वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 ४/८ पृ. १५-१७
  • मला अभ्यासात आणखी प्रगती करता येईल का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • मला अभ्यासात आणखी प्रगती करता येईल का?
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • काही मुलांना कुवतीपेक्षा कमी मार्क का पडतात
  • प्रेरणा
  • अभ्यासाच्या उत्तम सवयी
  • सकारात्मक मनोवृत्ती ठेवा
  • अडचणी असूनही प्रगती
  • मी शाळा सोडावी का?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
  • माझे मार्क मला कसे सुधारता येतील?
    तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे
सावध राहा!—१९९८
g98 ४/८ पृ. १५-१७

तरुण लोक विचारतात . . .

मला अभ्यासात आणखी प्रगती करता येईल का?

“आमच्या आईबाबांना मार्कांशिवाय आणखी काही सुचतच नाही. ‘गणितात किती मार्क मिळाले? इंग्रजीत किती मिळाले?’ मला याची भयंकर चीड येते!”—१३ वर्षांचा सॅम.

एकट्या सॅमचीच ही स्थिती नाही. किंबहुना, “आणखी प्रगती” (इंग्रजी) या पुस्तकात तर लेखकांनी असे म्हटले आहे, की “आपल्या अपत्याला त्याच्या/तिच्या क्षमतेनुसार शाळेत बऱ्‍यापैकी मार्क मिळतात असे म्हणणारे पालक आम्हाला अजूनही आढळलेले नाहीत.” पण सॅमसारख्या कित्येक मुलामुलींना मात्र असं वाटतं की शाळेच्या अभ्यासात सुधारणा करण्यासाठी—कदाचित सर्वांपेक्षा पुढे जाण्यासाठी, आईवडील आपल्यावर नको तितका दबाव आणतात. याशिवाय वर्गातही त्यांच्यावर दबाव आणला जात असेल. एक सोळा वर्षांचा मुलगा तक्रारीच्या सुरात म्हणतो, “शिक्षकांना सगळं कसं झटपट हवं असतं. एकदा काही शिकवलं की झालं, ते तुमच्या लक्षात राहिलंच पाहिजे, आणि नाही राहिलं तर तुम्ही बुद्धू. मी तर प्रयत्नच करण्याचं सोडून दिलंय.”

आईवडिलांच्या आणि शिक्षकांच्या अपेक्षा पूर्ण न करू शकणाऱ्‍या मुलांवर सहसा, आपल्या कुवतीपेक्षा कमी मार्क मिळवणारे (अंडरअचीवर्स) असा शिक्कामोर्तब केला जातो. आणि जवळजवळ सगळ्याच विद्यार्थ्यांना आपल्या शालेय जीवनात कमी मार्क मिळण्याचा अनुभव कधी न कधी येतोच. का बरं? गंमत अशी की आळशीपणा किंवा निर्बुद्धपणाच नेहमी यासाठी कारणीभूत नसतो.a

काही मुलांना कुवतीपेक्षा कमी मार्क का पडतात

अभ्यासाच्या बाबतीत काही मुलामुलींची खुशालचेंडू प्रवृत्ती असते हे खरे आहे. १५ वर्षांचा हर्मन कबूल करतो, “आपण तर बुवा, पास होण्यापुरते मार्क मिळतील या हिशेबानंच अभ्यास करतो.” पण सर्वच मुलं शिक्षणाच्या बाबतीत बेपर्वा नसतात, हे मात्र प्रामाणिकपणे कबूल करावं लागेल. कदाचित एखादा विषय असा असेल, की त्यात त्यांना रसच वाटत नाही. शिवाय इतर काहींना, आपण जे शिकतोय त्याचा व्यावहारिक उपयोग काय असा प्रश्‍न पडतो. रुबेन नावाचा एक १७ वर्षांचा मुलगा म्हणतो: “काही विषयांच्या बाबतीत मला पक्की खात्री आहे, की एकदा शाळा सोडल्यावर पुढे त्यांचा मला काहीएक उपयोग होणार नाहीये.” विषयात पुरेशी गोडी नसणे आणि शिकण्याकरता प्रेरणा नसणे, यांसारख्या कारणांचे कमी मार्क मिळण्यात सहज पर्यवसान होऊ शकते.

इतरही कारणे आहेत. उदाहरणार्थ, एखाद्या शिक्षकाचा शिकवण्याचा वेग तुमच्या मानाने जास्त असल्यास, तुम्ही साहजिकच निराश व्हाल. याउलट शिक्षक फारच धीम्या गतीने शिकवत असल्यास तुम्ही कंटाळून जाल. अभ्यासात चांगले असण्यावर तुमच्या सोबत्यांच्या दबावाचाही प्रभाव पडत असतो. कुवतीपेक्षा कमी मार्क मिळवणारी मुलं (इंग्रजी) या पुस्तकात खुलासा केलेला आहे, की “एखाद्या हुशार, होतकरू मुलाचे मित्र जर अभ्यासात कच्चे असतील, तर त्यांची मैत्री टिकवण्यासाठी आपल्यालाही कमी मार्क मिळवणं भाग आहे असं त्याला वाटू लागेल.” एका किशोरवयीन मुलाच्या बाबतीत असंच झालं; सुरवाती सुरवातीला आपण जेव्हा खूप मेहनतीनं अभ्यास करायचो तेव्हा इतरांना जळफळाट व्हायचा आणि ते आपली टिंगल करायचे, असे तो दुःखाने सांगतो. नीतिसूत्रे १४:१७ (NW) येथे आढळणारे तत्त्व किती खरे आहे, याचा एखाद्या युवकाला प्रत्यक्ष अनुभव येऊ शकतो, तेथे म्हटले आहे: “विचारशक्‍ती असणाऱ्‍या मनुष्याचा द्वेष केला जातो.”

काही वेळा, कमी मार्क मिळण्याची कारणं फार खोलवर रुजलेली असतात. काही मुलामुलींच्या मनात लहानपणापासून एक नकारात्मक आत्मप्रतिमा बनलेली असते. मठ्ठ, मूर्ख किंवा ऐतखाऊ यांसारख्या खोचक टोपणनावांचा मुलांवर सतत मारा झाल्यामुळे असे होऊ शकते. दुःखाची गोष्ट म्हणजे, कधी कधी ही भाकीतं खरी देखील ठरतात. एका डॉक्टरांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास, “तू निर्बुद्ध आहेस असे कोणी तुम्हाला सांगितले आणि तुम्ही यावर विश्‍वास ठेवला तर तुम्ही तसेच वागू लागाल.”

अधिकांश वेळा, आईवडील आणि शिक्षकांचा मुलांमागे तगादा लावण्याचा हेतू चांगलाच असतो. तरीसुद्धा, मुलांना मात्र असंच वाटतं की आपल्याकडून अवाजवी अपेक्षा केल्या जातात. तुम्हालाही असंच वाटत असल्यास, खात्री बाळगा की तुमचे आईवडील आणि शिक्षक काही मुद्दामहून तुम्हाला खिजवायला पाहात नाहीत. कदाचित, तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतेचं चीज करावं असं त्यांना वाटत असावं. हे खरं असलं तरीसुद्धा, त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा तुमच्या मनावर इतका तणाव येतो की तुम्हाला प्रयत्नच करण्याचं सोडून द्यावंसं वाटू लागतं. पण खचून जाऊ नका: तुम्ही खरंच अभ्यासात प्रगती करू शकता.

प्रेरणा

सर्वात महत्त्वाचं काय, तर तुम्हाला प्रेरणा झाली पाहिजे! यासाठी, आपण जे शिकतोय त्यामागचा उद्देश तुम्हाला कळला पाहिजे. बायबल म्हणते: “जो नांगरतो त्याने आशेने नांगरावे; आणि जो मळणी करितो त्याने ती उपभोग घेण्याच्या आशेने करावी.” (१ करिंथकर ९:१०) पण काही विषयांत हे ‘नांगरण्याचं कष्ट’ आपल्याला का उपसावं लागतंय हे लगेच कळून येत नाही. उदाहरणार्थ तुम्ही म्हणाल, ‘मला कंप्युटर प्रोग्रॅमर व्हायचंय. मग इतिहास घोकत बसण्यात काय अर्थ?’

कदाचित शाळेतल्या अभ्यासक्रमातील सर्वच विषय—निदान सध्या तरी, तुम्हाला आवश्‍यक वाटणार नाहीत हे कबूल आहे. पण जरा दूरदृष्टीने विचार करा. निरनिराळ्या विषयांचे सर्वसाधारण ज्ञान मिळाल्यामुळे भोवतालच्या जगाचे अधिक चांगले आकलन करता येणे तुम्हाला शक्य होईल. यहोवाच्या साक्षीदारांपैकी कित्येक तरुण मुलामुलींचा हा अनुभव आहे; बहुव्यापक शिक्षणामुळे त्यांना निरनिराळ्या क्षेत्रांतल्या लोकांना विचारात घेऊन वैविध्यपूर्ण पद्धतीने राज्याचा संदेश प्रस्तुत करणे आणि त्याअर्थी ‘सर्वांना सर्व काही होणे’ शक्य झाले आहे. (१ करिंथकर ९:२२) एखादा विषय व्यावहारिक दृष्टीने फारसा उपयोगी वाटत नसला तरीसुद्धा, तो आत्मसात केल्याने तुमचा फायदाच होतो. काही नाही, तर निदान तुमचं “चाणाक्षपण” तरी नक्कीच वाढेल आणि याचा तुमच्या पुढच्या जीवनात मोठा फायदा होईल.—नीतिसूत्रे १:१-४.

शालेय शिक्षणामुळे तुमचे सुप्त गुण देखील उजेडात येतात. प्रेषित पौलाने तीमथ्याला लिहिले: “देवाचे जे कृपादान . . . तुझ्या ठायी आहे, ते प्रज्वलित कर.” (२ तीमथ्य १:६) तीमथ्याला ख्रिस्ती मंडळीत विशेष सेवा करण्यासाठी नेमण्यात आलं होतं. देवाकडून लाभलेली ही क्षमता—हे “कृपादान”—विकसित करणं आवश्‍यक होतं, नाहीतर उपयोगात न आणल्यामुळे ते कुचकामी ठरलं असतं. अर्थात, तीमथ्याला मिळालेल्या कृपादानासारख्या तुमच्या शैक्षणिक क्षमता काही प्रत्यक्ष देवाकडून मिळालेल्या नसतात. तरीसुद्धा, तुमच्याजवळ असलेल्या क्षमता—मग त्या कला, संगीत, गणित, विज्ञान किंवा इतर कोणत्याही क्षेत्रांतल्या असोत—त्या तुमच्यासाठी अगदी खास असतात; शालेय शिक्षण तुम्हाला तुमच्या या क्षमता ओळखून त्यांत आणखी सुधारणा करण्यात सहायक ठरू शकतं.

अभ्यासाच्या उत्तम सवयी

पण शालेय शिक्षणातून पुरेपूर लाभ मिळवण्यासाठी, तुम्हाला अभ्यास करण्यासाठी नियमितपणे पुरेसा वेळ द्यावा लागेल. (पडताळा फिलिप्पैकर ३:१६.) अभ्यासाचा बराच मोठा भाग पूर्ण करता येईल इतका वेळ ठरवून घ्या, पण अधूनमधून थोडावेळ थांबून जरा विसावा घ्या. अभ्यासात वाचन करायचे असल्यास, आधी तेवढा भाग वरवर चाळून पाहा, म्हणजे विषय कशाबद्दल आहे याची तुम्हाला साधारण कल्पना येईल. मग, पाठाचं शीर्षक किंवा मुख्य उपशीर्षकं लक्षात घेऊन काही प्रश्‍न तयार करा. मग वाचा, आणि वाचताना या प्रश्‍नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करा. शेवटी, तुम्ही काय शिकलात हे पुस्तकात न पाहता म्हणता येतं का ते पाहा.

शिकलेल्या गोष्टींचा तुम्हाला आधीच माहीत असलेल्या गोष्टींशी संबंध जोडा. उदाहरणार्थ, विज्ञानाच्या अभ्यासातून तुम्हाला देवाचे “अदृश्‍य गुण स्पष्टपणे दिसतात.” (रोमकर १:२०, न्यू टेस्टामेंट, इझी-टू-रीड वर्शन) इतिहास तुम्हाला या विधानाची खात्री पटवून देतो, “हे परमेश्‍वरा, मला ठाऊक आहे की मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.” (यिर्मया १०:२३) मन लावून अभ्यास केल्यास, शिकणं तुम्हाला सोपं जाऊ लागेल—सोपंच नाही तर अतिशय मजेदार बनेल! शलमोनाने म्हटले: “समंजसाला ज्ञानप्राप्ति होणे सोपे असते.”—नीतिसूत्रे १४:६.

सकारात्मक मनोवृत्ती ठेवा

पण काहीवेळा, मुलांना त्यांनी निवडलेल्या सोबत्यांमुळे कमी मार्क पडतात. तुमच्या मित्रमैत्रिणी तुम्हाला यशस्वी होण्यास साहाय्य करतात का, की ते स्वतः देखील कमी मार्क मिळवणारेच आहेत? बायबलमध्ये एक नीतिसूत्र आहे: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.” (नीतिसूत्र १३:२०) म्हणून सोबत्यांची विचारपूर्वक निवड करा. शिक्षणाविषयी चांगली मनोवृत्ती असलेल्यांसोबत संगत करा. चांगले मार्क मिळवायचे आपण ठरवले आहे हे तुमच्या शिक्षकांना सांगण्यास मागेपुढे पाहू नका. तुम्हाला यासाठी मदत देण्याचा ते नक्कीच विशेष प्रयत्न करतील.

आपल्या क्षमतांबद्दल मनात नकारात्मक विचार डोकावू लागतात तेव्हा प्रेषित पौलाचे उदाहरण लक्षात घ्या. लोकांनी त्याच्या भाषण कौशल्यावर टीका केली तेव्हा त्याने उत्तर दिले: “जरी भाषण करण्यात अप्रवीण असलो तरी ज्ञानात [मी] तसा नाही.” (२ करिंथकर १०:१०; ११:६) पौलाने आपल्या उणीवांपेक्षा आपल्या विशेष गुणांवर जास्त लक्ष दिले. तुमच्यात कोणकोणते विशेष गुण आहेत? ते नेमके गुण ओळखणे तुम्हाला जड जात असल्यास, मोठ्यांपैकी अशा कोणाशी याविषयी बोला जो आनंदाने तुमची मदत करील. असा मित्र किंवा मैत्रीण तुम्हाला तुमचे विशेष गुण ओळखण्यात आणि त्यांचा पुरेपूर फायदा करून घेण्यात साहाय्य करू शकेल.

अडचणी असूनही प्रगती

“ही कर्तव्ये करण्यात गढून जा व ती अंग मोडून कर म्हणजे तुझी प्रगती सर्वांच्या लक्षात येईल.” (१ तीमथ्य ४:१५, सुबोध भाषांतर) वडील आपल्या मुलासोबत बोलतात त्याप्रमाणे पौलाने, सेवेत आधीच यशस्वी ठरलेल्या तीमथ्याला आणखी प्रगती करण्याचं प्रोत्साहन दिलं. बायबलच्या काळांत “प्रगती करणं” या ग्रीक क्रियापदाचा अर्थ अक्षरशः “कापून पुढे जाणं” असा होता; यातून दाट झाडंझुडपं कापत कापत मार्ग काढणाऱ्‍याचं चित्र डोळ्यापुढे येतं. कधी कधी शालेय जीवन असंच भासत असेल. पण, शेवटली फलश्रुती चांगलीच असणार आहे हे समजून चालल्यास शाळेची ही वाट तुम्हाला सहज सरता येईल.

प्रयत्न, प्रेरणा आणि शिकणं परस्परांशी निगडीत आहेत. एखादं वाद्य वाजवणाऱ्‍याचं उदाहरण विचारात घ्या. ते वाद्य वाजवण्यात त्याला आनंद मिळत असल्यास तो ते आणखी वाजवेल. जितकं जास्त वाजवेल तितकाच तो आणखीन निपुण होईल आणि यामुळे त्याच्या आनंदात भर पडेल. आपणही जितकं जास्त शिकून घेतो तितकंच आपल्याला आणखी शिकून घेणं सोपं जातं. म्हणून अभ्यासाच्या विचाराने खचून जाऊ नका. आवश्‍यक प्रयत्न करा, प्रगती करायला मदत करतील अशांची सोबत धरा, आणि प्राचीन काळी अजऱ्‍या याने आसा नावाच्या एका राजाला उद्देशून बोललेले शब्द नेहमी लक्षात असू द्या: “तुमचे हात गळू देऊ नका, कारण तुमच्या कर्तृत्वाचे तुम्हास फळ मिळेल.”—२ इतिहास १५:७.

[तळटीप]

a अध्ययन असमर्थता असणाऱ्‍या मुलांना याबाबतीत विशेष अडचणींना सामोरे जावे लागू शकते. यासंबंधी आणखी माहितीसाठी, सावध राहा! जुलै-सप्टेंबर १९९६, पृष्ठे २६-२८ पाहा.

[१६ पानांवरील चित्र]

चांगले मार्क मिळवायचे आपण ठरवले आहे हे तुमच्या शिक्षकांना सांगण्यास मागेपुढे पाहू नका

[१७ पानांवरील चित्र]

एखादा विषय व्यावहारिक दृष्टीने फारसा उपयोगी वाटत नसला तरीसुद्धा तो आत्मसात केल्याने तुमचा फायदाच होतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा