वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 १०/८ पृ. २२-२३
  • ‘जगाचे भाग नाहीत’ याचा काय अर्थ होतो?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘जगाचे भाग नाहीत’ याचा काय अर्थ होतो?
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ख्रिश्‍चन समाजविरोधी नाहीत
  • “कोणाची निंदा करू नये”
  • ‘सर्वांचे बरे करा’
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
  • नातेवाईकांचा आपल्यासारखाच विश्‍वास नसतो तेव्हा
    सावध राहा!—२००४
  • त्यांच्या विश्‍वासामुळे द्वेषित
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • आपल्या विश्‍वासाचे समर्थन करणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 १०/८ पृ. २२-२३

बायबलचा दृष्टिकोन

‘जगाचे भाग नाहीत’ याचा काय अर्थ होतो?

सा.यु. चौथ्या शतकात, हजारो तथाकथित ख्रिश्‍चनांनी इजिप्तच्या वाळवंटांत एकांतवासाचे जीवन व्यतीत करण्यासाठी आपल्या मालमत्तेची, नातेवाईकांची आणि इतकेच काय पण आपल्या जीवनक्रमाची देखील आहुती दिली. कालांतराने त्यांना, ग्रीक भाषेतील आनखोरियो अर्थात, “मी एकांतवास पत्करतो” यातून उगम पावणारे अँखराईट्‌स हे नाव पडले. आपल्या समकालीन लोकांपासून अलिप्त राहणारे, असे एक इतिहासकार त्यांचे वर्णन करतो. अँखराईट्‌स लोकांची अशी विचारधारा होती, की मानवी समाजापासून दूर राहिल्याने ‘जगाचे असू नये’ ह्‍या देवाच्या आज्ञेचे ते अनुपालन करत होते.—योहान १५:१९.

बायबल, “जगापासून निष्कलंक” राहण्याची ताकीद देते हे खरे आहे. (याकोब १:२७) शास्त्रवचने सुस्पष्टपणे बजावतात: “अहो अविश्‍वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हांस ठाऊक नाही काय? जो कोणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे.” (याकोब ४:४) पण मग यावरून, ख्रिश्‍चनांनी अँखराईट्‌स व्हावे, म्हणजे शाब्दिक अर्थाने इतरांपासून दूर राहावे असा अर्थ ध्वनित होतो का? त्यांचे धार्मिक विश्‍वास न अनुसरणाऱ्‍या लोकांपासून त्यांनी अलिप्त राहावे का?

ख्रिश्‍चन समाजविरोधी नाहीत

अनेकविध बायबल अहवालांत, जगाचा भाग नसण्याच्या विचाराचा ऊहापोह करण्यात आला आहे; हे अहवाल, देवापासून दुरावलेल्या मानवी समाजाच्या समूहापासून ख्रिश्‍चनांनी स्वतःस विलग करण्याची गरज ठळकपणे मांडतात. (पडताळा २ करिंथकर ६:१४-१७; इफिसकर ४:१८; २ पेत्र २:२०.) म्हणून, खरे ख्रिश्‍चन देवाच्या नीतिमान मार्गांच्या विरोधात असलेल्या प्रवृत्त्या, बोली व आचरण सुज्ञपणे टाळतात; यांत, धनसंपत्ती, मानप्रतिष्ठा मिळविण्याचा जगाचा लोभी प्रयत्न व सुखविलासाचा बेसुमार उपभोग या गोष्टी अंतर्भूत आहेत. (१ योहान २:१५-१७) युद्ध व राजनीतीच्या बाबतींत देखील ते जगापासून विलग असतात.

येशू ख्रिस्ताने म्हटले की त्याचे शिष्य, ‘जगाचे नसतील.’ पण त्याचवेळी त्याने देवाला अशीही प्रार्थना केली: “तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करितो.” (योहान १७:१५) आपल्या शिष्यांनी, गैर-ख्रिश्‍चनांसोबतचा सर्व संबंध तोडून समाजविरोधी व्हावे अशी येशूची इच्छा नव्हती, हे स्पष्टच आहे. खरे तर एकांतवास हा, प्रचार करण्याची व ‘चार लोकांत व घरोघरी शिकविण्याची’ आपली कार्यनियुक्‍ती पूर्ण करण्यापासून एखाद्या ख्रिश्‍चनास वंचित करील.—प्रेषितांची कृत्ये २०:२०; मत्तय ५:१६; १ करिंथकर ५:९, १०.

जगापासून निष्कलंक राहण्याचा सल्ला, स्वतःला इतरांपेक्षा वरचढ समजण्यास ख्रिश्‍चनांना आधार देत नाही. यहोवाची भिस्त बाळगणारे लोक ‘गर्वाचा’ तिरस्कार करतात. (नीतिसूत्रे ८:१३) गलतीकर ६:३ असे म्हणते: “आपण कोणी नसता कोणी तरी आहो अशी कल्पना करणारा स्वतःला फसवितो.” ज्यांना असे वाटते, की आपण इतरांपेक्षा वरचढ आहोत ते खरे तर स्वतःचीच फसवणूक करत असतात कारण “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.”—रोमकर ३:२३.

“कोणाची निंदा करू नये”

येशूच्या काळातील काही लोक, त्यांच्या खास धार्मिक गटातील नसणाऱ्‍या इतर सर्व लोकांना पाण्यात पाहत असत. यांमध्ये परूशी देखील होते. ते मोशेच्या नियमशास्त्रात तसेच यहुदी सांप्रदायाच्या बारीकसारीक तपशिलांत देखील पारंगत होते. (मत्तय १५:१; २; २३:२) नानाविध धार्मिक कर्मकांडांचे काटेकोर अनुपालन करण्यात त्यांना एक प्रकारचे भूषणच वाटत असे. केवळ आपल्या बौद्धिक साध्यतेमुळे व धार्मिक प्रतिष्ठेमुळे, आपण इतरांपेक्षा वरचढ आहोत असे परूश्‍यांच्या वागण्यातून दिसत होते. “हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे,” असे म्हणून त्यांनी आपली धर्मवेढी व तिरस्करणीय प्रवृत्ती प्रकट केली.—योहान ७:४९.

परूश्‍यांनी तर गैर-परूशी लोकांसाठी एक अपमानकारक संज्ञा देखील तयार केली होती. सुरवातीला ॲमहारेट्‌स ही इब्री संज्ञा, एका विधायक अर्थाने समाजाच्या सामान्य सदस्यांना संबोधण्यासाठी वापरली जात असे. पण कालांतराने, यहुदाच्या त्या उद्धट धार्मिक पुढाऱ्‍यांनी ॲमहारेट्‌स या संज्ञेस निर्भर्त्सनेचा अर्थ लावला. इतर गटांनी व त्याबरोबरच तथाकथित ख्रिश्‍चनांनी देखील, त्यांच्यापेक्षा भिन्‍न धार्मिक विश्‍वास बाळगणाऱ्‍या लोकांना संबोधण्यासाठी अनेक संज्ञांचा अतिशय अपमानकारकरित्या प्रयोग केला आहे.

तथापि, ज्यांनी अद्याप ख्रिश्‍चन धर्म अंगीकारला नव्हता, अशा लोकांविषयी पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांचा काय दृष्टिकोन होता बरे? येशूच्या शिष्यांना अशी ताकीद देण्यात आली होती, की त्यांनी सत्य न मानणाऱ्‍या लोकांसोबत “सौम्यतेने” तसेच “भीडस्तपणाने” वागावे. (२ तीमथ्य २:२५; १ पेत्र ३:१५) या संदर्भात प्रेषित पौलाने एक उत्तम आदर्श मांडला आहे. तो उद्धट नसून, उलटपक्षी अशा मनोवृत्तीचा होता, की लोक बिनदिक्कतपणे त्याच्याकडे जाऊ शकत होते. स्वतःस इतरांपेक्षा वरचढ समजण्याऐवजी तो विनम्र व उभारणीकारक होता. (१ करिंथकर ९:२२, २३) तीतास लिहिलेल्या आपल्या प्रेरित पत्रात, पौल अशी ताकीद देतो: “कोणाची निंदा करू नये, भांडखोरपणा न करता सौम्य, व सर्व माणसांबरोबर सर्व प्रकारे नम्रतेने वागणारे असावे.”—तीत ३:२.

काही वेळा बायबलमध्ये, “विश्‍वास न ठेवणारा” [सत्य न मानणारा] ही संज्ञा गैर-ख्रिश्‍चनांना संबोधण्यासाठी वापरली आहे. तथापि, “विश्‍वास न ठेवणारा” या अभिव्यक्‍तीचा, एखादा अधिकारयुक्‍त किताब किंवा लेबल या अर्थाने वापरल्याचा कोणताही पुरावा नाही. गैर-ख्रिश्‍चनांचा अपमान करण्यासाठी अथवा त्यांची मानहानी करण्यासाठी त्याचा प्रयोग केला गेला नव्हता हे स्पष्टच आहे. (नीतिसूत्रे २४:९) सत्य न मानणाऱ्‍या लोकांसोबत, यहोवाचे साक्षीदार कठोरपणे अथवा उद्धटपणे वागत नाहीत. गैर-साक्षीदार नातेवाईकांना अथवा शेजाऱ्‍यांना नावे ठेवण्यासाठी अपमानकारक संज्ञांचा प्रयोग करणे उद्दाम असल्याचे ते समजतात. ते बायबल सल्ल्याचे पालन करतात जे म्हणते: ‘प्रभूच्या दासाने सर्वांबरोबर सौम्य असावे.’—२ तीमथ्य २:२४.

‘सर्वांचे बरे करा’

जगासोबत व विशेषतः ईश्‍वरी दर्जांप्रती घोर अनादर दाखवणाऱ्‍यांसोबत जवळीक राखण्याचे धोके ओळखणे महत्त्वाचे आहे. (पडताळा १ करिंथकर १५:३३.) तरीसुद्धा ‘सर्वांचे बरे करा’ असा सल्ला बायबल देते तेव्हा “सर्वांचे” या शब्दात ख्रिस्ती विश्‍वास न अनुसरणाऱ्‍या लोकांचाही समावेश होतो. (गलतीकर ६:१०) पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी काही परिस्थितींत, सत्य न मानणाऱ्‍यांसोबत भोजन केल्याचे पुराव्यावरून दिसून येते. (१ करिंथकर १०:२७) यास्तव आज ख्रिश्‍चन, सत्य न मानणाऱ्‍यांना सहमानव समजून त्यांच्याशी वागताना संतुलन राखतात.—मत्तय २२:३९.

एखादी व्यक्‍ती केवळ बायबल सत्यांशी परिचित नसल्यामुळे ती असभ्य किंवा अनैतिक आहे असा ग्रह बाळगणे चुकीचे ठरेल. परिस्थिती व लोक यांच्यात भिन्‍नता असू शकते. यास्तव, सत्य न मानणाऱ्‍यांसोबत आपण कितपत संपर्क ठेवावा हे प्रत्येक ख्रिश्‍चनाने स्वतःच ठरवले पाहिजे. तथापि, अँखराईट्‌सनी केले त्यासारखे शारीरिकरित्या अलग होणे किंवा परूश्‍यांनी समजले तसे इतरांपेक्षा स्वतःस वरचढ समजणे ख्रिश्‍चनांसाठी अनावश्‍यक व अशास्त्रवचनीय देखील ठरेल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा