मनोविकृत जुगारी नेहमीच हरणारे
“मनोविकृत जुगार, मद्यपान व मादक पदार्थांच्या व्यसनाप्रमाणेच एक रोग आहे,” असे फ्रान्समधील प्राध्यापक झॉन अडे यांनी म्हटले. ते म्हणाले, “हे मादक औषधांचे नसले, तरी एक व्यसन आहे [व] अधिकाधिक लोकांना व्यसनी झाल्याचे आढळून येत आहे.” मनोविकृत जुगाऱ्यांचे मन, अमाप पैसा हरल्यावरही आणखी जुगार खेळून तोटा भरून काढण्याच्या गरजेने बहुधा व्यापलेले असते. “हरणारे पुष्कळ जण लवकरच त्यांच्या निराशेवर मात करतात. परंतु, काहींच्या बाबतीत, जुगार खेळण्याची तीव्र इच्छा इतकी अनियंत्रित असते की, ती त्यांच्या जीवनांचा नाश करू शकते,” असे फ्रान्सच्या एका वार्ताहराने लिहिले. “ही सवय सोडून देण्याचे वचन ते स्वतःला देत राहतात, परंतु ती सवय नेहमी त्यांच्यावर ताबा मिळवत राहते. ते जुगाराचे व्यसनी आहेत.”
दक्षिण आफ्रिकेतील एका जुगारी व्यक्तीने कबूल केले: “तुम्ही जुगाराचे व्यसनी आहात आणि रूलेट चक्र किंवा ब्लॅकजॅक टेबलजवळ बसला, तर बाकीच्या गोष्टींची तुम्हाला पर्वा नसते. तुमच्या नसानसातून अड्रेनलीनचा संचार होतो, आणि केवळ आणखी एका चक्राच्या भिरकीसाठी किंवा पत्त्यांच्या डावासाठी तुमच्याजवळ असेल नसेल ते सर्व तुम्ही पणास लावाल. . . . माझे शरीर उत्पन्न करत असलेल्या ॲड्रेनलीनचा फायदा घेऊन, पत्ते व आकडे पाहत, नेहमीच फसव्या असणाऱ्या त्या अमाप धनप्राप्तीची वाट पाहत मी लागोपाठ कित्येक दिवस अन् रात्र जागा राहू शकत होतो.” मग त्याने शेवटी असे म्हटले: “माझ्यासारखेच अनेक असे आहेत जे केवळ काही शेकडो किंवा काही हजार रॅन्ड्सवर देखील थांबू शकत नाहीत. आमच्याकडील असेल नसेल ते सर्व हरेपर्यंत आम्ही जुगार खेळत राहतो व आमच्या कौटुंबिक नातेसंबंधांचा इतपत नाश होतो की त्यांना पूर्ववत केले जाऊ शकत नाही.”
सेंट जॉन्स विद्यापीठ, न्यूयॉर्क मधील समाजशास्त्राचे प्राध्यापक हेन्री आर. लस्यूर यांनी असे लिहिले, जुगार खेळण्याची, इच्छा मग ते जिंकत किंवा हरत असले, तरी इतकी प्रबळ असते की, “पुष्कळ जुगारी अनेक दिवस झोपत नाहीत, खात नाहीत व शौचाला देखील जात नाहीत. जुगार खेळण्यात गढून गेल्याने बाकीच्या सर्व चिंता बाजूला सारल्या जातात. निर्णायक काळात, हातांना घाम सुटणे, हृदयाचे ठोके वाढणे व मळमळ होणे अशी गुणलक्षणे असणारी ‘शिरशिरी’ देखील असते.”
जुगाराचा एक माजी व्यसनी कबूल करतो की, त्याच्या दीर्घकालीन सवयीमागे जिंकणे ही प्रवृत्त करणारी शक्ती नसून जुगारातील “शिरशिरी”, म्हणजेच रोमांच ही होती. “जुगाराने विलक्षण हिंसक भावना प्रकट होतात,” असे तो म्हणतो. “रूलेट चक्र फिरत असताना, तुम्ही नशीबाकडून उत्तर मिळण्यास थांबता त्या वेळी डोके गरगर फिरू लागते व तुम्ही जवळजवळ बेशुद्धच होता.” फ्रेंच जुगारी ऑन्ड्रे कबूल करतो: “तुम्ही एका घोड्यावर १०,००० फ्रॅक्सची पैज लावली असेल व आणखी १०० मीटरची दौड पूर्ण व्हावयाची आहे आणि अशावेळेस तुम्हाला कोणीतरी तुमची बायको किंवा आई मरण पावल्याचे येऊन सांगतो तेव्हा तुम्हाला त्याची मुळीच पर्वा नसते.”
अतिशय नुकसान झाल्यावरही ऑन्ड्रे जुगार कसे खेळू शकला याचे तो वर्णन करतो. त्याने बँकेतून, मित्रांकडून व अतिशय व्याजाने कर्ज देणाऱ्या सावकारांकडून पैसे उसने घेतले. त्याने धनादेश चोरले व डाक कार्यालयाची बनावट बचत पुस्तके तयार केली. कॅसिनोमध्ये गेल्यावर तो एकट्या असलेल्या स्त्रियांना फसवून त्यांचे क्रेडिट कार्ड घेऊन बेपत्ता होत असे. एका फ्रेंच वार्ताहराने लिहिले, “अशी वेळ आली की, आपण आपले आर्थिक तोटे कधी भरून काढू शकू का याची देखील [ऑन्ड्रेला] मुळीच पर्वा राहिली नाही. केवळ या वेडामुळे तो इकडेतिकडे भटकत होता.” मग तो गुन्हे करू लागला व त्याला तुरूंगात टाकण्यात आले. त्याचा विवाह संपुष्टात आला.
अनेक वेळा, मनोविकृत जुगारी, मादक औषधांच्या व्यसनी व मद्यपी लोकांप्रमाणे, त्यांची नोकरी, त्यांचा व्यापार, त्यांची प्रकृती, व शेवटी त्यांचे कुटुंब हे सर्व गमावल्यावरही जुगार खेळत असतात.
फ्रान्समधील अनेक शहरांनी अलीकडेच जुगाराला मुभा दिली आहे. इतर धंदे अपयशी ठरले आहेत, तेथे वस्तू गहाण ठेवून कर्ज देणाऱ्या सावकारांची दुकाने भरभराटीला येत आहेत. तेथील मालक असे म्हणतात, जुगारी त्यांच्याजवळील सर्व पैसा हरतात व घरी परतण्यासाठी अंगठ्या, घड्याळे, कपडे व इतर मौल्यवान वस्तू देऊन त्याबदली पेट्रोलसाठी पैसे घेतात. अमेरिकेच्या काही किनारपट्टीवरील गावांमध्ये, नवीन सावकारांची दुकाने उघडली आहेत; काहीवेळा तीन, चार किंवा याहून अधिक दुकाने एकाच रांगेत आढळतात.
काहीजण तर, त्यांची जुगारी सवय चालू ठेवण्यासाठी गुन्हेगारीच्या जीवनाकडे वळाले आहेत. प्राध्यापक लस्यूरच्या मते, आतापर्यंत घेतलेल्या अभ्यासांद्वारे “मनोविकृत जुगारी व्यक्तींमध्ये पुष्कळ अवैध प्रवृत्त्या दिसून आल्या आहेत . . . बनावटी धनादेश बनवणे, अपहार, चोरी, सशस्त्र दरोडा, शर्यतीत जुगाराचे पैसे स्वीकारणे, लबाडीने पैसे कमावणे, एखाद्याचा विश्वास संपादून त्यास लुबाडणे व चोरीच्या वस्तू विकणे.” याशिवाय, व्हाईट कॉलर्ड गुन्हे आहेत ज्यामध्ये जुगारी त्यांच्या मालकांना लुटतात. मनोविकृत जुगाऱ्यांचे शिक्षण व उपचार संस्थेचे संचालक गेरी टी. फुलकर यांच्या मते, मनोविकृत जुगारी म्हणून सिद्ध झालेल्या हजारोंपैकी ८५ टक्के जणांनी त्यांच्या मालकांना लुबाडले असल्याचे कबूल केले. “खरे म्हणजे, आर्थिकदृष्ट्या पाहिले, तर मनोविकृत जुगार मद्यपान व मादक पदार्थांचा दुरुपयोग या दोन्ही गोष्टींपेक्षा संभवतः वाईट आहे,” असे ते म्हणाले.
त्यावरील अधिक अभ्यासांनी असा निष्कर्ष काढला आहे की, कैद न केलेले सुमारे दोन तृतीयांश मनोविकृत जुगारी व कैद केलेले ९७ टक्के, जुगाराला पैसा पुरवण्यासाठी किंवा जुगाराशी संबंधित कर्ज फेडण्यासाठी अवैध वागणुकीत गोवल्याचे कबूल करतात. वैध जुगार फोफावत असलेल्या अमेरिकेच्या गल्फ कोस्ट शहरांमध्ये, १९९३ साली बँकांना लुटण्याची १६ प्रकरणे घडली, पूर्वीच्या वर्षापेक्षा यात चार पटीची वाढ होती. एका मनुष्याने आपली जुगारी सवय चालू ठेवण्याकरता आठ बँकांमधील एकूण ८९,००० डॉलर चोरले. आपल्या सावकारांकडून अमाप कर्ज फेडण्याची जबरदस्ती केल्याने काही जुगाऱ्यांनी बंदुकीच्या जोरावर इतर बँका लुटल्या.
“मनोविकृत जुगारी ही सवय सोडण्याचा प्रयत्न करताना धूम्रपान करणारे व मादक पदार्थांच्या व्यसनी लोकांप्रमाणेच त्यांना पुनरावृत्तीची लक्षणे होऊ शकतात,” असे द न्यूयॉर्क टाईम्स म्हणते. तथापि, इतर सवयी सोडण्यापेक्षा जुगारी सवय सोडणे अतिशय कठीण आहे असे जुगारी व्यक्ती कबूल करतात. एकाने म्हटले, “आमच्यापैकी काहींनी मद्यपान व मादक औषधांचा दुरुपयोग यांचा देखील अनुभव घेतला आहे, व आम्ही सर्वजण याजशी सहमत आहोत की, इतर कोणत्याही व्यसनांपेक्षा मनोविकृत जुगाराची सवय सर्वात वाईट आहे.” हार्वर्ड विद्यापीठाच्या व्यसन अभ्यास केंद्र येथील डॉ. हाऊअर्ड शाफर म्हणाले की, ही सवय सोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनोविकृत जुगाऱ्यांपैकी ३० टक्के लोकांमध्ये तरी “चीडचीडेपणाची लक्षणे दिसून येतात किंवा ते पोटदुखी, निद्रा विकार, नेहमीपेक्षा जास्त रक्त दाब व हृदयाचे ठोके यांचा अनुभव करतात.”
बाल्टीमोर, मेरीलॅन्ड, अमेरिकेतील पॅथोलॉजिकल गॅम्ब्लिंगच्या नॅशनल सेंटरच्या संचालिका डॉ. वॅलरी लॉरेन्झ म्हणाल्या की, ते पैज लावत राहिले, तरी मनोविकृत “जुगाऱ्यांना, चिरकालीन डोकेदुखी, अर्धशिशी, श्वासोच्छ्वासाचा त्रास, पेटक्यांच्या वेदना, हृदयाच्या ठोक्यांची विकृती व हात आणि पाय बधिर होणे अशा वैद्यकीय समस्यांना तोंड द्यावे लागते.”
मग आत्महत्या देखील आहेत. ज्याला सामान्यपणे “प्राणघातक नसलेले व्यसन” असे ओळखले जाते, परंतु ज्यामुळे मृत्यू ओढवतो त्यापेक्षा अधिक वाईट काय असू शकते? उदाहरणार्थ, अलीकडेच जुगाराचे कॅसिनो उघडण्यात आलेल्या एका अमेरिकन परगण्यात, द न्यूयॉर्क टाईम्स मॅगझीनच्या वृत्तानुसार “आत्महत्येचे प्रमाण दुप्पट झाले हे गूढ आहे, तरीसुद्धा, आरोग्य निगेचा कोणताही अधिकारी ही वाढ जुगाराशी जोडण्यास इच्छित नव्हता.” दक्षिण आफ्रिकेत, एका आठवड्यात तीन जुगाऱ्यांनी आत्महत्या केली. जुगारामुळे तसेच या माध्यमाद्वारे वैध किंवा अवैधपणे कर्ज मिळवल्यामुळे घडलेल्या प्रत्यक्ष आत्महत्येची संख्या ठाऊक नाही.
आत्महत्या, हा जुगाराच्या पकडीतून मुक्त होण्याचा दुःखदायक मार्ग आहे. पुढील लेखात, काहींनी एक चांगला मार्ग कसा शोधला ते पाहा.
[६ पानांवरील संक्षिप्त आशय]
सावकारांची दुकाने—तसेच गुन्हे देखील भरभराटीला येत आहेत