उत्क्रांती की निर्मिती?
पंखांचं विलक्षण टोक
जेट विमान उडत असताना त्याच्या पंखांच्या टोकाजवळ वेगानं फिरणारे हवेचे भोवरे तयार होतात. या भोवऱ्यांमुळं विमान मागं रेटलं जातं आणि पुढं जाण्यासाठी जास्त इंधन खर्च होतं. तसंच, पाठोपाठ येणाऱ्या विमानांवरही या भोवऱ्यांचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळं, एकाच धावपट्टीवरून उड्डाण करणाऱ्या विमानांमध्ये, वेळेचं पुरेसं अंतर असणं गरजेचं आहे; यामुळं हवेचे भोवरे नाहीसे होण्यासाठी वेळ मिळतो.
या समस्या थोड्याफार प्रमाणात टाळण्यासाठी इंजिनियर्सनी विंग्लेट्सचा शोध लावला. विंग्लेट्स म्हणजे विमानाच्या पंखांचे वर वळवलेले टोक. पण इंजिनियर्सना हे सुचलं कसं? भरारी मारणारे पक्षी जसं की बहिरी ससाणे, गरुड आणि करकोचे यांच्या पंखांच्या टोकावर असलेल्या पिसांवरून!
तुम्हाला माहीत होतं का? हे मोठे पक्षी उडत असताना त्यांच्या पंखांच्या टोकावर असलेली पिसं वरच्या बाजूला वळतात आणि ताठ उभी राहतात. त्यामुळं पंख लहान असले तरी पक्ष्यांना उंच उडणं सहज शक्य होतं. याचीच नक्कल करून इंजिनियर्सनी विमानाचे पंख तयार केले आहेत. प्रयोगावरून त्यांना समजलं, की हवेचा प्रवाह लक्षात घेऊन पंखांच्या टोकांना अचूक वळण दिल्यास विमानाची कार्यक्षमता वाढते; अलीकडच्या काळात तर विमानांची कार्यक्षमता १० टक्क्यांहून जास्त वाढली आहे. कारण, विंग्लेट्समुळं हवेच्या भोवऱ्यांचा आकार कमी होऊन विमानाचं मागं रेटलं जाणं कमी होतं आणि भोवऱ्यांमधल्या उर्जेमुळं विमान वेगानं पुढं जातं.
पंखांच्या या विलक्षण रचनेमुळं विमानांना लांब पल्ल्याची उड्डाणं करता येतात आणि अधिक भार वाहून नेता येतो. तसंच, पंखांची लांबी कमी असल्यामुळं पार्किंगचा प्रश्न सुटतो. शिवाय, इंधनाचीही बरीच बचत होते. उदाहरणार्थ, नासा या संघटनेनं दिलेल्या वृत्तानुसार २०१० मध्ये विमान कंपन्यांनी “जगभरात ७६० कोटी लिटर इंधनाची बचत केली” आणि त्यामुळं प्रदूषण बरंच कमी झालं.
तुम्हाला काय वाटतं? भरारी मारणाऱ्या पक्ष्यांच्या पंखांच्या टोकाची ही विलक्षण रचना उत्क्रांतीमुळं आली, की तिच्यामागं कोणी रचनाकार असावा? ◼ (g15-E 02)