वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ११/८ पृ. १६-१७
  • एकान्ताचे महत्त्व

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एकान्ताचे महत्त्व
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • एकान्त—महत्त्वाचा का?
  • देवाजवळ जाण्यासाठी एकान्त
  • मर्यादशीलता हवी
  • इलेक्ट्रॉनिक साधनांमुळे होणारा परिणाम—तुमच्या शिकण्याच्या क्षमतेवर
    सावध राहा!—२०२१
  • आमच्या वाचकांचे मनो गत
    सावध राहा!—१९९९
  • एकलकोंडेपणा मला कसा घालवता येईल?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • एकटेपणा जाणवतो तेव्हा. . .
    सावध राहा!—२०१५
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 ११/८ पृ. १६-१७

बायबलचा दृष्टिकोन

एकान्ताचे महत्त्व

एके प्रसंगी, येशू “प्रार्थना करावयास डोंगरावर एकांती गेला आणि रात्र झाल्यावरहि तो तेथे एकटा होता.” (मत्तय १४:२३) दुसऱ्‍या एके प्रसंगी, “दिवस उगवल्यावर तो निघून रानात गेला.” (लूक ४:४२) या शास्त्रवचनांवरून हा पुरावा मिळतो की, येशू ख्रिस्त काही वेळा एकान्तात राहायचा आणि ते क्षण त्याला फार महत्त्वाचे असायचे.

बायबलमध्ये इतरही पुरुषांची उदाहरणे आहेत ज्यांना येशूप्रमाणेच एकान्ताचे क्षण महत्त्वाचे वाटायचे. रात्रीच्या एकान्तातच परीक्षण करताना स्तोत्रकर्त्याने आपला महान निर्माणकर्ता किती मोठा आहे यावर चिंतन केले होते. येशू ख्रिस्त तर, बाप्तिस्मा देणाऱ्‍या योहानाच्या मृत्यूची बातमी ऐकताच “अरण्यात एकांती गेला.”—मत्तय १४:१३; स्तोत्र ६३:६.

आजच्या घाईगडबडीच्या आधुनिक जीवनात, परिस्थितीमुळे म्हणा किंवा इच्छेने म्हणा, एकान्ताला इतके काही महत्त्व दिले जात नाही. तुम्ही मागे एकान्तात वेळ कधी घालवला हे तुम्हाला आठवते का? एका तरुण विवाहित स्त्रीने म्हटले: “माझ्या अख्ख्या आयुष्यात मी कधीच एकटी राहिले नाही.”

पण एकान्ताची खरोखर गरज आहे का? जर आहे तर, या शांत समयात आपण फायदेकारक आणि प्रतिफलदायक असे काहीतरी कसे करू शकतो? शिवाय, एकान्ताच्या बाबतीत संतुलन का राखावे?

एकान्त—महत्त्वाचा का?

बायबल आपल्याला सांगते की, देवाचा एक प्राचीन पुरुष, इसहाक “हा संध्याकाळच्या वेळी . . . रानात गेला.” का बरे? “ध्यान करावयास” असे बायबल म्हणते. (उत्पत्ति २४:६३) एका डिक्शनरीमध्ये म्हटले आहे की, ध्यान करणे म्हणजे “मनन करणे किंवा निवांतपणे विचार करणे.” त्यावरून “गंभीरपणे आणि काही वेळासाठी एकाग्रतेने विचार” करण्याचे सूचित होते. लवकरच भारी जबाबदाऱ्‍या मिळणार असल्यामुळे इसहाकाला मनन केल्याने मोकळा आणि नीट विचार करता आला असेल आणि कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे आणि कोणत्या गोष्टींना देऊ नये ते ठरवता आले असेल.

एका मनोदोष तज्ज्ञानुसार, ‘प्रमाणाच्या आत एकान्तात वेळ घालवला तर दुसरे कोणी नसल्यामुळे आपल्याला नीट विचार करायला आणि लक्ष एकाग्र करायला शक्य होते.’ हे आल्हाददायक, बळकटी देणारे आणि स्वास्थ्यकारक असू शकते याची पुष्टी अनेकजण देतील.

सखोल विचार आणि जपून बोलणे ही चिंतनाची काही इष्ट फळे आहेत; यांच्यामुळे एका व्यक्‍तीचे बोलणे-चालणे सुज्ञ होते आणि लोकांसोबत चांगले नातेसंबंध राहतात. उदाहरणार्थ, मनन करणाऱ्‍या व्यक्‍तीला शांत कधी राहावे हे देखील कळते. फटकळपणाने बोलण्याऐवजी, आपल्या बोलण्यामुळे काय परिणाम होईल याचा तो आधी विचार करतो. “बोलण्यात उतावळा असा कोणी तुला दिसतो काय?” असे बायबलच्या प्रेरित लेखकाने विचारले. तो पुढे म्हणतो: “त्याच्यापेक्षा मूर्खाविषयी अधिक आशा असते.” (नीतिसूत्रे २९:२०) जिभेचा असा अविचारीपणाने उपयोग कसा टाळता येईल? बायबल म्हणते: “धार्मिक मनुष्य विचार करून उत्तर देतो.”—नीतिसूत्रे १५:२८; पडताळा स्तोत्र ४९:३.

ख्रिश्‍चनाची आध्यात्मिक प्रौढता वाढण्यासाठी एकान्तात, शांतपणे मनन करणे हे महत्त्वाचे आहे. प्रेषित पौलाचे शब्द किती यथायोग्य आहेत: “तुझी प्रगती सर्वांस दिसून यावी म्हणून तू ह्‍या गोष्टींचा अभ्यास ठेव; ह्‍यात गढून जा.”—१ तीमथ्य ४:१५.

देवाजवळ जाण्यासाठी एकान्त

एका इंग्रजी लेखकाने म्हटले: “एकान्त म्हणजे देवाचा दरबार.” काही प्रसंगी, येशू आपल्या सोबत्यांना सोडून एकान्तात देवाच्या सान्‍निध्यात राहायला गेला. याचे एक उदाहरण बायबलमध्ये देण्यात आले आहे: “मग तो सकाळी मोठ्या पहाटेस उठून बाहेर गेला व रानात जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली.”—मार्क १:३५.

स्तोत्रसंहितेत, देवाचे मनन करण्याविषयी वारंवार सांगण्यात आले आहे. यहोवाला उद्देशून राजा दावीद म्हणाला: “मी . . . तुझे ध्यान करीत असतो.” आसाफाने देखील असेच म्हटले: “मी तुझ्या सर्व कृत्यांचे मननहि करीन आणि तुझ्या महत्कृत्यांचा विचार करीन.” (तिरपे वळण आमचे.) (स्तोत्र ६३:६; ७७:१२) अशाप्रकारे, ईश्‍वरी गुणांवर आणि व्यवहारांवर मनन केल्याने खूप फायदा होतो. त्यामुळे देवाबद्दल कदर वाढते आणि देवाच्या आणखीनच जवळ जाण्यास वाव मिळतो.—याकोब ४:८.

मर्यादशीलता हवी

अर्थात, एकान्तात राहण्याविषयी माणसाने मर्यादशील असावे. कोणतेही एकान्त ठिकाण भेट देण्यापुरते चांगले असते, पण खूप वेळ तेथे थांबून राहण्याकरता मात्र धोकेदायक असते. मिळणे-मिसळणे, बोलणे आणि प्रेम व्यक्‍त करणे या माणसाच्या मूळ गरजा आहेत आणि लोकांपासून नेहमीच दूर राहायचा प्रयत्न केला तर ते माणसाच्या स्वभावाच्या विरोधात जाते. शिवाय, एकान्ताची तुलना जमिनीशीही करता येईल जेथे मूर्खता आणि स्वार्थाचे जंगली दाणे वाढतात. बायबलमधील एक नीतिसूत्र इशारा देते: “जो फटकून राहतो तो आपली इच्छा पुरवू पाहतो, व त्याला सगळ्या सुज्ञतेचा संताप येतो.” (नीतिसूत्रे १८:१) एकान्तात राहण्याविषयी मर्यादशील असण्यासाठी आपण फटकून राहण्यात कोणते धोके आहेत हे ओळखले पाहिजे.

बायबल समयांतील, येशू आणि इतर आध्यात्मिक वृत्तीच्या लोकांप्रमाणे, ख्रिश्‍चनांनाही आज एकान्तात घालवलेले क्षण फार मोलाचे वाटतात. आज, आपल्याला पुष्कळ जबाबदाऱ्‍या आणि चिंता असताना एकान्तात मनन करण्यासाठी वेळ आणि संधी मिळतच नसेल. पण, खरोखरच मूल्यवान असलेल्या गोष्टींसाठी आपण जसा ‘वेळ काढतो’ तसाच यासाठीही काढला पाहिजे. (इफिसकर ५:१५, १६, NW) मग, स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपण असे म्हणू शकतो: “हे परमेश्‍वरा, . . . माझ्या तोंडचे शब्द व माझ्या मनचे विचार तुला मान्य असोत.”—स्तोत्र १९:१४.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा