विज्ञान कथा लोकप्रियतेकडे तिची वाटचाल
सन १९८२ या वर्षाने अमेरिकेच्या चित्रपट उद्योगात सर्वात प्रथम घटना पाहिली. सन १९८२/८३ दरम्यानच्या काळात चित्रपटातील सर्वात लोकप्रिय “अभिनेता” मुळीच व्यक्ती नव्हता. चित्रपटाचा स्पष्टीकृत इतिहास (इंग्रजी) यानुसार, इटी: द एक्स्ट्राटेरेस्ट्रीयल! या चित्रपटात इटी या विलक्षण परंतु काहीशा मोहक बाह्य अंतरिक्षातील पात्राने नायकाचे काम केले होते.
हे उल्लेखनीय उदाहरण, विज्ञान कथांनी (एसएफ) अलीकडील वर्षांमध्ये प्रचंड लोकप्रियता मिळवल्याचा केवळ एक पुरावा आहे. एकेकाळी स्वस्त नियतकालिकांमध्ये छापली जाणारी व एकलकोंड्या आणि स्वप्नाळू व्यक्तींची करमणूक समजली जाणारी विज्ञान कथा आता मुख्य मनोरंजनाचा प्रस्थापित भाग बनली आहे. तथापि, तिचे लोकप्रियतेकडे नाट्यमयरित्या वाटचाल होण्यामागील कारण काय आहे?
या प्रश्नाचे उत्तर देण्याकरता, आपण आधी विज्ञान कथांचा इतिहास लक्षात घेतला पाहिजे. अतिपुरातन काळापासून, लोकांनी आश्चर्यचकित, प्रभावित किंवा केवळ मनोरंजन करण्यासाठी चमत्कारिक कथा सांगितल्या आहेत. तथापि, १७ व्या आणि १८ व्या शतकांमध्ये, युरोपने वैज्ञानिक आणि भौतिक प्रगतीच्या युगात प्रवेश केला. अनेकजण पारंपारिक कल्पना आणि अधिकार यांच्या सत्यतेला आव्हान देऊ लागले. या वातावरणात, काहीजण वैज्ञानिक प्रगती मानवजातीवर, भवितव्यात कसा परिणाम करील यावर तर्क करू लागले.
विज्ञान कथांचा शोध नेमका कोणी लावला हे अनिश्चित आहे. फ्रान्सिस गॉडवीन आणि सिरानो द बरझेरॅक या सतराव्या शतकातील लेखकांनी काल्पनिक साहित्य लिहिले ज्यामध्ये अंतरिक्षातील प्रवासाचा समावेश होता. सन १८१८ मध्ये, फ्रॅकेनस्टेन, ऑर द मॉडर्न प्रोमेथियस या मेरी शेलीच्या पुस्तकात जीव निर्माण करण्याची क्षमता असणाऱ्या वैज्ञानिकाचे वर्णन दिले आहे आणि त्याचे भयानक परिणाम दाखवले आहेत.
काही लेखकांनी मानवी समाजातील उणिवा ठळकपणे मांडण्यासाठी अशा प्रकारच्या कथांचा उपयोग केला. यास्तव, जॉनथन स्वीफ्टने १८ व्या शतकातील इंग्रज समाजाचा उपहास केला तेव्हा त्याने आपले औपरोधिक साहित्य काल्पनिक जलपर्यटनाच्या एका श्रृंखलेद्वारे सादर केले. परिणामस्वरूप, गुलीवरचे प्रवास (इंग्रजी), या अत्यंत प्रभावशाली रूपकात्मक कथेची निर्मिती झाली ज्यास विज्ञान कथांचे “प्रथम उत्कृष्ट वाङ्मय” असे संबोधले गेले.
परंतु, जुल्स वर्न आणि एच. जी. वेल्स या लेखकांना विज्ञान कथांच्या कादंबरीला त्याचे आधुनिक रूप देण्याचे बहुधा श्रेय दिले जाते. सन १८६५ मध्ये, वर्नने पृथ्वीपासून चंद्रापर्यंत (इंग्रजी) हे पुस्तक लिहिले—यशस्वी कादंबऱ्यांच्या मालिकेतील ते एक होते. सन १८९५ मध्ये, एच. जी. वेल्सचे लोकप्रिय पुस्तक द टाईम मशिन प्रकाशित झाले.
कथेचे वास्तविकतेत रूपांतर होते
१९०० च्या दशकाच्या सुरवातीला, वैज्ञानिक, मनोराज्यात रमणाऱ्यांच्या स्वप्नांना वास्तविकतेत उतरवू लागले होते. डी ग्रोसन (थोर जण) या पुस्तकानुसार, हरमॉन ओबर्ट या जर्मन भौतिकशास्त्रज्ञाने जुल्स वर्नच्या मानवसंचालित अंतरिक्ष यानाच्या स्वप्नाचे सार्थक करण्याच्या प्रयत्नात अनेक वर्षे घालवली. ओबर्टच्या गणतीमुळे अंतरिक्षातील प्रवासासाठी एक शास्त्रीय आधार देण्यास मदत मिळाली. परंतु, विज्ञान कथांनी प्रभावित झालेला तो एकच वैज्ञानिक नव्हता. रे ब्रॅडबरी हा लोकप्रिय विज्ञान कथांचा लेखक म्हणतो: “लहान असताना, वर्नहर फोन ब्रॉन आणि जर्मनीतील त्याचे सहकर्मी तसेच हॉस्टन व केप केनेडी येथील सर्वांनी एच. जी. वेल्स आणि जुल्स वर्न यांची पुस्तके वाचली. मोठे झाल्यावर, आपण हे सर्व घडवून आणणार असा त्यांनी निश्चय केला.”
खरे म्हणजे, विज्ञान कथा, अनेक क्षेत्रांत नवीन शोध लावण्याकरता प्रवर्तक ठरल्या आहेत. रने ऑट हा लेखक असा दावा करतो की, ‘विज्ञान कथांनी आगाऊपणे भाकीत केले नाही असे फार कमी नवीन शोध किंवा संशोधन आहेत.’ पाणबुड्या, रोबोट आणि मानवसंचालित रॉकेट हे सर्व वास्तविकतेत येण्याआधी विज्ञान कथांचे सर्वसामान्य घटक होते. विज्ञान कथांचे लेखक, फ्रेडरीक पोल असे म्हणतात की, “विज्ञान कथा वाचणे म्हणजे मन विस्तृत करणे होय.”
अर्थात, सर्वच विज्ञान कथा खरोखरच विज्ञानाविषयी नसतात. सर्वात लोकप्रिय असलेली काही विज्ञान-कथा पुस्तके आणि चित्रपट ज्यास विज्ञान काल्पनिकता असे संबोधले जाते त्याचे प्रत्यक्ष प्रकार आहेत. वैज्ञानिक वरकरणी संभवनीयता हे बहुधा विज्ञान कथांचे लक्षण असते, तर त्याउलट काल्पनिक गोष्टी केवळ लेखकाच्या कल्पनेने मर्यादित केलेल्या असतात. जादू आणि चेटूकाचा देखील यात कदाचित मुख्य भाग असेल.
परंतु, भवितव्याबद्दल विज्ञान कथांचे मत किती अचूक आहे? सर्वच विज्ञान कथा वाचण्यासाठी किंवा पाहण्यासाठी योग्य आहेत का? पुढील लेख या प्रश्नांची उत्तरे देतील.
[३ पानांवरील चित्र]
“पृथ्वीपासून चंद्रापर्यंत” या जुल्स वर्नच्या कादंबरीने अंतरिक्षातील प्रवासाबद्दल आस्था निर्माण करण्यास पुष्कळ काही केले
[३ पानांवरील चित्राचे श्रेय]
Rocket Ship: General Research Division/The New York Public Library/Astor, Lenox and Tilden Foundations