तणावावर नियंत्रण करणे अशक्य नाही!
“जीवनात तणाव हा राहणारच, म्हणून तो घालवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्याला आपली प्रतिक्रिया कशी आहे हेच तपासून पाहण्यात अर्थ आहे.” —लीऑन शायतॉफ, सुप्रसिद्ध आरोग्यविषयक लेखक.
बायबलमध्ये भाकीत करण्यात आले होते की “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील.” पुराव्यावरून स्पष्ट आहे की आपण त्याच काळात जगत आहोत कारण—तंतोतंत भविष्यवाणीच्या शब्दांनुरूप—माणसे आज “बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापांस न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली” अशी आहेत.—२ तीमथ्य ३:१-५.
अशा परिस्थितीत नावापुरतीही शांतता टिकवून ठेवणे अत्यंत कठीण होऊन बसले आहे, यात काय आश्चर्य! जे शांतपणे जगण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही त्रास होतो. स्तोत्रकर्त्या दाविदाने लिहिले, “नीतिमानाला फार कष्ट होतात.” (स्तोत्र ३४:१९; पडताळा २ तीमथ्य ३:१२.) हे खरे असले तरीही, तुम्ही तणावाखाली दडपून जाऊ नये म्हणून त्याचे प्रमाण कमी करण्याच्या दिशेने तुम्ही बरेच काही करू शकता. पुढे सुचवलेल्या काही गोष्टी विचारात घ्या.
स्वतःला जपा
खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. आरोग्यवर्धक आहारात प्रथिने, फळे, भाज्या, तृणधान्ये आणि इतर धान्ये आणि दुग्ध पदार्थ असतात. मैदा आणि संतृप्त वसा शक्यतो टाळा. आहारातील मीठ, रिफाइन्ड साखर, अल्कोहोल आणि कॅफेन इत्यादि पदार्थांच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवा. तुमच्या आहारात सुधारणा केल्यास, तुम्ही तणावाला सहजासहजी बळी पडणार नाही.
व्यायाम. बायबल सल्ला देते की, “शारीरिक कसरत . . . उपयोगी आहे.” (१ तीमथ्य ४:८) खरोखर, माफक प्रमाणात पण नियमितपणे—काही जण सल्ला देतात त्याप्रमाणे, आठवड्यातून तीन वेळा व्यायाम केल्यास तुमचे हृदय सुदृढ राहते, रक्ताभिसरण सुधारते, कोलेस्टेरॉलचे प्रमाण घसरते आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, थकविणारी शारीरिक मेहनत करताना शरीरात उत्पन्न होणारी एन्डॉरफिन्स तुम्हाला प्रसन्नचित्त राहण्यास सहायक ठरू शकतात.
पुरेशी झोप घ्या. पुरेशी झोप न मिळाल्यास शीण येतो आणि तणावाला तोंड देण्याची तुमची क्षमता कमी होते. तुम्हाला नीट झोप येत नसल्यास, झोपण्याच्या आणि उठण्याच्या निश्चित वेळा ठरवून घ्या. काहीजण असा सल्ला देतात की दिवसा थोडावेळ डुलकी घ्यायची असेल, तर ३० मिनीटांपेक्षा जास्त वेळ झोपू नये; यामुळे रात्री चांगली झोप लागेल.
वेळेचे नियोजन करा. आपल्या वेळेचे सुनियोजन करणाऱ्यांना तणावावर नियंत्रण करणे आणखी सोपे जाते. वेळेचे नियोजन करण्यासाठी, सर्वप्रथम कोणत्या जबाबदाऱ्यांना पहिले महत्त्व द्यायचे हे ठरवून घ्या. यानंतर, त्यांकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून एक वेळापत्रक तयार करा.—१ करिंथकर १४:३३, ४० आणि फिलिप्पैकर १:१० यांत तुलना करा.
प्रेमाची नाती जपा
आधार घ्या. सामाजिक लागेबांधे असणाऱ्यांना तणावपूर्ण काळात, निदान काही प्रमाणात तरी सुरक्षा मिळते; ते तणावामुळे अगदीच खचून जात नाहीत. आपल्या मनातले बोलून दाखवण्याकरता एखादा जरी जवळचा विश्वासू माणूस असला तरी बराच फरक पडतो. बायबलमध्ये एक सुविचार आहे: “मित्र सर्व प्रसंगी प्रेम करितो, आणि विपत्कालासाठी तो बंधु म्हणून निर्माण झालेला असतो.”—नीतिसूत्रे १७:१७.
मतभेद मिटवा. प्रेषित पौलाने लिहिले: “तुम्ही रागात असताना सूर्य मावळू नये.” (इफिसकर ४:२६) राग मनात ठेवण्याऐवजी लवकरात लवकर मतभेद मिटवून टाकणे किती शहाणपणाचे आहे, हे हृदयविकाराच्या झटक्यातून बचावलेल्या ९२९ जणांवर घेतलेल्या एका अभ्यासातून दिसून आले. यांपैकी, सौम्य स्वभावाच्या रोग्यांच्या तुलनेत जे अत्यंत भांडखोर प्रवृत्तीचे होते, त्यांना पहिला झटका आल्यानंतर दहा वर्षांच्या आत हृदय बंद पडून मृत्यू होण्याचा तिप्पट धोका होता. या अभ्यासाविषयी माहिती देणाऱ्या लेखकांनी लक्षात आणून दिले की हा धोका वाढवण्यामागे राग हे सर्वात मुख्य कारण आहे असे भासते; पण तणावामुळे उत्पन्न होणारे हार्मोन्स मोठ्या प्रमाणात शरीरात सोडण्यास कारणीभूत ठरणाऱ्या कोणत्याही तीव्र नकारात्मक भावनेमुळेही असाच परिणाम होऊ शकतो. नीतिसूत्रे १४:३० सांगते, की “मत्सराने हाडे कुजतात.”
कुटुंबाच्या सहवासात घालवण्याकरता वेळ काढा. इस्राएली आईवडिलांना आपल्या मुलांच्या सहवासात वेळ घालवण्याची, त्यांच्या मनात योग्य तत्त्वे बिंबवण्याची आज्ञा देण्यात आली होती. (अनुवाद ६:६, ७) असे केल्याने आईवडील आणि मुलांमध्ये एक बंधन निर्माण होऊन कुटुंबाच्या ऐक्याला हातभार लागत असे—आज हे ऐक्य पाहायला मिळत नाही याचा खेद वाटतो. एका अभ्यासातून असे दिसून आले की नोकरी करणारी काही दांपत्ये दररोज आपल्या मुलांसोबत खेळण्यात फक्त सरासरी ३.५ मिनिटे घालवतात. पण तुम्ही तणावाला तोंड देत असता तेव्हा, तुमचे कुटुंब एक फार मोठा आधार ठरू शकते हे तितकेच खरे. तणाव या विषयावरील एका पुस्तकानुसार, “कुटुंबाची तुलना एखाद्या भावनात्मक आधार समूहाशी करता येईल ज्यात तुम्हाला खास बिनशर्त सदस्यत्व असते, जेथे तुमचे गुण दोष सर्व माहीत असूनही तुमच्यावर प्रेमच केले जाते. तणाव कमी करण्याच्या दिशेने सबंध कुटुंबाचे एकत्रित प्रयत्न अत्यंत परिणामकारक ठरतात.”
जीवनात संतुलन साधा
समंजस दृष्टिकोन बाळगा. शारीरिक आणि भावनिक रित्या स्वतःला अगदी जीव जाईपर्यंत खपवणारा, शीण आणि डिप्रेशन (विषण्णता) यांना हमखास बळी पडतो. यावर उपाय म्हणजे संतुलन. शिष्य याकोब याने लिहिले, की ‘वरून येणारे ज्ञान हे मुळात सौम्य [समंजस] आहे.’ (याकोब ३:१७; पडताळा उपदेशक ७:१६, १७ आणि फिलिप्पैकर ४:५.) आपल्याला हाताळता येणार नाहीत अशा अवाजवी जबाबदाऱ्यांना नकार द्यायला शिका.
दुसऱ्या कोणासोबत स्वतःची तुलना करू नका. गलतीकर ६:४ म्हणते त्यानुसार: “प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे, तर केवळ स्वतःसंबंधाने अभिमान बाळगण्यास जागा मिळेल.” खरंय, उपासनेच्या बाबतीतही देव नकारात्मक तुलना करीत नाही; आपल्या वैयक्तिक परिस्थितीत शक्य नसलेल्या गोष्टींची तो आपल्याकडून अपेक्षा करीत नाही. ‘जे आपल्यापाशी नाही त्याप्रमाणे नव्हे, तर जे आपल्यापाशी आहे त्याप्रमाणे,’ तो आपल्या देणग्या आणि अर्पणे स्वीकारतो.—२ करिंथकर ८:१२, पं.र.भा.
विरंगुळ्याकरता वेळ काढा. येशू मेहनती होता खरा, पण तरीसुद्धा स्वतः आणि शिष्यांना देखील विसावा घेता यावा म्हणून त्याने वेळातून वेळ काढला. (मार्क ६:३०-३२) देवाच्या प्रेरणेने उपदेशकाचे पुस्तक लिहिणाऱ्या लेखकाने नैतिकदृष्ट्या चांगल्या मनोरंजनाला हितावह म्हटले. त्याने लिहिले: “मी हास्यविनोदाची प्रशंसा करून म्हणालो, ह्या भूतलावर मनुष्याने खावे, प्यावे व चैन करावी यापेक्षा इष्ट त्याला काही नाही; देवाने त्याला या भूतलावर जो आयुष्यकाल दिला आहे त्यांत श्रम करीत असता एवढेच त्याच्याबरोबर राहणार.” (उपदेशक ८:१५) संतुलित प्रमाणातील मौजमजा, शरीराला नवचैतन्य देऊन तणाव दूर करण्यासही सहायक ठरू शकते.
तणावाविषयीचा योग्य दृष्टिकोन
तणावपूर्ण परिस्थितीतून जाताना:
देवाने आपल्याला नाकारले आहे असा निष्कर्ष काढू नका. बायबल आपल्याला हन्ना या विश्वासू स्त्रीविषयी सांगते; वर्षानुवर्षे तिचे “मन व्यथित” होते. (“तिला भयंकर तणाव होता,” रिव्हाइज्ड स्टॅण्डर्ड व्हर्शन) (१ शमुवेल १:४-११) मासेदोनियात, पौल “चहूकडून तणावग्रस्त झाला होता.” (२ करिंथकर ७:५, बाइंगटन) आपल्या मृत्यूपूर्वी येशू “अत्यंत विव्हळ झाला,” आणि त्याच्या मनावर इतका भयंकर तणाव होता की “रक्ताचे मोठमोठे थेंब भूमीवर पडावे असा त्याचा घाम पडत होता.”a (लूक २२:४४) हे सारे देवाचे विश्वासू सेवक होते. म्हणूनच, तुम्हालाही तणावाला तोंड द्यावे लागते, तेव्हा देवाने आपल्याला वाऱ्यावर सोडले आहे असा निष्कर्ष काढण्याचे कारण नाही.
आपल्या दुःखदायक परिस्थितीतून धडा घ्या. पौलाने आपल्या ‘शरीरात सलणारा एक काटा’ सहन करण्याविषयी लिहिले; नक्कीच त्याने हे आपल्या दुःखदायक आजाराच्या संदर्भात लिहिले होते. (२ करिंथकर १२:७) पण सुमारे पाच वर्षांनंतर तो म्हणू शकला: “हरएक प्रसंगी अन्नतृप्त असणे व क्षुधित असणे, संपन्न असणे व विपन्न असणे, ह्यांचे रहस्य मला शिकविण्यात आले आहे. मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे.” (फिलिप्पैकर ४:१२, १३) अर्थात, ‘शरीरात सलणारा तो काटा’ पौलाला त्रासदायकच होता, पण तो सहन केल्यामुळे पौल सामर्थ्याकरता देवावर अधिकाधिक विसंबून राहण्याचे शिकला.—स्तोत्र ५५:२२.
आध्यात्मिक विकास करा
देवाचे वचन वाचा आणि त्यावर मनन करा. येशूने म्हटले, “आपल्या आध्यात्मिक गरजेची जाणीव राखणारे ते धन्य.” (मत्तय ५:३, NW) देवाचे वचन वाचणे आणि त्यावर मनन करणे अत्यावश्यक आहे. सहसा बायबलच्या शास्त्रवचनांत मनःपूर्वक शोध घेतल्यास आपल्याला नेमके असे काहीतरी उत्तेजनात्मक वाचायला मिळते जे दिवसभर आपल्याला आवश्यक साहाय्य पुरवते. (नीतिसूत्रे २:१-६) स्तोत्रकर्त्याने लिहिले, “माझे मन अनेक चिंतांनी व्यग्र होते, तेव्हा तुझ्यापासून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाचे समाधान करिते.”—स्तोत्र ९४:१९.
नियमित प्रार्थना करा. पौलाने लिहिले: “आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धिसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांति तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” (फिलिप्पैकर ४:६, ७) खरंय, अगदी “सामर्थ्याची पराकोटी” आवश्यक भासते तेव्हासुद्धा “देवाने दिलेली शांती” आपल्या अशांत भावनांवर मात करून आपल्याला स्थैर्य देऊ शकते.—२ करिंथकर ४:७.
ख्रिस्ती सभा चुकवू नका. ख्रिस्ती मंडळी म्हणजे अतिशय मोलवान असा आधार देणारी एक तरतूद आहे, कारण मंडळीच्या सदस्यांना “प्रीति व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे एकमेकांकडे लक्ष” देण्याचे प्रोत्साहन देण्यात आलेले आहे. म्हणूनच तर पौलाने पहिल्या शतकातील हिब्रू ख्रिश्चनांना ‘एकत्र मिळणे सोडून न देण्याविषयी’ सांगितले.—इब्री लोकांस १०:२४, २५.
एक खात्रीलायक आशा
अर्थात, तणाव कमी करण्यासाठी कोणता एखादा सोपा फॉर्मुला म्हणून नाही. मुळात, सहसा विचारसरणीतच बदल करण्याची गरज असते. उदाहरणार्थ, कदाचित एखाद्याला आपल्या परिस्थितींना वेगळ्या पद्धतीने प्रतिक्रिया दाखवण्याचे शिकून घ्यावे लागेल, ज्यामुळे या परिस्थिती त्याला दडपून टाकणार नाहीत. काहीवेळा, तणावाचे प्रमाण किंवा तीव्रता इतकी असेल की प्रशिक्षण असलेल्यांकडून वैद्यकीय मदत घेणे भाग पडू शकते.
अर्थात, आज कोणाचेही जीवन अपायकारक तणावापासून पूर्णपणे मुक्त नाही. तथापि, बायबल आपल्याला आश्वासन देते की लवकरच देव मानवांकडे आपले लक्ष वळवून, ज्या परिस्थितींमुळे त्यांना इतका नुकसानकारक तणाव सहन करावा लागतो त्या परिस्थिती तो काढून टाकेल. प्रकटीकरण २१:४ या वचनात आपण वाचतो त्याप्रमाणे, देव “त्यांच्या डोळ्यांचे ‘सर्व अश्रु पुसून टाकील;’ ह्यापुढे मरण नाही; ‘शोक, रडणे’ व कष्ट ही नाहीत.” यानंतर, विश्वासू मानवजात निर्भयपणे जगू शकेल. संदेष्टा मीखा याने भाकीत केले: “ते सगळे आपापल्या द्राक्षीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसतील, कोणी त्यांस घाबरविणार नाही; कारण सेनाधीश परमेश्वराच्या तोंडची ही वाणी आहे.”—मीखा ४:४.
[तळटीप]
a अतितीव्र मानसिक तणावात रक्तासारखा घाम फुटल्याची काही प्रकरणे ज्ञात आहेत. उदाहरणार्थ, हीमेटिड्रोसिस नावाच्या विकारात रक्त किंवा रक्तातील रंगद्रव्य असलेला घाम सुटतो किंवा शरीरातून रक्तमिश्रित द्रव्य बाहेर पडते. पण येशूच्या बाबतीत नेमके काय घडले हे खात्रीने सांगता येणार नाही.
[१२ पानांवरील चौकट]
तणाव आणि शस्त्रक्रिया
काही फिजिशियन आपल्या पेशंट्सना शस्त्रक्रिया कक्षात नेण्याआधी त्यांचे तणावाचे प्रमाण (स्ट्रेस लेव्हल) तपासतात. उदाहरणार्थ, एक सर्जन डॉ. कॅमरॅन नेझ्हॅत म्हणतात:
“एखाद्या रुग्णाला शस्त्रक्रियेची तारीख दिल्यावर, समजा त्या दिवशी तिने मला येऊन सांगितले की, मला आज खूपच घाबरल्यासारखे झाले आहे, आज शस्त्रक्रिया करू नका, तर मी तिची शस्त्रक्रिया सरळ रद्द करतो.” का? नेझ्हॅत खुलासा करतात: “प्रत्येक सर्जनला याची पुरेपूर जाणीव आहे की जे लोक अत्यंत घाबरलेल्या स्थितीत असतात, त्यांना शस्त्रक्रियेदरम्यान फार कठीण जाते. त्यांना अतिशय रक्तस्त्राव होतो, शिवाय इन्फेक्शन्स आणि गुंतागुंतीही खूप होतात. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होणे देखील कठीण असते. त्यापेक्षा त्यांनी शांत असणेच सर्वात उत्तम.”
[१० पानांवरील चित्र]
आध्यात्मिक विकास केल्यामुळे तुम्हाला शांत राहण्यास मदत मिळेल
[११ पानांवरील चित्र]
आरोग्य जपल्याने तणाव कमी करता येतो
विसावा
उत्तम आहार
व्यायाम