माझ्या वडिलांना “अणू-बॉम्ब स्फोटाने तुरुंगातून बाहेर पाठवले”
ऑगस्ट ६, १९४५ रोजी सकाळी ८:१५ वाजता हिरोशिमा, जपान येथे बॉम्ब स्फोट झाला. त्यामुळे संपूर्ण शहर उद्ध्वस्त झाले आणि लाखो लोक मृत्युमुखी पडले. माझ्या वडिलांनी सम्राटाची उपासना करण्यास आणि जपानच्या लष्कराला पाठिंबा देण्यास नकार दिला होता म्हणून ते त्या वेळी हिरोशिमाच्या तुरुंगात होते.
त्या अविस्मरणीय सकाळी काय घडले याचे वडील नेहमी वर्णन करीत असत. ते म्हणाले, “अचानक माझ्या खोलीतील छतावर प्रकाश चमकला. मग मी एक फार मोठा आवाज ऐकला जणू सगळे पर्वत एकाच वेळी कोसळले होते. लगेचच खोली गडद अंधःकाराने भरली. मग तो काळाकुट्ट धूर टाळण्यासाठी मी माझे डोके बिछान्याखाली घातले.
“सात ते आठ मिनिटांनंतर मी डोके बाहेर काढल्यावर ‘धूर’ निघून गेला होता. पुन्हा एकदा प्रकाश झाला. फडताळावरील सर्व वस्तू आणि पुष्कळ माती खाली पडली होती व सगळीकडे अगदी पसाराच झाला होता. तुरुंगाभोवती उंच भिंत असल्यामुळे, बाहेरची आग आत शिरली नव्हती.
“मी मागच्या खिडकीतून पाहिले आणि मला धसकाच बसला! तुरुंगाचे कारखाने आणि लाकडी इमारतींचा चुराडा होऊन ते भुईसपाट झाले होते. मग मी समोरच्या लहान खिडकीतून पाहिले. समोरच्या इमारतीतील खोल्यांचा सर्वनाश झाला होता. वाचलेले कैदी मदतीसाठी ओरडत होते. सगळीकडे भीती आणि घबराट होती—पूर्ण गोंधळ आणि भयाचे दृश्य होते.”
लहान असताना वडील ज्याला “अणू-बॉम्ब स्फोटाने तुरुंगातून बाहेर पाठवले” असे म्हणत, ते ऐकण्यास मला मजा वाटत असे. मला ही कहाणी सांगताना त्यांना मुळीच दोषी वाटत नव्हते कारण त्यांना अन्यायाने तुरुंगात टाकले होते. वडिलांवर लावलेल्या आरोपांबद्दल आणि तुरुंगवासाच्या वर्षांमध्ये त्यांना कशाप्रकारे वागवले याबद्दल सांगण्याआधी, त्यावेळी टोडायशॉच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या जपानमधील वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रक्ट सोसायटीच्या संपर्कात माझे पालक कसे आले ते मी स्पष्ट करतो.
उद्देशाचा शोध करणे
वडील एक अतिउत्साही पुस्तकप्रेमी होते आणि जीवनात फारच लवकर त्यांनी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न केला. प्राथमिक शाळेत इयत्ता पाचवीत असतानाच, ते ईशान्य जपानमधील ईशीनोमोरी येथील त्यांच्या घरातून पळून गेले. एका वेळेच्या तिकिटापुरतेच पैसे त्यांच्याजवळ होते, त्यांनी टोक्योला जाणारी ट्रेन पकडली व तेथे जाऊन जपानचे दोनवेळा प्रधान मंत्री झालेल्या शेगेनोबू ओकुमॉ यांच्याकडे नोकर म्हणून काम करण्याचे ठरवले होते. परंतु श्री. ओकुमॉच्या घरी गेलेल्या या गबाळ्या अवतारातील गांवढळ मुलाकडे पाहूनच त्याची नोकरीची विनंती नाकारण्यात आली. नंतर वडील एका दूधकेंद्रातच राहून काम करू लागले.
किशोरावस्थेत असतानाच, माझे वडील राजकारणी पुढारी आणि विद्वानांच्या भाषणांसाठी उपस्थित राहू लागले. एका भाषणात बायबल हे महत्त्वपूर्ण पुस्तक असल्याचे सांगण्यात आले. यास्तव, वडिलांनी संदर्भ आणि ॲटलास असलेले बायबल आणले. त्यांनी जे वाचले त्यामुळे त्यांच्यावर खोल प्रभाव पडला आणि सर्व मानवजातीला लाभ होईल असे काम करण्यास त्यांना चालना मिळाली.
शेवटी, वडील घरी परतले आणि एप्रिल १९३१ मध्ये म्हणजेच, ते २४ वर्षांचे असताना, त्यांचा १७ वर्षाच्या हॉगीनोबरोबर विवाह झाला. वडिलांचा विवाह झाल्यावर लगेचच त्यांच्या एका नातलगाने टोडायशॉने प्रकाशित केलेले साहित्य त्यांना पाठवले. वाचलेल्या गोष्टींनी प्रभावित होऊन, वडिलांनी टोक्योमधील टोडायशॉला पत्र लिहिले. जून १९३१ मध्ये सेंडायच्या मॉत्सू इशी या नावाच्या पूर्ण-वेळेच्या सेविकेने त्यांची इशीनोमोरी येथे भेट घेतली.a वडिलांनी तिच्याकडून काही पुस्तके घेतली ज्यामध्ये देवाची वीणा (इंग्रजी), निर्मिती (इंग्रजी) आणि सरकार (इंग्रजी) यांचाही समावेश होता.
जीवनात उद्देश मिळवणे
लगेचच वडिलांना हे समजले की, मनुष्याला अमर जीव आहे, दुष्ट लोक नरकात सर्वकाळ जळत असतात आणि निर्माणकर्ता एक त्रैक्य देव आहे अशा चर्चच्या विविध शिकवणी खोट्या आहेत. (उपदेशक ९:५, १०; यहेज्केल १८:४; योहान १४:२८) या जगाचा अंत होईल हे देखील त्यांना कळाले. (१ योहान २:१७) काय करावे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी, टोडायशॉच्या नियुक्त प्रतिनिधीशी संपर्क साधला. ते, वडिलांना ऑगस्ट १९३१ मध्ये भेटले, त्यांच्या चर्चेचा परिणाम असा झाला की, वडिलांनी बाप्तिस्मा घेऊन यहोवाचा पूर्ण-वेळेचा सेवक होण्याचा निर्णय घेतला.
पुष्कळ वादविवादांनंतर आईला देखील हे पटले की, ती बायबलमधून शिकत असलेल्या गोष्टी सत्य आहेत. तिने तिचे जीवन यहोवाला समर्पित केले आणि ऑक्टोबर १९३१ मध्ये तिचा बाप्तिस्मा झाला. वडिलांनी त्यांच्या सर्व मालमत्तेचा लिलाव केला तेव्हा त्यांना खूळ लागले असे त्यांच्या नातेवाईकांना वाटले.
पूर्ण-वेळेचे सेवक या नात्याने जीवन
लिलाव केल्यावर मिळालेले सर्व पैसे वडिलांनी त्यांच्या आईला दिले आणि वडील व आई नोव्हेंबर १९३१ मध्ये टोक्यो येथे गेले. राज्याच्या सुवार्तेविषयी लोकांशी कसे बोलावे याबद्दल त्यांना सूचना मिळालेल्या नसतानाही, तेथे पोहंचल्यानंतर दुसऱ्या दिवसापासूनच ते प्रचार करू लागले.—मत्तय २४:१४.
त्यांचे जीवन आरामदायक नव्हते. विशेषकरून ते माझ्या आईसाठी अधिक कठीण होते जी त्यावेळेस केवळ १७ वर्षांची होती. तेथे सह-साक्षीदार, सभा आणि मंडळ्या नव्हत्या—केवळ सकाळी ९:०० पासून संध्याकाळी ४:०० वाजेपर्यंत बायबल साहित्याचे वाटप करण्याचे दैनिक कार्य होते.
१९३३ मध्ये त्यांची प्रचाराची नेमणूक टोक्योतून कोब येथे बदलण्यात आली. तेथे फेब्रुवारी ९, १९३४ मध्ये माझा जन्म झाला. माझा जन्म होण्याआधीच्या महिन्यापर्यंत माझ्या आईने सेवाकार्यात आवेशाने कार्य केले. त्यानंतर, माझे पालक यॉमॉगुची, युबे, क्युरे आणि शेवटी हिरोशिमा येथे पोहंचले. त्यांनी प्रत्येक ठिकाणी सुमारे एक-एक वर्ष प्रचार केला.
माझ्या पालकांना अटक करण्यात आले
जपानी लष्कर वाढले तसे, वॉचटावर संस्थेच्या प्रकाशनांवर बंदी आणली गेली आणि साक्षीदारांवर खास गुप्त सेवा पोलिसांकडून कडक पहारा ठेवण्यात आला. मग, जून २१, १९३९ रोजी जपानमध्ये सर्व यहोवाच्या साक्षीदारांच्या पूर्ण-वेळेच्या सेवकांना गोळा करण्यात आले. अटक केलेल्यांमध्ये आईवडील होते. माझी काळजी घेण्यासाठी मला इशीनोमोरी येथे राहणाऱ्या माझ्या आजीकडे पाठवण्यात आले. आठ महिन्यांसाठी डांबून ठेवल्यावर, माझ्या आईला मुक्त करण्यात आले आणि तिच्यावर कडक पहारा ठेवण्यात आला. शेवटी, १९४२ मध्ये मी तिच्याबरोबर सेंडाय येथे येऊन राहू शकलो.
या कालावधीत, इतर साक्षीदारांबरोबर हिरोशिमा पोलिस स्टेशन येथे वडिलांची गुप्त पोलिसांकरवी चौकशी झाली. साक्षीदारांनी सम्राटाची उपासना करण्यास किंवा जपानच्या लष्कराला पाठिंबा देण्यास नकार दिल्यामुळे, त्यांना फार वाईटरीतीने मारहाण केली गेली. प्रश्नकर्ता वडिलांना यहोवाची सेवा करण्यापासून ढळवू शकला नाही.
दोन वर्षांपेक्षा अधिक तुरुंगवासानंतर, वडिलांना कोर्टात उभे केले गेले. एका बैठकीत न्यायाधीशाने विचारले: “म्युरा, तुला राजेसाहेब, सम्राटाविषयी काय वाटते?”
“राजेसाहेब, सम्राट देखील आदामाचे वंशज आहेत आणि ते देखील मर्त्य, अपरिपूर्ण मनुष्य आहेत,” असे वडिलांनी उत्तर दिले. कोर्टातील लघुलेखक इतका आश्चर्यचकित झाला की, याची नोंद तो करूच शकला नाही. त्याचे काय आहे की, त्या वेळी बहुतेक जपानी लोक सम्राट हा देव असल्याचे मानत होते. वडिलांना पाच वर्षांसाठी तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आणि न्यायाधीशाने त्यांना सांगितले की, जोपर्यंत ते त्यांचा विश्वास त्यागणार नाहीत तोपर्यंत त्यांना उरलेले आयुष्य तुरुंगातच काढावे लागेल.
त्यानंतर लगेचच, डिसेंबर १९४१ मध्ये, जपानने पर्ल हार्बर, हावाई येथे अमेरिकेवर हल्ला केला. तुरुंगात अन्नाचा तुटवडा पडला आणि हिवाळ्याच्या महिन्यांमध्ये, पुरेसे कपडे नसल्यामुळे वडिलांना थंडीच्या वातावरणात जागरणाच्या रात्री काढाव्या लागल्या. सर्व तऱ्हेच्या आध्यात्मिक सहवासापासून संबंध तुटलेला असतानाही, ते तुरुंगातील पुस्तकालयातून बायबल मिळवू शकत होते आणि त्याला वारंवार वाचल्यानेच त्यांनी आपली आध्यात्मिक शक्ती टिकवून ठेवली.
बॉम्ब पडला तेव्हा
ऑगस्ट ६, १९४५ रोजी भल्या पहाटेच एका कैद्याला वडिलांसोबत पुस्तके अदलूनबदलून घ्यायची होती. यासाठी मनाई होती परंतु त्याने त्याचे पुस्तक वडिलांच्या खोलीत सरकून दिलेच होते त्यामुळे वडिलांनीही त्यांचे पुस्तक त्याच्या खोलीत सरकवले. यासाठी, त्या सकाळी आपला नेहमीचा न बदलणारा क्रम अनुसरण्याऐवजी, बॉम्ब पडला तेव्हा वडील वाचत होते. नाहीतर, बहुधा त्या सकाळच्या वेळी ते त्यांच्या खोलीतील शौचालयात असत. स्फोटानंतर वडिलांनी पाहिले की, पडझड होऊन शौचालयाच्या जागेचा संपूर्ण नाश झाला होता.
त्यानंतर, वडिलांना जवळच्या इवॉकुनी तुरुंगात नेण्यात आले. त्यानंतर लागलीच, जपानने दोस्त राष्ट्रांपुढे शरणागती पत्करली व या युद्धानंतरच्या गोंधळात त्यांची तुरुंगातून सुटका झाली. ते डिसेंबर १९४५ मध्ये इशीनोमोरी येथे घरी परतले. त्यांची तब्येत ढासळली होती. ते केवळ ३८ वर्षांचे होते परंतु एखाद्या म्हाताऱ्या मनुष्याप्रमाणे दिसत होते. सुरवातीला ते माझेच वडील होते यावर माझा विश्वासच बसेना.
त्यांचा विश्वास अजूनही मजबूत
जपानमध्ये गोंधळाची परिस्थिती असल्यामुळे, उरलेले काही विश्वासू साक्षीदार कोठे विखुरलेले होते ते आम्हाला माहीत नव्हते. तसेच आम्हाला यहोवाच्या साक्षीदारांचे कोणतेच साहित्य उपलब्ध नव्हते. तरीसुद्धा, यहोवाच्या राज्याविषयी, नवीन जगाविषयी आणि येणाऱ्या हर्मगिदोन युद्धाविषयीच्या सत्याबद्दल वडिलांनी मला थेट बायबलमधून शिकवले.—स्तोत्र ३७:९-११, २९; यशया ९:६, ७; ११:६-९; ६५:१७, २१-२४; दानीएल २:४४; मत्तय ६:९, १०.
त्यानंतर मला माध्यमिक शाळेत उत्क्रांतीची शिकवण दिल्यानंतर मी देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका करू लागलो. पण माझ्या वडिलांनी मला देवाच्या अस्तित्वाची खात्री पटवण्याचा प्रयत्न केला. मी तसा विश्वास ठेवण्यास कचरू लागलो तेव्हा त्यांनी शेवटी असे म्हटले: “जगातील पुष्कळ लोकांनी युद्धाला पाठिंबा दिला आणि ते रक्त सांडण्याबद्दल दोषी ठरले. परंतु मी बायबल सत्याला चिकटून राहिलो व लष्कर, सम्राटाची उपासना किंवा युद्धाला पाठिंबा कधीच दिला नाही. यास्तव, जीवनाचा सत्य मार्ग जो तुला अनुसरायचा आहे तो कोणता आहे त्याबद्दल तू स्वतःसाठी काळजीपूर्वक विचार कर.”
माझ्या वडिलांनी जे शिकवले आणि ज्याचे अनुसरण केले ते माहीत असल्यामुळे व त्याची तुलना मी शाळेत जे शिकत होतो त्याच्याशी केल्याने, मला असे दिसून आले की, उत्क्रांतीच्या सिद्धांताविषयी विचार करणे उचित नसेल. कोणत्याही उत्क्रांतीवाद्याने त्याच्या विश्वासासाठी आपले जीवन धोक्यात घातले नाही पण माझे वडील आपल्या विश्वासासाठी मरण्यासही तयार होते.
युद्ध संपल्याच्या पाच पेक्षा अधिक वर्षांनंतर म्हणजेच, मार्च १९५१ मध्ये वडील एके दिवशी ऑसॉही वर्तमानपत्र वाचत होते. अचानक ते मोठ्याने ओरडले: “अरे, ते आले, ते आले!” त्यांनी मला वर्तमानपत्र दाखवले. नुकतेच ओसाका येथे आलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या पाच मिशनऱ्यांबद्दल तो लेख होता. अत्यानंद झालेल्या माझ्या वडिलांनी वर्तमानपत्राशी संपर्क साधला आणि मग त्यांना समजले की यहोवाच्या साक्षीदारांनी टोक्योमध्ये एक शाखा दप्तर स्थापले होते. त्यांनी पत्ता मिळवला आणि शाखेला भेट दिली व अशाप्रकारे यहोवाच्या संघटनेशी पुन्हा संपर्क साधला.
शेवटपर्यंत विश्वासू
आमचे कुटुंब १९५२ मध्ये सेंडाय येथे आले. वॉचटावर संस्थेचे मिशनरी डॉनल्ड व मेबल हॅसलेट हे देखील त्याच वर्षी तेथे आले आणि त्यांनी टेहळणी बुरुज अभ्यास घेण्यास एक घर भाड्याने घेतले. केवळ चौघेच त्या पहिल्या सभेसाठी उपस्थित होते—हॅसलेट जोडपे, माझे वडील आणि मी. त्यानंतर शेनेची आणि मॉसॉको तोहारा, ॲडलाईन नॉको आणि लील्यन सॅमसन हे सेंडायमध्ये मिशनरी या नात्याने हॅसलेट जोडप्याला येऊन मिळाले.
या मिशनऱ्यांच्या सहवासाने आमचे कुटुंब देवाच्या वचनाच्या आणि त्याच्या संघटनेच्या ज्ञानात वाढत गेले. युद्धकाळात ज्या घटना घडल्या त्यामुळे आईचा विश्वास डगमगला होता. परंतु, लवकरच सभांना जाण्यास आणि क्षेत्र कार्यात सहभाग घेण्यास ती आमच्याबरोबर येऊ लागली. मला यहोवा देवाची सेवा करण्यास आपले जीवन समर्पित करण्यास चालना मिळाली व एप्रिल १८, १९५३ रोजी माझा बाप्तिस्मा झाला.
युद्धानंतर, वडील एका विमा कंपनीसाठी सेल्समन या नात्याने काम करत होते. मूत्रपिंडाचा रोग आणि उच्च रक्तदाबासारख्या तुरुंगवासाच्या परिणामांनंतरही पायनियर या नात्याने पूर्ण-वेळेची सेवा पुन्हा सुरु करावी अशी त्यांची तीव्र इच्छा होती. माझा बाप्तिस्मा झाला त्या वेळी त्यांनी तसे केले. ढासळत्या आरोग्यामुळे ते अधिक काळ पायनियर या नात्याने कार्य करू शकले नाहीत, तरी सेवेबद्दलचा त्यांचा आवेश पाहून मी विश्वविद्यालयीन शिक्षण सोडून पूर्ण-वेळेची सेवा हे उद्दिष्ट निवडण्यास प्रवृत्त झालो.
नागोयाच्या, इसॉमू सुगीयुरा या उत्तम तरुण व्यक्तीला माझा पायनियर सोबती या नात्याने नियुक्त करण्यात आले. मे १, १९५५ रोजी आम्ही, क्युशू बेटावर बेप्पू येथे खास पायनियर या नात्याने आमची सेवा सुरु केली. त्यावेळी त्या सबंध बेटावर केवळ थोडकेच साक्षीदार होते. आता, ३९ वर्षांनंतर, येथे आध्यात्मिकरित्या वाढत असलेले १५ विभाग आहेत आणि सबंध बेटावर १८,००० पेक्षा अधिक साक्षीदार आहेत. तसेच संपूर्ण जपानमध्ये आता सुमारे २,००,००० साक्षीदार आहेत.
इसॉमू आणि मला १९५६ च्या वंसत ऋतुत अमेरिकेत वॉचटावर बायबल स्कूल ऑफ गिलियड यास उपस्थित राहण्यास आमंत्रण मिळाले. आम्ही पुलकित झालो. परंतु प्रवासाच्या तयारीत मी शारीरिक तपासणी केल्यावर मला क्षयरोग झाल्याचे डॉक्टरांना कळाले. खूपच निराश होऊन मी सेंडाय येथे घरी परतलो.
तोपर्यंत वडिलांची तब्येत अधिकच खालावली होती व ते घरीच बिछान्यात पडून होते. आमचे टटामी चटईने बनवलेले भाड्याचे घर म्हणजे, नऊ चौरस मीटरची एकच खोली होती. माझे वडील व मी जवळजवळच निजत होतो. वडील काम करू शकत नसल्यामुळे आईला आमच्या आर्थिक गरजांची काळजी घेण्यात फारच कठीण दिवस घालवावे लागले.
जानेवारी, १९५७ मध्ये, वॉचटावर संस्थेचे त्या वेळचे उपाध्यक्ष, फ्रेड्रिक डब्ल्यू. फ्रान्झ यांनी जपानला भेट दिली व क्योटो येथे घेतल्या जाणाऱ्या खास अधिवेशनाची योजना करण्यात आली. वडिलांनी माझ्या आईला उपस्थित राहण्यास गळ घातली. आम्हाला आजारी अवस्थेत सोडून जाण्यास आई कचरत होती तरी तिने वडिलांचे ऐकले आणि ती अधिवेशनाला उपस्थित राहण्यास गेली.
त्यानंतर वडिलांची तब्येत दिवसानुदिवस बिघडत गेली. आम्ही एकमेकांच्या शेजारी झोपून असताना, मला काळजी वाटू लागली आणि आपला चरितार्थ कसा चालेल असे मी त्यांना विचारले. त्यावर त्यांनी उत्तर दिले: “आपण यहोवा देवाची सेवा केली आहे, त्यासाठी आपले जीवनही धोक्यात घातले व तो सर्वसमर्थ देव आहे. तू काळजी का करतोस? आपल्या आवश्यक वस्तू यहोवा नक्कीच पुरवील.” मग त्यांनी मला खूपच प्रेमळपणे सल्ला दिला व म्हटले: “स्वतःमध्ये अधिक मजबूत विश्वास उत्पन्न कर.”
मार्च २४, १९५७ रोजी, वडिलांचा मृत्यू झाला. त्यांच्या दफनविधीनंतर ते काम करत असलेल्या विमा कंपनीमध्ये मी सर्व गोष्टींची पूर्ती करण्यासाठी तेथे गेलो. मी तेथून निघत असताना, शाखेच्या व्यवस्थापकाने मला एक पाकीट दिले आणि म्हटले: “हे तुझ्या वडिलांचे आहे.”
घरी परतल्यावर, मला त्यात एक मोठी रक्कम मिळाली. नंतर मी व्यवस्थापकाला विचारले तेव्हा त्यांनी म्हटले की, ते पैसे विम्याच्या हप्त्यातले होते जे दर महिन्याला वडिलांच्या नकळत त्यांच्या पगारातून कापले जात होते. अशाप्रकारे, “आपल्या आवश्यक वस्तू यहोवा नक्कीच पुरवील,” हे वडिलांचे शब्द खरे ठरले. यामुळे, यहोवाच्या संरक्षक काळजीबद्दल माझा विश्वास अधिकच बळकट झाला.
दशकांची अखंड सेवा
त्या पैशांमुळे झालेल्या भौतिक साहाय्याने मला घरी असताना प्रकृती सुधारण्याकडे अधिक लक्ष देण्यास मदत मिळाली. एका वर्षानंतर, १९५८ मध्ये आईला आणि मला खास पायनियर म्हणून नेमण्यात आले. त्यानंतर मी जपानमध्ये प्रवासी पर्यवेक्षक या नात्याने कार्य केले आणि मग, १९६१ मध्ये मला ब्रुकलिन, न्यूयॉर्क येथे यहोवाच्या साक्षीदारांच्या जागतिक मुख्यालयात गिलियड प्रशालेच्या दहा महिन्याच्या उपक्रमासाठी उपस्थित राहण्याची सुसंधी प्राप्त झाली.
जपानला परतल्यावर, मी पुन्हा प्रवासी पर्यवेक्षक या नात्याने मंडळ्यांची सेवा करू लागलो. नंतर, १९६३ मध्ये मी, टोक्यो येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दप्तरात काम करीत असलेल्या यॉसूको हॉबॉ, हिच्याशी विवाह केला. ती १९६५ पर्यंत माझ्यासोबत प्रवासी कार्यात होती व त्यावेळी आम्हाला टोक्योच्या शाखा दप्तरात सेवा करण्यासाठी आमंत्रण मिळाले. तेव्हापासून आम्ही एकत्र सेवा करीत आलो आहोत—प्रथम टोक्यो येथील शाखेत, नंतर नुझॉमू आणि आता एबीनॉ येथे.
आईने १९६५ पर्यंत खास पायनियर या नात्याने कार्य केले. तेव्हापासून ती बायबलचे सत्य स्वीकारण्यास पुष्कळांना मदत करण्यात सक्रिय राहिली आहे. आता ती ७९ वर्षांची आहे परंतु त्या मानाने तिची प्रकृती अजूनही मजबूत आहे. ती जवळच राहते व एबीनॉ शाखा दप्तराजवळच्या मंडळीत जेथे आम्ही जातो तेथेच तीही येते याचा आम्हाला आनंद वाटतो.
हिरोशिमामध्ये झालेल्या बॉम्ब स्फोटातून वडील वाचले यासाठी आम्ही यहोवा देवाचे खूप आभार मानतो. त्यांनी आपला विश्वास टिकवून ठेवला. त्यांचे नवीन जगात स्वागत करण्याची आणि त्यांना जे पाहण्याची खूप इच्छा होती त्या हर्मगिदोन युद्धातून आम्ही कसे वाचलो ते सांगण्याची माझी खूप मनसा आहे. (प्रकटीकरण १६:१४, १६; २१:३, ४)—त्सूतोमू म्युरा यांनी निवेदित केल्याप्रमाणे. (g94 10/8)
[तळटीपा]
a मॉत्सू इशीच्या जीवनकथेसाठी कृपया मे १, १९८८ चे द वॉचटावर पृष्ठे २१-५ पाहा.
[१२ पानांवरील चित्रं]
कात्सूओ आणि हॉगीनो म्युरा आपला मुलगा, त्सूतोमू याच्याबरोबर
[१६ पानांवरील चित्रं]
जपानच्या शाखा दप्तरात त्सूतोमू म्युरा काम करत असताना
[१४ पानांवरील चित्राचे श्रेय]
Hiroshima Peace and Culture Foundation from material returned by the United States Armed Forces Instititue of Pathology