आमच्या वाचकांचे मनोगत
मित्रमैत्रिणींचे दडपण “तरुण लोक विचारतात . . . माझ्या मैत्रिणीचे दडपण मी कसे टाळू शकते?” हा लेख केवढा मूल्यवान ठरला हे मला सांगायचे आहे. (मे ८, १९९८) मी प्रौढ आणि विवाहित असले, तरी हे लेख मला फार आवडतात. हा लेख विशेषतः, माझे पती आणि मी सध्या अनुभवत असलेल्या स्थितीला इतका लागू होणारा होता की मी तो पाचदा वाचून काढला. त्यातून मला हे शिकायला मिळाले की येशूलाही स्वतःकरता वेळ हवा होता.
पी. ए., त्रिनिदाद
क्षुल्लक गैरसमजांमुळे माझा मित्र आणि मी काहीवेळा अबोला धरतो, पण त्यामुळे मी इतका दुःखी होतो की माझं कशातच लक्ष लागत नाही. हा लेख पुष्कळदा वाचून काढल्यावर मला जाणवलं की मी माझ्या मित्रावर दडपण आणत आहे आणि त्याला दुसऱ्या गोष्टी करायला वेळ देत नाही. मला असं वाटतं की, हा लेख अगदी माझ्यासाठीच लिहिण्यात आला होता कारण इतरांसोबत माझे नातेसंबंध सुधारायला मला यात पुष्कळ मार्गदर्शन मिळालं.
आर. एस., भारत
वक्रदंत चिकित्सा माझ्या दंतवैद्यांकडे मी अलीकडेच गेले होते तेव्हा वक्रदंत चिकित्सेचा लेख ज्यात होता त्या मे ८, १९९८ सावध राहा! नियतकालिकाची एक प्रत मी तिथं देऊन आले. नंतर त्या दंतवैद्याने आपल्याला तो लेख आवडला, शिवाय तो लेख माहितीपर, संक्षिप्त आणि सोप्या भाषेत लिहिलेला होता असंही म्हटलं. काही रुग्णांना त्यांचा उपचार समजण्यासाठी त्या लेखाच्या काही प्रती त्यांनी दिल्या असंही ते म्हणाले.
टी. पी., इंग्लंड
सन २००० “बायबलचा दृष्टिकोन: सन २००० किती महत्त्वाचे आहे?” जून ८, १९९८ सावध राहा! नियतकालिकातल्या या लेखामुळे बरी आठवण करून देण्यात आली. तर्कवितर्क न करण्याविषयी तुम्ही सडेतोडपणे सांगितले आणि यहोवाच्या दिवसाच्या वेळेबद्दल गतकाळात केलेल्या विधानांचे स्पष्टीकरण तुम्ही प्रामाणिकतेने दिले ते मला आवडले.
एस. डब्ल्यू., संयुक्त संस्थाने
कंबोडियातील जीवन-मृत्यू “कंबोडियातील जीवन-मृत्यूचा माझा दीर्घ प्रवास” या लेखासाठी तुमचे आभार. (जून ८, १९९८) यहोवाची विश्वासूपणे सेवा करणे सर्वोत्तम गोष्ट आहे आणि आधी सैनिक असताना स्वतःच्या रक्षणाकरता इतरांना ठार मारलेल्या वॅथना मीअसप्रमाणे दुःखदायक आठवणी घेऊन अनेकजण याच मार्गावर चालत आहेत. तीन महिने ते एका खड्यात लपून बसले हे वाचून तर मला धक्काच बसला. त्यांना हे माहीत नव्हते की, पुढे त्यांना त्यांच्या जीवनातला सर्वात मोठा विशेष हक्क मिळणार होता—यहोवाला जाणण्याचा सुहक्क!
सी. एम. एस. एल., ब्राझील
तुम्ही स्वरूप पाहून मत बनवता का? स्वरूप फसवे असू शकते हे नाझरेद्दीन हॉझच्या एका लोककथेतून छान समजावण्यात आले. (जुलै ८, १९९८, इंग्रजी) आम्हीपण लोकांचे केवळ स्वरूप पाहून ते चांगले आहेत की वाईट असे ठरवू नये—आणि यहोवा आपले अंतःकरण पाहतो, स्वरूप नाही ही आठवण करून दिल्याबद्दल फार आभारी आहे.
ए. ओ. एफ. ए., ब्राझील