जुगार १९९० च्या दशकाचे व्यसन
रंगीत फिल्मने भरलेला कॅमेरा हे दृश्य टिपतो. हे चित्र रविवारच्या वृत्तपत्राच्या मधल्या दोन पानांवर भरले आहे—नजर पोहंचते तेथपर्यंत, एक भव्य गुदाम एका जुगारगृहात बदलण्यात आले होते, त्याचे हजारो चौरस मीटर, जुगार खेळणाऱ्या प्रत्येक वयोगटाच्या व वर्णाच्या नियमित गिऱ्हाईकांनी भरलेले आहे. त्यांचे दमलेले चेहरे व आरक्त डोळे पाहा, ती तासांपर्यंत अविरत खेळल्याची चिन्हे आहेत काय? रात्रभर हरले असल्यास, निदान शेवटी तरी ते जिंकत आहेत असे वाटण्याच्या आशेने ते पुढील अंकाच्या घोषणेची आतुरतेने वाट पाहतात.
वृत्तपत्राची पाने पलटा. हातात पत्ते धरलेल्या लोकांचे चिंताग्रस्त चेहरे पाहा, त्यांना डाव हरण्याची भीती आहे का? अनेक प्रसंगी, पुढील पत्ता उचलल्यावर हजारो डॉलर जिंकले किंवा हरले जातात. या चित्रांपलीकडे कल्पना करा. अस्वस्थ हातांना घाम सुटलेला तुम्हाला दिसतो का? हृदयाचे जोराने धडधडणे, पुढच्या वेळी चांगला डाव मिळण्याच्या व इतरांनी डाव हरण्याच्या मागणीची मनातल्या मनात केलेली प्रार्थना तुम्हाला ऐकू येते का?
भपकेदार हॉटेल व बोटींवरील आलिशान कॅसिनोंमध्ये पाऊल टाका. रंगीबेरंगी स्लॉट यंत्रांच्या चक्रव्यूहात तुम्ही भटकला आहात काय? त्यांचे हँडल ओढण्याच्या व फिरत्या चाकांच्या भिर्र भिर्र आवाजाने तुमच्या कानठाळ्या बसल्या आहेत का? खेळणारे, जिंकले किंवा हरले तरी, त्यांच्या कानांसाठी तो संगीताचा नाद आहे. “त्या स्लॉट यंत्राचे हँडल पुढच्या वेळी ओढल्यावर काय होणार याची शिरशिरी त्यांच्याकरता अत्यानंद असतो,” असे एका कॅसिनोचा प्रमुख म्हणाला.
लोकांच्या झुंडीतून वाट काढून गर्दी जमलेल्या रूलेट टेबलाजवळ जा. चक्राच्या भिरकीने, तुमच्या डोळ्यांसमोर त्याचे लाल व काळ्या रंगांचे कप्पे फिरल्यावर तुमचे डोळे दिपू शकतात. गडगडणाऱ्या गोटीचा आवाज त्या जादूत भर घालतो. ते गोल गोल फिरल्यावर जेथे थांबते तो जिंकणे व हरणे यामधील फरक असतो. चक्राच्या एकाच भिरकीत बहुधा हजारो डॉलर हरले जातात.
यामध्ये दशसहस्त्रावधी चित्रे व दृश्यांची, अगणित लाखो खेळणाऱ्यांची व जगभरात हजारो ठिकाणांची भर घाला. आपला जुगाराचा हव्यास पूर्ण करण्यासाठी ते जगाच्या सर्व भागात विमानाने, रेल्वेने, जहाजाने व कारने येतात. त्यास “दडलेला रोग, १९९० च्या दशकाचे व्यसन: मनोविकृत जुगार” असे म्हणण्यात आले आहे. “सबंध जगभरात १९९० चे दशक, वैध जुगाराच्या ऐतिहासिक भरभराटीच्या काळास चिन्हांकित करील असे प्रतिपादन मी करतो,” असे संशोधक ड्यूरंट जेकब्स, हे जुगारी वृत्तीसंदर्भातील राष्ट्रीय अधिकारी म्हणाले.
उदाहरणार्थ, अमेरिकेत १९९३ साली, श्रेष्ठ संघाच्या बेसबॉल स्टेडियममध्ये जाण्याऐवजी अधिक अमेरिकन लोक कॅसिनोमध्ये गेले—त्यांनी ९.२ कोटी भेटी दिल्या. जुगाराची नवनवीन केंद्रे उघडण्याचे कधीच थांबणार नाही असे वाटते. पूर्व किनारपट्टीवरील हॉटेल चालक अत्यानंदी आहेत. “अंदाज केल्याप्रमाणे, दर दिवशी कॅसिनोमध्ये येणाऱ्या ५०,००० लोकांची सोय करण्याकरता पुरेशा खोल्या जवळजवळ नाहीतच.”
पुष्कळ दक्षिण राज्यांमध्ये, जेथे अल्प कालावधीआधीच जुगार खेळणे पाप समजले जात होते, तेथे आता १९९४ मध्ये त्याचे स्वागत करून त्यास मुक्तिदाता समजले जाते. “आज बायबल बेल्टमध्ये (दक्षिण अमेरिका) सबंध मिसिसिपी व लुइझियानामध्ये तरंगते व जमिनीवरील कॅसिनो आहेत तसेच फ्लोरिडा, टेक्सास, अलाबामा व अर्कान्साससाठी आणखी योजना असल्यामुळे त्याचे नाव ब्लॅकजॅक बेल्ट ठेवण्यात काही हरकत नाही,” असे निरीक्षण यु.एस.न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट करते. आता काही धार्मिक नेते जुगार पापमय असण्याच्या त्यांच्या विचारात पूर्ण बदल करत आहेत. उदाहरणार्थ, १९९४ साली न्यू ओर्लीन्स, लुइझियाना येथील शहर अधिकाऱ्यांनी, मिसिसिपी नदीमध्ये सर्वात प्रथम तरंगत्या कॅसिनोचे उद्घाटन केले त्या वेळी एका पाळकाने प्रार्थना केली व “खेळण्याची क्षमता दिल्याबद्दल” देवाचे आभार मानले व “या सद्गुणाद्वारे तू शहराला आशीर्वादित केले” असे ते म्हणाले.
सन २००० पर्यंत, जुगाराच्या कॅसिनोपासून गाडीने प्रवास करण्यास ३ ते ४ तासांचा अवधी लागेल अशा हद्दीत ९५ टक्के अमेरिकी लोक राहत असतील अशी अपेक्षा केली जाते. अमेरिकन इंडियन लोकांना देखील या जुगाराच्या धंद्यातला मोठा हिस्सा प्राप्त झाला आहे. अमेरिकेच्या सरकारने आतापर्यंत संपूर्ण राष्ट्रात, २२५ कॅसिनो व अधिक पैसे लावले जातात अशी जुगारगृहे चालवण्यासाठी मान्यता दिली आहे, असे वृत्त यु.एस.न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्टने दिले.
या सर्व गोष्टींमध्ये, पत्ते खेळण्याची ठिकाणे, क्रीडेवर पैज लावणे, घोड्यांच्या व कुत्र्यांच्या शर्यती, चर्च बींगो व अशाच तऱ्हेचे आणखी प्रकार जोडले, तर अमेरिकी लोकांनी १९९३ मध्ये वैधरित्या ३९४ अरब डॉलर्सची पैज कशी लावली हे स्पष्ट होते; ही मागील वर्षापेक्षा १७.१ टक्क्यांची वाढ होती. जुगाराच्या विरोधात असणारे लोक याने गोंधळून गेले आहेत. “लोकांना मदत करण्यासाठी आपल्याजवळ असणाऱ्या सर्वात मोठ्या गोष्टी म्हणजे, चर्च, मंदिरे व सरकार आहेत,” असे मनोविकृत जुगाराच्या एका मंडळातील कार्यकारी संचालक म्हणाले. “आणि आता ते सर्वजण जुगाराच्या धंद्यात आहेत.” एका अमेरिकी वृत्तपत्राने अमेरिकेला “जुगारी राष्ट्र” असे संबोधले व जुगार “अमेरिकेचा वास्तविक राष्ट्रीय विरंगुळा आहे,” असे म्हटले.
इंग्लंडने आपली सर्वात प्रथम लॉटरी १८२६ पासून सुरू केली आणि विक्री भरभराटीला आली आहे असे म्हटले जाते. ते राष्ट्र, बींगोमध्ये देखील प्रचंड वाढीचा अनुभव घेत आहे, असे द न्यूयॉर्क टाईम्स मॅगझीनने वृत्त दिले. “मॉस्को आता वरदळ असलेल्या कॅसिनोंनी भरलेले आहे. तसेच लेबानीस जुगारी, ज्या पश्चिम बैरूटच्या जुगारगृहांवर नागरिकी सेना व धार्मिक मूलतत्त्ववाद्यांकडून तेवढाच हल्ला होतो तेथे नियमितपणे जाण्यासाठी अक्षरशः त्यांचे जीव धोक्यात घालत आहेत,” असा टाईम्सने अहवाल दिला. “कॅसिनोचे मशिन गनने सशस्त्र असलेले संरक्षक, खूप पैसा जिंकलेल्या लोकांना घरापर्यंत पोहंचवतात.”
“कॅनेडियन लोकांना ते जुगारी लोकांचे राष्ट्र असल्याची जाणीव होत नाही,” असे जुगारावर नियंत्रण ठेवणाऱ्या एका कॅनेडियन प्रांतस्थाने म्हटले. “काही बाबतीत, अमेरिकेपेक्षा कदाचित कॅनडामध्ये जास्त प्रमाणात जुगार चालतो,” असे तो पुढे म्हणाला. “मागील वर्षी कॅनेडियन लोकांनी वैध जुगारावर व पैज लावण्यावर १० अरब पेक्षा अधिक डॉलर खर्च केले—हे चित्रपटांवर खर्च करण्याच्या जवळजवळ ३० पट अधिक आहे,” असे वृत्त द ग्लोब ॲण्ड मेल या बातमीपत्राने दिले. “अमेरिकेमध्ये सध्या आहे किंवा होते त्यापेक्षा कॅनडातील बींगो उद्योग अधिक विकसित आहे. कॅनडातील लॉटरीचा धंदा अधिक विकसित झालेला आहे. हेच, घोड्यांच्या शर्यतींविषयी देखील खरे आहे,” असे त्या बातमीपत्राने म्हटले.
“दक्षिण आफ्रिकेत जुगाराचे किती व्यसनी आहेत हे कोणालाही ठाऊक नाही पण निदान ‘हजारो’ तरी आहेतच,” असे एका दक्षिण आफ्रिकेच्या वृत्तपत्राने लिहिले. तथापि, स्पेनचे सरकार त्याच्या समस्येविषयी व वाढत्या जुगाऱ्यांविषयी चांगलीच जाणीव राखून आहे. अधिकृत आकडे दाखवतात की, त्याच्या ३.८ कोटी रहिवाश्यांनी एका वर्षात २५ अरब डॉलर जुगारात हरले व यामुळे स्पेन जगातील जुगाराच्या सर्वोच्च प्रमाणांमध्ये गणले जाते. जुगाऱ्यांना मदत करण्यासाठी संघ निर्माण केलेल्या एका मनुष्याने असे म्हटले की, “स्पॅनिश लोक तर अंगी-मुरलेले जुगारी आहेत. ते नेहमीच तसे होते. . . . ते घोड्यांवर, सॉकरवर, लॉटरींवर आणि रूलेट, पोकर, बींगो व पैसा खाणाऱ्या नाशक यंत्रांवरही निश्चितच पैज लावतात.” अलीकडील काळातच, स्पेनमध्ये, मनोविकृत जुगाराला मानसशास्त्रीय आजार असे ओळखण्यात आले आहे.
उपलब्ध असलेला पुरावा सुचवतो की, जुगाराच्या वेडाने इटली देश देखील झपाटला गेला आहे. लॉटरी व क्रीडेवर त्यासोबतच वृत्तपत्रांमधील स्पर्धा आणि जुगारावर देखील करोडो पैसे लुटण्यात येत आहेत. “जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये जुगार पसरला आहे,” असे सरकारकडून पैसा पुरवलेल्या संशोधक गटाने प्रस्तुत केलेल्या वृत्तामध्ये म्हटले होते. द न्यूयॉर्क टाईम्सने लिहिले, आज “जुगाराचे प्रमाण पूर्वी कल्पना करता येत नव्हते अशा टोकाला जाऊन पोहंचले आहे आणि धनप्राप्तीचे मार्ग शोधून काढण्याकरता सरकारी अधिकाऱ्यांपासून पॅरीश पाळकांपर्यंत स्पर्धा चालू आहे.”
हे किती खरे आहे! जुगार, अनेक बाबतीत लोकांच्या जीवनातील प्रत्येक पैलूवर परिणाम करतो असे पुढील लेख दाखवतील.
[४ पानांवरील संक्षिप्त आशय]
एकेकाळचे पापमय कृत्य —आता “तारक”
[५ पानांवरील संक्षिप्त आशय]
जुगाराची साथ सबंध जगभरात पसरत आहे