराचं निदान
माझ्या आईवडिलांनी खूप खर्च करून मला एका न्यूरोलॉजी तज्ज्ञांकडे नेलं. मला मिरगीचा आजार आहे, असं या डॉक्टरांनी निदान सांगितलं. मला मिळत असलेल्या उपचारामुळे जवळजवळ चार वर्षांपर्यंत माझा आजार आटोक्यात राहिला. या काळात मी पायनियर सेवा प्रशालेत उपस्थित राहू शकले. या प्रशालेत मला मिळालेल्या उत्तेजनामुळे माझ्यात, सुवार्तिकांची अधिक गरज असलेल्या क्षेत्रात जाऊन सेवा करण्याची इच्छा वाढली.
मला माझी सेवा वाढवण्याची किती उत्कट इच्छा आहे हे माझ्या आईवडिलांना माहीत होतं. मी घेत असलेल्या उपचारांमुळे माझं आजारपण काहीप्रमाणात आटोक्यात आलं असल्यामुळे त्यांनी मला, माझ्या घरापासून २०० किलोमीटर दूर असलेल्या मिचवाकान प्रांतांतल्या सेटाक्वारो शहरात जाण्याची परवानगी दिली. इथं, इतर पायनियरांबरोबर राहिल्यामुळे पूर्ण वेळेच्या सेवेबद्दलचं माझं प्रेम आणखी वाढलं.
पण सेटाक्वारोत दोन वर्ष राहिल्यानंतर, मला पुन्हा झटके येऊ लागले. मी पुन्हा घरी गेले. मी खूप निराश व दुखित झाले. मला वैद्यकीय उपचारांची गरज होती. मी दुसऱ्या एका न्यूरोलॉजी तज्ज्ञाकडे गेले. त्यांनी मला सांगितलं, की मी घेत असलेल्या औषधांमुळे माझ्या यकृतावर हानीकारक परिणाम होत आहे. मी मग दुसरी औषधे शोधू लागले, कारण तज्ज्ञांची फी द्यायला आम्हाला जमत नव्हतं. माझी तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली होती. मला माझी पायनियरींग सोडावी लागली. प्रत्येक झटका, माझ्या प्रगतीमधील पीछेहाट होता. पण मी जेव्हा स्तोत्रसंहिता वाचू लागले व प्रार्थनेत यहोवाकडे वळू लागले तेव्हा मला, तो देत असलेले सांत्वन आणि शक्ती जाणवली.—स्तोत्र ९४:१७-१९.
मी माझं ध्येय गाठते
माझी तब्येत अगदीच बिकट झाली होती. मला दिवसांतून दोनदोनदा झटके यायचे. पण एके दिवशी मला एक चांगला डॉक्टर भेटला. त्यांनी मिरगीच्या आजारावर एक विशिष्ट औषधोपचार सांगितला. ती औषधे घेतल्यामुळे मला जास्त काळसाठी बरं वाटू लागलं. त्यामुळे १ सप्टेंबर १९९५ रोजी मी पुन्हा पायनियर सेवा सुरू केली. माझी तब्येत स्थिर होती. दोन वर्षांपर्यंत मला झटके आले नव्हते. त्यामुळे मग मी खास पायनियर म्हणून सेवा करण्यासाठी अर्ज भरला. याचा अर्थ मला सेवेत अधिक काळ राहावं लागणार होतं आणि अधिक गरज असलेल्या ठिकाणी मला जावं लागणार होतं. मला जेव्हा माझी नेमणूक मिळाली तेव्हा मला किती आनंद झाला असेल, याची तुम्ही कल्पना करू शकता! लहानपणी मी जे ध्येय ठेवलं होतं ते सरतेशेवटी मी गाठलं!
२००१ सालच्या १ एप्रिल रोजी मी ईडालगो प्रांतांतील डोंगराळ प्रदेशातील एका लहान गावात माझ्या नवीन नेमणूकीस प्रारंभ केला. सध्या मी ग्वानाह्वाटो प्रांतांतील एका लहान शहरात सेवा करत आहे. औषधांच्या आणि पुरेसा आराम घेण्याच्या बाबतीत मला खूप काळजी घ्यावी लागते. मला माझ्या आहाराबाबत, खासकरून चरबीयुक्त, कॅफेन आणि डबाबंद अन्न यांबद्दलसुद्धा काळजी घ्यावी लागते. शिवाय मी भावनात्मक रीत्यासुद्धा शांत राहायचा प्रयत्न करते, जसे की मी चिडचीड किंवा जास्त काळजी करत नाही. अशा कडक नित्यक्रमामुळे मलाच फायदा झाला आहे. खास पायनियर म्हणून मी सेवा सुरू केल्यापासून मला फक्त एकदाच झटका आला.
मी अविवाहित असून, माझ्यावर कौटुंबिक जबाबदारी नसल्यामुळे मी खास पायनियर म्हणून माझी सेवा आनंदाने करू शकत आहे. ‘आपली कार्ये व . . . आपण देवावर दाखविलेली प्रीति, ही विसरून जाण्यास यहोवा अन्यायी नाही’ हे जाणल्यामुळे मला सांत्वन मिळते. तो खरच किती प्रेमळ आहे. आपण जितकी सेवा करू शकतो त्याच्यापेक्षा अधिक सेवेची तो आपल्याकडून अपेक्षा करीत नाही. हे सत्य माहीत झाल्यामुळे मी माझ्या विचारसरणीत संतुलन राखू शकले आहे. कारण, माझ्या तब्येतीमुळे मला पुन्हा पायनियरींग थांबवावी लागलीच तर मला माहीत आहे, की मनापासून मी करत असलेल्या सेवेवर यहोवा तेव्हाही संतुष्ट असेल.—इब्री लोकांस ६:१०; कलस्सैकर ३:२३.
मी दररोज लोकांना जेव्हा माझ्या विश्वासाविषयी सांगते, तेव्हा मला आणखी बळकटी मिळते यात काही शंकाच नाही. शिवाय, भवितव्यासाठी यहोवानं आपल्यासाठी राखून ठेवलेले आशीर्वाद आपण मनात सर्वप्रथम ठेवतो. नवीन जगात आजारपण नसेल, “शोक, रडणे व कष्टही” नसेल, “कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या” असतील, असे अभिवचन बायबल देते.—प्रकटीकरण २१:३, ४; यशया ३३:२४; २ पेत्र ३:१३. (g०५ ६/२२)
[२६ पानांवरील चित्रे]
(वर) मी सात वर्षांचे होते तेव्हा; मी १६ वर्षांची होते तेव्हा, त्यानंतर काही काळानंतरच माझा बाप्तिस्मा झाला
[२७ पानांवरील चित्र]
माझ्या एका मैत्रिणीबरोबर प्रचारकार्य करत असताना