शिष्टाचार ‘नव नीतीने’ धिक्कारलेला?
‘जे वाईटाला बरे, जे प्रकाशाला अंधकार, गोड ते कडू मानितात त्यांस धिक्कार असो.’—यशया ५:२०.
या विसाव्या शतकाने शिष्टाचार व नैतिकता यामध्ये झपाट्याने बदल पाहिले आहेत. दोन महायुद्धानंतरच्या दशकांमध्ये जुनी मूल्ये हळुवारपणे टाकाऊ असल्याचे समजण्यात येऊ लागले. बदलती परिस्थिती तसेच मानवी स्वभाव व विज्ञान यात सामोऱ्या आलेल्या नवनवीन सिद्धांतामुळे जुनी मूल्ये आता अनावश्यक आहेत अशी पुष्कळांची खात्री करून देण्यात आली. एके काळी उच्च समजले जाणारे शिष्टाचार आता अडथळा आणणारी नकोशी वस्तू झाली आहे. एके काळी आदराने पाहिली जाणारी बायबलची मार्गदर्शक तत्त्वे जुनी म्हणून धिक्कारण्यात आली. ती, या २० व्या शतकाच्या अत्याधुनिक लोकांच्या बेताल व स्वतंत्र समाजाकरता खूपच बंधनकारक होती.
मानवी इतिहासाला कलाटणी देणारा हा अभूतपूर्व बदल १९१४ या वर्षाने पाहिला. इतिहासकारांनी हे वर्ष तसेच पहिल्या जागतिक युद्धाबद्दल केलेली लिखाणे, १९१४ हे महत्त्वपूर्ण बदल घडवून आणणारे, मानवी इतिहासातील युगात भिन्नतादर्शक रेषा ओढणारे, अशाप्रकारच्या परीक्षणांनी ओतप्रोत भरली आहेत. युद्धापाठोपाठ तो १९२० च्या दशकाचा काळ आला आणि लोकांनी युद्ध काळादरम्यान जी मजा चुकवली होती तिची उणीव भरून काढू लागले. सुखविलासात अतिरंजकता मिळवण्यासाठी जुनी मूल्ये व गैरसोयीची नैतिक बंधने दूर झुगारण्यात आली. त्याऐवजी, शारीरिक गोष्टींचा स्वैर पाठलाग करणारी नवनीती अनौपचारिकपणे उभारण्यात आली. यात काहीही चालण्याजोगे आहे अशी धारणा मूलतः समाविष्ट होती. यातील नव्या नीतीनियमांनी शिष्टाचारांचा अपरिहार्य बदल अनुसरला.
याबद्दल इतिहासकार फ्रेड्रिक लुईस ॲलन हे विवेचन देतात: “या क्रांतीचा आणखी एक परिणाम असा झाला की, शिष्टाचार हा केवळ वेगळाच नव्हे, तर—थोड्या वर्षांसाठी—अशिष्टाचार बनला. . . . या दशकादरम्यान यजमाणिंना दिसले की, येताना व जाताना पाहुणे त्यांना अभिवादन करण्याकडे विशेष लक्ष देत नव्हते; नाचगाण्यात कोणीही आमंत्रणाविना यावे व सहभाग घ्यावा ही रीतच बनली; सायंकाळच्या जेवणाला उशिरा येण्याची तऱ्हा बनली, सिगारेटची जळती थोटुके आणि तिची राख त्याबद्दल दिलगिरी व्यक्त न करता जमिनीवर तशीच टाकण्यात येऊ लागली. जुनी बंधने नाहीशी झाली होती, नवी तयार करण्यात आली नव्हती त्यामुळे लोक कुरणातील डुकरांप्रमाणे स्वैर झाले होते. कधी काळी, कदाचित युद्धानंतरच्या दहा वर्षांना वाईट शिष्टाचाराचे दशक असे योग्यपणे म्हटले जाऊ शकते. . . . ते दशक कुशिष्टाचाराचे होते तर ते दुःखीही होते. जुन्या व्यवस्थेबरोबरच जीवनास समृद्ध व अर्थभरीत करणारी मूल्येही नाहीशी झाली आणि पर्यायी नीतीमूल्ये सहजपणे मिळू शकली नाही.”
जीवनाला समृद्ध व अर्थभरीत बनवणारी पर्यायी मूल्ये आढळलीच नाहीत. त्यांचा पाठलाग करण्यात आला नाही. काहीही चालण्याजोगे आहे अशा १९२० च्या दशकातील आरंभलेल्या जीवन शैलीने लोकांना नैतिक निर्बंधांपासून मुक्त केले व याचीच ते अपेक्षा करत होते. ते नैतिकता बाजूला सारत नव्हते तर त्यात सुधारणा करीत होते, तिला थोडेसे सैल बनवीत होते. कालांतराने त्यांनी तिला नव नीती हे नाव दिले. यामध्ये ज्याला जे बरे दिसते ते तो आचरतो. स्वतःची आस्था, स्वतःचे कल्याण तो पाहतो. स्वतःला जे पसंत वाटते तेच तो करतो. तो स्वैराचाराचा मार्ग घेतो.
त्याला तसे वाटते. पण, खरे पाहता, साधारण तीन हजार वर्षांआधी शहाणा राजा शलमोनाने म्हटले: “भूतलावर नवे म्हणून काहीच नाही.” (उपदेशक १:९) याच्याही आधी शास्त्यांच्या काळी, इस्राएलांनी, आपण देवाच्या आज्ञा पाळाव्या किंवा पाळू नये याबद्दल स्वतंत्रता अनुभवली होती: “त्या काळी इस्राएलाला कोणी राजा नव्हता; ज्याला जसे बरे दिसे तसे तो करी.” (शास्ते २१:२५) तथापि, बहुतेकांनी नियमशास्त्राकडे कान देण्याचे टाळले. अशाप्रकारची पेरणी केल्यावर इस्राएलाने शेकडो वर्षे राष्ट्रीय पारिपत्याची कापणी केली. याचप्रमाणे, आज राष्ट्रांनी यातना व त्रासाची कापणी कित्येक शतके मिळवली आहे—आणि याहूनही अधिक वाईट अजूनही यायचे आहे.
नव नीतीची अधिक स्पष्टता करणारी आणखी एक संज्ञा आहे व ती म्हणजे “सापेक्षता.” याचा वेबस्टर्स नाईन्थ न्यू कॉलेजिएट डिक्शनरी असा अर्थ देते: “नैतिक सत्ये, ती जोपासणाऱ्या व्यक्तींवर किंवा गटांवर अवलंबून असतात हा दृष्टिकोन.” थोडक्यात सांगायचे तर हे सापेक्षतावादी म्हणतात की, जे काही त्यांच्यासाठी चांगले वाटते तेच त्यांच्यासाठी नैतिक आहे. सापेक्षतेबद्दल अधिक विस्तारीतपणे बोलताना एका लेखकाने म्हटले: “सापेक्षता बऱ्याच काळ दडून राहिली होती, ती एकाएकी सत्तरीच्या दशकात ‘मी-पणा दशक’ या सर्वत्र आढळणाऱ्या तत्त्वज्ञानाच्या रुपात वर आली; ती अद्याप ऐंशीच्या दशकात मध्यमवर्गीय चैनबाज युवकांवर आपले वर्चस्व राखून आहे. आम्ही सांप्रदायिक मूल्यांची अद्यापही वरवर स्तुती करीत असू, पण प्रत्यक्षात, मला जे चांगले वाटते तेच बरोबर आहे.”
यामध्ये शिष्टाचारही समाविष्ट आहेत—‘ते मला पसंत पडले, तर मी ते करीन; नाही तर करणार नाही. तुम्हाला तो शिष्टाचार वाटत असेल, पण तो मला योग्य वाटणार नाही. ते माझे श्रेष्ठ व्यक्तिमत्व नष्ट करील, मला दुर्बळ भासवील, मला त्राण नसल्यासारखे करील.’ अशा लोकांना ही गोष्ट केवळ निष्ठुर कृत्यांपुरतीच लागू होत नाही, तर ‘कृपया, मला वाईट वाटते, मला क्षमा करा, आभारी आहे, मी तुमच्यासाठी दरवाजा उघडतो, माझ्या जागेवर बसा, मला तुमची ती सामानाची पिशवी घेऊ द्या’ या साध्या व दररोजच्या चांगल्या गोष्टींनाही लागू होते हे उघड आहे. या व इतर प्रकारच्या संज्ञा मऊ वंगणासारख्या आहेत, ज्या मृदूपणा देतात व आमचे नातेसंबंध सुखावह करतात. परंतु मी-पणा असणारा व्यक्ती आक्षेप घेऊन म्हणेल, ‘इतरांबद्दल शिष्टाचार दाखवायचा म्हणजे माझी जीवनशैली व माझी पहिल्या क्रमांकावर असणारी छबी यावर घातक परिणाम होणार.’
समाजशास्त्रज्ञ जेम्स क्यू. विल्सन वाढत्या चकमकी व गुन्हेगारीच्या वागणूकीचा दोष ज्याला आज “तिरस्काराने ‘मध्यम वर्गीय मूल्ये’” म्हटली जातात त्यांच्या पतनाला देतात. तो अहवाल पुढे म्हणतो: “या मूल्यांचा अंत—आणि नैतिक सापेक्षतेची वाढ—या गोष्टी वाढत्या गुन्हेगारीच्या संदर्भात एकमेकांशी पूरक आहेत असे दिसते.” हेच, स्वत्वाच्या वक्तव्यावर, मग ते कितीही वाईट वा दुःखदायक असले तरी त्यावरील कोणताही निर्बंध झुगारून देण्याच्या आधुनिक प्रवृत्तीशी खात्रीने संबंधित आहे. हेच आणखी एक समाजशास्त्रज्ञ, जारड टेलर यांनी म्हटले त्याप्रमाणे, “आमचा समाज हा आत्मसंयमनापासून ते स्वत्वाप्रत अविचलपणे वाहवत गेला आहे आणि पुष्कळ लोक जुन्या चालीच्या मूल्यांना दडपशाही या नावाखाली धुडकावत आहेत.”
सापेक्षता आचरणे म्हणजे तुम्हीच तुमच्या वागणूकीचे न्यायाधीश होता, दुसऱ्यांच्या व देवाच्या देखील निर्वाळ्याकडे दुर्लक्ष करता. तुमच्यासाठी बरोबर व चुकीचे काय ते स्वतःच ठरवता. हेच एदेनातील पहिल्या जोडप्याने केले. त्यांनी देवाचा हुकूम अवमानून स्वतःसाठी बरोबर व वाईट हे स्वतःच निवडले. सर्पाने हव्वेची असे म्हणून भुलवणूक केली की, तिने आज्ञाभंग करून मना केलेले फळ खाल्ले तर त्यामुळे असे काही घडेल असे त्याने म्हटले: “तुमचे डोळे उघडतील, आणि तुम्ही देवासारखे बरेवाईट जाणणारे व्हाल.” या कारणामुळे हव्वेने त्या फळाचा काही भाग खाल्ला आणि मग ते आदामाला दिले व त्यानेही ते खाल्ले. (उत्पत्ती ३:५, ६) आदाम व हव्वेने खाण्याबद्दल घेतलेला हा निर्णय त्यांच्यासाठी विनाशी व त्यांच्या संतानासाठी आपत्तीजनक ठरला.
राजकारणी मुत्सद्दी, व्यापारी, खेळाडू, शास्त्रज्ञ, एक नोबेल पारितोषिक विजेता आणि एक पाळक यांच्यातील भ्रष्टाचाराबद्दलचा प्रदीर्घ सारांश संपवल्यावर हावर्ड बिझनेस स्कूलपुढे भाषण देणाऱ्या एका परीक्षकाने म्हटले: “आज आपण आपल्या देशात, ज्याला मी चारित्र्यावर आलेले संकट असे म्हणेन त्याचा अनुभव घेत आहोत. पश्चिमी संस्कृतीद्वारे सांप्रदायिकरित्या गृहीत धरलेल्या आणि स्वतःमधील लाजिरवाण्या प्रवृत्तींचे लाड पुरवण्यापासून आळा घालणाऱ्या अंतर्गत प्रतिबंधाला व अंतर्गत सद्गुणांना आम्ही मुकलो आहोत. अशा या वातावरणात शौर्य, सन्मान, कर्तव्य, जबाबदारी, सहानुभूती, दाक्षिण्य जे बहुतेक अपरिचित वाटतील—बहुतेक अप्रचारात जमा झालेले दिसतील,” अशा शब्दांबद्दल ते बोलले.
एकोणिसशे साठच्या दशकात विद्यालयीन आवारात काही वादविषय उद्भवले. पुष्कळांनी म्हटले, की ‘देवच नाही, देव मेला आहे, काहीच नाही, उत्कृष्ट मूल्ये नाहीत, जीवन अगदीच अर्थशून्य आहे, जीवनाची ही व्यर्थता तुम्ही केवळ आपल्या शौर्यत्वाद्वारे जिंकू शकता.’ याद्वारे हिप्पींना पुढे जाण्याचा संकेत मिळाला आणि ‘कोकाईन हुंगणे, गांजा, मुक्त लिंगाचार, आणि व्यक्तिगत शांतीचा शोध’ या गोष्टींद्वारे जीवनातील व्यर्थतेवर मात करण्यासाठी ते पुढे निघाले. त्यांना व्यक्तिगत शांती कधीच मिळाली नाही.
शिवाय साठीच्या दशकात संघटित चळवळी देखील होत्या. छंद म्हणण्यापेक्षा त्यांना अमेरिकी संस्कृतीच्या बहुसमाजाने कवटाळले व हे सत्तरीच्या मी-पणाच्या दशकात परिणामित झाले. अशाप्रकारे, आम्ही टॉम वुल्फे या सामाजिक टिकाकाराने म्हटले त्याप्रमाणे, “मी-दशकात” प्रवेश केला. ऐंशीच्या दशकापर्यंत याची वाढ झाली व याला काहींनी उपहासात्मकपणे “लोभाचे सुवर्णयुग” म्हटले.
या सर्वांचा शिष्टाचाराशी काय संबंध येतो? तो स्वतःला प्रथम ठेवण्याशी आहे. तुम्ही स्वतःला पहिले ठेवले तर इतरांपुढे तुम्ही सहजपणे नमत नाही, तुम्हाला इतरांना प्रथम ठेवता येत नाही, दुसऱ्यांबद्दल चांगला शिष्टाचार दाखवता येत नाही. स्वतःला प्रथम ठेवल्यामुळे तुम्ही कदाचित आत्म-भक्ती, माझी भक्ती या प्रकाराला आचरत असाल. बायबल, असे करणाऱ्यांपैकी काहींचे वर्णन कसे करते? ते म्हणते की, “लोभी, हा मूर्तिपूजक आहे,” आणि दाखवते की, “लोभ—ह्याला मूर्तिपूजा म्हणावे.” (इफिसकर ५:५; कलस्सैकर ३:५) असे लोक खरेपणाने कोणाची भक्ती करतात? “पोट हे त्यांचे दैवत.” (फिलिप्पैकर ३:१९) स्वतःसाठी नैतिकदृष्ट्या उचित समजून ज्यांनी अत्यंत खराब अशी जीवनशैली निवडली आहे ती, आणि त्या जीवनशैलीचे विध्वंसकारी, मरणप्राय परिणाम केवळ यिर्मया १०:२३ ची सत्यता वदवीत आहेत: “हे परमेश्वरा [यहोवा, NW] मला ठाऊक आहे की, मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्या मनुष्याच्या हाती नाही.”
बायबलने हे सर्वकाही आधीच अवलोकिले होते आणि ‘शेवटल्या काळातील’ ईशारेवजा घटक म्हणून २ तीमथ्य ३:१-५ मध्ये न्यू इंग्लिश बायबलनुसार ही माहिती दिली: “तुला या वस्तुस्थितीला तोंड द्यावे लागेल: शेवटल्या दिवसांमध्ये संकटाचे समय येतील. कारण लोक केवळ स्वतःवर आणि स्वतःच्या पैशावरच प्रेम करतील. ते गर्विष्ठ, बढाईखोर, देवाचा उपहास करणारे, मातापित्यांची अवज्ञा करणारे व त्यांच्याशी कृतघ्न होणारे, असे पूर्णपणे अधम होतील. ते ममताहीन, फिरुन मैत्री संपादन करता न येणारे, द्वेष करणारे, चहाड्या करणारे, आत्मसंयमन न राखणारे, क्रूर, चांगल्याचा द्वेष करणारे, विश्वासघातकी, बेपर्वा, अहंकारी, देवाऐवजी सुखोपभोगावर प्रीती करणारे, असे होतील. ते धार्मिकपणाचा देखावा करतील. परंतु त्यांच्या आचरणात धर्माची सत्यता व्यक्त होणार नाही. अशा सर्व लोकांपासून दूर राहा.”
आपली निर्मिती ज्यासाठी करण्यात आली—देवाचे प्रतिरुप व त्याची सदृश्यता—यापासून आपण बरेच दूर गेलो आहोत. आपल्यामध्ये अद्यापही प्रेम, बुद्धी, न्याय व सामर्थ्य यासारखे संभाव्य गुण आहेत; पण ते असमतोल व विकृत झाले आहेत. यापासून मागे परतण्याचे पहिले पाऊल वर उद्धृत केलेल्या बायबलमधील वचनाच्या शेवटल्या वाक्यात स्पष्ट करण्यात आले आहे: “अशा सर्व लोकांपासून दूर राहा.” नव्या वातावरणाचा शोध घ्या, असे की, जे तुमच्या अंतर्गत भावनांमध्ये देखील परिवर्तन घडवू शकेल. याबद्दलचे बोधप्रद असे सुज्ञ बोल पुष्कळ वर्षांआधी डॉरथी थॉम्पसन यांनी स्त्रियांचे गृह नियतकालिक (इंग्रजी) मध्ये लिहिले आहेत. त्यांच्या अवतरणाची सुरवात म्हणते की, बाल गुन्हेगारीला आळा घालायचा असेल तर युवकाच्या बुद्धिमत्तेपेक्षा त्याच्या भावनांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे:
“मूल या नात्याने तो करीत असलेल्या हालचाली व दाखवत असलेल्या प्रवृत्ती त्याच्या प्रौढ हालचाली व प्रवृत्तींना निश्चित करतात. हे त्याच्या बुद्धिमत्तेने नव्हे तर त्याच्या भावनांद्वारे प्रेरित होत असते. त्याला ज्यावर किंवा ज्याबद्दल प्रेम, कौतुक, भक्ती, काळजी व त्याग करण्याचे शिकवले आणि उत्तेजन दिले जाते, तसा तो बनतो. . . . या सर्व बाबतीत शिष्टाचार महत्त्वाची भूमिका पार पाडतो, कारण चांगला शिष्टाचार इतरांबद्दल विचारशीलता प्रकट करणे यापेक्षा अधिक काही नाही. . . . बाह्य स्वभावाद्वारे आंतरिक भावनांचे प्रदर्शन होते; तथापि, बाह्य स्वभाव हा सुद्धा अंतर्गत भावना वाढीस लावण्याकरता कारणीभूत ठरतो. विचारपूर्वकता राखून कृती आचरली जाते तेव्हा त्यात आक्रमकपणा नसतो. चांगला शिष्टाचार सुरवातीला वरपांगी असेल. पण तो तसा नेहमी राहत नसतो.”
त्यांनी याचेही परीक्षण केले की, काही अपवाद वगळता, चांगुलपणा व वाईटपणा हा “मेंदूद्वारे नव्हे तर भावनांद्वारे घडवला जातो” आणि “गुन्हेगार रक्तवाहिन्यांमुळे नव्हे तर हृदय कठीण होण्यामुळे बनतात.” त्यांनी आणखी असा भर दिला की, मनापेक्षा बहुतांशी भावना आपल्या वागणूकीवर प्रभूत्व राखतात आणि आपल्याला ज्या पद्धतीने शिकवण्यात येते, आपण जसे वागतो, जरी सुरवातीला जबरदस्तीने करावे लागले, तरी ते आपल्या अंतर्गत भावनांवर प्रभाव पाडते आणि आपले हृदय बदलवते.
तथापि, आपल्या अंतःकरणातील जे आंतरिक मनुष्यपण आहे त्याला बदलण्याच्या बाबतीत प्रेरित सूत्र देण्यामध्ये बायबल श्रेष्ठ ठरते.
प्रथम, इफिसकर ४:२२-२४: ‘तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना मनुष्य त्याचा तुम्ही त्याग करावा, जो कपटाच्या वासनांनी युक्त आहे . . . तुम्ही आपल्या मनोवृत्तीत नवे केले जावे आणि सत्यापासून निर्माण होणारे नीतिमत्त्व व पवित्रता ह्यांनी युक्त असा देवसदृश निर्माण केलेला नवा मनुष्य धारण करावा.’
दुसरे, कलस्सैकर ३:९, १०, १२-१४: “तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतींसह काढून टाकले आहे; आणि जो नवा मनुष्य, आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्याला तुम्ही धारण केले आहे. तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहा, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा; एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरूद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा; प्रभूने [यहोवा, NW] तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही करा; पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीति ती ह्या सर्वांवर धारण करा.”
वील ड्युरंट या इतिहासकारांनी म्हटले: “आमच्या काळातील सर्वात मोठा प्रश्न कम्युनिस्ट मतप्रणाली की व्यक्तीवाद, युरोप की अमेरिका, शिवाय पूर्व की पश्चिम हा नव्हे; तर लोक देवाशिवाय राहू शकतील का हा आहे.”
आपल्याला यशस्वीरित्या जीवन जगता यावे म्हणून देवाच्या सल्ल्याकडे लक्ष दिले पाहिजे: “माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको, तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागोत; कारण त्यांपासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धि व कल्याण ही तुला प्राप्त होतील. दया व सत्य ही तुला न सोडोत; त्यांची माळ तू आपल्या गळ्यात वागीव; त्यांस आपल्या हृत्पटलावर लिहून ठेव; म्हणजे तुला देव व मनुष्य यांजकडून अनुग्रह व सुकीर्ति ही प्राप्त होतील. तू आपल्या अगदी मनापासून [हृदय, NW] परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको; तू आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.”—नीतीसूत्रे ३:१-६.
अशाप्रकारे, शतकानुशतकांचे दयावंत व विचारशील असे चांगले शिष्टाचार अडथळा आणणाऱ्या नकोशा वस्तूसारखे खरेच नाहीत, तसेच राहणीमानासाठी बायबलची मार्गदर्शक तत्त्वे मुळीच जुनी व टाकाऊ बनलेली नाहीत, तर ती मानवाच्या चिरकालिक तारणासाठी उपयुक्त असल्याचे सिद्ध होईल. यहोवाशिवाय मानवजात जिवंत राहणे शक्यच नाही, कारण ‘जीवनाचा झरा यहोवाजवळ आहे.’—स्तोत्र ३६:९. (g94 7/22)
[११ पानांवरील संक्षिप्त आशय]
आपण जसे वागतो, जरी सुरवातीला जबरदस्तीने करावे लागले, तरी ते आपल्या अंतर्गत भावनांवर प्रभाव पाडते आणि आपले हृदय बदलवते
[१० पानांवरील चौकट]
लोक अनुकरण करू शकतील असा भोजनप्रसंगीचा निर्दोष शिष्टाचार
बेरी या छोट्या पिकलेल्या फळांनी बहरलेल्या झुडुपात लांब तुऱ्याच्या पक्ष्यांची सुंदर, एकत्रितपणे शिष्टाचारयुक्त अगदी खेळीमेळीची जेवणावळ होत आहे. एका फांदीवर एक रांग आहे, ते फळे खात आहेत, पण अधाशीपणाने मुळीच नाही. चोचीने ते एक फळ एकमेकांना देतात, आणि शेवटी एखादा ते गिळून टाकतो. ते आपल्या “मुलांना” कधीच विसरत नाहीत, उघडलेली सर्व मुखे खाऊन तृप्त होईपर्यंत ते एकेक फळ तोडून सतत अन्न आणीत राहतात.
[चित्राचे श्रेय]
H. Armstrong Roberts
[८ पानांवरील चित्र]
काही म्हणतात: ‘बायबल व नैतिक मूल्यांना कचऱ्यात टाका’
[९ पानांवरील चित्र]
“देव मेलेला आहे”
“जीवनाला काही अर्थ नाही!”
“गांजा ओढा, कोकाईन हुंगत राहा”
[७ पानांवरील चित्राचे श्रेय]
Left: Life; Right: Grandville