आमच्या वाचकांचे मनोगत
समतोलपणा “देवाकडून मिळालेले समतोलपणाचे वरदान” (सावध राहा! एप्रिल-जून १९९६) हा लेख वाचल्यानंतर मला तुमचे आभार मानावेसे वाटले. सध्या मी श्रवणशास्त्राचा अभ्यास करत आहे आणि सावध राहा! लेखात, जशी समग्र व सहज समजण्याजोगी माहिती दिली आहे तशी माहिती माझ्या एकाही पाठ्यपुस्तकात नाही. कानाची आकृतीही उत्कृष्ट होती.
जे. पी. ए., ब्राझील
लैंगिक छळणूक “लैंगिक छळणूक नसेल तेव्हा!” (जून ८, १९९६, इंग्रजी) या श्रुंखलेकरता आभारी आहे. हे नियतकालिक इतरांना देताना, छळणूक कशी टाळावी आणि छळ होत असता काय करावे यावरील सूचनांकरता अनेक स्त्रिया कृतज्ञ असल्याचं माझ्या निदर्शनास आलं. काही आठवड्यांनंतर नोकरीच्या ठिकाणी माझी स्वतःची छेडछाड करण्यात आली आणि ही बाब मी पोलिसांच्या कानांवर घातली. मी ज्याप्रकारे परिस्थिती हाताळली त्याबद्दल माझी प्रशंसा करण्यात आली.
नाव गुपित, जर्मनी
या लेखांकरता मी खरोखर कृतज्ञ आहे. मी सध्या अकरावीत शिकत आहे आणि मी देखील अशा प्रकारची छळणूक अनुभवलीय पण मी कोणाजवळही हे बोलले नाही. या लेखांनी मला माझ्या आईबाबांजवळ व शिक्षकांजवळ मन मोकळं करण्यास उत्तेजित केलं. आता छळ करणाऱ्यांना मी तोंड देऊ शकते.
के. वाय., जपान
मी एक २१ वर्षीय सेक्रेटरी असून अलीकडंच माझ्या मालकानं लैंगिकरित्या माझा छळ केला होता. मला कसं वाटत होतं हे त्याला सांगण्यासाठी मी त्याच्याकडे जाण्याचा मार्ग शोधत असतानाच सावध राहा! याचा हा अंक माझ्या हातात पडला. मी माझ्या मालकाला त्याची एक प्रत दिली व त्यानं ती वाचली. माझ्यासोबत त्यानं जे काही केलं होतं त्याबद्दल त्यानं क्षमा मागितली व पुन्हा कदापि तसं न वागण्याचं वचनही दिलं.
डी. एन. आय., नायजेरिया
तुम्ही ही महत्त्वपूर्ण माहिती प्रकाशात आणल्याबद्दल मी कृतज्ञ आहे, परंतु तुम्ही दिलेल्या चित्रांवरून केवळ पुरुषच छळणूक करत असल्याचं दिसून येतं. स्पष्टतः, तुम्ही एक पक्षपाती दृष्टिकोन सादर करत आहात.
एच. टी., संयुक्त संस्थाने
पुष्कळसे संशोधक म्हणतात, की लैंगिक छळणुकीला बळी पडणाऱ्या स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असते. असे असले तरी, या लेखांनी कबूल केले, की पुरुषांचा देखील छळ होऊ शकतो व त्याकरता विशिष्ट उदाहरणेही नमूद केली होती.—संपादक
या विषयावरील बहुतेक लेख, स्त्रियांनी आपलं संरक्षण करण्याकरता काय करावं केवळ यावरच भर देतात परंतु, पुरुषांना मात्र स्त्रियांचा आदर करायला शिकवत नाहीत. जर छळ करणारेच नसले तर छळणूकही नसेल. तुमच्या लेखानं “पुरुषांकरता योग्य आचरण” यावर चर्चा केलीय. म्हणून, ते खूपच प्रशंसनीय आहे.
ओ. ची., तायवान
मैत्री “तरुण लोक विचारतात . . . मी मित्र का बनवू शकत नाही?” (मे २२, १९९६, इंग्रजी) या लेखासाठी मी तुमची मनःपूर्वक आभारी आहे. या लेखानं माझी किती मदत केली याची तुम्ही कल्पना करू शकत नाही. यानं मला दाखवून दिलं, की अडथळे असतानाही चिरस्थायी मैत्री प्रस्थापित करणे शक्य आहे. काही वेळा, गैरसमजुती मिटवण्यात आपण दिरंगाई करतो त्यामुळे आपण मित्र गमावून बसतो. या बाबतीत माझ्या दोषांशी लढा देण्यास या लेखानं मला मदत केली.
ए. एम. पी., ब्राझील
हा लेख अगदी योग्य वेळी आला. तीन महिन्यांपूर्वी एका मुलीसोबतची माझी जिवलग मैत्री कमी होऊ लागली होती; शेवटी आम्ही एकमेकींशी बोलण्याचंही सोडून दिलं. हा लेख प्रकाशित झाला तेव्हा आम्ही दोघींनी मिळून तो वाचला आणि आपण किती मूर्खपणे वागत होतो याची आम्हाला जाणीव झाली. आम्ही बसून याविषयी बोललो व सर्व गैरसमजुती दूर केल्या. आता पुन्हा एकदा आमची मैत्री दाट झाली आहे.
एन. टी., इटली