पाणी आणि तुमचे आरोग्य
“तुम्हाला किती तहान लागते, या आधारावर तुमच्या शरीराला किती पाण्याची आवश्यकता आहे, हे ठरवता येणार नाही,” असे आरोग्य (इंग्रजी) नियतकालिक दाखवून देते. तरी, भरपूर पाणी पिणे हे आपल्या शारीरिक आणि भावनिक स्वास्थ्यासाठी, तसेच आपल्या स्वरूपासाठी देखील आवश्यक आहे. घाम, अश्रू, लघ्वीमार्गे, शिवाय श्वास घेताना देखील आपल्या शरीरातून सतत पाणी बाहेर पडते. गमावलेल्या या द्रवाची भरपाई झालीच पाहिजे. यासाठी किती पाणी आवश्यक आहे? अनेक अधिकारसूत्रे, दररोज कमीत कमी आठ ग्लास—दोन लीटर पाणी पिण्याचा सल्ला देतात.
का बरे? आपल्या शरीरांतर्गत पोषक पदार्थांचे वहन करण्यासाठी व शरीरातील नको असलेले पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे. ते शरीराचे तापमान नियंत्रित करते व सांध्यांकरता वंगणाचे काम करते. “पाण्याचा किंचितही अभाव असल्यास थकल्यासारखे . . . किंवा आजारी असल्यासारखे वाटते,” अशी नोंद आरोग्य नियतकालिक करते. “डिहायड्रेशन हे सर्वसामान्यपणे दुर्लक्षित केलेले शिणवट्याचे एक कारण होय.” नियतकालिक असा सल्ला देते: “कॉफी, चहा, कॅफेनयुक्त सॉफ्ट शीत पेये आणि मद्यात तर पाण्याचा अंश असतोच असे धरून चालू नका; खरे तर ही पेये काही प्रमाणात डिहायड्रेशनला कारणीभूत ठरतात.” कॅफेन आणि मद्य, मूत्रवर्धकाचे कार्य करून शरीरातील पाणी घटविण्यास कारणीभूत ठरतात.
या शिवाय, “तुमची त्वचा मऊ व नितळ राहण्यासाठी पाण्याची गरज आहे.” या बाबतीत मदत होण्यासाठी त्वचेवर मॉइस्चराईझर्स लावले जाऊ शकतात. पण ते ओलावा देत नाहीत. उलट, आपल्या त्वचेमध्ये आधीपासून असलेला ओलावा टिकवून ठेवण्यासाठी ते त्वचेवर एक सुरक्षा कवच तयार करतात. वयानुसार हा ओलावा टिकवून ठेवणे अधिक महत्त्वाचे बनते कारण वय वाढते तसे पाणी टिकवून ठेवण्याची त्वचेची क्षमता कमी होते.
खेदाची बाब अशी, की जगाच्या अधिकांश भागात पुरेसे शुद्ध, स्वच्छ पाणी प्राप्त करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. पण त्यांचे सार्थक होते. म्हणूनच, भरपूर पाणी प्या आणि उत्तम स्वरूपासाठी व निकोप स्वास्थ्यासाठी या साध्यासोप्या पद्धतीचा लाभ उठवा!