कीटक उड्डाणाचे कोडे उलगडले
कीटकांची शरीरयष्टी इतकी भारदस्त व त्यांचे पंख देखील अगदी नाजूक असताना ते विमानगामी कसे असू शकतात, असा एक यक्षप्रश्न कित्येक वर्षांपासून वैज्ञानिकांना भेडसावत आहे. असे वाटते जणू हे अति लहान जीव, वायुगतिशास्त्राच्या तत्त्वांचे उल्लंघन करतात. अशक्यप्राय वाटणारे हे चमत्कृत्य, कीटक कसे काय करतात याचे कोडे, इंग्लंडच्या केंब्रीज विद्यापीठातील संशोधकांना आता उलगडले आहे.
कीटक उड्डाणाचा अभ्यास करण्यासाठी, वैज्ञानिकांनी हॉकमॉथ नामक एका पतंगाला दोर बांधून त्यास वातसुरंगात बांधले. मग विषारी नसलेला धूर त्यांनी सुरंगात सोडला व पतंग आपले पंख फडफडताना, धुराचा प्रवाह कसा होतो त्याचे त्यांनी निरीक्षण केले. त्यानंतर, त्यांनी दहापट मोठे यांत्रिक मॉडेल तयार केले ज्याचे पंख १०० पट मंद गतीने फडफडत होते, आणि आता अधिक सुस्पष्ट दिसणाऱ्या परिणामांचे त्यांनी अवलोकन केले. त्यांना दिसून आले, की पतंगाच्या पंखाची खाली येण्याची क्रिया सुरू होते, तेव्हा पंखाच्या मुळाशी एक चक्र किंवा वायूचा एक भोवरा तयार होतो. परिणामतः, पंखावरील कमी दाब, उच्चालक प्रेरणा उत्पन्न करून कीटकास वर उचलतो. चक्र मृतवत झाले असते तर पतंगाची उच्चालक प्रेरणा नाहीशी होऊन कीटक जमिनीवर पडले असते. या उलट, वायूचा भोवरा पंखाच्या पुढील कड्यापासून पंखाच्या टोकापर्यंत प्रवास करतो व खाली येण्याच्या पंखाच्या क्रियेमुळे उत्पन्न होणारी उच्चालक प्रेरणा, जी पतंगाच्या वजनाच्या दीडपट असते, तिच्यामुळे कीटकाला उड्डाण करणे सुकर बनते.
वैमानिकी अभियांत्रिकांना आधीपासूनच माहीत होते, की डेल्टा विंग विमाने (त्यास असे यासाठी म्हटले आहे कारण त्याचे पंख ग्रीक वर्णमालेतील Δ या अक्षरासारखे असते) आपल्या पंखाच्या टोकापाशी चक्रवात तयार करतात ज्यामुळे उच्चालक प्रेरणा उत्पन्न होते. परंतु, पंख फडफडणाऱ्या कीटकांसाठी चक्रवात कशाप्रकारे उच्चालक प्रेरणा देतो हे समजल्यानंतर, प्रोपेलरच्या व हेलिकॉपटर्सच्या रचनेत याच दृश्य चमत्काराचा प्रयोग कसा केला जाऊ शकेल याचा अभ्यास आता ते करू इच्छितात.