मधमाशी केव्हा मधमाशी नसते?
मधमाश्या दररोज शेकडो फुलांना भेटी देऊन त्यांच्यातील मकरंद शोषून ते पोळ्यात साठवितात; त्यामुळे साहजिकच त्यांचे जीवन अतिशय व्यस्त असते. वसंत ऋतूचे आगमन होते तेव्हा, नर मधमाश्या आपल्यासाठी एका मादीचा शोध करू लागतात. यासाठी त्यांना दृष्टी आणि वास यांवर विसंबून राहावे लागते. तथापि, निकटदृष्टी असलेल्या मधमाशीचे लक्ष वेधण्याच्या प्रयत्नात आणखीही कुणीतरी—ऑर्किड मिरवत असते.
दक्षिण युरोपमध्ये, अनेक रानटी ऑर्किड्स असून मादी मधमाश्यांचे सोंग घेण्यावरच त्यांचे फलन अवलंबून असते. या ऑर्किड्सना आपल्या इतर ऑर्किड्सपर्यंत परागकणांचे “पार्सल” पाठवणे आवश्यक असते. या कामासाठी मधमाश्याच सर्वोत्तम वाहक ठरतात. पण मग, मधमाश्यांना आकृष्ट करण्यासाठी ऑर्किड्सकडे चवदार मकरंद नसल्यामुळे त्यांना एक युक्ती करावी लागते. आणि ही युक्ती म्हणजे, या ऑर्किड फुलाचे स्वरूप आणि सुगंध एखाद्या मादी मधमाशीच्या इतक्या साम्य असते, की नर मधमाशीची फसवणूक होऊन तो चक्क त्या फुलासोबतच संग करण्याचा प्रयत्न करतो! या ऑर्किड्सपैकी प्रत्येक जातीचा आपला स्वतःचा एक कपटवेष व वेगवेगळा सुगंध असतो.
मधमाशीचे डोळे उघडतात तोपर्यंत ऑर्किडने परागकणांचे एक चिकट पुडके मधमाशीच्या शरीरावर लावून दिलेले असते. मग मधमाशी उडून जाते, पण दुसऱ्या एका ऑर्किडकडून या बिचाऱ्याची पुन्हा फसवणूक होऊन त्या ऑर्किडलाही हे परागकण मिळतात. अशा प्रकारे कितीतरी वेळा फसविले गेल्यानंतर मधमाशीच्या लक्षात येते की, ऑर्किड्स काही भरवशालायक नाहीत. पण भानावर येईपर्यंत, कदाचित काही फुलांचे परागसिंचन झालेले असेल.
विचारक्षम नसणाऱ्या या ऑर्किड्सना, मधमाश्यांची फसवणूक करण्याइतका नेमका वास आणि स्वरूप कसे काय लाभले? अशा विलक्षण संरचना एका बुद्धिमान रचनाकाराची साक्ष देऊन जातात, ज्याची सृष्टी आपल्याला थक्क व मोहित केल्याशिवाय राहत नाही.