आमच्या वाचकांचे मनोगत
दांडगाई करण्यात—गैर काय? “तरुण लोक विचारतात . . . दांडगाई करण्यात—गैर काय?“ (एप्रिल ८, १९९७) या लेखासाठी आभारी आहे. शाळेत प्रत्येकजण दुर्बळांचा अपमान करत असतो आणि माझ्यावरही तेच करण्याचा दबाव आणला जायचा. पण स्वतःला दुसऱ्याच्या स्थितीत घालून पाहण्याचा जो सल्ला लेखामध्ये दिला आहे, त्यामुळं दांडगाई टाळण्यास मला बरीच मदत मिळाली. पुन्हा एकदा तुमची आभारी आहे.
एम. एन., फ्रान्स
मी १७ वर्षांची आहे आणि या लेखासाठी तुमचे मनस्वी आभार मानते. मी केलेल्या प्रार्थनांचं ते उत्तर होतं आणि त्यापासून मला खरोखर उत्तेजन मिळालं. यहोवा दांडगाईचा तिरस्कार करतो हे जाणून, माझ्या आचरणात आवश्यक ते बदल करण्यास मला पुष्कळशी मदत झाली आहे. सुवर्ण नियमानं आणि खुद्द येशूच्या उदाहरणानं माझ्यावर छाप पाडली आणि चांगलं वागण्यास या दोन्ही गोष्टी माझी मदत करतात.
व्ही. टी., इटली
अलीकडेच एका प्रतिक्षालयामध्ये बसलेली असताना मी एक सावध राहा! वाचायला घेतले आणि सुरेखपणे लिहिलेला हा लेख मला आढळला. दांडगाईमुळे जी स्थायी हानी पोहंचते ती मी निश्चित समजू शकते. माझा भाऊ शाब्दिक, भावनिक आणि चक्क शारीरिकरित्या देखील [माझ्याशी, आपल्या स्वतःच्या बहिणीशी] दुर्व्यवहार करायचा. विरोध केल्यास तो खांदे उडवायचा, खिदळायचा आणि बिनधोकपणे म्हणायचा की ती नुसती थोडीशी गंमत होती. माझ्यामध्ये विनोदबुद्धी नसल्यामुळं चूक माझीच आहे असंही तो म्हणायचा! मी १३ वर्षांची झाले आणि तो १५ वर्षांचा झाला तेव्हा तर लैंगिक छळ करण्याची भीतीही तो मला दाखवू लागला. तो माझ्यापेक्षा वयानं मोठा, धिप्पाड आणि अगदी दणकट असल्यामुळं मला सतत त्याची भीती वाटायची! माझ्या आईबाबांनी कधीच मला साह्य केलं नाही. जीवनांतील अशा गंभीर विषयांवर लिहिण्याचे कष्ट घेतल्याबद्दल सावध राहा! नियतकालिकास माझे मनस्वी आभार. असे विषय शब्दांत मांडण्यास धैर्य लागतं हे मला ठाऊक आहे. मला असं वाटतं, या लेखाद्वारे तुम्ही अनेकांची अंतःकरणे स्पर्श केली आहेत.
बी. एस. एम., संयुक्त संस्थाने
जगव्याप्त उद्यान “जगव्याप्त उद्यान—स्वप्न की भविष्यातील हकीगत?” (मे ८, १९९७) या सुरेख श्रृंखलेसाठी तुमचे आभार मानायला हवेत. होय, उद्याने आणि रंग, यांचा आपल्या स्वास्थ्यावर परिणाम होऊ शकतो, शिवाय त्यामुळे आपल्यात आनंदाची भावनाही उत्पन्न होते. त्यातील, “परादीसकडे परतीचा प्रवास,” हे सदर मला विशेष आवडले. ते मोजके शब्द किती उत्तेजनात्मक होते—जणू “हाच मार्ग आहे” असं आमंत्रण देत होते. भविष्यात कधीतरी, पृथ्वीचे रूपांतर परादीसमध्ये करण्याच्या कामात सकाळपासून संध्याकाळपर्यंत हातभार लावणे किती सुखकारक असेल! चित्र काढणे, त्यांत रंग भरणे तसेच हस्तकला यांची सुरवातीपासूनच आवड असल्यामुळे त्या नियतकालिकांतील सर्व चित्रं देखील मला आवडतात.
व्ही. आर., ऑस्ट्रेलिया
या लेखांसाठी मी तुमची वाखाणणी करू इच्छिते. मला ते फार फार आवडले. मी जवळजवळ ८० वर्षांची आहे आणि अजूनही मला माझ्या बागेत काम करायला आवडतं. माझ्या फुलांना व भाज्यांना स्पर्धेत बक्षीस मिळणार नाही हे खरं, पण बाहेरच्या मोकळ्या हवेत हे काम करणं मला फार सुखकारक वाटतं. ते लेख वाचल्यापासून, बागेत काम करणं लोकांना इतकं का आवडतं हे मला अधिक चांगलं समजलं आहे.
आर. आर., संयुक्त संस्थाने
विवाह टिकवा? “वैवाहिक विश्वासघात झाल्यावर विवाह टिकवता येतो का?” (मे ८, १९९७) हा लेख वाचल्यानंतर मला तीव्रपणे जाणवलं, की यहोवानंच मला हे पत्र पाठवलं होतं. मी ज्या परिस्थितीतून वाटचाल करत होते आणि मला जे काही वाटत होतं अगदी तेच त्यामध्ये व्यक्त केलं होतं. माझ्या पतीनं माझा वैवाहिक विश्वासघात केला, पण त्यांनी प्रामाणिकपणे पश्चात्तापही केला. लेखानं उल्लेख केला त्याप्रमाणे मलाही असं वाटलं, की मी जणू एका वावटळीत सापडले होते. मी त्यांना क्षमा करण्याचं ठरवलं खरं, पण त्यांच्याविषयी माझ्या मनात येणाऱ्या वाईट विचारांची कधीकधी माझी मलाच लाज वाटायची. त्या लेखानं मला हे समजण्यास मदत केली, की माझ्या प्रतिक्रिया अगदी स्वाभाविक आणि यथायोग्य होत्या. यहोवानं आमचे प्रयत्न विपुलतेने आशीर्वादित केले आहेत आणि आमचा विवाह टिकला.
एल. पी., फ्रान्स
माझा विवाह टिकू शकला नसला तरी हा लेख खरोखर एक आशीर्वादच होता, कारण त्यात जणू माझीच भावनात्मक स्थिती हुबेहूब शब्दचित्रित केली होती. लेखातील प्रत्येक गोष्टीशी मी माझी स्थिती जुळवू शकत होते. अशाप्रकारे लाभ मिळविलेले इतर लोकही माझ्या माहितीत आहेत. एखाद्याला नेमकं कसं वाटत असतं हे समजून घेणं अनेकांना जड जातं, त्यामुळं अशांना अंतर्दृष्टी प्रदान करून हा लेख त्यांना पुष्कळ मदत करू शकेल.
एम. सी., आयर्लंड
ख्रिस्ती विश्वासात नसलेल्या एका व्यक्तीसोबत माझा विवाह होऊन आज नऊ वर्षं झाली आहेत, पण ते सतत माझा विश्वासघात करत राहिले. “विवाह टिकवण्याजोगा आहे का?” या मथळ्याखाली दिलेली माहिती मी वाचली, तेव्हा मला फार दिलासा मिळाला. माझ्या पतीला आमचा विवाह टिकवायचा तर आहे, पण आपले विवाहबाह्य संबंध मात्र ते तोडू इच्छित नाहीत. म्हणूनच मी आमचं वैवाहिक जीवन आता संपुष्टात आणत आहे, याचा मला आनंद वाटतो. आता सर्वकाही नव्यानं सुरवात करून, मला एकट्या आईची भूमिका पार पाडावी लागेल.
एम. एस. बी., त्रिनिदाद
त्या अतिसुंदर व संवेदनशील लेखासाठी मनस्वी आभार. वैवाहिक तडजोड यशस्वी होईल की नाही हे ठरविण्यासाठी दिलेला सल्ला उत्कृष्टच होता. मी नेहमी असं धरून चालायचे, की माझ्या पतीनं कधी माझा विश्वासघात केला तर आयुष्यात कधीच मी त्यांना माफ करू शकणार नाही. पण आता मला कळून चुकलं, की अशी मनोवृत्ती बाळगणं नेहमीच योग्य नसतं. हे अतिशय लज्जास्पद आहे, की ही एक सतत वाढत चाललेली समस्या आहे; तरी, आपण स्वतःची मदत कशी करू शकतो याविषयी शास्त्रवचनांवर आधारित समजबुद्धी दिल्याबद्दल आभारी आहे. निराशेच्या काळातून वाटचाल करत असताना तसंच क्षमा करण्याचं बळ एकवटण्यास, यहोवावरील माझ्या भरवशानंच मला साह्य केलं; कारण माझ्या पतीनं मनस्वी पश्चात्ताप केला होता (शिवाय आताही ते करतच आहेत).
एस. एन., संयुक्त संस्थाने