शेरीफ माफी मागतात
एडवर्ड मायकलेक यांनी डिसेंबर २२, १९९६ च्या “सावध राहा!” (इंग्रजी) नियतकालिकातील, “परीक्षांना तोंड देण्यासाठी बळकट केलेले” या लेखात ज्या शेरीफचा उल्लेख केला तेच होते टॉम वील लेन. त्या कहाणीत, मायकलेक म्हणाले:
“व्हार्टन, टेक्सास, यु.एस.ए. इथले शेरीफ जळफळून उठले. चवथ्या वेळी मला तुरुंगात नेताना ते माझ्यावर खेकसले: ‘तुम्हाला आदेश पाळता येत नाहीत का?’
त्यावर मी पटकन बोलून गेलो, ‘मला हे करण्याचा पूर्ण अधिकार आहे.’ यावर त्यांचा तिळपापड झाला आणि ते मला हातातल्या लाठीने बदडू लागले. बाकीचे अधिकारीसुद्धा त्यांच्या बंदूकींच्या दस्त्याने मला मारू लागले.”
सन १९६० च्या दशकाच्या पूर्वार्धात शेरीफ लेनसाठी नोकरी करणाऱ्या मॅरी पेरेझ यांनी अलीकडे लिहिले: “मी यहोवाची साक्षीदार असल्याचं त्यांना माहीत होतं. एड मायकलेकला आपण कसं छळलं हे त्यांनी मला सांगितलं होतं. पण, त्यांनी जे काही केलं त्याचा त्यांना खेद वाटतो असं मी इतर साक्षीदारांना सांगावं असं ते मला म्हणाले. साक्षीदार चांगले, नियम पाळणारे लोक आहेत हे त्यांना माहीत नव्हतं असं ते म्हणाले. त्यांनी अगदी मनापासून दिलगिरी व्यक्त केली.”
मॅरी पुढे म्हणाल्या: “शेरीफ जाऊन तर काही वर्षे झाली, पण या पत्रातून त्यांनी माफी मागितली हे तुम्हाला कळेल अशी आशा करते.”
मग त्या साक्षीदार कशा बनल्या हे त्यांनी सांगितलं: “बंधू मायकलेक यांचा छळ १९४० च्या दशकाच्या पूर्वार्धात झाला. या घटनेमुळे, साक्षीदार माझ्या घरी येतील तेव्हा मी त्यांचं नक्की ऐकेन असा दृढनिश्चय मी केला. म्हणून आम्ही बायबलचा अभ्यास करू लागलो. माझ्या पतीचा आणि माझा बाप्तिस्मा १९४९ साली झाला.”
ख्रिस्ती तत्त्वांसाठी एखाद्या व्यक्तीने दृढ भूमिका घेतल्यामुळे, इतरांच्या जीवनांवर याचा मोठा परिणाम कसा होऊ शकतो हे दाखवणारे हे आणखी एक उदाहरण आहे. उदाहरणार्थ, पहिल्या शतकातल्या पेत्राने आणि इतर प्रेषितांनी धीटपणे घेतलेल्या भूमिकेचा किती जणांवर खोल परिणाम झाला?—प्रेषितांची कृत्ये ५:१७-२९.
[३१ पानांवरील चित्रं]
एड मायकलेक आणि मॅरी पेरेझ, १९४० च्या दशकात