आमच्या वाचकांचे मनोगत
मूत्रपिंड “तुमचे मूत्रपिंड—जीवनदायी गाळणी” (सप्टेंबर ८, १९९७) हा लेख मला भावला. मला मूत्रपिंडांचा विकार आहे असं माझ्या डॉक्टरांनी सांगितलं. पण आता हा लेख वाचल्यावर, मला एकटीलाच हा विकार नाही हे ऐकून जरा बरं वाटतं.
व्ही. एम., संयुक्त संस्थाने
माझ्या मूत्रपिंडांच्या विकारामुळे मला चार महिने इस्पितळात राहावं लागलं. तुमच्या लेखामुळे माझ्या शरीराविषयी मला केवढी कमी माहिती आहे याची जाणीव झाली. आता मी इतरांना माझ्या स्थितीविषयी नीट समजावून सांगू शकतो.
एस. एच., जपान
माझ्या पत्नीला मूत्रपिंडांचा कर्करोग झाला आहे असं आम्हाला सांगण्यात आलं आणि अगदी त्याच दरम्यान हा लेखही आला. माझ्या पत्नीचं निदान ऐकून आम्हाला धक्का बसला होता खरा, पण सर्जनने जेव्हा आम्हाला समजावून सांगितलं तेव्हा मूत्रपिंडांच्या विविध कार्यांची समज आम्हाला मिळाली. माझ्या पत्नीची नेफ्रेक्टोमी झाली आणि आता तिची प्रकृती सुधारत आहे.
जी. एस., भारत
द्वेष “द्वेष एवढा का? प्रेम इतके कमी का?” (ऑक्टोबर ८, १९९७) या लेखमालेचे मुखपृष्ठ आजपर्यंत तुम्ही छापलेल्या मुखपृष्ठांपैकी सर्वात उत्कृष्ट होतं. अनोळखी आणि भिन्न संस्कृतीच्या लोकांवर भरवसा का केला जात नाही, हे नीट समजायला या लेखांनी मला मदत दिली.
जे. एम., संयुक्त संस्थाने
श्रवणशक्तीचे वरदान “तुमची श्रवणशक्ती—जतन करण्याजोगे वरदान” (ऑक्टोबर ८, १९९७) या लेखासाठी मी तुमचे आभार मानू इच्छितो. लेख वाचण्यापूर्वी मला वाटायचं की, कानाच्या कार्याबद्दल आणि आपल्याला ऐकू कसं येतं याबद्दल मला बऱ्यापैकी ज्ञान आहे. परंतु, माझं ज्ञान किती कमी होतं हे मला ठाऊक नव्हतं. पृष्ठ २६ वरचं चित्र उत्तम होतं! कानाचं ते चित्र काढण्यासाठी केवढा विचार आणि प्रयत्न करावा लागला असेल हे पाहून मी थक्क झालो. पण, खरोखरच्या कानाची रचना निर्माण करायला केवढी बुद्धी लागली असेल याचं मला अधिक आश्चर्य वाटतं!
ए. एस., संयुक्त संस्थाने
माझी मैत्रीण आणि मी दोघीही वैद्यकीय तज्ज्ञ आहोत, आणि आम्हाला अगदी मनापासून असं वाटतं की, इतक्या वर्षांच्या आमच्या अभ्यासात इतक्या साध्यासोप्या भाषेत आणि अचूकपणे कानाचं वर्णन देणारा असा लेख आम्ही कधीच वाचला नव्हता. हा लेख वाचल्यामुळे स्तोत्र १३९:१४ मधील शब्दांशी आमची सहमती होते; तिथं म्हटलं आहे: “भयप्रद व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे.”
एम. बी. आणि झेड. बी., व्हेनेझुएला
दारू पिऊन गाडी चालवणाऱ्याने एकदा मला उडवलं होतं. कोमामध्ये एक महिनाभर राहिल्यावर, मला शुद्ध आली तेव्हा माझी श्रवणशक्ती गमावली होती. १८ वर्षांनंतर, मी अजूनही जवळजवळ कर्णबधिर आहे, पण श्रवणयंत्रांच्या साहाय्याने मला थोडंफार ऐकू येतं. हा समयोचित लेख, श्रवणशक्ती असलेल्यांना श्रवण विकार असलेल्यांप्रती सहानुभूती दर्शवायला मदत करतो.
के. सी., संयुक्त संस्थाने
जगाचे भाग नाहीत “बायबलचा दृष्टिकोन: ‘जगाचे भाग नाहीत’—याचा काय अर्थ होतो?” (ऑक्टोबर ८, १९९७) हा लेख मला अत्यंत आवडला. या लेखाचा अभ्यास केल्यावर, गैर-ख्रिस्ती लोकांना “जगीक” असं म्हणायचं मी थांबवलं. ३० वर्षांआधी, मी तरी कुठं ख्रिस्ती होते. मला ज्या व्यक्तीने प्रथम बायबलविषयी सांगितलं तिने जर अशाप्रकारचा शिष्टपणा दाखवला असता, तर कदाचित मला कोणत्याच साक्षीदाराशी बोलावंसं वाटलं नसतं!
बी. जी., संयुक्त संस्थाने
त्रासमुक्त परादीस मी नऊ वर्षांची आहे, आणि तुमच्या “त्रासमुक्त परादीस—लवकरच वास्तविकता बनेल” (नोव्हेंबर ८, १९९७) या लेखासाठी मी तुमचे आभार मानू इच्छिते. हा लेख माझ्या मनाला भावला कारण माझे पप्पा बाहेरगावी गेले आहेत आणि रात्रीच्या वेळी कोणीतरी घरात घुसेल म्हणून खिडकी उघडायला सुद्धा मला आणि आईला भीती वाटते. म्हणून सर्व गुन्हेगारी आणि हिंसेचा अंत करायचं वचन यहोवा कसं देतो हे वाचल्यावर मला हायसं वाटलं.
डी. एम., संयुक्त संस्थाने