आमच्या वाचकांचे मनोगत
हितावह करमणूक एक यहोवाची साक्षीदार बनण्यासाठी मी अभ्यास करत आहे; “कानोसा हितावह करमणुकीचा” (जून ८, १९९७) ही लेखश्रृंखला प्रकाशित केल्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छिते. टीव्हीवर फारच मोजके पाहण्यालायक कार्यक्रम असतात आणि आम्हा सर्व आबालवृद्धांना तुम्ही फारच उत्तम सल्ला दिला. अशा विषयांवर तुम्ही सतत माहिती पुरवत राहील अशी माझी आशा आहे.
डी. डब्ल्यू., संयुक्त संस्थाने
देव कायम माझा मित्र राहील का? “तरुण लोक विचारतात . . . देव कायम माझा मित्र राहील का?” (जून ८, १९९७) या उत्कृष्ट लेखासाठी मी आपल्या प्रेमळ निर्मात्याची खूप कृतज्ञ आहे. अलीकडेच, मी किती मित्रमैत्रिणी जोडू शकते याविषयी एक प्रश्नावली भरून काढली आणि निकालावरून मला याची खात्री झाली होती, की माझ्या अवतीभोवती सतत मित्रमैत्रिणींचा वावर असेल. परंतु घडलं उलटंच. तरीही, मला याची जाणीव आहे, की केवळ यहोवा देवच आपला जिवलग मित्र आहे. हे अगदी खरं, की आपण यहोवा देवाचे मित्र नसल्यास बाकीच्या सगळ्या गोष्टी निव्वळ व्यर्थ ठरतात.
ए. टी. एम., मेक्सिको
तरुण लोकांबद्दल तुम्ही जी आस्था दाखवता त्यासाठी तुमचे आभारी आहे. मला आत्यंतिक गरज होती अगदी अशाच वेळी, “तरुण लोक विचारतात . . . देव कायम माझा मित्र राहील का?” हा लेख हाती पडला. मला बहिष्कृत करण्यात आलं होतं पण अलीकडेच माझा पुनःस्वीकार करण्यात आला. कधीकधी एकाकीपणा मला खायला उठायचा आणि अनेक शंकाकुशंकांनी मला भेडसावलं; यांपैकी एक शंका अशी होती, की देव माझी प्रार्थना ऐकतो का? “शरीरात एक काटा” या उपशीर्षकाखाली दिलेल्या पौलाच्या उदाहरणाचे विश्लेषण केल्यानंतर, नियमित बायबल अभ्यासाद्वारे व मनमोकळेपणाने प्रार्थना केल्याद्वारे यहोवाकडून आशीर्वाद प्राप्त करण्याचा निर्णय मी घेतला. यहोवा कायम माझा मित्र राहील का? या प्रश्नाचं आता मला सुस्पष्ट उत्तर मिळालं आहे.
जे. सी. ए., अर्जेंटिना
मधमाशीपालन मधमाश्यांबद्दल संक्षिप्त परंतु अगदी बिनचूक माहिती देणाऱ्या, “मधमाशीपालन—याचा ‘गोड’ किस्सा” (जून ८, १९९७) या लेखासंदर्भात मी हे पत्र लिहित आहे. त्यातील स्पष्टीकरणे, छायाचित्रे आणि मनोभावनांचे उचित संमिश्रण मला फार आवडले. प्रसारमाध्यमे चुकीची किंवा अर्धसत्य माहिती देतात तेव्हा मधमाशीपालकाच्या ते चटकन लक्षात येते, पण अशी कोणतीच चूक तुमच्या लेखात आढळली नाही. मी एक हौशी मधमाशीपालक आहे आणि अनेक लोकांपेक्षा या कीटकांमध्ये मला अधिक ‘उत्तम बुद्धी’ असल्याचं आढळतं. तर मग मला वाटतं, मी आवर्जून असं म्हटलंच पाहिजे, की हा विषय हाताळताना तुम्ही जीवनाच्या सुंदरतेची प्रशंसा केली आहे, जी खास करून अशा लहान जीवांमधून ठळक दिसून येते.
पी. जी. एम., इटली
तरुण लोक विचारतात . . . मी शाळेला जाणारी १२ वर्षांची मुलगी आहे आणि मला तुमची नियतकालिकं वाचायला फार आवडतात. मी ही नियतकालिकं वाचायला लागले त्यापूर्वी, वयानं माझ्यापेक्षा मोठे असलेल्यांशी सहवास करणं मला जड जायचं. पण मग, सावध राहा! नियतकालिकात, “तरुण लोक विचारतात . . . ,” या सदरातील लेख वाचल्यानंतर मात्र मला ते अधिक सोपं असल्याचं आढळलं. आभारी आहे!
एन. टी., रशिया
आमच्या वाचकांचे मनोगत गेल्या २६ वर्षांपासून मी सावध राहा! नियतकालिकाची एक नियमित वाचक आहे आणि अजूनही ते वाचण्यात मला एक आगळाच आनंद मिळतो. “आमच्या वाचकांचे मनोगत” हे सदर तर मी हमखास वाचते कारण त्यातील विवेचनं मला एखादा लेख पुन्हा वाचून काढण्याची प्रेरणा देतात. या उत्कृष्ट नियतकालिकांसाठी मनस्वी आभारी.
एम. बी., फ्रान्स
तुम्हाला मिळणारं प्रत्येक नियतकालिक मला प्राणप्रिय वाटतं. विशेषतः, जून ८, १९९७ (इंग्रजी) या सावध राहा! अंकात बहिष्कृतीसंबंधी वाचकांनी व्यक्त केलेले आपले अभिप्राय मला फार भावले. मलाही बहिष्कृत करण्यात आलं होतं आणि मग पुढील वर्षी माझा पुनःस्वीकार करण्यात आला. अनेकांना असं वाटतं, की ही अतिशय कठोर शिक्षा आहे. पण खरं सांगू, तसं मुळीच नाही. मला मिळालेली शिक्षा स्वीकारण्यास जड होती, पण कठोर मुळीच नव्हती. वडीलजन केवळ माझी मदत करू इच्छित होते, हे मला ठाऊक आहे. पण, त्यांची मदत न स्वीकारल्यामुळे मला बहिष्कृत करण्यात आलं. यहोवाशिवाय आयुष्य किती एकाकी असतं ही बाब, बहिष्कृत केल्यानंतर मला प्रकर्षानं जाणवली. माझ्या जीवनात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. आणि मी माझी जीवनशैली बदलून पुन्हा एकदा यहोवाकडे वळाल्याशिवाय ही पोकळी कधीच भरून निघाली नसती. बहिष्कृत केल्यामुळे मी नमले आणि मला यहोवाची आणि त्याच्या संस्थेची गरज आहे हे देखील मी शिकले.
ए. सी., कॅनडा
सावध राहा! सावध राहा! या उत्कृष्ट नियतकालिकाच्या वर्गणीचं नूतनीकरण करण्याचं विसरल्याबद्दल प्रथम तुमची क्षमा मागते. हे माहितीपूर्ण, शैक्षणिक आणि वास्तविकतेला धरून असलेलं नियतकालिक आहे आणि यातील लेख खरोखरच प्रेरणादायी आणि सावध करणारे असतात. मी चुकवलेले सर्व जुने अंक मला हवे आहेत. मी एकही अंक चुकवू शकत नाही. अज्ञानाशी लढत देण्यास धीराने मदत केल्याबद्दल तुमची आभारी आहे.
एन. एस., श्रीलंका