वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g05 ४/८ पृ. २०-२२
  • मी अंगमेहनतीचं काम करायला का शिकलं पाहिजे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मी अंगमेहनतीचं काम करायला का शिकलं पाहिजे?
  • सावध राहा!—२००५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकता
  • व्यक्‍तिमत्त्व विकास
  • पवित्र सेवा
  • तुम्ही कसे शिकू शकता
  • श्रम करून आपल्या जिवास सुख द्या
    देवाच्या प्रेमात टिकून राहा
  • तरुण बहिणींनो​—आध्यात्मिक रितीने प्रौढ बना
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • लौकिक शिक्षण आणि तुमचे आध्यात्मिक ध्येय
    आमची राज्य सेवा—१९९९
  • ११ मेहनत
    सावध राहा!—२०१८
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—२००५
g05 ४/८ पृ. २०-२२

तरुण लोक विचारतात . . 

मी अंगमेहनतीचं काम करायला का शिकलं पाहिजे?

“स्वप्नातही मी कधी अंगमेहनतीचं काम करायचा विचार केला नव्हता. मला तर कंप्यूटरच आवडायचं.”—नेथन.

“काही मुलं, काम करणाऱ्‍या मुलांची थट्टा करायचे. त्यांना वाटायचं, की आम्ही बुद्धू आहोत म्हणून आम्हाला हे काम करावं लागतय.”—सारा.

अंगमेहनतीचे काम—पुष्कळांना ते कंटाळवाणे, घाणेरडे, नकोसे वाटते. अंगमेहनतीच्या कामाविषयी अर्थशास्त्राच्या एका प्राध्यापकांनी म्हटले: “समाजात उच्च स्थान असले पाहिजे अशी मनोवृत्ती असलेल्या जगात, या कामांना हलक्या दर्जाचे समजले जाते.” म्हणूनच, पुष्कळ तरुण अंगमेहनतीच्या कामाचे नाव काढताच नाक का मुरडतात, हे आपल्याला समजू शकते.

परंतु बायबल अंगमेहनतीच्या कामाकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते. राजा शलमोनाने म्हटले: “मनुष्याने खावे, प्यावे व श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे यापेक्षा त्याला काहीहि इष्ट नाही.” (उपदेशक २:२४) बायबल काळांत, इस्राएल कृषिप्रधान राष्ट्र होते. नांगरणे, कापणी, मळणी यासारखी कामे करण्यासाठी बरेच कष्ट करावे लागत असत. तरीपण शलमोनाने म्हटले, की कष्टाच्या कामामुळे समृद्ध प्रतिफळ मिळू शकते.

अनेक शतकांनंतर, प्रेषित पौलाने म्हटले: “चोरी करणाऱ्‍याने पुन्हा चोरी करु नये, तर त्यापेक्षा . . . जे चांगले ते आपल्या हातांनी करुन उद्योग करीत राहावे.” (इफिसकर ४:२८) स्वतः पौल अंगमेहनतीचे काम करायचा. तो उच्च शिक्षित होता तरीसुद्धा अधूनमधून तंबू बनवून तो आपला उदरनिर्वाह करायचा.—प्रेषितांची कृत्ये १८:१-३.

तुम्हाला स्वतःला अंगमेहनतीच्या कामाविषयी काय वाटते? तुम्हाला कदाचित याची जाणीव नसेल, पण अंगमेहनतीच्या कामामुळे तुम्हाला अनेक मार्गांनी फायदा मिळू शकतो.

तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकता

अंगमेहनतीचे काम—मग ते हाताड्याने ठोकायचे काम असो अथवा गवत कापण्याचे काम असो—तुमच्या आरोग्यासाठी चांगले आहे. यामुळे तुम्ही फक्‍त सडसडीतच राहत नाही तर आणखीही पुष्कळ फायदे तुम्हाला मिळू शकतात. टायर पंक्चर झाल्यावर तुम्हाला टायर बदलता येते का? किंवा गाडीचे ऑईल कसे बदलायचे ते तुम्हाला माहीत आहे का? घरातील खिडकी मोडली असेल तर ती तुम्हाला दुरुस्त करता येते का? किंवा, तुंबलेला पाईप तुम्हाला दुरुस्त करता येतो का? तुम्हाला स्वयंपाक येतो? तुम्हाला बाथरूम चकाचक आणि निर्जंतुक बनवता येते का? ही अशी कामे आहेत जी, मुलामुलींना आली पाहिजेत. पुढे, एक ना एक दिवशी तुम्हाला नक्कीच ती कामी येतील.

मनोरंजक गोष्ट म्हणजे, येशू ख्रिस्तही पृथ्वीवर असताना काही कामे करायला शिकला होता. तो सुताराचे काम करायला शिकला होता. त्याचा दत्तक पिता, योसेफ याच्याकडून तो हे काम शिकला होता. म्हणूनच तर येशूला लोक सुतार म्हणायचे. (मत्तय १३:५५; मार्क ६:३) तुम्ही देखील मेहनतीचे काम करून वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये शिकू शकता.

व्यक्‍तिमत्त्व विकास

अंगमेहनतीचे काम केल्याने तुमचा स्वतःविषयीचा दृष्टिकोन देखील बदलू शकतो. यु.एस. नॅश्‍नल मेंटल हेल्थ ॲण्ड एज्युकेशन सेंटरसाठी लेखक असलेले डॉ. फ्रेड प्रोव्हेनझॉनो म्हणतात, की अंगमेहनतीचे काम केल्याने, तुमची “आत्म-निर्भरता आणि आत्मविश्‍वास वाढतो” आणि तुम्ही अधिक आत्मसंयमी व संघटित होता; व्यवसायात यशस्वी होण्याकरता याच गुणांची आवश्‍यकता आहे.” जॉन नावाचा एक तरुण म्हणतो: “अंगमेहनतीचे काम केल्याने तुमच्या अंगी धीर उत्पन्‍न होतो. समस्या कशा सोडवायच्या हे तुम्ही शिकता.”

लेखाच्या सुरुवातीला जिचा उल्लेख करण्यात आला ती सारा म्हणते: “अंगमेहनतीच्या कामामुळे मी कष्टाळू आणि उद्योगी बनण्यास शिकले. मानसिकरीत्या आणि शारीरिकरीत्या मी स्वतःला शिस्त लावायला शिकले.” अंगमेहनतीचे काम कंटाळवाणे असते, असे आहे का? नेथन म्हणतो: “मी हातांनी काम करायला शिकलो, तेव्हा मला आनंद वाटू लागला. मी जसजशी माझी कौशल्ये सुधारत गेलो तसतसे माझ्या कामाचा दर्जा वाढत असल्याचे मला दिसले. यामुळे माझा आत्मसन्मान वाढला.”

अंगमेहनतीचे काम केल्याने तुम्ही, काहीतरी साध्य केल्याचे समाधान अनुभवू शकता. जेम्स नावाचा एकजण असे म्हणतो: “मला सुतारकाम खूप आवडतं. कधीकधी मी खूप थकून जातो, पण मी जेव्हा माझ्या पूर्ण झालेल्या कामाकडे पाहतो तेव्हा, मी काहीतरी साध्य केल्याचं मला जाणवतं. यामुळं मला खूप समाधान मिळतं.” ब्रायनच्या काहीशा अशाच भावना आहेत. “मला गाड्या दुरुस्त करायला आवडतात. गाडीचा एखादा तुटलेला किंवा खराब झालेला भाग सुधारून तो जवळजवळ नवीन बनवण्याचं कौशल्य आपल्यात आहे, याची जेव्हा मला जाणीव होते तेव्हा माझा आत्मविश्‍वास वाढतो, माझ्या मनाला खूप समाधान मिळतं.”

पवित्र सेवा

ख्रिस्ती युवकांच्या बाबतीत, अंगमेहनतीचे काम त्यांना देवाच्या पवित्र सेवेत टिकून राहायला मदत करू शकते. राजा शलमोनाला यहोवासाठी एक भव्य मंदिर बांधण्याची नेमणूक देण्यात आली तेव्हा, ही काही तोंडची गोष्ट नाही, हे त्याला जाणवले. हे मंदिर बांधण्यासाठी खूप प्रयत्न आणि कौशल्याची गरज लागेल, हे त्याने ओळखले. बायबल म्हणते: “शलमोन राजाने सोर येथून हीरामास बोलावून आणिले. तो नफताली वंशांतील एका विधवेचा पुत्र होता; त्याचा बाप सोरातला एक तांबट होता; पितळेचे सगळे काम करण्यास लागणारे शहाणपण, अक्कल व कौशल्य ही त्याच्या ठायी भरपूर होती; तो शलमोन राजाकडे येऊन त्याचे सर्व काम करू लागला.”—१ राजे ७:१३, १४.

यहोवाच्या उपासनेला बढावा देण्यासाठी आपल्या कलाकौशल्यांचा उपयोग करण्याची किती मोठी सुसंधी हीरामास मिळाली होती! हीरामाच्या उदाहरणावरून, बायबलचे शब्द किती खरे आहेत हे कळते. नीतिसूत्रे २२:२९ म्हणते: “आपल्या धंद्यांत चपळ असा कोणी तुला दिसतो काय? त्याचे स्थान राजासमोर आहे; हलकट लोकांसमोर नाही.”

आज, बांधकामाचा थोडासाच किंवा काहीच अनुभव नसणाऱ्‍या तरुणांना देखील राज्य सभागृहांचे बांधकाम करण्याचा सुहक्क मिळाला आहे. या प्रकल्पांवर काम केल्याने काही जण, इलेक्ट्रिकल, प्लंबिंग, गवंडीकाम आणि सुतारकाम यासारखे फायदेकारक धंदे शिकू शकले आहेत. तुम्ही तुमच्या स्थानीय वडिलांबरोबर बोलून पाहा कदाचित तुम्हालाही राज्य सभागृहाचे बांधकाम करण्याची संधी मिळू शकेल.

अनेक राज्य सभागृहांचे बांधकाम केलेल्या जेम्सने म्हटले: “मंडळीतल्या अनेकांना, मदत करण्यासाठी वेळ नसेल, किंवा त्यांच्याजवळ क्षमता नसतील. तर तुम्ही मदतीसाठी पुढे येऊन, अख्ख्या मंडळीलाच जणू काय मदत करता.” गवंडीकाम शिकलेल्या नेथनला दिसून आले, की हे काम शिकल्यामुळे त्याच्यासमोर देवाच्या सेवेत आणखी एक द्वार खुले झाले. तो आठवून सांगतो: “मी झिंबाब्वेला जाऊन, माझ्या कलाकौशल्यांचा यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराच्या बांधकामात उपयोग करू शकलो. तिथं मी तीन महिने होतो. हा माझ्या जीवनात आलेला सर्वात मोठा अनुभव आहे.” काही तरुणांना अंगमेहनतीचे काम करण्याची इच्छा असल्यामुळे ते, यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानीय शाखा दफ्तरात स्वयंसेवक म्हणून सेवा करण्याचा अर्ज भरण्यास प्रवृत्त झाले.

अंगमेहनतीच्या कामात प्राविण्य मिळवल्यामुळे तुम्हाला काही प्रमाणात आर्थिक स्वातंत्र्य मिळू शकते. यहोवाच्या साक्षीदारांतील अनेक तरुण, पायनियर किंवा पूर्णवेळेचे सुवार्तिक म्हणून सेवा करतात. एखादा पेशा शिकून घेतल्यामुळे, शिक्षणात वेळ आणि पैसा खर्च करण्यापेक्षा ते स्वतःचा आर्थिक भार उचलू शकले आहेत.

तुम्ही कसे शिकू शकता

पैसे कमवण्याच्या उद्देशाने तुम्ही एखादा पेशा शिकू इच्छित असला किंवा फक्‍त घरात उपयोगी पडू शकेल म्हणून एखादा पेशा शिकून घेऊ इच्छित असला तरी, तुम्ही अंगमेहनतीचे काम कसे करायचे ते शिकून घेण्यात फायदे आहेत. तुमच्या स्थानीय शाळेत एखाद्या पेशाचे कोर्सेस दिले जात असतील. किंवा कदाचित तुम्हाला अगदी घरातच एखाद्या पेशाचे प्रशिक्षण मिळू शकते. ते कसे? घरातील कामे करण्यास शिकल्याने. आधी ज्यांचा उल्लेख करण्यात आला ते डॉ.  प्रोव्हेनझॉनो म्हणतात: “घरातील बारीकसारीक कामे किशोरवयीनांसाठी चांगली असतात. कारण या कामांद्वारे त्यांना घरातील मूलभूत ‘उपजीविका कौशल्ये’ शिकायला मिळतात जी किशोरवयीनांना, जेव्हा पालकांपासून वेगळे राहण्याची त्यांच्यावर वेळ येते तेव्हा यशस्वीरीत्या व सक्षमपणे जगायला मदत करू शकतात.” तेव्हा, घरात कोणते काम करता येईल हे पाहत राहा. बागेतील गवत कापायचे काम आहे का? नाहीतर, पुस्तकाचे एखादे कपाट दुरुस्त करायचे आहे का?

अंगमेहनतीचे काम कमीपणा आणणारे किंवा हलक्या दर्जाचे तर नाहीच. उलट अनेक मार्गांनी ते तुमच्याच फायद्याचे आहे. तेव्हा, अंगमेहनतीच्या कामापासून अंग चोरू नका! अंगमेहनतीच्या कामातून “सुख” मिळवण्याचा प्रयत्न करा कारण उपदेशक ३:१३ म्हणते, की अंगमेहनतीचे काम “देवाची देणगी आहे.” (g०५ ३/२२)

[२१ पानांवरील संक्षिप्त आशय]

एखादा पेशा शिकून घेतल्यामुळे अनेक तरुणांना देवाची सेवा वाढवता आली आहे

[२२ पानांवरील चित्रे]

सहसा तुमचे पालक तुम्हाला मूलभूत कौशल्ये शिकवू शकतात

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा