व्हेनिस—‘समुद्रात वसलेली नगरी’
इटली येथील सावध राहा! लेखकाकडून
“समुद्रात वसलेली वैभवशाली नगरी. तिच्या रस्त्यांतून, गल्लीबोळांतून समुद्राचं पाणी वाहतंय; तिच्या महालांच्या भिंतींना समुद्रवेलींनी कवटाळलंय.”—सॅम्यल रॉजर्स, इंग्रज कवी, १८२२.
ही “वैभवशाली नगरी” म्हणजे व्हेनिस. एकेकाळी एका महान प्रजासत्ताक राष्ट्राची राजधानी असलेल्या या व्हेनिस शहराचे कित्येक शतके एका वैभवी समुद्री साम्राज्यावर प्रभुत्व होते. पण हे शहर “समुद्रात” का व कसे बांधण्यात आले? ते कशामुळे वैभवी ठरले? त्याचे साम्राज्य कशाप्रकारे संपुष्टात आले आणि आज व्हेनिसच्या वैभवातील काय शिल्लक आहे?
अनाकर्षक ठिकाण
एड्रियॅटिक समुद्राच्या वायव्य टोकाशी असलेल्या, खाऱ्या पाण्याच्या एका सरोवराच्या मधोमध वसलेले व्हेनिस ११८ द्वीपांना एकमेकांशी जोडते. जवळच्याच समुद्रात येऊन मिळणाऱ्या नद्यांतून किनाऱ्यावरच्या उथळ पाण्यात बराच गाळ येऊन साचतो. भरती-ओहोटी व पाण्याच्या प्रवाहामुळे या ठिकाणी वाळूचे बांध तयार झाले आहेत. या बांधांमुळे समुद्रापासून वेगळे झालेल्या खाऱ्या पाण्याचे एक सरोवर तयार झाले असून ते ५१ किलोमीटर लांब व जवळजवळ १४ किलोमीटर रुंद आहे. समुद्रात जाऊन मिळणारे अरुंद फाटे तीन फूट उंचीच्या भरतीसाठी पुरेसे असून येथून बोटींची ये-जाही होऊ शकते. एका सूत्रानुसार, “कित्येक शतकांपासून हे सरोवर एड्रियॅटिक समुद्रात तसेच मध्य व उत्तर युरोपातील नद्यांतून किंवा काफिल्यांच्या मार्गांवरील प्रवासातील एक मुख्य स्थानक होते.”
अभ्यासकांच्या मते व्हेनिस शहराची स्थापना सा.यु. पाचव्या ते सातव्या शतकांमध्ये झाली असावी. या कालावधीत उत्तरेकडील रानटी जमातींच्या लोकांनी मुख्य भूप्रदेशातील शहरांवर आक्रमण केले व बरीच नासधूस व लुटालूट केली. लुटारूंना घाबरून पळालेल्या लोकांपैकी बऱ्याच जणांनी सरोवराच्या आसपासच्या द्वीपांचा आश्रय घेतला. ही द्वीपे कोणत्याही दृष्टीने सोयीस्कर नसली तरीसुद्धा ती निदान सुरक्षित होती.
प्राचीन दस्तऐवजांवरून असे सूचित होते की अगदी सुरुवातीला येथे जी घरे बांधण्यात आली त्यांकरता आधी चिखलात मोठमोठे खांब ठेवून त्यांवर अधूनमधून झाडांच्या पातळ फांद्या व वेत पसरून पाया तयार केला जात व त्यावर बांधकाम करण्यात येत असे. कालांतराने व्हेनिसच्या रहिवाशांनी हजारो लाकडांच्या ढिगाऱ्यावर पाया तयार करून त्यावर दगडी बांधकाम करण्यास सुरुवात केली. दरम्यान, सरोवरातील रियाल्टोची द्वीपे जी शहराचा प्रमुख भाग बनणार होती, ती सहसा पाण्याने भरून जायची. आणि त्यामुळे येथली जमीन पक्की नसून वसाहती स्थापन करण्याइतकी मोठीही नव्हती. यावर एकच उपाय होता, तो म्हणजे, ओली जमीन कोरडी करून समुद्राच्या जागेवर विस्तारित जमीन निर्माण करणे. येथील रहिवाशांनी आपल्या बोटींकरता कालवे काढले आणि द्वीपांलगतच्या जमिनीत भर घालून पाण्याखालील जमीन पक्क्या बांधकामाकरता संपादन केली. हे कालवेच या शहरातील रस्ते बनले आणि पायी चालणाऱ्या लोकांना एका बेटावरून दुसऱ्या बेटावर जाता यावे म्हणून ठिकठिकाणी पुल बांधण्यात आले.
प्रजासत्ताक राज्याचा उदय व उत्कर्ष
पश्चिमेकडील रोमन साम्राज्य लयास गेल्यानंतर सरोवरातील द्वीपे बायझंटिन साम्राज्याच्या प्रभुत्वाखाली आली. या साम्राज्याची राजधानी कॉन्स्टंटिनोपल (आताचे इस्तानबुल) येथे होती. पण द्वीपांवरील रहिवाशांनी बंड पुकारले व स्वातंत्र्याची मागणी केली. परिणामस्वरूप व्हेनिस एका विचित्र स्थितीत आले, ते ‘ड्यूकच्या सत्तेखालील एक लहानसे स्वतंत्र क्षेत्र होते, पण फ्रँक व बायझंटिन या दोन मोठ्या साम्राज्यांच्या मधोमध अगदी दूरस्थ ठिकाणी होते.’ या असामान्य स्थितीमुळे हे शहर एक महान “व्यापारिक मध्यस्थाची” भूमिका निभावू शकले.
यानंतरच्या शतकांत, भूमध्य सागरालगतच्या अनेक राज्यांशी व्हेनिसच्या लढाया झाल्या. यांत सारासेन्स, नॉर्मन, व बायझंटिन लोकांचा समावेश होता. शेवटी व्हेनिस या सर्वांपेक्षा अधिक शक्तिशाली सिद्ध झाले. पण यासाठी प्रथम त्यांना १२०४ साली चौथ्या धर्मयुद्धाची दिशा बदलून आपला सर्वात मोठा शत्रू असलेल्या कॉन्स्टंटिनोपलचा नाश घडवून आणावा लागला. व्हेनिसने काळा समुद्र व एजियन समुद्राच्या काठावर, तसेच ग्रीस, कॉन्स्टंटिनोपल, सिरिया, पॅलेस्टाईन, सायप्रस व क्रीट येथे अनेक व्यापारिक केंद्रांची स्थापना केली होती. आता बायझंटिन साम्राज्याच्या पतनाचा फायदा उचलून व्हेनिसने त्यांच्यापैकी बऱ्याच केंद्रांचे व्हेनिशियन वसाहतींमध्ये रूपांतर केले.
“भूमध्य प्रदेशाची सम्राज्ञी”
बाराव्या शतकातच, व्हेनिसमधील जहाजांच्या कारखान्यांत दर दोन तीन तासांच्या अंतराने एक पूर्ण सोयींनी युक्त असे जहाज निर्माण केले जात होते. निरनिराळ्या प्रकारचे स्थानिक उद्योगही येथे भरभराटीस आले, उदाहरणार्थ, काचेच्या वस्तू बनवणे तसेच जाळीदार कापड, जरीकाम, डॅमस्क व मखमल यांसारख्या उत्तम प्रतीच्या कापडांचे उद्योग. व्हेनिसचे व परदेशी व्यापारी पाश्चिमात्य देशांतून शस्त्रे, घोडे, जडजवाहीरांचे साहित्य, जनावरांची लोकरयुक्त कातडी, लाकूड, लोकर, मध, मेण व गुलाम आणीत. तर पौर्वात्य मुस्लिम देशांतून सोने, रूपे, रेशीम, मसाले, कापूस, रंग, हस्तिदंत, अत्तर व इतर असंख्य वस्तूंची आयात केली जात असे. शहरातील प्रशासकीय अधिकारी येथील बाजारांत प्रवेश करणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या सर्व मालावर कर आकारत होते.
शहराला सुशोभित करण्यात पॅलाडियो, टिटियन व टिन्टोरेट्टो यांसारख्या सुविख्यात शिल्पकारांचा व कलाकारांचा समावेश होता; म्हणूनच व्हेनिसचे वर्णन ला सेरेनेससीमा अर्थात, “सर्वात अक्षुब्ध” किंवा “सौंदर्याने परिपूर्ण” असे करण्यात आले. “भूमध्य प्रदेशाची सम्राज्ञी, . . . सुसंस्कृत जगातील सर्वात समृद्ध व्यापारी केंद्र” ही सगळी वर्णने त्यावेळी या शहराकरता अगदी योग्य होती. कित्येक शतकांपर्यंत या शहराचे वैभव तसेच कायम राहिले; पण १६ व्या शतकात व्यापाराचा अक्ष अटलांटिक व पश्चिम गोलार्धाकडे वळला तेव्हा व्हेनिसचा प्रभाव हळू हळू लयास जाऊ लागला.
व्हेनिसच्या वसाहती भूमध्य सागरालगतच्या संपूर्ण परिसरात विखुरलेल्या असल्यामुळे त्यांच्यात भौगोलिक सान्निध्य, प्रशासकीय एकता किंवा संयुक्तता असणे शक्यच नव्हते. एकेक वसाहत व्हेनिसच्या हातून जाऊ लागली. आसपासच्या राज्यांनी हळूहळू व्हेनिसच्या सत्तेखालील प्रदेश बळकावण्यास सुरुवात केली आणि शेवटी १७९७ साली नेपोलियन पहिला याने या समुद्री शहराला ताब्यात घेऊन त्याला ऑस्ट्रियाच्या हाती सोपवले. १८६६ साली व्हेनिसला इटलीत सामावण्यात आले.
स्वप्नमय नगरी
व्हेनिस शहराला भेट देणाऱ्या अनेकांच्या मते हा अनुभव, कालप्रवाहात दोन तीनशे वर्षे मागे जाण्यासारखा आहे. या शहरातील खुमार काही औरच आहे.
एक गोष्ट जी येथे प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे निरव शांतता. सहसा कालव्यांतून शांतपणे जाणाऱ्या नावांच्या वाहतुकीचा, शहरातील चिंचोळ्या गल्लीबोळांतील लोकांच्या वर्दळीशी जराही संबंध येत नाही; फक्त काही ठिकाणी कालव्यांवरून पलीकडे जाण्याकरता कमानदार दगडी पुल बांधण्यात आले आहेत. येथे “रस्ते” पाण्याचेच असल्यामुळे येथल्या मोटरगाड्या म्हणजे बोटीच असतात. शहराचा प्रत्येक कोपरा जणू विलोभनीय देखाव्यांनी ल्यालेला आहे. सेंट मार्क्स चौरस्ता व तेथील बॅसिलिका, बेल टॉवर; पाण्याला लागून असलेल्या इमारतींचे रम्य दृश्य, सरोवराच्या हिरवट पाण्यावर पडणारी सूर्याची किरणे; एकेक दृश्य खरोखर मन मोहून घेते. असंख्य कलाकारांना या नयनरम्य देखाव्यांनी प्रेरित केले आहे.
मुख्य चौरस्त्यावर असलेली खुली उपाहारगृहे, अर्थात कॅफे पर्यटकांची व शहरातील रहिवाशांची बरीच गर्दी खेचतात. येथे तुम्ही लहानलहानशा खास ऑर्केस्ट्रांनी वाजवलेल्या संगीताचा आनंद लुटताना एखादे पेय घेऊ शकता किंवा इथल्या खास जेलॅटोचा (आइस्क्रिमसारखा पदार्थ) आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला येथे एकही कार दिसणार नाही; त्यामुळे ये-जा करणाऱ्या लोकांकडे आणि तुमच्याभोवती असलेल्या उत्तम वास्तूकलेचे नमूने असलेल्या इमारतींकडे पाहताना, तुम्हाला खरच असे वाटेल की जणू तुम्ही एका वेगळ्याच कालखंडात पोचला आहात.
जे उत्कृष्ट कलाकुसरीच्या नमुन्यांच्या शोधात आहेत त्यांच्याकरता या शहरात असंख्य आकर्षणे आहेत. शहरातील निरनिराळ्या महालांत, वस्तूसंग्रहालयांत व चर्चेसमध्ये जगप्रसिद्ध कलाकारांच्या कलाकृती प्रदर्शनाकरता ठेवल्या आहेत. पण काही पर्यटकांना फक्त चिंचोळ्या गल्लीबोळांतून मनसोक्त फिरायला आणि येथल्या अनोख्या देखाव्यांकडे पाहायला जास्त आवडते. या शहरातील जगविख्यात उत्पादने विकणारी अनेक दुकाने तुमच्या दिमतीला तयार आहेत. या वस्तूंमध्ये बुरानो बेटावरील खास जाळीदार कापड व भरतकाम आणि मुरानो बेटाच्या देखण्या काचेच्या वस्तू व भांडी तुम्ही विकत घेऊ शकता. वाटल्यास तुम्ही वेपोरेट्टोची (मोटरबोट) फेरी घेऊन यांपैकी एका बेटावर जाऊन या वस्तू कशा बनवल्या जातात हे प्रत्यक्ष पाहू शकता; हाही एक आगळाच अनुभव ठरेल.
निमुळत्या टोकदार कमानी असलेले भव्य महाल, गतकाळात या शहरावर पौर्वात्य देशांचा पगडा होता याची तुम्हाला आठवण करून देतील. शहराचा मुख्य जलमार्ग, अर्थात ग्रँड कनॅल यावर बांधलेला सुप्रसिद्ध रियॅल्टो पुल आणि या पुलाखालून तुळतुळीत काळ्या गोन्डोला बोटींची शांतपणे ये-जा सुरू असते.
अस्तित्व टिकवण्याचा संघर्ष अजूनही चालूच
व्हेनिस हे “सौंदर्याने परिपूर्ण असे साम्राज्य” लयास जाऊन दोन शतके उलटली आहेत; पण अजूनही व्हेनिसचा संघर्ष सुरूच आहे. अर्थात, हा एका वेगळ्या प्रकारचा संघर्ष आहे. येथल्या जमिनीचे वधारलेले भाव, रोजगार संधींचा अभाव व आधुनिक सुविधांचा तुटवडा यामुळे येथे स्थाईक झालेल्या रहिवाशांची संख्या, जी १९५१ साली १,७५,००० इतकी होती ती २००३ साली ६४,००० पर्यंत घसरली. या शहरासंबंधी जटिल स्वरूपाचे सामाजिक व आर्थिक प्रश्न सोडवण्याची गरज आहे; उदाहरणार्थ, अधोगतीच्या मार्गाला लागलेल्या या शहराचे पुनरुज्जीवन कसे करता येईल?
मुख्य भूप्रदेशावर, १९२० च्या दशकात एक नवा औद्योगिक परिसर निर्माण करण्यात आला; यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल असे अपेक्षित होते. तेलाच्या टँकर्सना तेल शुद्धीकरणाच्या कारखान्यांपर्यंत पोचवण्यासाठी सरोवराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एक खोल खाडी खणण्यात आली. या उद्योगांमुळे लोकांना रोजगार तर मिळाला पण यामुळे प्रदूषणाची समस्या सुरू झाली अशी तक्रार केली जाते. तसेच यामुळे समुद्री पाण्याची पातळी वाढून ॲक्वा आल्टा म्हटलेली भरतीची नाशकारक स्थिती वारंवार निर्माण होऊ लागली आहे. यामुळे शहराचा ऐतिहासिक परिसर वरचेवर जलमय होऊ लागला आहे.
सरोवराचे वातावरण व पाण्याच्या हालचाली यांतल्या नाजूक संतुलनावरच या शहराचे अस्तित्व अवलंबून आहे ही तर बऱ्याच काळापासून ज्ञात असलेली वस्तूस्थिती आहे. १३२४ सालीसुद्धा, सरोवरात बराच चिखल व गाळ आणून सोडणाऱ्या नद्यांची दिशा बदलण्याकरता व्हेनिशियन लोकांनी भव्य अभियांत्रिकी प्रकल्प हाती घेतले होते. अठराव्या शतकात, एड्रियॅटिक समुद्राचे पाणी सरोवरात वाहत येऊन महापूर येऊ नये म्हणून त्यांनी समुद्राचे पाणी अडवण्यासाठी भिंती उभारल्या होत्या.
पण आताची परिस्थिती कधी नव्हे इतकी बिकट झाली आहे. औद्योगिक वापराकरता जमिनीखालच्या जलसंचयांच्या अतिवापरामुळे जमिनीची पातळी कमी होण्याच्या समस्येवर मात करण्यात आली आहे अशी अपेक्षा केली जाते. पण तरीसुद्धा जगभरातील समुद्रांची पातळी वाढत चालली आहे. शिवाय, ओल्या जमिनीत भर घालून पक्की जमीन संपादन करण्याच्या प्रक्रियेमुळे सरोवराचे क्षेत्र कमी करण्यात आले आहे आणि जमीन व पाण्याचे संतुलन बिघडवण्यात आले आहे. भरतीच्या पाण्याची समस्या तर नेहमीच होती पण आता आहे इतकी बिकट कधीच नव्हती. २० व्या शतकाच्या सुरुवातीला सेंट मार्क्स चौरस्ता वर्षाकाठी पाच ते सात वेळा पूरग्रस्त व्हायचा. पण एका शतकानंतर, म्हणजे २००० साली, एकाच वर्षात हा प्रकार ८० वेळा घडला.
व्हेनिसचा समृद्ध ऐतिहासिक व कलात्मक वारसा लक्षात घेता, या शहराच्या समस्यांबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. भरतीच्या पाण्यापासून शहराचे संरक्षण व्हावे व नैसर्गिक परिस्थितीचे संवर्धन केले जावे, पण त्याचवेळेस बंदरावरील कारभारांत व्यत्यय येऊ नये व येथील रहिवाशांचे दैनंदिन जीवनही विस्कळीत होऊ नये यासाठी खास कायदे संमत करण्यात आले आहेत. पण प्रत्यक्षात हे कसे घडवून आणता येईल हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे.
कालव्यांच्या काठांवरील जमिनीची पातळी उंचावण्याचा, भूपृष्ठाखालील जमिनीतील पाण्याची पातळी वाढली तरी पाणी वरती येऊ नये म्हणून फरसबंदी क्षेत्रातील जमिनीला जलरोधक बनवण्याचा आणि भरतीच्या स्थितीत सांडपाण्याचा उलट प्रवाह रोकण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वात महत्त्वाचा, पण सर्वात वादग्रस्त उपाय म्हणजे, ज्या ज्या ठिकाणी समुद्राचे पाणी सरोवरात प्रवेश करू शकते त्या त्या ठिकाणी, हलवता येण्याजोगे बांध बांधून, भरतीच्या वेळी पाण्याची पातळी वाढू लागते तेव्हा हे बांध उभे करता येतील अशाप्रकारची यंत्रणा तयार करण्याची योजना आहे.
अर्थात, व्हेनिस शहरासंबंधी असलेली उद्दिष्टे साध्य करणे सोपे नाही. ही “समुद्रात वसलेली वैभवशाली नगरी” अत्यंत रोमांचक इतिहासाची साक्ष आहे, पण अनेक लेखकांनी लक्षात आणून दिल्याप्रमाणे, “बाहेरचे लोक, येथल्या स्थानिक लोकांचे नुकसान करून, किंबहुना त्यांना येथून कायमचे घालवून या शहराला एक पुराणवस्तूसंग्रहालय बनवू पाहात आहेत.” व्हेनिसला पूर्वीपासूनच नैसर्गिक परिस्थितीसंबंधीच्या समस्यांना तोंड द्यावे लागले आहे, पण आता अशी स्थिती आली आहे की “जोपर्यंत या शहरातील सामाजिक व आर्थिक क्षेत्रांत आलेली मरगळ दूर करून या शहराचे पुनरुज्जीवन केले जात नाही, तोपर्यंत, केवळ नैसर्गिक समस्यांचे निवारण करणे व्यर्थ आहे.” (g०५ ३/२२)
[१६ पानांवरील नकाशा]
(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)
व्हेनिस
[१६ पानांवरील चित्र]
ग्रँड कनॅलवरील रियॅल्टो पुल
[१७ पानांवरील चित्र]
सान जॉर्जो माजोरे
[१७ पानांवरील चित्र]
सांता मारीया देला सालूते
[१८ पानांवरील चित्र]
ग्रँड कनॅलवरील उपाहारगृहे
[१९ पानांवरील चित्र]
जलमय झालेला सेंट मार्क्स चौरस्ता
[चित्राचे श्रेय]
Lepetit Christophe/ GAMMA
[१६ पानांवरील चित्राचे श्रेय]
नकाशा: Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.; पार्श्वभूमी: © Medioimages