जुगाराची नवीन भरती युवक!
प्रौढ मंडळी, पुरुष व स्त्रिया दोन्ही जुगाराच्या व्यसनात किती गुंतले आहेत हे पाहून तुम्ही अविश्वास दर्शक भाव व्यक्त करता का? प्रौढ जुगारी त्यांच्या जीवनातील कार्य व साध्यता—नोकऱ्या, धंदे, कुटुंबे, व काहीजण तर त्यांचे जीव देखील—जुगाराकरता त्यागतात याविषयी वाचून त्याची कल्पना करणे तुम्हाला कठीण वाटते का? एकाच रात्रीत जुगारामध्ये १५ लाख डॉलर जिंकल्यावर ७० लाख डॉलर हरेपर्यंत एक प्रौढ, सुशिक्षित व्यक्ती आणखी खेळत राहिली याचे मूलभूत कारण काय असावे हे तुम्ही समजू शकता का? पुष्कळ बाबतीत तो लोभ, फसव्या डॉलरचा पाठलाग असतो. तथापि, बहुतेकवेळा, ती जुगाराचीच शिरशिरी असते.
तुम्हाला लहान मुले आहेत, तर जुगार, प्रौढ व्यक्तींचा खेळ आहे असा विचार करून तुम्ही निश्चिंत आहात का? मग पुन्हा विचार करा. सामील होण्यास तयार असलेल्या किंवा आधीच या क्षेत्रात उतरलेल्या—नवीन तरुण सदस्यांचा विचार करा. वास्तविकता तुम्हाला चकित करतील.
अलीकडील वृत्तपत्रांमध्ये व नियतकालिकांमध्ये पुढील लेखांचे मथळे होते: “जुगार १९९० च्या दशकातील किशोरवयीनांचे व्यसन असण्याची अधिक शक्यता.” “अधिक युवक जुगाराचे व्यसनी.” “१९९० च्या दशकातील क्रॅक: मुलांना जुगाराचे व्यसन.” “माझा मुलगा जुगार खेळण्याचे थांबवू शकला नाही.”
आता, मथळ्यांखालील मजकूर वाचा. “अधिकारी या संकटसमयाचा आरोप राज्य तसेच चर्चने आयोजन केलेल्या जुगाराच्या वाढीवर लावतात,” असे एका वृत्तपत्राने लिहिले. “आज, सहजगत्या बळी पडणाऱ्या तरुण जणांकरता पैज लावणे अधिक सुलभ बनले आहे. तसेच ९० पेक्षा अधिक टक्के मनोविकृत प्रौढ जुगारी १४ वर्षांचे होण्याआधी ही सवय लावून घेतात असा इशारा विशेषज्ञ देतात,” असे त्या वृत्तपत्राने म्हटले. “अनेक मनोविकृत जुगारी सुमारे १४ वर्षांचे असताना जुगार खेळण्यास सुरवात करत असत. आता ९ किंवा १० वर्षांचे असतानाच जुगार सुरू करत असल्याचे आढळून येते,” अशी एक संशोधिका म्हणाली. “का? तर त्यांना संधी आहे,” अशी ती पुढे म्हणाली. “मुलांवर . . . सर्वत्र असणाऱ्या जुगाराच्या जाहिरातींचा भडिमार होतो. हा जुगार सामाजिकरित्या मान्य असलेली मजा आहे.” “तो जलद गतीने बिकट होत चालला आहे,” असे निनावी जुगारी या गटाच्या एका प्रतिनिधीने म्हटले. “मुले अतिशय लहान वयातच जुगार खेळण्याचे सुरू करत आहेत व पूर्वीपेक्षा अधिक जण यात गुरफटले जात आहेत.”
एका अमेरिकन राज्यात, किशोरवयीन जुगाऱ्यांच्या अभ्यासानुसार, सुमारे ३.५ टक्के संभवनीय मनोविकृत जुगारी होते; आणखी ९ टक्के “अधिक जोखीम पत्करणारे” जुगारी होण्याची शक्यता होती. “विशिष्टपणे, सामान्य प्रौढ लोकसंख्येपेक्षा युवकांमध्ये जुगाराचे उच्च प्रमाण आहे असे आकडेवारीने दाखवून दिले,” असे एका अमेरिकन महाविद्यालयातील सल्ला देणाऱ्या खात्याचे समन्वयक विल्यम सी. फिलिप्स यांनी म्हटले. “बहुधा, पुढील दशकात मादक पदार्थांच्या दुरुपयोगाच्या—विशेषतः अवैध मादक पदार्थांच्या दुरुपयोगाच्या समस्यांपेक्षा युवकांच्या जुगाराच्या अधिक समस्या आपल्यासमोर असतील,” असे दुसऱ्या एका व्यसन सल्लागाराने म्हटले. प्राध्यापक हेन्री लस्यूर यांनी माध्यमिक तसेच उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा अभ्यास केला. द लॉस ॲन्जेलीस टाईम्सने वृत्त दिले की, “त्यांचा शोध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षणासारखाच आहे: ज्यांनी आपल्या जुगारी कार्यहालचालीवरील नियंत्रण गमावले—असे ‘पॅथोलॉजिकल’ किंवा ‘मनोविकृत’ जुगारी ठरवण्यात आलेल्या किशोरवयीनांच्या टक्केवारींची सरासरी सबंध राष्ट्रातील किशोरवयीनांच्या लोकसंख्येच्या ५ टक्के आहे.”
जुगाराचे उपचारतज्ञ कबूल करतात, की त्यांना तरुण जुगाऱ्यांची संख्या नव्हे, तर “किशोरवयीन जुगाराविषयी मुलांची, पालकांची व शिक्षकांची देखील मनोवृत्ती” चिंताग्रस्त करते. “जुगार, ‘निरुपद्रवी करमणूक’ असून त्याचे परिणाम मादक औषधे व मद्यपान किंवा हिंसा वा अनिर्बंध संबंध यात गोवल्यामुळे होणाऱ्या परिणामांपेक्षा अतिशय कमी प्रमाणात गंभीर आहेत असा विचार अनेक मुले व त्यांचे पालक करतात.” परंतु वर्तणुकीचे सल्लागार, ड्यूरंड जेकब्स यांनी असा इशारा दिला की, जुगारामुळे युवकांना गुन्हेगारी, शाळा चुकवणे व सहजगत्या पैसे मिळवण्याची लालसा या गोष्टींची झळ लागू शकते.
उदाहरणार्थ, लहान वयातच जुगार खेळण्याचे सुरू केलेल्या एका माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्याचा विचार करा. शाळेमध्ये, वर्ग सुरू असताना इतर विद्यार्थ्यांसोबत जुगार खेळण्यात त्याने वेळ घालवला. तो हरला व त्याचे सर्व पैसे संपले तेव्हा, गरजवंत कुटुंबांकरता विद्यार्थ्यांनी अन्नाच्या टोकऱ्यांसाठी दान केलेल्या निधीतून त्याने पैसे चोरले. या चोरलेल्या पैशांचा जुगार खेळून आधीच्या जुगाराचे कर्ज फेडण्याकरता कुटुंबाचा गहाण ठेवलेला दूरदर्शन संच व गोमेदाची अंगठी, पुन्हा खरेदी करण्याची आशा त्याने धरली होती. तो ९ व्या इयत्तेत जाईपर्यंत, १,५०० डॉलर चोरल्याबद्दल त्याने आधीच २० दिवस बाल कारागृहात घालवले होते व डॉलर-ॲन्टे पोकर व ५ डॉलर रॅक पूल खेळण्याचा अतिशय नाद त्याला लागला होता. “मी मोठा होत गेलो तसे, ही रक्कम वाढतच गेली,” असे तो म्हणाला. लवकरच त्याचे जुगाराचे कर्ज फेडण्यासाठी तो शेजाऱ्यांकडून चोरी करू लागला. त्याची आई अतिशय निराश होती. वयाच्या १८ व्या वर्षापर्यंत तो मनोविकृत जुगारी बनला.
इंग्लंडमध्ये, जुगाराचे सौम्य नियम मुलांना स्लॉट यंत्रांवर खेळण्यास मान्यता देतात असे समाजशास्त्रज्ञ म्हणतात. अनेक मुले, विमानतळे व जुगारगृहांमध्ये त्यांच्या जुगार खेळण्याच्या व्यसनाचे खर्च भागवण्याकरता आपल्या पालकांकडील पैसे चोरतात आणि दुकानात चोरी करतात.
“माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयांच्या आवारात युवकांमध्ये जुगाराचा सर्वात लोकप्रिय व वाढता प्रकार म्हणजे [विद्यार्थ्यांमध्ये] खेळावर पैज लावणे, काहीवेळा शर्यतीत जुगाराचे पैसे स्वीकारणारे स्थानिक लोक देखील यास पाठबळ देतात,” असे जेकब्स म्हणाले. “मी असा अंदाज करीन की, माध्यमिक व विद्यालयाचे असे फारच अल्प आवारे आहेत जेथे सुव्यवस्थित व खेळासाठी मोठ्या रक्कमेची पैज लावली जात नाही.” याशिवाय पत्त्यांचे खेळ, लॉटरी व कॅसिनो आहेत जेथे किशोरवयीनांना ते प्रौढ दिसत असल्यामुळे प्रवेश दिला जातो.
“पुष्कळ लोक पुढे जाऊन मनोविकृत जुगारी बनले कारण किशोरवयीन असताना त्यांनी सुरवात केली तेव्हा ते जिंकत होते, हा एक महत्त्वपूर्ण मुद्दा सांगायचा आहे,” असे जेकब्स म्हणाले. “ते म्हणाले, तरुणांच्या ‘अत्याधिक बहुतांशाला’ जुगाराचा परिचय त्यांच्या पालकांकडून किंवा नातेवाईकांकडून झालेला होता ज्यांनी त्यास मजा व खेळ समजून त्याकडे दुर्लक्ष करून सूट दिली होती,” असे पुढे द लॉस अन्जेलीस टाईम्स म्हणाले. आणखी एका पदार्थ-दुरुपयोग सल्लागाराने म्हटले: “पालकांना मद्यपान व मादक पदार्थांच्या बाबतीत जो जुना विषय हाताळावा लागला तोच विचारात घेतला पाहिजे. माझ्या मते, जुगाराचा जितका विस्तार होईल तितकीच नवीन सदस्यांची भर मनोविकृत जुगाऱ्यांमध्ये पडेल.” मनोविकृत जुगाऱ्यांवर उपचार करणारे तज्ज्ञ म्हणतात, मादक औषधे व मद्याप्रमाणेच जुगाराचे व्यसन लागल्यावर अधिकाधिक लहान मुले चोऱ्या, मादक औषधांची विक्री व वेश्याव्यवसाय करून त्यांचे व्यसन भागवत आहेत. पालकांना, जुगार “मजा व खेळ” वाटत असावा परंतु पोलिस अधिकाऱ्यांना तसे वाटत नाही.
“ज्या मुलांना स्लॉट यंत्रांवर खेळण्याचे व्यसन लागले . . . त्यांनी प्रौढ मनोविकृत जुगाऱ्यांचे सर्व हानीकारक गुण प्रदर्शित केले. या स्लॉट यंत्रांवर खेळण्याचे व्यसन ज्या युवकांना लागले होते त्यांनी ९ किंवा १० वयाचे असताना त्याची सुरवात केली असावी. त्यांनी स्वतःच्या खर्चाकरिता दिलेले पैसे, शाळेत भोजनासाठी दिलेले पैसे व घरातील सुटे पैसे हे सर्व त्यात उडवले. एक किंवा दोन वर्षे झाल्यावर मुले वस्तूंची चोरी करू लागतात. स्वतःच्याच खोलीमधून बॅट, पुस्तके व रेकॉर्ड प्लेयरसारख्या मौल्यवान वस्तूंपर्यंत त्या मुलाचे सर्वकाही विकले जात होते: इतर मुलांना त्यांची खेळणीदेखील गायब झाल्याचे दिसून येत होते. घरातील कोणतीही वस्तू सुरक्षित नव्हती. निराश झालेल्या माता त्यांच्या वस्तू चोरल्या जाऊ नयेत म्हणून एकाच खोलीत त्या गोळा करून ठेवत असत किंवा झोपताना त्यांना त्यांच्या बॅगा खाटेखाली लपवून ठेवाव्या लागत होत्या, अशांबद्दल मुडीने ऐकले आहे. कोकिळ दुसऱ्या पक्ष्याच्या घरट्यात अंडी घालते त्यावेळी त्या पक्ष्याला काहीच कळत नाही त्याचप्रमाणे आपल्या मुलांना काय होत होते हे अशा वेडेपिसे झालेल्या मातांना कळत नव्हते. तरीसुद्धा, ही मुले कोठूनही कशीबशी चोरी करत होती. १६ वर्षांचे असतानाच पोलिस दारावर आलेले असतात.—डेवीड स्पॅनयर यांचे सहजगत्या मिळणारा पैसा: जुगाऱ्याच्या मनात डोकावून पाहणे.
या लेखांमध्ये दर्शवून दिल्याप्रमाणे, अनेक प्रौढ तसेच तरुणांना जुगाराचा परिचय त्यांच्या चर्चेसद्वारे करून देण्यात आला आहे—जसे बींगो, लॉटरी वगैरे. धार्मिक संस्थांनी व ख्रिस्ताचे अनुयायी असल्याचा दावा करणाऱ्या त्यांच्या नेत्यांनी कोणत्याही प्रकारच्या जुगाराला उत्तेजन, चालना किंवा प्रोत्साहन द्यावे का? मुळीच देऊ नये! जुगार हा प्रत्येक पैलूत मानवाच्या सर्वात वाईट गुणाला प्रवृत्त करतो, काही न देता काहीतरी मिळवण्याची अभिलाषा किंवा आणखी स्पष्टपणे सांगावयाचे, तर लोभ. त्यास चालना देणारे, लोकांना असे उत्तेजन देतात की, इतरांचा तोटा करून स्वतःचा फायदा करणे योग्य आहे. असे कृत्य कुटुंबाचे मोडकळीस येणे, नालस्ती, खराब प्रकृती व एखाद्याच्या जीवनाचा नाश होणे यास कारणीभूत ठरत असल्यास येशू त्यास चालना देईल का? कधीच नाही! त्याउलट, लोभिष्ट लोक देवाच्या राज्याचे वतन पावणार नाहीत असे देवाचे प्रेरित वचन स्पष्ट करते.—१ करिंथकर ६:९, १०.
कोणत्याही प्रकारचा जुगार चुकीचा आहे असे पालकांनी त्यांच्या मुलांना लहानपणीच शिकवले पाहिजे. त्यास मजा किंवा खेळ समजू नका तर आळशीपणा, खोटे बोलणे, फसणूक व अप्रामाणिकतेचा प्रारंभ असे समजा. पुष्कळ शहरांमध्ये निनावी जुगारी यासारखे मदत कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. याहूनही महत्त्वाचे म्हणजे, तुम्हाला समस्या असल्यास, देव वचन, बायबलमधील प्रेरित सल्ला प्राप्त करा. आत्महत्या करण्याचा विचार केलेले काहीजण असे म्हणतात, की असा प्रेरित सल्ला ऐकल्यामुळे ते जिवंत आहेत.
मनोरंजक गोष्ट अशी की, यहोवाच्या साक्षीदारांनी मनोविकृत जुगारात गुरफटलेल्या अनेकांना त्यातून मुक्त होण्यास मदत केली आहे. पूर्वी मनोविकृत जुगारी असलेल्या अशाच एका मनुष्याने लिहिले की, पुष्कळ वर्षे अशा व्यसनात तसेच खूप जुगार खेळण्यात घालवल्यावर, “यहोवाच्या साक्षीदारांसमवेत मी व माझी मैत्रीण बायबलचा अभ्यास करू लागलो त्यानंतर वर्तणुकीचे तत्कालिक व नाट्यमय बदल घडून येऊ लागले. जुगाराचे व्यसन लागले होते व त्यावर ताबा ठेवणे फार कठीण होते. यहोवाच्या मदतीने व माझ्या मैत्रीणीच्या आधाराने—सोबतच अभ्यास, प्रार्थना व मनन विशेषतः लोभाविषयी देवाच्या दृष्टिकोनावर मनन केल्याने—हे जुगाराचे व्यसन नियंत्रणामध्ये आले, आणि मी व माझी मैत्रीण जी आता ३८ वर्षांपासून माझी पत्नी आहे आम्ही दोघांनी यहोवाला आमचे जीवन समर्पित केले. अधिक गरज आहे तेथे व पूर्ण-वेळेच्या सेवेत आम्ही अनेक वर्षे काम केले असले व मी वॉचटावर संस्थेचा प्रवासी प्रतिनिधी या नात्याने कार्य केले असले, तरी मला अद्यापही जुगाराची आसक्ती आहे व ती केवळ यहोवाच्या मदतीने व मार्गदर्शनाने नियंत्रित आहे.”
जुगार तुमच्यासाठी एक समस्या असल्यास, तुम्ही या व्यसनातून मुक्त होऊ शकता का? होय, तुम्ही देवाच्या मदतीचा फायदा घेत राहिल्यास व त्याची गरज असलेल्या इतरांना ती दिल्यास मुक्त होऊ शकता.
[९ पानांवरील संक्षिप्त आशय]
लवकरच मादक औषधांपेक्षा युवकांच्या जुगाराविषयी अधिक समस्या असतील
[११ पानांवरील संक्षिप्त आशय]
लोभिष्ट व्यक्ती देवाच्या राज्याचे वतन पावणार नाहीत
[१० पानांवरील चौकट]
जुगाराच्या चिप्सचे लास वेगासच्या कॅथोलिक पवित्र स्थानी स्वागत
अति पवित्र मुक्तिदाताच्या पवित्र स्थानी अभ्यागत बहुधा पाळकांना असे विचारतात: “फादर, मी जिंकावे म्हणून तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना कराल का?”
करोडो लोक, जगाच्या सर्व भागातून दर वर्षी लास वेगास, नेवाडा, अमेरिका येथे जुगारासाठी येतात. या रोमन कॅथोलिक चर्चच्या उबदार रंगाने प्रकाशित केलेल्या देवळात, जेथे भिंतींवर येशूच्या जन्माचे, शेवटल्या भोजनाचे व क्रूसावर चढवल्याचे पुतळे आहेत, तेथे चर्चच्या राखीव बैठकींच्या ठिकाणी पैशांचा जुगार खेळला जातो: उपासक दान पात्रांमध्ये कॅसिनो चिप्स घालतात.
“नेहमी येथील एका पात्रात ५०० डॉलरची चिप आपल्याला मिळेल,” असे या पवित्र स्थानातील लेअरी पाळक आयरीश लकबीने हळू आवाजात म्हणाले.
लास वेगास पट्ट्याच्या वरच्या भागात, अनेक दशकांपर्यंत उपासक एका रोमन कॅथोलिक चर्चमध्ये जात होते, पण जगातील सर्वात मोठे चार हॉटेल-कॅसिनो—एमजीएम ग्रँड, लॅक्सर, एक्सकॅलिबर व ट्रॉपीकॅना—हे त्या पट्ट्याच्या दक्षिण टोकाला बांधण्यात आले तेव्हा, अति पवित्र मुक्तिदाताचे नवीन पवित्र स्थान, एक ब्लॉक सोडून नंतरच्या ब्लॉकमध्ये बांधण्यात आले.
असे का केले हे पाळकांना विचारल्यावर, ते म्हणाले: “का करू नये? तेथेच तर लोक असतात.”
तेथेच पैसा देखील असतो. मग असे का करू नये?
[पानांवरील चित्र ९]
जुगार कुसंगतीकडे नेतो