वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ३/८ पृ. १७-१९
  • घरच्या घरी मोड आणा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • घरच्या घरी मोड आणा
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • तयारी करणे
  • घरच्या घरी मोड आणणे
  • मोड आलेल्या कडधान्यांचा स्वाद कसा घ्यावा
  • बी वाढण्यासाठी पाणी घालण्याची गरज आहे
    आमची राज्य सेवा—२०११
  • राज्याच्या सत्याचे बी पेरणे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
सावध राहा!—१९९७
g97 ३/८ पृ. १७-१९

घरच्या घरी मोड आणा

हवाईतील सावधराहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

तुम्ही कधी तुमच्या स्थानिक बाजारात ताज्या, हिरव्यागार व पोषक भाज्या शोधण्याचा व्यर्थ प्रयत्न केला आहे का? केला असल्यास आता मात्र तसे करण्याची गरज नाही! कमीतकमी वेळ आणि श्रम खर्च करून तुम्ही चक्क तुमच्या घरात अथवा अपार्टमेंटमध्येच भाज्या लावू शकता. ते कसे बरे? कडधान्यांना मोड आणण्याद्वारे!

मोड आणणे इतके सोपे आहे, की मुलेसुद्धा ते काम करू शकतात. त्यासाठी कमी जागा लागते तसेच खोदणे, पेरणी करणे या गोष्टी तर नाहीच पण यात रसायने फवारण्याचीही गरज नसते. सर्वात मुख्य म्हणजे केवळ चारपाच दिवसांनीच तुम्ही या उत्पन्‍नाचा स्वाद घेऊ शकता. परंतु सोईस्करपणा, केवळ हाच एक त्याचा फायदा नव्हे त्याचे आणखीही काही फायदे आहेत.

एक म्हणजे मोड आलेली कडधान्ये पोषक असतात—कदाचित साधे बीन्स अथवा कडधान्यांपेक्षाही अधिक पोषक असतात. गे कोरटर यांचे बीन्सस्प्राऊट बुक (इंग्रजी) म्हणते: “जसजसे कडधान्यांना मोड येऊ लागतात तसतसे त्यांच्यातील जीवनसत्त्व देखील वाढते. पेन्सिल्व्हानियाच्या विद्यापीठात केलेल्या एका अभ्यासात, सोया बीनच्या सगळ्यात पहिल्या (प्रत्येक १०० ग्रॅम [सुमारे ४ औंस] बियांमध्ये) मोडांमध्ये १०८ मिलिग्रॅम क-जीवनसत्त्व होते. परंतु, ७२ तासांनंतर क-जीवनसत्त्व ७०६ मिलिग्रॅम इतके वाढले होते!”

मोड आलेली कडधान्ये किफायतशीरही असतात. खरे तर, याकरता लागणारे सगळे साधन आधीच तुमच्याजवळ उपलब्ध असेल.

तयारी करणे

प्रथम तुम्हाला धातूयुक्‍त नसलेले एक पात्र लागेल. एक मोठा काचेचा अथवा प्लॅस्टिकचा जार, काचेचा अथवा चिनीमातीचा बोल किंवा एक खोलगट डिशही चालेल. शुष्कपणा टाळण्याकरता ओले सुती कापड अथवा टिश्श्यू पेपर यांच्या दोन थरांमधोमध कडधान्यांचा एक थर पसरवण्यासाठी एखाद्या उथळ डिशचा वापर करणेही शक्य आहे. कडधान्यांना मोड आल्यानंतरही पात्र गच्च भरणार नाही तर त्यांच्याभोवती खेळती हवा असेल असे एखादे मोठे पात्र वापरा. मला असे दिसून आले, की अल्फाल्फा यासारख्या अतिशय लहान बियांकरता एखादा काचेचा जारच बरा पडतो. मूगासारख्या मोठ्या कडधान्यांकरता एखादी खोलगट डिश अथवा पात्र वापरणे बरे आहे. यामुळे त्यांना आवश्‍यक असणारी अधिक जागा मिळते शिवाय, मोड कुजत नाहीत अथवा आंबटत देखील नाहीत.

तुम्हाला एक झाकणही हवे आहे. एक प्लॅस्टिकची जाळी, सुती कापड किंवा नायलॉनच्या एका जुन्या पायमोज्यानेही काम चालेल. मग पात्राचे तोंड बंद करायला केवळ एखादा घट्ट रबरबँड अथवा दोरी हवी आहे. अर्थातच, जर कडधान्यांना दिवसातून दोन वेळा धुवायचे आहे तर तुम्हाला पाणी तसेच पाणी गाळण्याकरता कदाचित एक चाळणही लागेल.

शेवटी तुम्हाला कडधान्यांची गरज असेल. कोणत्याही कडधान्यांना मोड आणता येते. (तथापि, रसायने फवारलेली कडधान्ये मी सहसा टाळत असते.) पहिल्यांदाच हे करून पाहणाऱ्‍याने मूगाचा अथवा अल्फाल्फा बियांचा उपयोग करावा. मोड आणण्यासाठी त्या सर्वात चांगल्या आहेत आणि खायला तर अतिशय चटकदारही लागतात! आता हे कसे करण्यात येते ते मी तुम्हाला सांगते.

घरच्या घरी मोड आणणे

पहिला दिवस: प्रथम, कडधान्ये चांगली धुऊन स्वच्छ करा. मग, कडधान्य अथवा बीन्स पात्रात घालून ती संपूर्ण बुडेपर्यंत त्यांवर सुमारे ५ सेन्टिमीटर पाणी ओता. कमीतकमी आठ ते दहा तास तरी कडधान्य पाण्यात भिजत ठेवा. तुम्ही रात्री झोपण्याआधी कडधान्य भिजत घालू शकता. आठ ते दहा तासांनंतर, कडधान्य फुगतील व त्यांवरील साल किंचित निघेल. मोड आणण्याकरता ते आता तयार असतात.

दुसरा दिवस: सकाळी, झाकण न काढता पात्रातले सगळे पाणी गाळा. (या पाण्यात जीवनसत्त्वे असल्यामुळे मी ते पाणी माझ्या झाडांना घालते.) आता पुन्हा पात्रात पाणी घाला. ते जरा हालवा आणि मग उलटे करून जास्त झालेले पाणी ओतून टाका. पुन्हा पात्रात पाणी घाला व एकूण तीन वेळा कडधान्य स्वच्छ धूवा व गाळा. तुम्ही भिजवलेले कडधान्य एका उथळ ताटात घातले असल्यास, अलगदपणे सुती कापडावर पाणी ओता आणि डिश थोडीशी तिरपी करून पाणी गाळा. नंतर, पुन्हा एकदा धुवा म्हणजे दिवसातून दोन वेळा कडधान्य चांगले धुऊन निघतील.

तिसरा दिवस: आतापर्यंत कडधान्याला मोड आल्याचे तुम्हाला दिसून येईल. दिवसातून दोनदा त्यांना धुऊन काढा.

चौथा दिवस: आता तुम्ही हे मोड खाऊ शकता! मुगाचे मोड चांगले वाढू दिले तरी चालतील कारण ते कडवट लागत नाहीत. दिवसांतून दोन वेळा तुम्ही मोड धूत असल्याची मात्र खात्री करा. मोड आलेल्या या कडधान्यांना तुम्ही एका तासाभरासाठी ऊन देऊन नंतर ती फ्रिजमध्येही ठेवू शकता. यांची लहान पाने इतका मोहक रंग धारण करतील की ती पाने चटकन तोडून खावीशी वाटतात.

यात यशस्वी झाल्यानंतर, तुम्हाला कदाचित दुसऱ्‍या प्रकारची कडधान्ये आणि बिया यांचा उपयोग करून हा प्रयोग करावासा वाटेल. प्रत्येकाची चव व मोड येण्याची वेळ थोडीफार वेगवेगळी असते. उदाहरणार्थ, सूर्यफुलाच्या साल काढलेल्या बियांनिशी तुम्ही हा प्रयोग कदाचित करू शकता. दोन दिवसांनी मोड अर्धे इंच लांब असतात तेव्हा ते खाण्यासाठी तयार असतात. जर ते यापेक्षाही अधिक लांब वाढले तर त्यांना एक कडवट चव येते.

मोड आलेल्या कडधान्यांचा स्वाद कसा घ्यावा

मोड आलेली अधिकतर कडधान्ये कोशिंबीर, सँडविचेस अथवा बीन्स आणि कडधान्यांचा ज्यात वापर होतो अशा दुसऱ्‍या कोणताही खाद्यपदार्थांत घालून ती कच्चीच खाता येतात. तथापी बीन्सचे मोड खाण्याआधी ते १० ते १५ मिनीटे वाफवले जाऊ शकतात. किंवा लसूण आणि मीठाची किंचित फोडणी देऊ शकता. मग तयार होतो एक लज्जतदार खाद्यपदार्थ! मोड आलेले गहू आणि राय चवीला अतिशय गोड असून ब्रेड व मफ्फिन्स याच्यातही ते घालू शकता.

मोड आणणे हा एक स्वास्थ्यकारी तसाच किफायतशीर छंद आहे. ते काम करणे खरोखर मौजेचे व फलदायी असल्याची प्रचीती तुम्हाला येईल. शेवटी, तुम्ही यात नक्की यशस्वी व्हाल शिवाय त्याचे परिणामही स्वादिष्टच असतील!

[१७ पानांवरील चित्राचे श्रेय]

Japanese Stencil Designs

[१८ पानांवरील चित्र]

पहिला दिवस: कडधान्य घ्या व आठ ते दहा तास पाण्यात भिजवा

[१९ पानांवरील चित्र]

दुसरा व तिसरा दिवस: दिवसातून दोन वेळा कडधान्य चांगले स्वच्छ धुवा

[१९ पानांवरील चित्र]

चौथा दिवस: (येथून दिसणारे सुती कापडावर ठेवलेले) मोड स्वाद घेण्यासाठी तयार आहेत!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा