वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 १०/८ पृ. २४-२७
  • तुमची श्रवणशक्‍ती जतन करण्याजोगे वरदान

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमची श्रवणशक्‍ती जतन करण्याजोगे वरदान
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • तुमचा महत्त्वाचा बाह्‍यकर्ण
  • तुमचा मध्यकर्ण—एक यांत्रिक चमत्कृती
  • तुमचा अद्‌भुत अंतर्कर्ण
  • तुमचा मेंदू व श्रवणशक्‍ती
  • जतन करण्याजोगे वरदान
  • देवाकडून मिळालेले समतोलपणाचे वरदान
    सावध राहा!—१९९६
सावध राहा!—१९९७
g97 १०/८ पृ. २४-२७

तुमची श्रवणशक्‍ती जतन करण्याजोगे वरदान

जन समूहाच्या गोंगाटापासून अगदी दूर, अर्थात गावाबाहेरील एखादी शांत संध्याकाळ, रात्रीच्या कर्णमधूर आवाजांचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी पुरवते. वाऱ्‍याची एक मंद झुळूक पानांत हलकासाच सळसळ आवाज निर्माण करून जाते. दूरवरून कीटक, पक्षी आणि प्राणी यांचाही आवाज यात मोलाची भर घालतो. असे कर्णमधूर आवाज ऐकणे किती विलक्षण अनुभव होय! तुम्हाला ते ऐकू येतात का?

मानवी श्रवण संस्थेची अद्‌भुत शक्‍ती निश्‍चितच विस्मयकारक आहे. एका प्रतिध्वनीरहित व निनादरहित कक्षेत अर्धा तास घालवा; ही श्रवणाचीच एक खोली आहे जिच्या पृष्ठभागाची रचना अशाप्रकारे केलेली असते की हा पृष्ठभाग कोणताही आवाज शोषून घेऊ शकतो; मग हळुवारपणे तुमची श्रवणशक्‍ती इतपत ‘वाढेल’ की तुमच्या स्वतःच्या शरीरातून येणारे अपरिचित आवाज आता तुम्हाला ऐकू येतात. श्राव्य वैज्ञानिक एफ. ऑल्टिन एव्हरेस्ट, द मास्टर हँडबुक ऑफ अकॉस्टिक्स यात ह्‍या अनुभवाचे वर्णन करतात. प्रथम, तुमच्या हृदयाचे ठोके अधिक स्पष्ट ऐकू येतात. साधारण एक तास त्या खोलीत राहिल्यानंतर, वाहिन्यांतून होणाऱ्‍या रक्‍ताभिसरणाचा आवाज तुम्हाला ऐकू येतो. आणि शेवटी, तुमची श्रवणशक्‍ती जर अधिकच तीक्ष्ण असेल तर “तुमच्या धीराचे प्रतिफळ, म्हणजे हृदयाच्या ‘ठोक्यांचा आवाज’ व रक्‍ताचे उसळणे यांमधील एक अपरिचित फुसकारा देखील तुम्ही ऐकू शकता. हे काय आहे बरे? तुमच्या कर्णपटलावर येऊन आदळणाऱ्‍या वायुकणांचा हा आवाज आहे,” असे स्पष्टीकरण एव्हरेस्ट देतात. या फुसकाऱ्‍यामुळे परिणीत होणारी कर्णपटलाची हालचाल, विश्‍वास बसणार नाही इतकी कमी असते—एका सेंटिमीटरच्या दशलक्ष भागाचा केवळ १/१०० भाग!” हाच “श्रवणाचा मूळारंभ,” अर्थात ध्वनीचा ठाव घेण्यातील तुमच्या क्षमतेची अधिक खालची पातळी होय. उच्च प्रतीची संवेदनक्षमता तुमच्या कोणत्याही फायद्याची असणार नाही कारण वायुकणांच्या हालचालींच्या आवाजामुळे अधिक मंद ध्वनी, ऐकू येईनासा झाला असता.

बाह्‍यकर्ण, मध्यकर्ण व अंतर्कर्ण आणि त्याबरोबरच आपली मज्जासंस्था तथा मेंदूच्या प्रक्रिया व संवेदन शक्‍तींच्या सहकार्यामुळेच ऐकणे शक्य होते. ध्वनी, दाब कंपन लहरींच्या रूपात हवेतून प्रवास करतो. या लहरी, आपले कर्णपटल मागेपुढे हलवितात आणि मग मध्यकर्णामार्फत ही हालचाल अंतर्कर्णापर्यंत पोहंचवली जाते. त्याठिकाणी हालचालीचे रूपांतर चेता आवेगांत होते ज्यास मेंदू ध्वनीचा अर्थबोध लावतो.a

तुमचा महत्त्वाचा बाह्‍यकर्ण

तुमच्या कानाच्या लवचिक, परिवलित भागास पिन्‍ना म्हटले जाते. हा पिन्‍ना, ध्वनी संकलित करतो परंतु त्याचे कार्य तेवढ्यापुरतेच मर्यादित नसते. तुम्ही कधी विचार केला का, की तुमच्या कानाला इतक्या साऱ्‍या लहान लहान घड्या का असतात? पिन्‍नाच्या विविध पृष्ठभागांतून परावर्तित होणाऱ्‍या ध्वनीलहरींचे, त्यांच्या येण्याच्या दिशेनुसार कुशलतापूर्वक परिवर्तन केले जाते. या सूक्ष्म कंपनांचे संकेतवाचन करण्यास तसेच ध्वनीच्या उगमाची स्थिती निश्‍चित करण्यास मेंदू समर्थ असतो. तुमच्या कानांत ध्वनी प्रवेश करतो, तेव्हा त्याच्या समयाची व तीव्रतेची तुलना करण्याबरोबरच मेंदू, वर उल्लेखिलेले कार्य देखील करतो.

हे प्रमाणसिद्ध करण्यासाठी, डोळे मिटून असलेल्या एखाद्या व्यक्‍तीच्या अगदी समोर तुमचा हात वर खाली करत असताना चुटकी वाजवा. व्यक्‍तीच्या दोन्ही कानांपासून समान अंतरावर तुम्ही चुटकी वाजवत असलात तरी ध्वनीलहरी कोठून आल्या—वरून, खालून की मधून, हे ती व्यक्‍ती सांगू शकते. खरे तर, केवळ एकाच कानाने चांगले ऐकू शकणारी व्यक्‍ती देखील ध्वनीचे उगमस्थान अगदी उत्तमप्रकारे निश्‍चित करू शकते.

तुमचा मध्यकर्ण—एक यांत्रिक चमत्कृती

तुमच्या मध्यकर्णाचे प्रमुख कार्य म्हणजे, तुमच्या कर्णपटलावरील कंपन तुमच्या अंतर्कर्णात भरलेल्या द्रव पदार्थात पोहंचवणे हे आहे. हा द्रव पदार्थ वायूपेक्षा जास्त भारी असतो. म्हणूनच, टेकडीवर चढणाऱ्‍या एखाद्या सायकल स्वाराच्या बाबतीत खरे असते, त्याप्रमाणेच ध्वनिशक्‍ती शक्य तितक्या कार्यक्षमपणे पोहंचवण्यासाठी देखील ‘गिअर प्रमाणाची’ आवश्‍यकता असते. मध्यकर्णामध्ये, तीन छोट्या अस्थिकांमार्फत शक्‍ती पोहंचवली जाते; त्यांच्या आकारामुळे त्यांना सर्वसामान्यपणे हातोडा, ऐरण व रिकिब म्हटले जाते. हे लघू यांत्रिक अनुबंधन, ‘गिअर प्रमाण’ साध्य करते जे मध्यकर्णासाठी जवळजवळ अगदी योग्य असते. हे नसते तर, ९७ टक्के ध्वनिशक्‍ती हरपण्याची शक्यता असती!

तुमच्या मध्यकर्णातील अनुबंधनास जोडणारे दोन नाजूक स्नायू असतात. एक सेकंदाच्या शंभराव्या भागाच्या आत, कमी-आवृत्ती असलेला, परंतु उच्च प्रतीचा ध्वनी कानावर पडताच हे स्नायू आपोआप आवळतात व परिणामी अनुबंधनाच्या हालचालीत मोठी बाधा आणून कोणतीही संभवनीय इजा टाळतात. हा प्रतिक्षेप, यांत्रिक व इलेक्ट्रॉनिक यंत्रांचा ध्वनी वगळता निसर्गात आढळणाऱ्‍या जवळजवळ सर्व ध्वनीपासून तुमचे संरक्षण करण्यास पुरेसा तत्पर असतो. या शिवाय, ते लहान स्नायू ही संरक्षणात्मक स्थिती केवळ दहा मिनिटांपर्यंतच धरुन ठेवू शकतात. परंतु, यामुळे तरी कर्णकटू ध्वनीपासून पळ काढण्याची एक संधी तुम्हाला मिळते. आणि गंमत म्हणजे, तुम्ही बोलू लागता तेव्हा तुमची श्रवण संवेदनक्षमता कमी करण्याचे संकेत तुमचा मेंदू या स्नायूंना पाठवतो, ज्यामुळे तुमचाच आवाज तुमच्यासाठी वाजवीपेक्षा मोठा नसतो.

तुमचा अद्‌भुत अंतर्कर्ण

श्रवणात अंतर्भूत असणारा तुमच्या अंतर्कर्णातील एक भाग म्हणजे कर्णशंकू हा आहे; गोगलगायच्या शंखाच्या आकृतीचा असल्यामुळे त्यास हे नाव पडले आहे. त्याच्या नाजूक रचनेस सुरक्षित ठेवणारे आवरण म्हणजे तुमच्या शरीरातील सर्वात कठीण अस्थी. त्याच्या आतल्या भागात आधारकला, अर्थात कर्णशंकूच्या लांबीस नलिकांमध्ये विभाजित करणाऱ्‍या अनेकविध ऊतींपैकी एक ऊती आढळते. आधारकलेच्या बाजूने ध्वनिबोधक सर्पिलांग असते जे हजारो लोमकोशिकांना—लोमसदृश्‍य टोक असलेल्या व कर्णशंकूमध्ये भरलेल्या द्रव पदार्थाप्रत विस्तारित होणाऱ्‍या मज्जापेशींना आधार देते.

जेव्हा मध्यकर्णातील अस्थिकांच्या हालचालीमुळे, कर्णशंकूचे लंबगोलाकार गवाक्ष कंपन पावते तेव्हा त्यामुळे द्रव पदार्थात तरंग निर्माण होतात. ज्याप्रमाणे तलावातील तरंगांमुळे त्यावर तरंगणारी पाने वर-खाली होतात, त्याप्रमाणेच हे तरंग देखील कलांना हालवितात. विशिष्ट आवृत्तीला अनुरूप असलेल्या ठिकाणी हे तरंग आधारकलेस वाकवतात. मग त्याठिकाणी असलेल्या लोमकोशिका, पृष्ठभागावरील आच्छादक कलेस घासतात. या संपर्कामुळे लोमकोशिका चेतवल्या जातात आणि पुढे त्या आवेग निर्माण करून त्यांस मेंदूकडे पाठवतात. ध्वनी जितका अधिक तीव्र असतो तितकी अधिक लोमकोशिकांना चेतना मिळते व तितक्याच अधिक गतीने त्या चेतवल्याही जातात. अशाप्रकारे, मेंदूला अधिक उच्च ध्वनीचा अर्थबोध होतो.

तुमचा मेंदू व श्रवणशक्‍ती

मेंदू हा तुमच्या श्रवण संस्थेचा सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहे. त्याच्यात, चेता आवेगांच्या रूपात मिळालेल्या भरघोस माहितीचे रूपांतर ध्वनीच्या मानसिक संवेदनात करण्याची विलक्षण क्षमता आहे. हे सर्वात प्रमुख कार्य, मनोध्वनिशास्त्र या क्षेत्रात अभ्यासिलेला संबंध, अर्थात विचार आणि श्रवण यांच्यात असलेला विशेष दुवा सुस्पष्ट करतो. उदाहरणार्थ, एका गजबजलेल्या खोलीतील अनेक लोकांच्या संभाषणांपैकी एकाचे संभाषण ऐकण्यास तुमचा मेंदू तुम्हाला समर्थ करतो. मात्र मायक्रोफोनमध्ये ही क्षमता नसते. म्हणूनच, त्याच खोलीत केलेले एखादे रेकॉर्डिंग जवळजवळ समजण्यापलीकडे असेल.

अनिच्छित आरडाओरडीमुळे होणारा त्रास याच दुव्याची आणखीन एक बाजू प्रमाणसिद्ध करतो. एखाद्या ध्वनीची तीव्रता कितीही निम्न असली, पण तो ऐकण्याची तुमची इच्छा नसताना त्याचा अगदी क्षीण आवाज देखील तुमच्या कानी पडला तरी त्यामुळे खूप त्रास होतो. उदाहरणार्थ, नळाच्या गळतीमुळे निर्माण होणाऱ्‍या ध्वनीची तीव्रता अतिशय निम्न असते. परंतु, त्याच्यामुळे एखाद्या निःस्तब्ध रात्री तुमची झोपमोड होत असेल तर ते विशेषकरून चीड आणणारे ठरेल!

वास्तविकतः, आपल्या भावनांचा व आपल्या श्रवण संवेदनाचा अगदी निकटचा संबंध आहे. जोराच्या हशाचा किंवा आपुलकीच्या अथवा प्रशंसेच्या एखाद्या प्रांजळ शब्दामुळे परिणीत होणाऱ्‍या स्नेहपूर्णतेच्या संसर्गजन्य परिणामाचा जरा विचार करा. त्याचप्रमाणे, बौद्धिकरित्या आपण जे काही शिकत असतो त्यातील पुष्कळसे कानाद्वारे ग्रहण केले जाते.

जतन करण्याजोगे वरदान

आपल्या श्रवणशक्‍तीचे अनेक विस्मयकारक रहस्ये अद्याप उलगडलेले नाहीत. परंतु, प्राप्त झालेली वैज्ञानिक समज मात्र, त्यामुळे झालेल्या बुद्धिमत्तेच्या व प्रेमाच्या आविष्कारासंबंधी आपली कृतज्ञता वाढवते. श्रवणशास्त्र संशोधक एफ. ऑल्टिन एव्हरेस्ट लिहितात: “मानवी श्रवण संस्थेचा कितीही सखोल विचार केला तरी, त्याची क्लिष्ट कार्ये व घडण यांवरून त्याच्या रचनेमागे कोणा उपकारक व्यक्‍तीचा हात असावा हा निष्कर्ष काढल्याशिवाय राहावतच नाही.”

आपल्या श्रवणशक्‍तीच्या आंतरिक कार्यांविषयीचे आजचे वैज्ञानिक ज्ञान, प्राचीन इस्राएलच्या दावीद राजाजवळ नव्हते. असे असले तरी त्याने आपले शरीर व त्याच्या अनेकविध वरदानांवर मनन केले व असे गायिले: “भयप्रद व अद्‌भुत रीतीने माझी घडण झाली आहे, . . . तुझी कृत्ये अद्‌भुत आहेत.” (स्तोत्र १३९:१४) शरीराची आणि त्याबरोबरच श्रवणाची चमत्कृत्ये व रहस्ये यांतील वैज्ञानिक संशोधन यास पुष्टी देतात की—एका बुद्धिमान व प्रेमळ निर्मात्यामार्फत आपली घडण अद्‌भुतरित्या करण्यात आली आहे, असे जे दावीदाने म्हटले ते उचितच होते!

[तळटीप]

a पाहा जानेवारी २२, १९९० चे सावध राहा! (इंग्रजी), पृष्ठे १८-२१.

[२७ पानांवरील चौकट/चित्र]

श्रवणदोष असलेल्यांना साहाय्य

जोराच्या दीर्घकालिक आवाजामुळे कायमस्वरूपी श्रवणदोष निर्माण होऊ शकतो. कर्णकटू आवाजात संगीत ऐकणे अथवा कोणत्याही कर्णसंरक्षकांशिवाय, आवाज करणाऱ्‍या यंत्रांजवळ काम करणे म्हणजे अशाप्रकारच्या दोषासाठी फार मोठी किंमत मोजणे. श्रवणविकार झालेल्यांना व जन्मजात कर्णबधिर असलेल्या काहींना देखील श्रवणयंत्रांमुळे पुष्कळ मदत होऊ शकते. या उपकरणांमुळे, वैविध्यपूर्ण ध्वनी अनुभवण्याची क्षमता अनेकांना पुन्हा प्राप्त झाली आहे. एका स्त्रीने पहिल्यांदाच श्रवणयंत्र वापरले तेव्हा तिच्या स्वयंपाकघराच्या खिडकीपलीकडून तिला एक वेगळाच आवाज ऐकू आला. “तो तर पक्ष्यांचा आवाज होता!” असे तिने उद्‌गारले. “कितीतरी वर्षं मी पक्ष्यांचा आवाज ऐकला नव्हता!”

तीव्रस्वरूपाचा दोष झाला नसला तरी, वयोमानानुसार उच्च प्रतीचा ध्वनी ऐकण्याच्या क्षमतेचा बहुधा अपकर्ष होतो. पण दुःखाची बाब म्हणजे, यात व्यंजनांची, अर्थात बोल समजण्यास अत्यावशक असणाऱ्‍या ध्वनींची वारंवारता अंतर्भूत असते. यास्तव, वाहत्या पाण्यामुळे किंवा कागद चुरगळ्याने निर्माण होणाऱ्‍या घरातील सर्वसामान्य आवाजांमुळे देखील मौखिक दळणवळणात बाधा आल्याचे वयस्कर लोकांना वाटू शकते, कारण यांमध्ये, व्यंजनांत बाधा आणणाऱ्‍या उच्च आवृत्ती असतात. श्रवणयंत्रांमुळे थोडाफार फायदा होत असला तरी त्याचे काही तोटे देखील आहेत. एक म्हणजे, दर्जेदार श्रवणयंत्रे अतिशय खर्चिक—अनेक देशांतील सर्वसामान्य व्यक्‍तीच्या खिशाला न परवडणारी असू शकतात. शिवाय, काहीही केले तरी कोणतेही श्रवणयंत्र, तुमची सामान्य श्रवणशक्‍ती तुम्हाला परत देऊ शकत नाही. तर मग, काय केले जावे बरे?

विचारशील असल्यामुळे पुष्कळशी मदत होऊ शकते. कमी ऐकू येणाऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीशी बोलण्याआधी याची खात्री करा, की तुम्ही काहीतरी बोलणार आहात हे तिला माहीत आहे. व्यक्‍तीकडे पाहण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचे शरीर व ओठांची हालचाल ती पाहू शकते, शिवाय तुमच्या शब्दांतील व्यंजनांचे संपूर्ण सामर्थ्यही तिला ऐकता येईल. शक्यतो व्यक्‍तीच्या जवळ जा आणि हळू आवाजात पण सुस्पष्टपणे बोला; मात्र ओरडू नका. खरे तर, श्रवणविकार असलेल्या अनेकांना जोराच्या आवाजाचा खूप त्रास होतो. एखादे वाक्य समजले नाही तर त्याचा पुनरुच्चार करण्याऐवजी तेच वाक्य दुसऱ्‍या शब्दांत सांगा. तसेच, तुमची श्रवणशक्‍ती पूर्वी होती तशी नसल्यास बोलणाऱ्‍या व्यक्‍तीच्या समीप गेल्याने व सहनशील असल्याने इतरांना तुमच्यासोबत दळणवळण राखणे अधिक सुकर बनते. या अतिरिक्‍त प्रयासांमुळे नातेसंबंधांत सुधारणा होईल तसेच तुमच्या सभोवतालची जाणीव राखण्यास मदतही मिळेल.

[चित्र]

कमी ऐकू येणाऱ्‍या एखाद्या व्यक्‍तीशी बोलताना तिच्याकडे पाहा आणि मग हळू आवाजात पण सुस्पष्टपणे बोला

[Diagrams on page 26]

(For fully formatted text, see publication)

तुमचा कान

गोलाकार गवाक्ष

रिकिब (स्टेपीज)

लंबगोलाकार गवाक्ष

कर्ण तंत्रिका

ऐरण (इंकस)

हातोडा (मेलीयस)

पिन्‍ना

कर्ण नलिका

कर्णपटल

कर्णशंकू

ध्वनिबोधक सर्पिलांग

कर्ण तंत्रिका

लोमकोशिका

आच्छादक कला

पेशींचे तंतू

आधारकला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा