“त्यांनी ते वृत्तपत्रात छापलं”
असे कॅनडातील एका कृतज्ञ मुलीने, वॉच टावर संस्थेला लिहिलेल्या आभारप्रदर्शनाच्या पत्रात म्हटले. तिने शाळेतील जाहीर वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला होता आणि तिच्या सादरीकरणाने न्याय मंडळातील एका न्यायाधीशास इतके खूष केले, की त्यांनी स्थानीय वृत्तपत्रात ते छापण्याची परवानगी मागितली.
या मुलीने आपल्या विषयाची निवड कशी केली होती? तिने स्पष्टीकरण दिले: “माझ्या वर्गाची आणि खासकरून मुलींमध्ये, चहाडी ही एक समस्या होती.” त्यामुळे आपल्या सादरीकरणासाठी तिने सावध राहा! यात जे काही वाचले होते त्याचाच आधार घेतला. तिच्या भाषणातील काही भाग, नायगारा धबधबा, ओंटॅरियोच्या द रिव्ह्यू या स्थानीय वृत्तपत्रांत, “चहाडी अपायकारक असू शकते; तुम्हाला कसं वाटलं असतं?” या मथळ्याखाली प्रकाशित होऊन आले.
यात असे काय होते बरे ज्यामुळे न्याय मंडळातील न्यायाधीश इतके प्रभावित झाले? या मुलीच्या भाषणाच्या काही अवतरणांची नोंद घ्या: “आज समाजात चहाडी ही अत्यंत सामान्य बाब होऊन बसली आहे. याची परिणती तीव्र डोकेदुखी, निद्राभंग आणि सर्वात मुख्य म्हणजे दुःख यांत होऊ शकते. . . .
“बोलणे हा मानवी स्वभावाचा एक अविभाज्य भाग असल्यामुळे चहाडीवर पूर्णपणे बांध घालणे ही अशक्य कोटीतील एक बाब आहे. एक गोष्ट मात्र आपण करू शकतो आणि ती म्हणजे चहाडीला लगाम लावणे. असे करण्याच्या काही सूचना पुढीलप्रमाणे आहेत: १. आगीत तेल ओतू नका. २. चहाडी ऐकू नका. . . . चहाडी ऐकल्याने कदाचित असे भासेल, की जे काही बोलले जात आहे त्याजशी तुम्ही सहमत आहात. ३. घातक चहाडी, तुम्ही लबाड असल्याचेही सिद्ध करील. ४. सर्वात महत्त्वाचा सल्ला म्हणजे, बोलण्याआधी विचार करा! स्वतःस विचारा, ‘हेच जर माझ्याबद्दल बोललं गेलं असतं तर मला कसं वाटलं असतं बरं?’”
“हे चार टप्पे कृतीत आणा आणि तुम्ही बहुधा एक उत्तम व्यक्ती व्हाल,” अशाप्रकारे त्या मुलीने समारोप केला.
केवळ शाळेतील युवकांकरताच नव्हे तर सर्वांकरताच किती हा व्यवहार्य सल्ला! वैविध्यपूर्ण विषयांवर अगदी प्रसंगोचित व अद्ययावत माहिती सादर करण्यास सावध राहा! प्रयत्नांची शिकस्त करत असते. तुम्हाला नियमितरित्या हे नियतकालिक मागवायचे असल्यास, पुढच्या वेळी यहोवाचे साक्षीदार तुम्हाला भेट देतील तेव्हा त्यांच्याजवळ याची मागणी करा अथवा पृष्ठ ५ वर दिलेल्या योग्य पत्त्यावर लिहा.