मुलांच्या गरजा पुरवणे
आतापर्यंत विचारात घेतलेल्या माहितीवरून स्पष्ट आहे की मुलांकडे भरपूर लक्ष देण्याची गरज आहे; पण बरीच मुले यापासून वंचित आहेत. आजच्या तरुण पिढीची दशा पाहून याची खात्री पटते. टोरोन्टो, कॅनडा येथील ग्लोब ॲन्ड मेल दैनिकात एका संशोधकाने या खेदजनक वस्तुस्थितीवर पुढील विधान केले: “आपल्या समाजातील तरुणांना त्यांच्याच कुटुंबापासून इतके दुरावलेले आणि व्यावहारिक अनुभव व व्यावहारिक ज्ञानापासून इतके वंचित झालेले पूर्वी कधीही पाहण्यात आले नव्हते.”
असे का घडले? कदाचित, शिशुवस्थेत पुरेसे लक्ष न दिल्यामुळे तर ही समस्या निर्माण झाली नसावी? निम्न-आय वर्गातील स्त्रियांना नवजात शिशुंचे योग्यप्रकारे संगोपन करण्यास साहाय्य करणारी एक मानसशास्त्रवेत्ती असे म्हणते: “बालसंगोपन एक कला आहे जी आपण सर्वांनी शिकून घेणे गरजेचे आहे. आईवडील या नात्याने हे ओळखणे महत्त्वाचे आहे, की आज आपण आपल्या मुलांना जो वेळ देतो त्याचा कालांतराने आपल्याला अनेक पटीने मोठा मोबदला मिळणार आहे.”
बाळांनासुद्धा नियमित मार्गदर्शनाची गरज आहे. वेळोवेळी काही मिनिटे नव्हे, तर नियमित, होय, सबंध दिवसभर. शिशुवस्थेपासून मुलांसोबत घालवलेला वेळ त्यांच्या निकोप वाढीसाठी अत्यावश्यक आहे.
तयारीची गरज
पालकत्वाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडण्याकरता समर्थ होण्यासाठी, आईवडिलांनी आपल्या बाळाच्या आगमनाची तयारी केली पाहिजे. आगाऊ समायोजनाच्या महत्त्वाविषयी येशू ख्रिस्ताने घालून दिलेले एक तत्त्व त्यांच्याकरता अत्यंत बोधप्रद ठरू शकते. त्याने म्हटले: “तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावयाची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्याजवळ तो पुरा करण्याइतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही?” (लूक १४:२८) बालसंगोपन—ज्याला बऱ्याचदा २० वर्षीय प्रकल्प म्हटले जाते—तो बुरूज बांधण्यापेक्षा कैक पटीने जास्त आव्हानात्मक आहे. तेव्हा हे आव्हान यशस्वीरित्या पेलण्याकरता एक ब्लूप्रिंट अथवा योजनेचा आराखडा असणे आवश्यक आहे.
सर्वप्रथम, पालकत्वाच्या जबाबदाऱ्या पेलण्याकरता, मानसिक व आध्यात्मिक तयारी करण्याची गरज आहे. जर्मनीतील २,००० गरोदर स्त्रियांवर घेण्यात आलेल्या एक अभ्यासातून दिसून आले, की ज्यांना आपली बाळे नकोशी होती अशा मातांच्या तुलनेत, ज्या आई होण्यास उत्सुक होत्या त्यांची मुले भावनिक व शारीरिक दृष्टीने अधिक निरोगी होती. दुसरीकडे पाहता एका संशोधकाने असा अंदाज बांधला की ज्या स्त्रिया आपल्या वैवाहिक जीवनात सुखी आहेत, त्यांच्या तुलनेत कलहपूर्ण विवाहात अडकलेल्या स्त्रियांना भावनिक व शारीरिक दोष असलेले बाळ जन्मण्याचा २३७ टक्के जास्त धोका आहे.
तेव्हा बाळाच्या निरामय विकासाकरता वडिलांची भूमिकाही तितकीच महत्त्वाची आहे. डॉ. थॉमस वर्मी म्हणतात: “बाळाला सर्वात जास्त अपायकारक जर काही ठरू शकते, तर ते म्हणजे आपल्या गरोदर पत्नीशी दुर्व्यवहार करणारा किंवा तिच्याकडे दुर्लक्ष करणारा पिता.” किंबहुना, बऱ्याच ठिकाणी म्हणण्यात आले आहे, की मुलांसाठी सर्वात मोठे वरदान म्हणजे त्यांच्या आईवर प्रेम करणारे बाबा.
आईच्या रक्तप्रवाहात पाझरणारे, तणाव व मानसिक अस्वस्थतेशी संबंधित हॉर्मोन, तिच्या न जन्मलेल्या बाळावर परिणाम करू शकतात. पण अधूनमधून येणाऱ्या नकारात्मक भावना किंवा तणावपूर्ण घटनांमुळे नव्हे तर मातेला होणाऱ्या अतिशय तीव्र किंवा दीर्घकालीन मानसिक आघातमुळेच विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे. आईला आपल्या येणाऱ्या बाळाविषयी कितपत उत्सुकता वाटते हा सर्वात कळीचा मुद्दा आहे.a
समजा तुम्ही गर्भार असताना तुमचा पती तुमची काळजी घेत नसेल किंवा तुम्हाला स्वतःलाच आई बनायची इच्छा नसेल तर? कधीकधी परिस्थितीमुळे गर्भार स्त्रीला आपल्या होणाऱ्या बाळाविषयी अनास्था वाटू शकते. पण दोष त्या चिमुकल्या जिवाचा नाही हे कधीही विसरू नका. मग, प्रतिकूल परिस्थितीत तुम्ही शांत मनोवृत्ती कशी राखू शकता?
देवाचे वचन बायबल यात दिलेले सूज्ञ मार्गदर्शन अनेकांना लाभदायक ठरले आहे. त्यात म्हटले आहे: “सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” या शब्दांचे पालन केल्यामुळे “कशाविषयीहि चिंताक्रांत होऊ नका” हा सल्ला पाळण्यास किती मदत होते हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. (फिलिप्पैकर ४:६, ७) निर्माणकर्ता देव तुमच्या पाठीशी असल्याचे तुम्हाला अक्षरशः जाणवेल; तो तुमची काळजी घेण्यास समर्थ आहे.—१ पेत्र ५:७.
एक सर्वसामान्य अनुभव
बाळंतपणानंतर सुरवातीच्या काही आठवड्यांत काही तरुण स्त्रियांना काहीही स्पष्ट कारण नसताना, निराश व मलूल वाटते. ज्या अगदी उत्सुकतेने आपल्या बाळाची वाट पाहात होत्या, त्यांनाही असे अचानक खिन्न वाटू शकते. अशी अस्थिर मनःस्थिती होणे असामान्य नाही. याचे कारण म्हणजे जन्म दिल्यानंतर स्त्रीच्या शरीरातील हॉर्मोनच्या प्रमाणात अमूलाग्र बदल घडतात. तसेच, बाळाला दूध पाजणे, वारंवार ओली होणारी दुपटी बदलणे, तसेच वेळेचे अजिबातच भान नसलेल्या बाळाच्या निरनिराळ्या गरजा पूर्ण करणे अशा मातृत्वाच्या विविध जबाबदाऱ्या पेलताना सहसा नवी बाळंतीण अगदी घायकुतीला येते.
एका आईला तर वाटायचे की तिचे बाळ मुद्दाम तिला छळण्यासाठीच रडत असते. जपानमधील एका बालसंगोपन तज्ज्ञाने केलेले विधान अगदी खरे आहे: “बालसंगोपन करताना येणाऱ्या तणावाला सर्वांनाच तोंड द्यावे लागते.” या तज्ज्ञानुसार, “आईने कधीही एकाकी राहण्याचा प्रयत्न न करणे सर्वात महत्त्वाचे आहे.”
आईला काही वेळा अगदी खिन्न वाटत असले तरीसुद्धा ती आपल्या मानसिक अस्थिरतेचा दुष्परिणाम आपल्या बाळावर होऊ नये म्हणून काळजी घेऊ शकते. टाईम नियतकालिकात असे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले: “ज्या खिन्न मातांनी आपल्या निराशेवर मात करून आपल्या बाळांकडे लक्ष दिले, व त्यांचा भरभरून लाड केला त्यांची मुले अधिक प्रसन्न स्वभावाची निघाली.”b
पित्याची मदत
बाळाची काळजी घेण्यासाठी बाळाचे वडीलही बरीच मदत व साहाय्य देऊ शकतात. रात्री अपरात्री बाळ रडते तेव्हा पित्याने बाळाकडे लक्ष दिले तर बऱ्याचदा आईला पुरेशी झोप मिळू शकते. बायबल म्हणते: “पतींनो, . . . तुम्ही ज्यांच्याबरोबर राहता त्या आपल्या पत्नींना समजून घेण्याचा प्रयत्न करा.”—१ पेत्र ३:७, सुबोध भाषांतर.
येशू ख्रिस्ताने पतींसाठी एक उत्तम कित्ता घालून दिला. त्याने तर आपल्या अनुयायांकरता आपला जीवही दिला. (इफिसकर ५:२८-३०; १ पेत्र २:२१-२४) त्याचप्रकारे, जे पती आपल्या बाळाचा सांभाळ करण्यास मदत करण्याकरता पुढाकार घेतात आणि त्यासाठी थोडाबहुत त्रास सोसण्याची तयारी दाखवतात ते खरे तर येशूचे अनुकरण करत आहेत. बाळाचे संगोपन हे माता पिता दोघांचे काम आहे, याकरता दोघांच्या सहकार्याची गरज आहे.
परस्पर सहकार्याने जबाबदाऱ्या पेलणे
एका दोन वर्षीय मुलीचा पिता योईचीरो म्हणतो: “आमच्या मुलीचे आम्ही कसे संगोपन करणार याविषयी आम्ही पतीपत्नीने आधीच सविस्तर चर्चा केली. कोणतीही समस्या उद्भवल्यास तिला कसे तोंड द्यायचे याविषयी आम्ही दोघे मिळून विचारविनिमय करतो.” आपल्या पत्नीलाही विश्रांतीची गरज आहे याची योईचीरोला जाणीव आहे त्यामुळे तो अनेकदा घराबाहेरची लहानमोठी कामे करण्यास जातो तेव्हा आपल्या मुलीलाही सोबत नेतो.
जुन्या काळात, एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे मुलांचा सांभाळ करण्याकरता आईवडिलांना घरातल्या इतर मोठ्या मुलांची आणि नातेवाईकांची मदत मिळत असे. म्हणूनच कावासाकी, जपान येथील बालसंगोपन साहाय्य केंद्रातील एक कार्यकर्ती म्हणते, “बऱ्याचदा आईने दुसऱ्या कोणाशी चर्चा केल्यास तिच्या समस्येचे निरसन होऊ शकते. बऱ्याच माता दुसऱ्यांची थोडीबहुत मदत मिळाल्यावर आपल्या अडचणींना यशस्वीरित्या तोंड देतात.”
पालक (इंग्रजी) हे नियतकालिक म्हणते की आईवडिलांना “ज्यांना आपल्या शंकाकुशंका विचारता व सांगता येतील अशा काही व्यक्ती उपलब्ध असाव्यात.” ही मदत कोठे सापडेल? स्वतःच्या आईवडिलांचे किंवा सासूसासऱ्यांचे ऐकून घेण्याची तयारी ठेवल्यास नव्या माता व पितांना बरीच मदत लाभू शकते. अर्थात, आजीआजोबांनी हे समजून घेतले पाहिजे की शेवटला निर्णय घेण्याचा हक्क बाळाच्या आईवडिलांचा आहे.c
तरुण मातापिता आणखी ज्यांच्यावर अवलंबून राहू शकतात ते म्हणजे सह उपासक. यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानिक मंडळीत तुम्हाला अशा अनेक व्यक्ती सापडतील ज्यांना बालसंगोपनाचा अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि ज्यांची तुमच्या समस्या ऐकून घेण्याची तयारी देखील आहे. त्यांच्याकडून तुम्हाला बरेच साहाय्य मिळू शकते. वेळोवेळी तुम्ही, ज्यांना ख्रिस्ती जीवनात जास्त अनुभव असल्यामुळे बायबलमध्ये ‘वृद्ध स्त्रिया’ असे संबोधले आहे त्यांची देखील मदत घेऊ शकता; त्या तरुण स्त्रियांना मदत करण्यास तयार असतात.—तीत २:३-५.
अर्थात, इतरांचे सल्ले ऐकून घेताना पालकांनी चोखंदळ असणे महत्त्वाचे आहे. योईचीरो सांगतात, “आमच्या ओळखीचे सर्व लोक एकाएकी बालसंगोपन तज्ज्ञ झाले.” त्यांची पत्नी टाकाको कबूल करते: “सुरवातीला कुणी सल्ला दिला की मला राग यायचा कारण मला मातृत्वाचा अनुभव नाही असे ते सुचवायचा प्रयत्न करत आहेत असे मला वाटायचे.” पण इतरांकडून शिकल्यामुळे अनेक जोडप्यांना आपल्या मुलांच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याविषयी समतोल दृष्टिकोन बाळगण्यास मदत झाली आहे.
सर्वात उत्तम साहाय्य
कोणीही मदत करणारा नसला तरीसुद्धा, एक व्यक्ती तुम्हाला सामर्थ्य देऊ शकते. तिच्यावर तुम्ही सदैव विसंबून राहू शकता. अर्थात, ज्याने आपल्याला निर्माण केले आहे त्या यहोवा देवावर आपण विसंबून राहू शकतो. पृथ्वीवर जन्म होणाऱ्यांना तो “गर्भात पिंडरूपाने असताना” पाहू शकतो. (स्तोत्र १३९:१६) यहोवाने आपल्या वचनात अर्थात बायबलमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्राचीन काळातील आपल्या लोकांना एकदा असे म्हटले: “स्त्रीला आपल्या पोटच्या मुलाची करुणा येणार नाही एवढा तिला आपल्या तान्ह्या बाळाचा विसर पडेल काय? कदाचित स्त्रियांना विसर पडेल, पण मी तुला विसरणार नाही.”—यशया ४९:१५; स्तोत्र २७:१०.
होय, आईवडिलांची जबाबदारी पार पाडणाऱ्यांना यहोवा विसरत नाही. बायबलमध्ये त्याने बालसंगोपनाविषयी त्यांच्याकरता उत्तम मार्गदर्शन पुरवले. उदाहरणार्थ, ३,५०० वर्षांआधी देवाचा संदेष्टा मोशे याने लिहिले: “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीति कर.” मग तो म्हणाला: “ज्या गोष्टी मी तुला आज बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव; आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव; आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निजता, उठता त्यांविषयी बोलत जा.”—अनुवाद ६:५-७.
देवाच्या वचनातील या आज्ञेचे तात्पर्य काय? तुम्हाला काय वाटते? तुमच्या मुलांना नियमित, सातत्यपूर्ण किंबहुना, दररोज मार्गदर्शन दिले पाहिजे असेच यावरून सूचित होत नाही का? खरे तर, आपल्या मुलांसाठी वेळोवेळी काही वेळ काढणे पुरेसे नाही. सुसंवाद हा ठरवून साधला जात नाही. तर कोणत्याही क्षणी एखाद्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे त्याला खतपाणी मिळते. म्हणूनच तुम्ही नियमितरित्या आपल्या मुलांना वेळ देणे गरजेचे आहे. असे केल्याने “मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे,” हा बायबलमधील सल्ला अनुसरण्यास तुम्हाला मदत होईल.—नीतिसूत्रे २२:६.
चिमुकल्यांना शिक्षण देण्याचा एक मार्ग म्हणजे त्यांना मोठ्याने वाचून दाखवणे. बायबल आपल्याला पहिल्या शतकातील शिष्य तीमथ्याविषयी सांगते; त्याला ‘बालपणापासूनच पवित्र शास्त्राची माहिती होती;’ याचा अर्थ, तो लहान बाळ होता तेव्हापासूनच त्याची आई युनीके व आजी लोईस यांनी त्याच्यासाठी मोठ्याने वाचन केले असावे. (२ तीमथ्य १:५; ३:१४, १५) तुम्ही तुमच्या बाळाशी बोलायला लागल्यापासूनच असे करण्यास सुरू केले पाहिजे. पण तुम्ही कोणती पुस्तके वाचावीत आणि लहान मुलांना शिकवण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता?
तुम्ही बायबल वाचता तेव्हा तुमच्या लहान मुलांना ऐकू द्या. तीमथ्याला तेच वाचून दाखवण्यात आले. तसेच रंगीबेरंगी चित्रांच्या साहाय्याने मुलांना बायबलचा परिचय करून देण्याकरता अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. यांमुळे मुलांना बायबलमधील शिकवणुकींचे चित्र डोळ्यांपुढे उभे करण्यास मदत मिळते. उदाहरणार्थ, बायबल कथांचं माझं पुस्तक आणि सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य. अशा पुस्तकांच्या साहाय्याने लक्षावधी लहान मुलांच्या मनांवर आणि अंतःकरणावर बायबलच्या शिकवणुकी बिंबवण्यात आल्या आहेत.
बायबल म्हणते त्याप्रमाणे, “पाहा, संतति ही परमेश्वराने दिलेले धन आहे; पोटचे फळ त्याची देणगी आहे.” (स्तोत्र १२७:३) तुमच्या लाडक्या बाळाच्या रूपात निर्माणकर्त्याने तुमच्या हाती “धन” सोपवले आहे. उद्या तुम्हाला तुमच्या मुलांविषयी अभिमान व संतोष वाटेल. मुलांना वाढवणे व त्यांना निर्माणकर्त्याची स्तुती करण्यास शिकवणे निश्चितच अत्यंत समाधानकारक काम आहे! (g०३ १२/२२)
[तळटीपा]
a केवळ तणावसंबंधित हॉर्मोनच नव्हेत तर निकोटीन, मद्य आणि इतर मादक पदार्थांमुळे देखील गर्भावर विपरीत परिणाम होऊ शकतो. स्त्रियांनी गर्भावस्थेत अशा सर्व धोकेदायक पदार्थांचे सेवन टाळावे. तसेच कोणतीही औषधे घेण्याअगोदर, त्यांचा गर्भावर काही परिणाम होऊ शकतो का याची डॉक्टरांशी बोलून खात्री करून घ्यावी.
b आईला अगदीच तीव्र निराशा व खिन्नता वाटत असेल, आपल्या बाळाबद्दलही आपुलकी वाटत नसेल आणि सगळ्या जगाशीच काही घेणेदेणे नाही अशाप्रकारच्या भावना भेडसावत असतील तर तिला बाळंतपणानंतरची खिन्नता (पोस्टपार्टम डिप्रेशन) हा मनोविकार असण्याची शक्यता आहे. असे असल्यास तिने आपल्या प्रसूतीतज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. सावध राहा! (दोन्ही इंग्रजी अंक) जुलै २२, २००२, पृष्ठे १९-२३ व जून ८, २००३, पृष्ठे २१-३ पाहावीत.
c “आजीआजोबा—त्यांची सुखदुःखे” हा सावध राहा! (इंग्रजी) मार्च २२, १९९९ अंकातील लेख कृपया वाचा.
[८ पानांवरील चित्र]
गर्भातल्या बाळाविषयी आईच्या भावना कशा आहेत हे अत्यंत महत्त्वाचे आहे
[९ पानांवरील चित्र]
बाळंतपणानंतर नव्या आईची मनःस्थिती वारंवार बदलत असली तरीसुद्धा ती आपल्या बाळाला दुर्लक्षित वाटणार नाही म्हणून बरेच काही करू शकते
[१० पानांवरील चित्र]
बाळाची काळजी घेण्यात पित्यांचीही जबाबदारी आहे
[१० पानांवरील चित्र]
बाल्यावस्थेपासूनच मुलांना वाचून दाखवले पाहिजे