वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 २/८ पृ. १३-१७
  • फ्लोरिडातील एव्हरग्लेड्‌स अरण्याचा आक्रोश

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • फ्लोरिडातील एव्हरग्लेड्‌स अरण्याचा आक्रोश
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मदतीसाठी काकुळतीची हाक
सावध राहा!—१९९७
g97 २/८ पृ. १३-१७

फ्लोरिडातील एव्हरग्लेड्‌स अरण्याचा आक्रोश

याअद्‌भुतरम्य उष्णकटिबंधीय परिसरातील महान निर्माणकर्त्याची आश्‍चर्यकृत्ये पाहायला दर वर्षी सुमारे दहा लाख पर्यटक या ठिकाणाला भेट देतात. इथं कित्येक किलोमीटर खोल असलेल्या दऱ्‍या नाहीत की थक्क करून सोडणारे गगनचुंबी डोंगर नाहीत, पटापटा फोटो काढण्यासारखे अवाढव्य धबधबे नाहीत, कुठे मूस दिसत नाहीत की सुरक्षित अंतरावरूनच पाहण्यासारखी ग्रिज्ली बेयर वावरत असलेली दृष्टीस पडत नाहीत. उलट, एव्हरग्लेड्‌स राष्ट्रीय उद्यान हे जगातलं सर्वप्रथम राष्ट्रीय उद्यान आहे जे केवळ नयनरम्य नजाऱ्‍यासाठी नव्हे तर तेथील वनस्पती आणि प्राण्यांची विपुलता असल्यामुळं प्रस्थापित करण्यात आलं आहे.

निम्मा गवताळ तर निम्मा उष्णकटिबंधीय पाणथळ प्रदेश असून त्यास “गवताळ नदी” असं संबोधलं जातं. शतकानुशतकांपासून चालत आलं आहे त्यानुसार इथलं जीवन असंच चालत राहतं. तीन-मीटर लांबीच्या सुसरी ऊन खात बसलेल्या असतात आणि पुढच्या शिकारीवर त्यांचा डोळा असतो. रात्रीच्या वेळी त्यांचं प्रियाराधन चालत असतं तेव्हा या पाणथळ प्रदेशात सर्वत्र त्यांचाच आवाज घुमत असतो आणि जमीन कशी हादरून जाते. एखाद्या वॉशटबच्या आकाराची कासवे अन्‍नाच्या शोधात गवतातून हळूहळू पुढे सरकत असतात. दुडक्या चालीचे, खेळकर रिव्हर ऑटर्स सुद्धा याच परिसरात राहतात. भुसभुशीत मातीत, शिकारीवर निघालेल्या फ्लोरिडा पँथरच्या पायांचे स्पष्ट ठसे उमटलेले दिसतात. व्हाईट-टेल्ड हरिणांना नेहमीच जागृत राहावं लागतं कारण शिकारीवर निघालेले हे पँथर कोणत्याही क्षणी त्यांचा फडशा पाडू शकतात. सहसा, जवळपासच्या वाहत्या पाण्यात आपलं अन्‍न धूत असताना दाखवलेले रकून्स, एव्हरग्लेड्‌समध्ये अगदी निश्‍चिंत असतात; आणि त्यांना अन्‍न शोधायला दूर जावंही लागत नाही.

त्याचप्रमाणे, एव्हरग्लेड्‌समध्ये पर्यटकांच्या नजरेस अदृश्‍य असणाऱ्‍या जीवनाची रेलचेल देखील आहे. विविध प्रकारचे बेडूक, पानांच्या, लिलि पॅड्‌सच्या किंवा मानव-निर्मित कालव्यांमधील सुंदर वॉटर हेसिंथ्सच्या रंगांशी समरूप झालेले असतात. जलवनस्पतींमधून, ॲपल-स्नेल्झ, गोगलगाईसारखेच हळूहळू जात असतात—ते गॉल्फ-बॉलच्या आकाराचे मॉलस्क असतात ज्यांना कल्ले आणि साध्या प्रकारचे फुफ्फुस असल्यामुळे त्यांना पाण्याखाली असताना तसेच पाण्याच्या बाहेरही श्‍वास घेता येतो. तिथल्या उथळ पाण्यात क्रेफिश, खेकडे आणि इतर अनेक प्रकारच्या माशांची रेलचेल आहे. तिथं साप, कीटक आणि इतर सरपटणारे प्राणीही पुष्कळ आहेत—ते सर्व एकतर शिकार करतात किंवा स्वतः शिकार ठरतात.

सुंदर रोझिएट स्पूनबिल्स, व्हाईट आयबिस आणि स्नोई ईग्रेट्‌स हे पक्षी आकाशात विहार करताना दिसतात तर त्यांचे सोबती विहार करण्याचे सोडून घरट्यातील अंडी उबवण्याचं काम करतात ज्यातून लवकरच पिल्ले बाहेर पडणार असतात. वर उडणाऱ्‍या ग्रेट ब्लू हेरॉन्सच्या थव्यांचे मनोरम दृश्‍य कधीच विसरता येत नाही; ते पक्षी वेगाने उडत असल्यामुळे ते मोजताही येत नाहीत. सी गल्स, पेलिकन्स आणि पर्पल गलीन्यूल्स, अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी, म्हणजेच प्रचंड मोठ्या बॉल्ड इगलसोबत विहार करत असतात.

इथं, लांब मानेचे, कॉरमोरंट आणि अनहिंगा किंवा स्नेक पक्षी देखील पाहायला मिळतात; स्नेक पक्षी पाण्याबाहेर आपली इंग्रजी एस अक्षराच्या आकाराची मान काढतो तेव्हा तो पक्ष्यासारखा दिसण्याऐवजी सापासारखाच दिसतो म्हणून त्याचं तसं नाव आहे. हे दोन्ही प्रकारचे पक्षी अधाशी असल्यामुळे, एव्हरग्लेड्‌सच्या उथळ पाण्यांमध्ये अन्‍नासाठी त्यांची झटापट होत असलेली दिसून येते. ओले झाल्यावर, आपले पंख आणि शेपटी पसरून हे दोन्ही जणू फोटो काढण्यासाठी पोझ करत असल्यासारखा शोभिवंत नजारा पेश करतात. खरं तर, त्यांची पिसे पूर्णपणे वाळल्यावरच ते उडू शकतात.

त्याचप्रमाणे, क्रेनसारखा लिंप्किन पक्षी आपल्याकडेही लोकांनी लक्ष द्यावे म्हणून कर्कश आवाज काढून पर्यटकांना चकित करतो. या मोठाल्या, तांबूस-पांढऱ्‍या ठिपक्याठिपक्यांच्या पक्ष्याला क्रायइंग पक्षी सुद्धा म्हणतात कारण अति-व्याकूळ झालेल्या माणसाप्रमाणे आक्रोश करत असल्यासारखा त्याचा आवाज असतो. ॲपल स्नेलशिवाय जगू न शकणारा एव्हरग्लेड्‌स काईट हा दुर्मिळ आणि संकटग्रस्त असलेला कावळ्याच्या आकाराचा भक्षक पक्षी, पक्षी-निरीक्षकांच्या मनावर कायमची छाप पाडून जातो. हिरवीगर्द पाने आणि स्पॅनिश मॉसचे जणू तोरण असलेल्या भव्य ओक वृक्षांवर घरटी करून पक्ष्यांचे थवेच्या थवे राहत असलेले पाहून पर्यटक अचंबित होतात. हिरवा रंग आणि वृक्षांवर पसरलेल्या नाजूक वेलींवरची लाल फुलं या पक्ष्यांच्या रंगांशी एकरूप झालेली असतात. इथं पर्यटकांना आपण कोणत्या देशात आणि कोणत्या खंडात आहोत त्याचं काहीच भान नसतं. ही एक आगळीच दुनिया आहे, प्रत्यक्षात स्वर्ग, अगदी नैसर्गिक आणि नयनरम्य.

शेवटी, एव्हरग्लेड्‌सचे हमखास वैशिष्ट्य—उथळ पाणी आणि त्यातील सोनेरी रंगाचे सॉ ग्रास पाहायला मिळते. दूरदूरपर्यंत, एखाद्या टेबलाच्या पृष्ठभागासारखी सपाट चकाकणारी आणि चमकणारी शांत गवताळ नदी दृष्टीस पडते जिला दक्षिण बाजूला प्रत्येक किलोमीटरमागे चारपेक्षा कमी सेंटीमीटरचा उतार लागलेला असतो. कळेल न कळेल इतक्या संथपणे हे पाणी समुद्राकडे वाहत असते. एव्हरग्लेड्‌ससाठी ते जीवनावश्‍यक रक्‍तच आहे; त्याशिवाय, एव्हरग्लेड्‌स जिवंत राहिलं नसतं.

या शतकाच्या प्रारंभी, एव्हरग्लेड्‌सला मानवांचा असा भयंकर, भीषण धक्का बसण्याआधी हा गवताळ समुद्र पूर्व ते पश्‍चिमेपर्यंत ८० किलोमीटर आणि किसिम्मी नदी ते फ्लोरिडा उपसागरापर्यंत ५०० किलोमीटर इतका पसरलेला होता. सर्वसाधारण उंचीचा एखादा माणूस यातून सहज चालत जाऊ शकतो शिवाय पाणी त्याच्या खांद्यांपर्यंत पोहंचणारही नाही. या उथळ पाण्यावरून एअरबोटी, उंच सोनेरी सॉ ग्रासमधून पोटात गोळे येतील इतक्या वेगाने जातात आणि हवेत झोकांड्या घेणाऱ्‍या पर्यटकांना विलक्षण रोमहर्षक अनुभव मिळतो. अनेक पिढ्यांपासून लोक तिथं बास आणि इतर गोड्या पाण्यातील तसेच खाऱ्‍या पाण्यातील मासे पकडण्यासाठी येतात.

मदतीसाठी काकुळतीची हाक

या शतकाच्या सुरवातीला, फ्लोरिडातील राजकर्त्यांनी आणि व्यापाऱ्‍यांनी एव्हरग्लेड्‌सला अनावश्‍यक जीवित प्राण्यांनी भरलेली दलदल समजून इमारती वगैरे वाढवण्यासाठी, शहर विस्तारण्यासाठी आणि कृषी विकास करण्यासाठी त्यास साफ करावं असं ठरवलं. “धरण बांधा, पाणी निचरा, पाण्याचा प्रवाह बदला,” असा नारा ते लावू लागले. सन १९०५ मध्ये, फ्लोरिडाचे गवर्नर म्हणून निवड होण्याआधी, एन. बी. ब्रॉवर्ड यांनी ती “घाणेरडी दलदल” संपूर्णतः निचरून टाकण्याची शपथ घेतली.

ती फक्‍त बोगस आश्‍वासने नव्हती. गाळ काढणारी आणि मोठमोठाली ड्रेजिंग यंत्रे आणण्यात आली. यु.एस. आर्मी कोर्स ऑफ इंजिनियर्स यांच्या निदर्शनाखाली आणि देखरेखीखाली, ९ मीटर खोल असलेली ९० किलोमीटरचे कालवे खोदून एक दशलक्ष चौरस मीटरपेक्षा अधिक पाणथळ जमीन नष्ट करण्यात आली. मोठमोठाले बांध, बंधारे आणि पंपिंग स्टेशन तिथं उभारण्यात आले आणि एव्हरग्लेड्‌समधून आणखी कालवे व रस्ते निघाले. जीवजंतुंनी संपन्‍न असलेल्या ह्‍या प्रदेशावरून मौल्यवान, जीवनदायी पाण्याचा प्रवाह बदलून नव्याने रूपांतर केलेल्या मोठमोठाल्या शेतींना पाणी पुरवठा होऊ लागला. किनारपट्टीवरील शहरे देखील पश्‍चिमेकडे विस्तारू लागली आणि त्यामुळे भल्यामोठ्या निवास वस्त्या, महामार्ग, बाजारपेठा आणि गॉल्फ कोर्सेससाठी एव्हरग्लेड्‌सची आणखीनच जागा बळकावण्यात आली.

सन १९४७ मध्ये एव्हरग्लेड्‌सचा काही भाग, राष्ट्रीय उद्यान असल्याचे जाहीर झाले होते, तरी गाळ काढणे आणि पाण्याचा रोख बदलण्याची कामे अनर्थकारी वेगाने चालूच होती. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, एव्हरग्लेड्‌सचे पाणी निचरणे—आणि त्यासाठी करोडो डॉलर खर्च करणे—ही एक घोडचूक होती. पाण्याचा प्रवाह असा बदलल्याने एव्हरग्लेड्‌स येथील जीवनावर इतका विनाशकारी परिणाम घडेल हे अत्यंत कमी लोकांना जाणवले. ते नुकसान स्पष्ट दिसून यायला कित्येक दशके लागली.

तथापि, १९८० च्या दशकाच्या मध्यापासून, एव्हरग्लेड्‌स नष्ट होत असल्याचा इशारा पर्यावरण तज्ज्ञ आणि जीवशास्त्रवेत्ते देऊ लागले. जणू तिथला प्रत्येक जिवंत प्राणी तक्रार करीत होता, मदतीसाठी हाक मारीत होता. अनावृष्टीच्या वेळी, सुसरी जेथे राहायच्या त्या सरोवरांचं पाणी आटू लागलं. पाऊस पडल्यावर पूर यायचा तेव्हा त्यांची घरटी आणि अंडी वाहून जायची. आता मात्र त्यांची संख्या अतिशय रोडावत आहे. अहवालांनुसार, त्या सुसरी आपल्याच पिलांना खात आहेत. एके काळी त्या परिसरात दहा लाखांपेक्षा अधिक संख्येने असलेले लांब पायांचे नयनरम्य पक्षी आता फक्‍त हजारांच्या संख्येत आहेत—९० टक्क्यांनी ही संख्या रोडावली आहे. आपल्या घरट्यांकडे परतताना एके काळी संपूर्ण आकाशाला व्यापून टाकणारे सुंदर रोझेट स्पूनबिल्स पक्षी आता तुलनात्मकरित्या बोटांवर मोजण्याइतकेच उरले आहेत. १९६० च्या दशकापासून, संकटग्रस्त वुड स्टॉक्स पक्ष्यांची संख्या ६,००० पासून चक्क ५०० झाली आहे. त्याचप्रमाणे, राज्यातील शिंपला उद्योगाला हातभार लावणारे फ्लोरिडा उपसागर येथील संपन्‍न मत्स्यसंवर्धन देखील धोक्यात आहे. एका जीवशास्त्रवेत्त्यांनुसार, हरिणांपासून कासवांपर्यंतचे सर्व पृष्ठवंशी प्राण्यांची संख्या सुद्धा ७५ ते ९५ टक्के कमी झाली आहे.

शेती आणि इतर मानवी उद्योगांची वाढ होत गेली तसे खत आणि कीटकनाशकांतील दूषकांमुळे हळूहळू जमीन आणि पाणी दूषित होत गेले. पाणथळीतील मत्स्यांपासून रकून्स, सुसरी ते कासव या सर्व अन्‍न साखळीत पाऱ्‍याचे अधिक प्रमाण दिसून आले आहे. मासेमाऱ्‍यांना, विशिष्ट ठिकाणातील बास आणि कॅटफिश खाण्यास मनाई केली जाते कारण त्यांच्यामध्ये जमिनीतून शोषलेला पारा मिसळलेला असतो. पँथर देखील मानवाच्या अतिक्रमणाला बळी पडले आहेत; फक्‍त पाऱ्‍याची विषबाधा झाल्यानेच नव्हे तर अवैध शिकारीमुळेही ते मारले जात आहेत. हा प्राणी इतका संकटग्रस्त आहे की सबंध राज्यात त्यांची संख्या ३० पेक्षा कमी आणि उद्यानात केवळ १० असल्याचे समजले जाते. एव्हरग्लेड्‌समधल्या अनेक मूळच्या वनस्पती सुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

काही निरीक्षक आणि पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, एव्हरग्लेड्‌सची स्थिती सुधारण्याजोगी राहिलेली नाही. तथापि, सरकारी व उद्यान अधिकारी आणि अनेक पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, आर्थिक मदत करण्यात आली त्याचप्रमाणे राज्य आणि संघीय एजेन्सींनी तत्काळ पावले उचलली तर एव्हरग्लेड्‌सचा बचाव होऊ शकतो. “हे प्रचंड आणि गुंतागुंतीचं ठिकाण सुधारणा करण्यापलीकडच्या स्थितीत कधी पोहंचेल हे कोणालाही ठाऊक नाही,” असे एक अधिकारी म्हणाले. “कदाचित तशी स्थिती झालीही असावी.” जीवशास्त्रवेत्ता जॉन ऑगडेन कबूल करतात की, एव्हरग्लेड्‌सला पूर्ववत करण्याची शक्यता इतकी काही खात्रीची वाटत नाही पण तरीही ते आशावादी आहेत. “मला आशावादी राहावंच लागतंय,” ते म्हणाले. “नाहीतर, दुसरा पर्याय म्हणजे, उद्यानाच्या एका कोपऱ्‍यात बोटांवर मोजण्याइतक्या सुसरी, तर दुसऱ्‍या कोपऱ्‍यात पक्ष्यांची जेमतेम उरलेली घरटी आणि एखादं सुंदरसं वस्तुसंग्रहालय आणि त्यात मध्यभागी भुसा भरलेला पँथर.”

सबंध राष्ट्रातील फ्लोरिडाचे अधिकारी, जीवशास्त्रवेत्ते आणि पर्यावरण तज्ज्ञांचा इशारा, वॉशिंग्टन येथील संघीय अधिकारी आणि राजकर्त्यांच्या तसेच अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या आणि उपराष्ट्रपतींच्या कानी देखील पडला आहे. आता पुन्हा एकदा यु.एस. आर्मी कोर्स ऑफ इंजिनियर्सने हाती घेण्याचा हा प्रकल्प आहे ज्यांच्या पूर्वजांनी अनेक वर्षांआधी हाती घेतलेल्या कामाची पार नासधूस करून सोडली. धरण बांधा, पाणी निचरून टाका, पाण्याचा प्रवाह बदला असा उद्देश असण्याऐवजी एव्हरग्लेड्‌स व त्यातील प्राणीमात्रांचा बचाव करणे ही त्यांची नवीन आशा आहे.

स्पष्टतः, सर्वात मोठा प्रश्‍न पाण्याचाच आहे. “यु.एस.न्यूझ ॲण्ड वर्ल्ड रिपोर्टनुसार “स्वच्छ पाणी—आणि तेही भरपूर प्रमाणात उपलब्ध केल्यावरच यश मिळू शकते आणि ते शेती किंवा शहरी क्षेत्रातले पाणी कमी करूनच साध्य केले जाऊ शकते. संभवतः, दक्षिण फ्लोरिडातील उसाची लागवड आणि भाज्यांची शेते यांच्यावरच नेम आहे.” “जास्त पाणी पुरवठा करणं कठीणंच आहे, पण आम्ही आधीच पुष्कळ पाणी पुरवठा केलाय आणि आता आणखी शक्य नाही,” असे एव्हरग्लेड्‌स उद्यानाचे व्यवस्थापक रॉबर्ट चँड्‌लर म्हणाले. “इतरांनी काळजीपूर्वक संरक्षण करण्याची अत्यंत गरज आहे,” असे ते म्हणाले. एव्हरग्लेड्‌सची पुनर्स्थापना करण्याचा प्रस्ताव मांडलेल्यांना अशी भीती आहे की, एव्हरग्लेड्‌समध्ये जमिनीवर अधिक ताबा असलेले फ्लोरिडाचे ऊस उत्पादक आणि शेतकरी यांच्याकडून या प्रकल्पाला सर्वात जास्त विरोध येईल. ग्लेड्‌समधील जीवहानी करून यांनी आपल्या गरजा भागवण्यासाठी प्रचंड मात्रेत पाणी काढून घेतले होते.

एव्हरग्लेड्‌सची पुनर्स्थापना आणि बचाव ही इतिहासातील सर्वात धारिष्ठ आणि खर्चीक पुनःप्राप्तीची योजना ठरेल. “आमचा असं म्हणण्याचा अर्थ म्हणजे, भरमसाट पैसा, पुष्कळ जमीन आणि अपूर्व प्रमाणावर परिस्थितीकीची पुनर्स्थापना करणे असा होतो,” असे जागतिक वन्यजीवन निधी येथील एव्हरग्लेड्‌सच्या प्रकल्पाचे अधिकारी म्हणाले. विज्ञान (इंग्रजी) या नियतकालिकाने स्पष्टीकरण दिले, “पुढील १५ ते २० वर्षांमध्ये, अदमासे २०० करोड डॉलर खर्च करून, कोर्स, राज्य आणि इतर संघीय एजेन्सीस संपूर्ण फ्लोरिडा एव्हरग्लेड्‌सच्या परिस्थितीकीत आणि त्यासोबत १४,००० चौरस किलोमीटरच्या [५,४०० चौरस मैल] पाणथळ जमीनीत आणि खणलेल्या कालव्यांमध्ये पाणी पुरवठ्याचे नियंत्रण करण्याची योजना करत आहेत.”

शिवाय, या योजनेत, ओकिकोबी सरोवराजवळील १,००,००० एकर शेतजमीन विकत घेऊन तिचे रूपांतर पाणथळ प्रदेशात करण्याची गरज आहे ज्यामुळे उर्वरित शेतजमीनीतले अशुद्ध घटक निचरले जातील. एव्हरग्लेड्‌सची सफाई करण्यासाठी अतिरिक्‍त निधी उभारण्याकरता ऊस उद्योगाच्या संघीय अर्थसाहाय्यात प्रत्येक किलो मागे ७५ पैसे कमी करण्याच्या प्रस्तावाविरुद्ध उत्पादक तीव्र विरोध करत आहेत. “एव्हरग्लेड्‌सचा नाश करून त्यातून अधिक फायदा मिळवलेल्यांकडून पुनर्स्थापनेचा निधी गोळा करावा: म्हणजेच फ्लोरिडातील ऊस उत्पादकांकडून आणि प्रक्रिया करणाऱ्‍यांकडून,” असे युएसए टुडे या वृत्तपत्रातील एका लेखात छापले होते. फ्लोरिडा साखरेवर प्रत्येक किलो मागे ७५ पैसे अशी जी आकारणी केली गेली आहे त्यातून दर वर्षी ३.५ कोटी डॉलर गोळा होतील असा अंदाज काढला आहे.

शेतकरी आणि ऊस उत्पादक विरुद्ध जीवशास्त्रवेत्ते, पर्यावरण तज्ज्ञ आणि निसर्ग प्रेमी यांच्यातील ही लढाई संयुक्‍त संस्थानांतील इतर भागांत याच दोन गटांमध्ये होत असलेल्या विरोधाप्रमाणेच चालू राहील. उपराष्ट्रपती गोर यांनी सहकार्य करण्याची विनंती केली. ते म्हणाले, “एकत्र मिळून कार्य केल्याने आपण हे विभाजन दूर करून निरोगी पर्यावरण आणि संपन्‍न अर्थव्यवस्था असल्याची खात्री करू शकतो. पण कार्य करण्याची वेळ आताच आहे. जगात दुसरं कोणतंही एव्हरग्लेड्‌स नाही.”

[१३ पानांवरील चित्र]

सुसर

[चित्राचे श्रेय]

USDA Forest Service

[१४ पानांवरील चित्र]

बॉल्ड इगल

[१५ पानांवरील चित्र]

व्हाईट आयबिस

[१५ पानांवरील चित्र]

घरटी बांधणाऱ्‍या अनहिंगा किंवा स्नेकबर्ड पक्षाची जोडी

[१६ पानांवरील चित्र]

पाण्यातून जात असलेले रकून्सचे त्रिकूट

[१६ पानांवरील चित्र]

इग्रेट

[१७ पानांवरील चित्र]

लिंप्किन, ज्यास क्रायइंग पक्षी असेही म्हटले जाते

[१७ पानांवरील चित्र]

ग्रेट ब्लू हेरोन

[१७ पानांवरील चित्र]

कॉरमोरंट पक्षाची पिले

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा